‘ड्रग्ज रॅकेटमध्ये नाही’; रियाला अखेर जामीन

‘ड्रग्ज रॅकेटमध्ये नाही’; रियाला अखेर जामीन

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्

कर्नाटकच्या गोहत्या कायद्याने गोव्याची उपासमार
तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग
लैंगिक छळ प्रकरणातील हायकोर्टाचा वादग्रस्त निर्णय रद्द करावा!

नवी दिल्लीः बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन दिला. रियाला ८ सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक खात्याने अटक केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा स्वत:च्या घरात राहात होता आणि स्वत:च्या गरजांसाठी खर्च करत होता. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नव्हता. त्यामुळे रिया चक्रवर्तीने त्याला आश्रय दिला आणि अंमली पदार्थ मिळवण्यासाठी पैसे दिले, असे म्हणता येणार नाही. रियाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नाही. तसेच अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटमध्ये ती सहभागी असल्याचे दिसत नाही’, असे निरीक्षण न्या. सारंग कोतवाल यांनी निकालात नोंदवले.
एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे देणे म्हणजे, ते उत्तेजन नव्हे व अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २-अ नुसार अंमली पदार्थांसाठी अर्थ पुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीने केलेला युक्तिवाद मान्य करता येणार नाही. एनसीबीने रियाची रिमांडही मागितली नव्हती म्हणजे तिने तपासाला पूर्णपणे सहकार्य केले होते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

रियाबरोबर सुशांत सिंह राजपूत याचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व घरातील मदतनीस दीपेश सावंत या दोघांनाही जामीन मिळाला आहे. पण उच्च न्यायालयाने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती व अब्देल बासित यांचा जामीन फेटाळला आहे.

रियाला एक लाख रु.चा जातमुचलका व अन्य अटींवर तर सावंत व मिरांडा यांना प्रत्येकी ५० हजार रु. जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीन दिल्यानंतर येत्या १० दिवसांत रियाला जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे. तसेच तिचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय देशाबाहेर जाता येणार नाही तसेच बृहन्मुंबई क्षेत्राबाहेर जाण्यासाठी पोलिसांची परवानगी अत्यावश्यक असल्याच्या अटी तिच्यावर घालण्यात आल्या आहेत.

मंगळवारी एका स्थानिक न्यायालयाने रिया व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचा जामीन अर्ज फेटाळून २० ऑक्टोबरपर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आपण खुश झालो अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. सत्य व न्याय यांचा हा विजय असून रियाची अटक व तिला दिलेली कोठडी अयोग्य होती. तिचा सीबीआय, ईडी व एनसीबीकडून छळ केला गेला असा आरोप मानेशिंदे यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0