नाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…

नाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…

डॉ. श्रीराम लागू - माझ्या वैद्यकीय व्यवसायात मला नाक, कान, घशाच्या फक्त निरनिराळ्या व्याधींचाच विचार करावा लागे, इथे नटाच्या दृष्टिकोनातून स्वरसाधनेचा, उच्चारसाधनेचा विचार मांडलेला होता. ती मांडणी सहा व्याख्यानांत करणे मुळीच कठीण नव्हते.

मी आणि ‘गिधाडे’
माझं बुद्धिप्रामाण्य – श्रीराम लागू
साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड

मी इंग्लंडहून नुकताच परत येऊन पुण्यात प्रॅक्टिसला लागलो होतो. एक दिवस अचानक के. नारायण काळे माझ्यापुढे येऊन उभे राहिले. काळे म्हणजे नाट्य-चित्रपट-साहित्य क्षेत्रात अधिकाराने संचार केलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. माझी काही नाटके त्यांनी पाहिली होती. माझ्या अभिनयाबद्दल त्यांचे बरे मत होते. मला म्हणाले, ‘बंगलोरला सुप्रसिद्ध नाटककार आद्य रंगाचार्य तिथल्या माध्यमिक शिक्षकांसाठी एक मोठे नाट्यशिबीर घेताहेत. तिथे जाऊन तू ‘व्हॉईस न् स्पीच’वर सहा दिवसांत सहा व्याख्याने द्यायची आहेत. दीड तासाचे एक अशी सहा व्याख्याने इंग्रजीत.’

मी म्हणालो, ‘हे कसे शक्य आहे? मला या विषयातले काहीच माहीत नाही. किंबहुना असा काही विषय नाट्यशास्त्रात असतो आणि तो शिकवला जातो, हेच मला माहीत नाही.!’

काळे एकदम फुस्कारले, ‘माहीत नाही- तर माहीत करून घे! तू नट आहेस, तुझा आवाज चांगला आहे आणि तू नाक-कान-घशाचा तज्ज्ञ आहेस. हा विषय तुला माहीत असायलाच हवा!’ आणि अचानक आले तसेच ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले. आले ते हातात चार इंग्रजी पुस्तके घेऊन आले. पुस्तके माझ्यासमोर टाकून म्हणाले, ‘हे वाच. अजून महिना आहे बंगलोरला जायला. तेवढ्यात नक्कीच वाचून होतील. मी आद्यांना कळवतो, तू येतो आहेस म्हणून!’ आणि मला तोंड उघडायलाही वेळ न देता निघून गेले.

मी काही काळ अवाक बसून राहिलो. कॅलेंडरकडे पाहिले. जवळजवळ पाच आठवडे मला तयारीला मिळणार होते. पुस्तके फार जाड नव्हती. सगळी मिळून फार तर पाच-सहाशे पानांचा ऐवज होता. निरनिराळ्या लेखकांची एकाच विषयावरची पुस्तके असल्याने पुनरुक्ती बरीच असणार. प्रत्येक पुस्तकात आकृत्याही बऱ्याच होत्या. पाच आठवड्यात सहा व्याख्यानांची तयारी होऊ शकणार होती. आणि आता माघार घेणे अशक्यच होते.

मी कामाला लागलो.

आपला आवाज कसा निर्माण होतो, त्याचे गुणधर्म काय असतात, आवाज जिथे निर्माण होतो त्या स्वरयंत्राची रचना कशी असते, ज्या श्वासापासून आवाज निर्माण होतो, त्या श्वासाचा व्यवहार करणाऱ्या श्वसनसंस्थेची रचना कशी असते,तिचे कार्य कसे चालते, नटाने आवाज सुधारावा म्हणजे काय करावे, आवाजापासून शब्द कसा तयार होतो, स्पष्ट शब्दोच्चार कसा करावा, शब्दफेक नेमकी आणि पल्लेदार करण्याकरिता काय करावे आणि मुख्य म्हणजे हे सारे कशाकरिता करावे, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा साऱ्या पुस्तकांतून होत होता. मेडिकल कॉलेजमध्ये असल्यापासून जवळजवळ पंधरा वर्षे मी या विषयाशी संबंधित असल्याने विषय समजण्यात काहीच अडचण आली नाही. माझ्या वैद्यकीय व्यवसायात मला नाक, कान, घशाच्या फक्त निरनिराळ्या व्याधींचाच विचार करावा लागे, इथे नटाच्या दृष्टिकोनातून स्वरसाधनेचा, उच्चारसाधनेचा विचार मांडलेला होता. ती मांडणी सहा व्याख्यानांत करणे मुळीच कठीण नव्हते.

महिनाभरात मी सहा व्याख्याने तयार केली. बंगलोरच्या शिबिरार्थीच्या समोर ती व्याख्याने दिली. व्याख्यानांसोबत काही छोटे-मोठे व्यायाम शिबिरार्थींकडून करून घेतले. एकूण माझा पहिलाच प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला, असे म्हणायला हरकत नाही. हे सारे करताना एक विचार सतत त्रास देत होता, तो हा की आपण देत असलेल्या या व्याख्यानात आवाज सुधारण्याकरिता, दमसास वाढवण्याकरिता, शब्दोच्चार स्पष्ट करण्याकरिता जे निरनिराळे व्यायाम सांगितलेले आहेत, त्यातले कोणतेच आपण जाणीवपूर्वक केलेले नाहीत! ते केले पाहिजे. मग बंगलोरहून आल्यावर त्या साऱ्या साधनेचे प्रयोग मी स्वत:वर नेमाने आणि काटेकोरपणे करू लागलो. या विषयावरची आणखी पुस्तके वाचत राहिलो. अगदी सातत्याने.

त्या काळी मी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ‘हौशी’ नट म्हणून पुण्याच्या पी.डी.ए. या नाट्यसंस्थेत वसंत कानेटकरांच्या ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकात काम करत होतो. नाटकात कामे करायला लागून मला दहा-बारा वर्षे झाली होती. ‘हौशी’ नट असल्यामुळे नाट्यप्रयोग संख्येने खूपच कमी होत असत. गदी शिकस्त म्हणजे आठवड्याला एखादा प्रयोग. पण ‘वेड्याचं घर’ खूप लोकप्रिय झाले आणि काही वेळा त्या नाटकाचे शनिवार-रविवार असे लागोपाठ दोन प्रयोग करावे लागत. अशा वेळी दुसऱ्या प्रयोगानंतर माझा आवाज साफ बसून जात असे!

अर्थात नंतर आठवडाभर प्रयोग नसल्याने बसलेला आवाज एक-दोन दिवसांत सुटतही असे. त्यामुळे मी (नाक-कान-घशाचा तज्ज्ञ असूनही!) बसलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत असे.

बंगलोरहून परतल्यावर मी नेटाने स्वरसाधनेच्या मागे लागलो आणि दोन महिन्यांतच मला फायदा दिसू लागला. माझा आवाज बसायचा पार थांबला. पुढे सात-आठ वर्षानंतर मी व्यावसायिक नट झालो, तेव्हा मला रोज प्रयोग करावे लागत, कधी कधी तर एका दिवसात तीन-तीन प्रयोग करावे लागत (आणि ‘काचेचा चंद्र’, ‘नटसम्राट’, ‘गिधाडे’, ‘हिमालयाची सावली’ असली पिळून काढणारी नाटके!) पण माझा आवाज बसल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे प्रयोग रद्द करावा लागला, असा एकही प्रसंग आला नाही. यात प्रौढी नाही. हे कोणालाही साध्य आहे. साधना मात्र करायला पाहिजे. गायकाला जसा रियाझ आयुष्यभर आवश्यक आहे, तसाच तो नटालाही आहे. माझ्या वैयक्तिक अनुभवाचे हे एवढे चऱ्हाट थोड्या विस्ताराने अशासाठी वळले की, वाचिक अभिनय हे मी लिहिलेले छोटे पुस्तक म्हणजे एका तांत्रिक विषयावरचा एखादा विद्वत्ताप्रचुर प्रबंध नव्हे. थोडेफार ज्ञान आणि बराचसा अनुभव यांच्या मिश्रणातूनच ही एक मार्गदर्शिका निर्माण झाली.

नाटकामध्ये अभिनयाबरोबरच संवादाला महत्त्व असते. ते संवाद म्हणताना आवश्यक असलेली आवाजाची पट्टी आणि इतर काही गोष्टीही आवश्यक असतात.

‘नटसम्राट’ या नाटकात दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला पुढील संवाद आहे :

अप्पा : गेली.

कावेरी : कुठली गाडी होती ती?

अप्पा : दिल्लीला जाणारी, सतार अप्.

मुलाच्या घरी अपमानित होऊन अप्पा आणि कावेरी घर सोडून निघून गेलेत आणि आगगाडीने मुलीच्या गावी पोचलेत. मुलगी, जावई स्टेशनवर घ्यायला येतील म्हणून वेटिंग रूममध्ये वाट पाहात बसलेत. अप्पा मधून मधून फलाटावर जाऊन जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पाहताहेत.

नाटकाचे अनेक प्रयोग मी हे संवाद छापलेत तसेच म्हणत होतो. नाटक खूपच लोकप्रिय झाले होते. पण ‘अप्पा बेलवलकर’ या भूमिकेचे सूक्ष्म धागेदोरे पिंजून काढण्याचे माझे काम संपले नव्हते. शंभरएक प्रयोगांनंतर एक दिवस अचानक माझ्या मनात विचार आला. अप्पा प्रथम ‘गेली’ म्हणाले, तेव्हा त्यांच्या मनात ‘गाडी’च होती का? का, जाणाऱ्या गाडीच्या एका डब्यात त्यांची अत्यंत लाडकी नात ‘ठमी’ दिसल्याचा त्यांना भास झाला होता ती ‘ठमी’ होती? ‘ठमी’ असण्याचा संभव अधिक होता. कारण तिला अत्यंत करुणास्पद अवस्थेत मागे सोडून, काळजावर धोंडा ठेवून ते मुलाचे घर सोडून बाहेर पडले होते. मनात ‘ठमी’चा आक्रोश दुमदुमत होताच आणि आता जाणाऱ्या गाडीच्या डब्यात दिसलेल्या ठमीचा भास इतका खरा वाटला होता की, ते जिवाची पर्वा न करता धावणाऱ्या गाडीमागे पळत सुटले होते. त्या हमालाने अडवले नसते, तर गाडीखालीच गेले असते! म्हणजे, आता ठमी कायमची गेली होती की काय? कावेरीला हे भास-प्रकरण काहीच माहीत नसल्याने तिच्या दृष्टीने ‘गेली’ हे नुकत्याच गेलेल्या गाडीला उद्देशूनच अप्पा उद््गारले होते आणि साहजिकच तिने विचारले, ‘कुठली गाडी होती ती?’

ही विचारमालिका मनात पक्की झाल्यावर मी संवाद म्हणण्याच्या पद्धतीत खालील बदल केला.

अप्पा : गेली! (तंद्रीत, अति विव्हल.)

कावेरी : कुठली गाडी होती ती? (सहज. काही तरी विचारायचे म्हणून)

अप्पा : अं? (दचकून)

कावेरी : कुठली गाडी होती?

अप्पा : …ओ… गाडी!  हां ती… सतरा अप, दिल्लीत जाणारी… (भानावर येऊन)

बदल प्रेक्षकांच्या दृष्टीने फार मोठा, लक्षणीय नव्हता. पण त्या सबंध प्रवेशात (अंक २ प्र. १) अप्पांची जी व्याकूळ, दोलायमान मन:स्थिती आहे, ती मला अगदी सुरुवातीलाच पकडता यायची आणि मग बाकीचा प्रवेश सोपा व्हायचा.

हा बारकावा मी कुठल्याशा लेखात लिहिला, तो वि. वा शिरवाडकरांनी वाचला आणि ते मला म्हणाले, ‘हे फारच सुंदर आहे; पण लिहिताना हे माझ्या मनात नव्हते!’

अप्पा बेलवलकरांचे भाषण पाठ करून ती भूमिका कोणीही ढोबळमानाने उभी करू शकेल. पण आशयातले असे सूक्ष्म बारकावे शोधून काढून त्यांना अभिव्यक्ती देण्याने भूमिका समृद्ध होत जाते. ‘बारकावे नाटकाच्या प्रेक्षकांच्या लक्षात येत नाहीत (जसे ते चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या लक्षात येतात)’ या चुकीच्या समजुतीने नाटकातील भूमिका बऱ्याच ढोबळपणे उभ्या केल्या जातात, पण हे खरे नाही.

एकएक सुटा बारकावा सर्वच प्रेक्षकांच्या लक्षात येत नसेल, पण अनेक बारकाव्यांनी नटलेल्या भूमिकेची समृद्धी प्रेक्षकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. भूमिकेला पोषक असा कुठलाही बारकावा-आशयाचा असो वा अभिनयाचा असो- जर लक्षात आला, तर त्याचा अंतर्भाव अभिव्यक्तीत करणे हे नेहमीच भूमिकेला समृद्ध देते. असा हा बारकाव्यांचा शोध नटाने शेकडो प्रयोग झाले तरी घेत राहिले पाहिजे.

(डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या वाचिक अभिनय या पुस्तकातील संपादित अंश. राजहंस प्रकाशनने वाचिक अभिनय या पुस्तकाची ऑगस्ट १९९८मध्ये प्रथमावृत्ती प्रसिद्ध केली.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: