रिलायन्स जिओला टॉवर उभारण्यासाठी पोलिस संरक्षण

रिलायन्स जिओला टॉवर उभारण्यासाठी पोलिस संरक्षण

“टॉवरमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होईल या भीतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही,” असे न्यायाधीश म्हणाले.

धर्म बदलला तरी जात बदलत नाहीः मद्रास हायकोर्ट
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटा अनिवार्य: हायकोर्ट
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांना बंदी

 कोईमतूर येथे सेलफोन टॉवर उभारण्यासाठी रिलायन्स जिओ टीमला पोलिस संरक्षण देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. संभाव्य उत्सर्जनाच्या भीतीमध्ये काही सत्यता असल्याचे सिद्ध झालेले नाही आणि म्हणून त्यासाठी काम थांबवता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक रहिवाशांनी सेल टॉवरच्या बांधकामाच्या विरोधात निदर्शने केली होती, आणि रिलायन्स जिओने पोलिसांकडे टॉवर बांधताना संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. पोलिसांनी मागणीला प्रतिसाद दिला नाही तेव्हा कंपनीने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. बार अँड बेंच मधील अहवालानुसार, रिलायन्स जिओच्या बाजूने निकाल देताना, न्यायमूर्ती एन. आनंद वेंकटेश म्हणाले,

“या न्यायालयाने सातत्याने ही भूमिका घेतली आहे की सेल फोन टॉवरकडून येणाऱ्या उत्सर्जनांच्या परिणामांच्या केवळ भीतीमुळे सेल फोन टॉवर उभारण्यापासून कुणालाही प्रतिबंध करता येणार नाही. या भीतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्या संदर्भात काहीतरी सकारात्मक निष्कर्ष समोर येत नाही तोपर्यंत केवळ भीतीपोटी सेल फोन टॉवर उभारण्यास प्रतिबंध करता येणार नाही.”

२००२ पासून रिलायन्स जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना असे टॉवर बांधण्यासाठी सरकारी मान्यता मिळत आली आहे असेही न्यायाधीशांनी नोंदवले.

रेडिओ लहरींमुळे आरोग्यावर दीर्घकालीन घातक परिणाम होतील ही भीती नवी नाही. अगदी अलीकडच्या काळात, मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटीची नवीन पिढी – ५जी येत असल्यामुळे या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

द वायरने, पूर्वी दिलेल्या बातमीनुसार रेडिओ लहरी या मानवी आरोग्याला क्ष-किरण किंवा अतिनील किरणांसारख्या प्रत्यक्ष अपायकारक नसतात. मात्र काही अभ्यासांनी असे दाखवले आहे की त्यांच्या सततच्या संपर्कामुळे त्या जागेवर थोडीशी उष्णता निर्माण होऊ शकते. ही उष्णता आणि आरोग्यावरचे गंभीर परिणाम यांच्यातील संबंध – जर काही असल्यास – अजून अज्ञात आहे.

जरी अजून या अभ्यासांमध्ये कोणताही निष्कर्ष निघाला नसेल तरीही प्रचलित प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रे यांनी ज्या प्रकारे ते प्रस्तुत केले त्यामुळे जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे. ऍटॉमिक एनर्जी रीसर्च बोर्डचे माजी सचिव के. एस. पार्थसारथी यांनी द वायरमध्ये लिहिले:

“दुर्दैवाने [या अभ्यासाच्या] प्रसारमाध्यमांमधील काहीशा चुकीच्या आणि भडकाऊ चित्रणामुळे भावना उत्तेजित होऊ शकतात. मात्र या बाबतीत प्रत्यक्ष अपायापेक्षा लोकांच्या मनातली अपायाची भीती जास्त आहे. सेलफोनमधील उत्सर्जनामुळे होणाऱ्या संभाव्य कर्करोगाची लोकांना भीती वाटते. सांगोवांगीचा पुरावा आणि सेलफोन उत्सर्जनामुळे आपल्याला इजा झाल्याचा दावा करणाऱ्या लोकांनी दाखल केलेल्या खटल्यांना मिळणारी मोठी प्रसिद्धी यामुळे आगीत तेल ओतले जाते.”

याचा अर्थ अशा उत्सर्जनाच्या परिणामांबाबत मांडणाऱ्यांना थोडे सावधगिरीने पुढे जायला हवे – आणि उत्तरे गृहीत न धरता किंवाभयोन्मादात भर न घालता प्रश्न विचारायला हवेत. दुर्दैवाने नेहमी तसे होत नाही. उदाहरणार्थ रजनीकांत अभिनीत २.० या चित्रपटात अगदी खात्रीपूर्वक सेलफोनमधून होणारे किरणांचे उत्सर्जन माणसांकरिता घातक असते असे म्हटले आहे. तनुल ठाकूर यांनी द वायरमधील त्यांच्या  परीक्षणामध्येलिहिले आहे:

“सेलफोनमधून होणाऱ्या किरणांच्या उत्सर्जनाचे घातक परिणाम या कल्पनेभोवती केंद्रित असलेल्या २.० या चित्रपटाला तंत्रज्ञानामध्ये, त्याच्या जटिलता आणि गुंतागुंतींमध्ये, त्याच्या संतापजनक आणि दुर्दैवी विसंगतींमध्ये स्वारस्य नाही. सेलफोनचे घातक परिणाम हा वादग्रस्त विषय आहे. सेलफोन उत्सर्जन धोकादायक हे का याबाबत अनेक अभ्यास होऊनही त्यातून काही निष्कर्ष निघालेले नाहीत. पण २.० ला त्याबद्दल फारशी पर्वा नाही, किंवा कशाचेही अर्थ समजून घ्यायलाही वेळ नाही कारण तो तंत्रज्ञानाच्या धोक्यांबद्दल मोठ्याने नैतिकतेची भाषणे देण्यात व्यग्र आहे.”

हाच इशारा विविध वार्तांकनालाही लागू केला पाहिजे. द इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने पर्यावरणीय घटक आणि त्यांचे विविध कर्करोगांशी असलेले कार्यकारण संबंध यांचे मूल्यमापन करण्यासाठी एक श्रेणीबद्ध प्रणाली निर्माण केली आहे. सेलफोन उत्सर्जन ‘२बी’ श्रेणीत येते – ज्यामध्ये प्राण्यांमध्ये कर्करोग निर्माण करण्याच्या क्षमतेबाबत अपुरा पुरावा आणि मानवांमध्ये मर्यादित किंवा अयोग्य पुरावा असलेल्या कारकांचा समावेश होतो.

वेगवेगळ्या श्रेणींबद्दल बोलताना आपण जे शब्द वापरतो ते विशेष महत्त्वाचे असतात. अजु मॅथ्यू यांनी द वायरमध्ये लिहिल्याप्रमाणे:“प्रक्रिया केलेले मांस आणि धूम्रपान यांच्यामुळे कर्करोगाची जोखीम सारखीच कशी असू शकेल? अर्थातच याचे उत्तर सरळ आहे: जोखीम सारखीच नाही, पण धोका सारखा आहे. ‘धोका’ हा ‘जोखमी’चा स्रोत असतो. ‘जोखीम’ म्हणजे आपल्याला त्या धोक्यामुळे अपाय होण्याची शक्यता.”

आपण अधिक नेमक्या उत्तरासाठी वाट पाहू या, परंतु तोपर्यंत आपण या समस्येला उत्तर कसे द्यायचे? सेलफोन टॉवर सुरक्षित असतात असे गृहीत धरून जे चालले आहे ते चालू द्यायचे? की आरोग्यावर परिणाम होऊ शकतात असे सुचवणाऱ्या काही अभ्यासांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा? यापैकी कोणतेच आदर्श उत्तर वाटत नाही.

द वायरमध्ये लिहिताना, वासुदेवन मुकुंथ यांनी एक तिसरा पर्याय सुचवला – सरकारने अशा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात ज्यामध्ये आपल्याला या उत्सर्जनाबद्दल काय माहिती आहे आणि काय नाही ते स्पष्ट लिहिलेले असावे आणि अपायकारक परिणाम कमी करण्यासाठी काय केले आहे आणि केले जाऊ शकते त्याचेही वर्णन करावे. शास्त्रज्ञ आणि या उद्योगातील इतर तज्ञ यांनी असे टॉवर सुरक्षित आहेत हे गृहीतक वैध आहे का हे शोधण्यासाठी आवश्यक ते पुढील अभ्यास करावेत. तोपर्यंत अशा मार्गदर्शक सूचना सामान्य लोकांना या समस्येची अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी करण्यास मदत करू शकतात.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: