स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन

स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन

बाभळीच्या खाली पोहचलो तर खाली एक पक्ष्याच पिल्लू अधूनमधून चोच उघडत आवाज करत होत. ते पिल्लू जिथं पडलेलं होत त्याच्या बरोबर वर स्वर्गीय नर्तकाचे तुटलेलं घरटं होत शिवाय पिल्लाच्या पाठीवर लालसर तपकिरी पंख पण होते म्हणजे नक्कीच ते वरच्या स्वर्गीय नर्तकाच्या घरट्यातून खाली पडलेलं होतं. बाजूला घाणेरीच्या झुडपात अजून एक पिल्लू आवाज करत होते तेही स्वर्गीय नर्तकाचेच होतं.

पक्ष्यांच्या आवाजाची किमया
चिगा (सुगरण)
धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव

हतनूर धरणाच्या कालव्याच्या काठावर बाभळीच्या एकाच झाडावर स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher), हळद्या (Indian Golden Oriole) आणि कोतवाल (Drongo) यांनी घरटं केलेलं असल्याचे सौरभने मला सांगितले. या तीनही पक्षांचे घरटे मी कधीच पाहिलेले नसल्याने २१ जुलै २०१९ ला संध्याकाळी ५ वाजता सौरभ आणि मी, कालव्यावर पोहचलो, पुलावर गाडी उभी करून पुलावरून दुर्बिणीतून बाभळीचे झाड पाहिले. स्वर्गीय नर्तक, हळद्या, कोतवालचे घरटे पक्ष्यांची वापरून सोडून दिले वाटत होते. बाजूला निंबाच्या झाडावर पण स्वर्गीय नर्तकाचे घरटे असल्याचं सौरभ सांगत होता. जवळून बघावे म्हणून दोघेही कालव्याच्या काठावर खाली उतरलो. खाली उतरताच निंबाच्या झाडावर स्वर्गीय नर्तकाचे घरटे दिसले. निंबाच्या फांदीवर जमिनीपासून अंदाजे १०-११ फुटांवर निमुळते वाटीच्या आकाराचे घरटे फांदीवरच्या २ काड्यांच्या मध्ये बांधलेले होते. त्यात ४ पिल्लं पण दिसत होती. तेवढ्यात लालसर तपकिरी (rufous) रंगाची मादी बाजूच्या झाडावर येऊन बसली, तिच्या चोचीत पिल्लांना भरवण्यासाठी चारा होता पण आम्हाला पाहून ती घरट्याकडे येत नव्हती मग आम्ही त्या निंबाच्या झाडापासून थोडं दूर चालत गेलो. लगेच मादी आली आणि तिने पिल्लांना चारा भरवला आणि नवीन भक्ष्य शोधायला उडून गेली. निंबाच्या झाडापासून २५-३० फुटांवर अगदी कालव्याला लागून बाभळीचे झाड आहे. त्याच्या एका फांदीवर पण स्वर्गीय नर्तकाचे घरटं आहे म्हणून सौरभने इशारा केला पण ते घरटं तुटलेलं दिसलं.

बाभळीच्या खाली पोहचलो तर खाली एक पक्ष्याच पिल्लू अधूनमधून चोच उघडत आवाज करत होत. ते पिल्लू जिथं पडलेलं होत त्याच्या बरोबर वर स्वर्गीय नर्तकाचे तुटलेलं घरटं होत शिवाय पिल्लाच्या पाठीवर लालसर तपकिरी पंख पण होते म्हणजे नक्कीच ते वरच्या स्वर्गीय नर्तकाच्या घरट्यातून खाली पडलेलं होतं. बाजूला घाणेरीच्या झुडपात अजून एक पिल्लू आवाज करत होते तेही स्वर्गीय नर्तकाचेच होतं. ते थोडं मोठं आणि मजबूत असल्याने झुडपात सरकत गेलेलं वाटत होतं.

कालव्यावर झुकलेल्या फांद्यावर हळद्याचे आणि त्याच्या वर कोतवालाचे रिकामे घरटे दुर्बिणीतून पाहत असताना फांदीवर सरकताना एक बारीक-लांब साप दिसला. झाडावर आढळणारा नानेटी जातीचा (Striped Keelback) साप वाटत होता, पण त्या सापाचा आकार बघता घरट्याची ही अवस्था करू शकेल असे वाटत नव्हते. बराच वेळ झाला पण तिथं या पिल्लांचे पालक पण दिसत नव्हते, घरी घेऊन जावं म्हणून शेवटी दोन्ही पिल्लांना उचलून घेतले, दुर्बिणीच्या बॅगेत ठेवले. घरी जाताना वाटेत मासे विक्रेत्याकडून माशांच्या पोटातील अंडी घेतली. संध्याकाळ होत आलेली होती आणि अळ्या शोधणे शक्य नव्हते तेव्हा प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेली मासळीची अंडी त्यांना खाऊ घालायचे ठरवले. आमचे मित्र आणि पक्षी अभ्यासक श्री अनिल महाजन यांच्या घरी गेल्यावर त्यांनी कृत्रिम घरटे तयार करून त्यात पिल्लं ठेवून जिथं पिल्लं सापडली त्या झाडावर टांगून देण्याचा सल्ला दिला. पण आम्ही तिथं बराच वेळ होतो, दोन्ही पिल्लंही सलग आवाज करत होती पण तिथं पालक पक्षी दिसून आले नाहीत, त्यामुळे त्यांना पुन्हा तिथं सोडलं तर ते वाचतील की नाही याची शंका होती. आता जर पिल्लांनी काही खाल्लं तर ते वाचतील म्हणून चिमट्याच्या मदतीने मासळीची अंडी त्यांच्या चोचीसमोर धरली तर त्यांनी लगेच चोच मोठी करून तोंड उघडले. खाद्य भरवताच दोन्ही पिल्लांची त्यांची विष्ठा (fecal sac) बाहेर टाकली.

पिल्लांच्या विष्ठेने घरटे खराब होऊन जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून निसर्गाने फार उत्तम नियोजन केलेले आहे. पालक पक्षी जेव्हा पिल्लांना चारा भरवतात तेव्हाच पिल्लू त्याची विष्ठा एका पारदर्शक पिशवीत बांधून बाहेर टाकते मग पालक पक्ष्याला ती बंद विष्ठेची पिशवी (fecal sac) चोचीत पकडून घरट्या बाहेर टाकणे सोपं होते.

दोन्ही पिल्ले माशांची अंडी खाल्ल्यावर सुस्त पडली आणि माना खाली करून डोळे बंद करून पडून राहली. सौरभने त्याचे पुण्यातील शिक्षक व पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडेंना फोन लावला त्यांनी पण पिल्लांना कृत्रिम घरट्यात ठेवून त्यांच्या आधीच्या घरट्याजवळ सोडून द्यायचे सांगितले. खाद्य भरवून पाचेक मिनिट होत नाहीत तर दोन्ही पिल्लांनी खाल्लेलं बाहेर ओकून दिले. मत्स्य अंडी त्यांचे मुळात नैसर्गिक खाद्य नाहीच. अळ्या शोधणे बरंच कठीण काम आहे तर आता यांना खाऊ काय घालणार? आणि किती दिवस? शिवाय “अशी पिल्लं जास्त दिवस जगत नाही, मी बरेच प्रयत्न आणि प्रयोग केलेले आहेत”, असंही अनिल महाजन बोलले. बरं समजा पिल्लं जगली तरी त्यांचे पालक पक्षी जे त्यांना जीवन शिक्षण देतात ते तर आपण देऊच शकत नाही हाही विचार माझ्या मनात येऊन गेला. कालव्याच्या काठावरच निंबाच्या झाडावर पिल्ले असलेले स्वर्गीय नर्तकाचेच अजून एक घरटे होते पण त्यात आधीच ४ पिल्लं असल्याने ह्या दोन पिल्लांना त्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी कृत्रिम घरटे तयार करून त्यांना पुन्हा मूळ जागेवर सोडायचा विचार केला.

संध्याकाळ बरीच झाल्याने रात्र पडायच्या आत कालव्याच्या काठावर पोहचायचे असल्याने घाईघाईने घरटे तयार केले. एक प्लास्टिकची वाटी घेऊन त्यात खाली कापूस टाकला त्यावर एक कपडा अंथरून त्यावर दोन्ही पिल्लांना ठेवले. अनिल महाजनांनी लगेच तारेच्या साहाय्याने शिंकाळे तयार केले, त्यात वाटी ठेवली, जाड तार घेऊन तो वाकवून त्याचा हुक तयार केला.

घरटे टांगण्यासाठी तोंडाशी हुक असलेला लांब पाईप सौरभने घेतला  आणि आम्ही दोघे पुन्हा कालव्याच्या काठावर पोहचलो. आधीच घरटं जिथं होत त्याच्या जवळच कृत्रिम घरटं टांगण्याची जागा निश्चित केली पण घरून आणलेला पाईप छोटा पडत होता मग सौरभने एक काडी शोधली, ती पाईपमध्ये खालून खोचून त्याची लांबी वाढवली. जुन्या तुटलेल्या घरट्याला लागूनच कृत्रिम घरटं व्यवस्थित टांगलं. या पिल्लांचे पालक येथे नक्कीच येतील अशी आशा बाळगत घरी आलो.

सौरभ दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला जाणार होता मात्र मी, विठ्ठल भरगडे आणि विलास महाजन यांच्या सोबत पक्षी निरीक्षणासाठी सकाळी जाणार होतोच तर आम्ही कालव्याच्या काठावर जायचं ठरवलं. पुलावर उभं राहून दुर्बिणीतून घरटं पाहिलं तर दोन्ही पिल्लं जिवंत होती आणि त्यांच्या पालकांनी चारा भरावा म्हणून अधूनमधून चोची उघडत माना उंचावत होती. दोन्ही पिल्लं जिवंत पाहून बरं वाटलं. पाचेक मिनिट उभं राहिलो तर लालसर तपकिरी रंगाचा नर उडत घरट्या जवळ आला आणि त्याने पिल्लांना भरवलं आणि पुन्हा भक्ष्य आणायला उडून गेला. ते दृश्य फारच सुखद होत, दोन्ही पिल्लांचा जीव वाचला, शिवाय स्वर्गीय नर्तकाच्या एका जोड्याची या वर्षीच्या वीण यशस्वी होताना पाहणे फारच समाधानकारक होत.

विलास महाजन यांचा कॅमेरा वापरून नराला पिल्लांना खाद्य भरवतानाचे चांगले फोटोही मिळाले. विलास महाजन मागच्या महिन्यात इथं आले असताना त्यांना स्वर्गीय नर्तकाची मादी घरट्यात अंडी उबवतानाचा फोटो पण मिळाला होता तोही कॅमेरात त्यांनी दाखवला. बाजूला निंबाच्या झाडावर ४ पिल्लं असलेलं घरटं पण न्याहाळलं. नर-मादी दोघेही चारी पिल्लांना लगबगीने भरवत होती. त्यातला नर पांढऱ्या रंगाचा (White morph) होता तर घरटं तुटलेला नर मात्र लालसर तपकिरी रंगाचा (Rufous morph) होता. आम्ही तिघांनीही परिसरात एखादा तास पक्षीनिरीक्षण केलं. घरी जाताना पुन्हा काही वेळ पुलावरून घरट्याचं निरीक्षण केले. केवळ नर पिल्लांना भरवताना दिसत होता. मादी एकदाही दिसली नाही. इकडे ३-५ दिवस चकरा माराव्या लागतील हे मनाशी ठरवून घरी आलो. या सगळया प्रकारात एक चूक आमच्याकडून झाली. कृत्रिम घरटे तयार करताना जी प्लस्टिकची वाटी वापरली ती बऱ्यापैकी खोल होती शिवाय आम्ही त्याला खालून २-३ छिद्र पाडायचे विसरलो कारण पावसाळ्याचे दिवस असल्याने जास्त पाऊस झाला तर वाटीत पाणी जमा होऊन वाटी तुडुंब भरू शकते आणि हे पिल्लांसाठी हानिकारक ठरू शकते. पिल्लांच्या सुदैवाने २ दिवस झाले पाऊस पडला नाही अजून ५-६ दिवसात पिल्लं मोठी होऊन घरट्या बाहेर राहू शकतील. २६ जुलैला घरट्याकडे चक्कर मारली तर पिले घरट्यात नव्हती.

मात्र कालव्याच्या काठावरच्या झुडपांमध्ये दोन्ही बसलेली दिसून आली. पालक पक्षी त्यांना अधूनमधून चारा भरवताना दिसून आले. अशा रीतीने कृत्रिम घरट्याच्या माध्यमातून बेघर झालेल्या स्वर्गीय नर्तकाच्या २ पिल्लांचं यशस्वी पुनर्वसन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

राजपालसिंग आधारसिंग राजपूत, भुसावळ येथे भारतीय डाक विभागाच्या रेल्वे डाक सेवेत कार्यरत असून चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य आहेत.

(सर्व छायाचित्रे – राजपालसिंग आधारसिंग राजपूत)

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास फॉर्म भरा.

NatureNotes

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0