डॉ. गेल ऑमव्हेट यांचे निधन

डॉ. गेल ऑमव्हेट यांचे निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या तसेच स्त्री-मुक्ती विचारांची अभ्यासपूर

वरवरा रावांच्या पुस्तकातील ‘हिंदुत्व’ शब्द पेंग्विनने हटवला
मंत्र्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश द्यावेतः हायकोर्टात मागणी
तेजस्वी सूर्यांकडून ‘हिंदू धर्म वापसी’चे आवाहन मागे

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या तसेच स्त्री-मुक्ती विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या जेष्ठ संशोधक, विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी सांगलीतील कासेगाव येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. गेल गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्यावर कासेगाव येथे घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते.

डॉ. गेल या जन्माने अमेरिकन होत्या. मात्र त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच त्या भारतामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या. महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी ‘वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड’ हा पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर केला. यावर पुस्तकही निघाले. या पुस्तकामुळेच बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम हे प्रभावित झाले आणि कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.  डॉ. गेल विद्यार्थी दशेत अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या  चळवळीतही अग्रस्थानी होत्या.

डॉ. गेल यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्याशी विवाह केला आणि पुढे श्रमिक मुक्ती दलाची स्थापना केली. पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. खानापूर तालुक्यामध्ये झालेल्या दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती या संगळ्यामध्ये त्या अग्रभागे होत्या.

डॉ. गेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नॉर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले.

कल्चरल रिव्हॉल्ट इन कलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया अशी २५ पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली आहे.

त्यांच्या निधनाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी म्हंटले आहे, की ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ या ग्रंथाच्या लेखिका गेल ऑमव्हेट यांचं काम, त्यांचा सहभाव कायम आपल्यासोबत राहील. सत्यशोधक चळवळीला जागतिक लढ्यांच्या पटावर कसं समजून घ्यावं याबाबत त्यांची मांडणी मूलभूत महत्त्वाची आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0