जीएसटी कर प्रणाली फसली असून, ही योजना मागे घ्यावी यासाठी एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करून जीएसटी कर प्रणाली फसल्याचा उल्लेख केला.
ते म्हणाले, “का म्हणून तुम्ही कर्ज उचलताय व आम्हाला उचलायला लावताय? कर्ज फेडणार कोण? कर गोळा करण्याचा जो आमच्याकडे अधिकार होता, त्याही वेळी शिवसेनेने जीएसटीला विरोध केला होता. सरळ द्यायचं ते फिरवून कसं देणार तुम्ही? म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सगळीकडे वाटणार.
पण पैसा येत नाहीए! मग जीएसटी जर का तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर आज या महा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, या पुढे. आपण चर्चा करू यावर.
जीएसटीची जी काही करपद्धत आहे, ती जर का फसली असेल आणि मला वाटतं फसलीये ती. आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळायला हवा तो आम्हाला मिळत नाही. प्रत्येक जण बोंब मारतोय, पत्रावर पत्र लिहिली जाताहेत, त्या पत्रांना केराची टोपली दाखवली जातेय.
ते पैसे जर का मिळणार नसतील आणि ही करप्रणाली जर चुकली असेल, तर पंतप्रधानांनी देखील प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा करावी. नाहीच तर जीएसटीची पद्धत रद्द करून, पुन्हा जुन्या करप्रणाल्या आणायची आज गरज असेल तर ते केलं पाहीजे.
ठाकरे म्हणाले, की आमच्या हक्काचा जीएसटी जवळपास २८ हजार कोटी व वरचे १० हजार कोटी म्हणजे ३८ हजार कोटी येणं आजही केंद्राकडे बाकी आहे. ते देत नाहीयेत. आमचे ३८ हजार कोटी देत नाहीयेत आणि बिहारला फुकट लस देताहेत… कोणाच्या पैशाने देताहेत?
भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, “जे काही चालले आहे संपूर्ण देशात, हे फार विचित्र चालले आहे. कोरोनाचे संकट आहेच, जगभरात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये भाजपला रस असेल तर मला असं वाटतं की, आपण अराजकाला आमंत्रण देत आहोत.
जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय, त्यातलं थोडसं लक्ष तुम्ही देशावर द्या! आज देश रसातळाला चाललाय.
ते काय म्हणाले? विलासी राजा आणि त्याची अहंकारी मुलं? मग मी असं म्हटलं तर, “अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या.” कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आता महाराष्ट्राने संपवला आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इकडे मर्द मावळ्यांचंच सरकार येणार आहे.”
राज्यातील भाजप नेत्यांविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणले, “पुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेक जणं स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देतोय, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात, निदान त्या मातीशी तरी ईमान ठेवा ना, मित्रपक्षाशी ठेऊ नका. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर फटाके नका वाजवू पण निदान खोटं तरी बोलू नका.”
COMMENTS