अमेरिकेच्या राजकारणातील उजवे

अमेरिकेच्या राजकारणातील उजवे

१८ सप्टेंबर २०२१रोजी अमेरिकन सरकार उलथून टाकायचा दुसरा प्रयत्न होणार होता! पण अफगाणिस्तानमध्ये नुकतंच मार खाऊन आलेलं लष्कर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अफगाणिस्तानची पुनरावृत्ती करून देणार नव्हतं. लष्कराने अगदी थोड्याच अवधीत वॉशिंग्टनचं काबूलमध्ये रूपांतर केलं... संसदेभोवती दहा पुरुष उंचीचे काटेरी पोलादी कुंपण उभे केले. इतक्या जय्यत तयारीनंतर फक्त सहाशेच तालिबान आले! सगळंच ओम् फस झालं...

अमेरिकन सरकार उलथून टाकायचा तथाकथित पहिला प्रयत्न या वर्षी जानेवारी महिन्याच्या ६ तारखेस झाला होता. तेव्हा ट्रंप समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून गोंधळ घातला होता. इलेक्टरच्या मतांची अजून मोजणी व्हायची होती आणि ट्रंप समर्थकांना अशी धांदल केल्याने आपला माणूस निवडून येईल, अशी वेडी आशा वाटत होती. पण तसं काही झालं नाही. उलट एक महिला पोलिसांच्या गोळीने हकनाक मृत्यू पावली. आणि काही धांदलखोरांची तुरुंगात रवानगी झाली. पहिला प्रयत्न फसला म्हणून दुसर्‍याचं प्रयोजन. त्याचा तर विनोदच झाला. इथे कार्ल मार्क्सच्या एका निरीक्षणाची आठवण आली. History repeats itself: First as a tragedy, and then as a farce.

 सूडबुद्धीचे राजकारण

अमेरिकेचं सर्व राजकारण हल्ली सूडबुद्धीने चाललेले आहे. अंतर्गत आणि परराष्ट्रीय. परराष्ट्रीय राजकारणात धोरण, तडजोड, समजूतदारपणा, व्यवहारचातुर्य ही जुनी तंत्रं बासनात गुंडाळून ठेवली आहेत. त्याऐवजी दहशत, दडपण, दमदाटी, हमरीतुमरी, जबरदस्ती ही रस्त्यावरच्या गुंडापुंडांची तंत्रं ही आज प्रतिष्ठित झाली आहेत. अंतर्गत राजकारणातही तोच प्रकार. येऊन जाऊन इनमीन दोन पक्ष. बाहेरचा कुणी इसम दिसला-चीन, रशिया, क्युबा, इराण, सिरिया, व्हेनझुएला, यादी मोठी आहे-की त्याच्या अंगावर झेप टाकून जातात, एकमेकाला चिथवत. घरी परतले, की मात्र एकमेकाच्या उरावर चढून बसतात.

तसं म्हटलं तर ताकदीत दोघंही एकमेकाला तुल्यबळ आहेत. त्यांची हमरीतुमरी विशेष रंगात येते निवडणुकांच्या वेळी. अमेरिकेतील निवडणुका घ्यायची तंत्रं उर्वरित जगाला आदर्शवत नाहीतच, उलट मागासलेल्या देशांनाही लाज वाटतील अशी जीर्णवत आहेत. बरं, ती सुधारायचं नाव काढायचं नाही. कारण तसं करणं मुळात आपल्यात कमतरता होती, हे कबूल करावं लागेल. आणि जीव गेला, तरी अमेरिका तसं कबूल करणार नाही. शिवाय खुद्द मतांची अफरातफर होते, ते वेगळंच. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे, महत्त्वाच्या निवडणुकांचा निकाल स्वच्छ लागत नाही. मग सुंदोपसुंदी चालू होते ती पुढच्या निवडणुकीपर्यंत!

पुढारलेल्या अमेरिकेचे मागास दर्शन

याचं पहिलं प्रदर्शन झालं २००० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणूकीत. ४९ राज्यांतली मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल फ्लॉरिडा नामक एका चंचल राज्यावर येऊन थबकला. ते राज्य जो जिंकेल, तो स्वयंवर जिंकला! पण या राज्याचं मत काही पक्कं होईना. स्वैरपणे ते आज एका पक्षाशी घसट करे, तर उद्या दुसर्‍या! येऊन जाऊन प्रश्न होता अडीचशे मतांचा-एकूण २० लाखांपैकी! आपले पूर्वीचे बसचे कंडक्टर जसं फाडलेल्या तिकिटाला स्टेजप्रमाणे भोक पाडायचे, तसं अमेरिकेतलं मतदानाचं मशीन मतपत्रिकेवर भोक पाडायचं. शेवटी प्रश्न आला, तो हा की किती मोठं भोक पडलं म्हणजे भोक पडलं असं मानायचं. काही भोकं स्पष्ट होती, तर काहींचा फाटलेला कागदाचा अवशेष (chad) लोंबत होता. ती जर वैध धरायची तर भोकं किती फाटली तर वैध धरायची? या वादात आठवडे गेले. शेवटी, सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज बुश यांना विजयी जाहीर केले. (सुप्रीम कोर्टात रिपब्लिकन पक्षाचं ५:४ असं मताधिक्य होतं!)

अशा निवडणुका अपवाद न राहता प्रमाण व्हायला लागल्यात. २०१६ मध्ये निवडून आलेल्या ट्रंप याचं अनौरस हे बिरूद शेवटपर्यंत गेलं नाही. या निवडणुकीत फ्लॉरिडासारखी आणखी चार राज्ये लहरी निघाली. तिथे दोन पक्षातील फरक लाखो मतांमध्ये काही शेकड्यांतच होता. साहजिकच सुरुवातीस मतांच्या फेरमोजणीची मागणी झाली. त्यात काही निष्पन्न झाले नाही. मग ट्रंपच्या इलेक्टरना फितूर करायचे प्रयत्न झाले. ते फसले. ट्रंप यांचा शपथविधी झाल्या क्षणापासून त्याला काढून टाकायच्या, योजना चालू झाल्या. त्याना काढून टाकणं अशक्यप्राय असताना, आणि ते ठाऊक असतानाही, क्षुल्लक कारणांसाठी इम्पीच केलं. तेही एकदा नव्हे तर दोनदा! आणि दुसर्‍या वेळी तर ते महाशय अध्यक्षही नव्हते! इम्पिचमेंटचं प्रयोजन विद्यमान अध्यक्षाला काढण्यासाठी असतं. जो अध्यक्षच नाही, त्याला काढायचं हा काय प्रकार आहे? केवळ खुन्नस!

२०२० च्या निवडणुकीत ट्रंप उताणे पडले, तेही अशाच काट्यावर, आणि त्याच्या बगलबच्च्यांनी तोच प्रयोग पुढे चालू ठेवला आहे. थोडक्यात म्हणजे, गेली पंचवीस वर्षं अमेरिकेतील निम्मी प्रजा आपल्या अध्यक्षाचा मनापासून द्वेष करते.

 युद्धखोरीची मौज

२००१ मध्ये निवडणुकीच्या अवैधतेचा बट्टा पुसून काढायला नवनिर्वाचित बुशसाहेबांनी जुनीच क्लृप्ती वापरली. अफगाणिस्तानविरुद्ध-आणि नंतर इराकविरुद्ध-युद्ध उकरून काढले. मतभेद विसरून अखिल प्रजा अध्यक्षांच्या पाठीमागे उभी राहिली. युद्धाची मजा अर्थातच युद्धाचं बिल येईपर्यंत! ते आल्यावर रिपब्लिकन पक्षाचे डोळे पांढरे झाले. अर्थसंकल्प तुटीत जाता कामा नये, हे या पक्षाच्या पवित्र तत्वांतलं एक प्रमुख तत्व. (आपली कर्जं आपल्या नातवंडांनी फेडायची का?) पण अनेक तत्वांसारखं हे तत्व पुस्तकातच राहतं. नामवंत सनातनी अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे शिष्य अध्यक्ष रेगन यांनी बजेटमधली ७० अब्ज डॉलरची तूट १७० अब्ज डॉलरपर्यंत नेली. त्यानंतर आलेल्या बुशने ती ३०० अब्ज डॉलर केली. पुढचा अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचा बिल क्लिंटन. त्यानं तूट शून्यावर नेली! कनवाळू सनातनी (Compassionate Conservative) हा आपला ब्रँड आहे असं सांगणार्‍या बुशच्या राज्यात युद्धाच्या खर्चामुळे तूट १२०० अब्ज डॉलर इतकी वाढली.

 एकाच माळेचे मणी

सगळे नेते एका माळेचे मणी. तेव्हा पक्षात तळागाळाचा एक गट निर्माण करावा, अशी चळवळ रिपब्लिकन पक्षात २००८ मध्ये सुरू झाली. त्यात पुन्हा एका काळ्या माणसाची नुकतीच झालेली अध्यक्षपदावरची निवड म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. काळे लोक अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेले, त्यांना जनावरांसारखे वागवलेले, बारीकसारीक कारणांसाठी त्यांना सर्व वस्तीसमोर विधिपूर्वक झाडावर लटकावलेले, ते मेल्यानंतर त्यांना झाडावरून उतरवून आणि त्यांचे शरीर कापून त्यांच्या हृदय, यकृत वगैरे अवयवांचे बक्षीस म्हणून लिलाव झालेले. त्यांच्यातला एक राष्ट्राध्यक्ष ही कल्पनाही सहन करवत नव्हती. त्यात पुन्हा त्याचं बराक हुसेन ओबामा असं परदेशी, मुसलमान नाव! तो नक्की अमेरिकनच आहे ना? त्याचा जन्मदाखला तपासून पहा, अशी चळवळ निघाली.

अमेरिकेतले दोन्ही पक्ष आपापल्या परीनं नमुनेदार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाची खासियत ही की नवीन नवीन चित्रविचित्र सिद्धांत-विशेषत: sex आणि genderच्या बाबतीत-मांडून ते लोकांच्या गळी जबरदस्ती उतरवायचे. (त्याच्यामागे अब्जावधी डॉलर्सच्या इंडस्ट्री आहेत. मदतीला हॉलिवूड आहे.) रिपब्लिकन पक्ष हे काही वेगळेच रसायन आहे. रिपब्लिकन पक्ष स्वत:ला शुद्ध राज्यघटनावादी समजतो. खरं म्हणजे, राज्यघटना त्रोटकपणेसुद्धा कोणी वाचलेली नसते. त्यातली दुरुस्ती क्रमांक २ (Second Amendment) हीच त्यांच्या दृष्टीने राज्यघटना! या घटनादुरुस्तीची भाषा बुचकळ्यात पाडणारी असली, तरी अमेरिकन नागरिक शस्त्र बाळगू शकतो असाही एक तिचा अर्थ निघू शकतो.

 बंदुकीचा संबंध स्वातंत्र्याशी

खरं म्हणजे, अमेरिकन माणसाचं बंदुकीबरोबरचं प्रेमप्रकरण राज्यघटनेपेक्षाही जुनं आहे. युरोपियन माणूस मुलुखगिरी करायला इतर खंडात घुसला, ते बंदुकीच्या जोरावर. मायदेशी असलेलं बंदुकींवरचं बंधन नवीन जगतात शिथिल झाल्याने त्याने बंदुकीचा संबंध स्वातंत्र्याशी जोडला. कालांतराने कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा देशांनी बंदुकीशी फारकत घेतली. पण अमेरिकेचे बंदुक-प्रेमप्रकरण अजूनही चालू आहे. किंबहुना, त्या प्रेमप्रकरणाचे मनोव्याधीत रूपांतर झालं आहे.

काही बायकांना जसं वेगवेगळ्या दागिन्यांचं प्रदर्शन करणं आवडतं, तसं अमेरिकन माणसाला (यात बायकासुद्धा आल्या) बंदुकींची नवनवीन मॉडल्स विकत घेऊन त्यांचं प्रदर्शन करणं आवडतं. हा त्याच्या एकूण हिंसक संस्कृतीचा भाग झाला. जसे आपले संघवाले काठ्या घेऊन कवायती करतात, तसे हे उजव्या प्रवृत्तीचे लोक बंदुका, मशीन गन, हँड ग्रेनेड, असलं मिलिटरीचं सामान घेऊन कमांडो कसरती करतात. असलं साहित्य मिलिटरीकडे उदंड पडलेलं असतं. ते त्यांच्या गोदामात मावेनासं झालं, की ते त्यांच्या दारूगोळ्यासहीत बाहेर स्वस्तात विकायला काढतात. व्हिडीओ गेम्स विकत घेऊन त्यात शत्रूपक्षाच्या (चिनी, व्हिएतनामी, रशियन) सैनिकांना गोळ्या घालणं हा अमेरिकन उजव्यांचा आवडता छंद आहे. या लुटपुटीच्या हत्येने निर्ढावलेलं मन लढाईच्या निमित्ताने परक्या देशात गेलं, की तिथल्या निष्पाप बायका-मुलांना मारताना क्षणाचाही विचार करत नाही. नित्यनेमाने आठवड्यामागे खुद्द अमेरिकेत बेछूट गोळीबारात दहा-बारा माणसांचा बळी जात असला तरी या मनोरूग्णांना पश्चात्ताप वाटत नाही.

नमुनेदार अमेरिकी उजवा गंड

उजव्या गटाच्या अमेरिकन लोकांचा दुसरा मनोगंड म्हणजे सरकार हे दुष्ट आणि जुलमी आहे, आणि ते आपल्या सुखी संसारात आणि निष्पाप जीवनात शिरकाव करायचा अखंड प्रयत्न करत आहे, ही अनामिक भीती. म्हणून त्यांचा लस टोचून घ्यायला विरोध आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धानंतर जुलमी सरकारला मूठमाती दिली असली, तरी ते सापासारखे डोकं वर कधी काढेल हे सांगता येत नाही. म्हणून उजव्या प्रवृत्तीच्या प्रजेचा सरकारवर संशय. सरकारची कोणतीही सेवा नको. रस्ते, रेल्वे, विमान, या गोष्टी शक्यतो स्थानिक किंवा खाजगी संस्थाकडून राबवून घ्याव्यात.

सरकारने शिक्षण, आरोग्य असल्या समाजाला उपयुक्त गोष्टींतून आपलं अंग बाहेर काढून घ्यावं, आणि त्या गोष्टी खाजगी संस्थांकडे सोपवाव्यात. सरकारने आपलं सर्व लक्ष देशाच्या संरक्षणाकडे आणि त्या अनुषंगाने इतर देशांवर आक्रमण करणं इकडे एकवटावं. आणि फक्त अशा कामांसाठीच प्रजेकडून कर वसूल करावा. अशा करांबद्दल-तो कितीही अवास्तव असला तरी-लोकांनी तक्रार करता कामा नये, कारण हा खर्च देशाच्या भल्यासाठी आहे. देशभक्तीत आपला हात कुणी धरणार नाही, अशी रिपब्लिकन पक्षाची तीव्र भावना आहे.

बायबलवाक्यम् प्रमाणम्

रिपब्लिकन पक्षात एके काळी थोडे फार बुद्धिप्रामाण्यवादी लोक होते. आता नाहीत. आता तो पक्ष एकजिनसी झाला आहे. प्रचंड धार्मिक झाला आहे. बायबलवाक्यम् प्रमाणम् अशी सध्याची परिस्थिती आहे. बायबल देवाच्या मुखातून आले असल्याने, त्यात चूक होण्याची संभवना नाही. तेव्हा विज्ञान (सायन्स) हे बकवास आहे. देवाने ही सृष्टी सहा हजार वर्षांपूर्वी तयार केली आणि तो ती लवकरच (या पिढीतच!) संपवणार आहे. येशूचे जे चाळीस हजार सच्चे अनुयायी आहेत त्यांना तो एका बाजूला करणार आणि बाकीच्यांना-यांत हिंदू, मुसलमान, ज्यू, बौद्ध सर्व आले-भस्म करून टाकणार. आणि शेवटी आपल्या माणसांना घेऊन स्वर्गात जाणार. अमेरिकेतल्या उजव्यांचा या उपपत्तीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांचा इस्लामद्वेष जगजाहीर आहे. पण इतर धर्मांवरही ते तेवढाच आकस धरून आहेत.

विज्ञान सत्य नाही, तेव्हा अर्थातच आणि विशेषत: उत्क्रांतीवाद थोतांड आहे. तो शाळेच्या अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे. विश्वाची निर्मिती कशी झाली,याचं बायबलमध्ये विस्ताराने वर्णन केलं आहे, त्या पलिकडे जाणे म्हणजे, देवाचा अवमान करण्यासारखं आहे. आज बाजारात उत्क्रांतीवादावर जेवढी शास्त्रीय पुस्तकं आहेत, त्याच्या हजारपटीने पुस्तकं उत्क्रांती कशी चुकीची आहे, यावर आहेत. उत्क्रांतीवादाविरुद्ध साहित्याने सर्व माध्यमं काबीज केली आहेत. हल्लीच्या जमान्यात माध्यमं पावसाळी छत्र्यांसारखी वाढत आहेत. बहुतेकांवर प्रतिगाम्यांचा अंमल आहे. भारतात तोच प्रकार असल्याने त्यात नवीन काही नाही. भारतात असते तशीच निधर्मवादाची सतत आणि कुचकट टिंगल चालू असते.

रिपब्लिकन पक्षाने गर्भपाताला सातत्याने विरोध केला आहे. गर्भपात म्हणजे मानवी हत्या अशी त्यांची टोकाची भूमिका राहिली आहे. त्यात कसलीही सूट नाही. बलात्कार होऊन गर्भधारणा झालेल्या कोणत्याही वयाच्या मुलीला किंवा स्त्रीला गर्भपाताची परवानगी नाही. टेक्सस या रिपब्लिकन राज्याने या विषयावर आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. जर एखादा डॉक्टर गर्भपातात मदत करताना कुणाला आढळला, तर नागरिक डॉक्टरवर फिर्याद ठोकू शकेल, आणि त्याच्या या सत्कार्याबद्दल सरकार त्याला १० हजार डॉलर्सचं बक्षीस देईल, असा कायदा त्या राज्याने केला आहे! गंमत म्हणजे असाच कायदा आणखी पंधरा रिपब्लिकन राज्यांच्या विचाराधीन आहे.

अर्धशिक्षितांचा पक्षमेळ

रिपब्लिकन पक्षात एकूणच शिक्षणाचं प्रमाण कमी. सरासरी शाळेतल्या दहावीपर्यंत. एक कारण म्हणजे, सारासारबुद्धी लहानपणापासून खुंटीला टांगून ठेवल्याने मुळातच माठ. दुसरं म्हणजे पारंपरिक शिक्षणावर संशय. विज्ञानावर संशय. त्यामुळे अलीकडे मुलांना घरी शिकवण्याचं प्रमाण वाढलं आहे. हा म्हणजे The blind leading the blind सारखा प्रकार आहे. गणित आणि विज्ञान या विषयांतल्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेचा क्रम दरवर्षी खाली जात आहे, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक.

पर्यावरणाच्या बाबतीतही रिपब्लिकन पक्षाची मतं जगावेगळी आहेत. तापमान वाढीचा आणि मानवी उद्योग यांचा परस्पर काही संबंध आहे, यावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे पॅरिसमध्ये त्या विषयावर चालू असलेली बोलणी निरर्थक आहेत, असं ठरवून ट्रंप यांनी त्यातून आपले अंग काढून घेतले, आणि खनिज तेल आणि कोळसा वापरायला प्रोत्साहन दिले. अमेरिकेला खनिज तेल, वायू आणि कोळसा यांपासून वंचित करण्यामागे चीनचं कारस्थान आहे, असा विचार रिपब्लिकन पक्षात अलीकडे बळावत चालला आहे.

मोगलांच्या घोड्यांना म्हणे, तळ्याच्या पाण्यात संताजी- धनाजी दिसत असत. तसं हल्ली डेमोक्रॅटिक पक्षाला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी रशिया दिसतो. रशियाविरुद्ध लढणार्‍या बिनीच्या शिलेदाराला- युक्रेनला!-मदत करायला ट्रंप आखडता हात घेतो, यावरूनच तर त्याला इम्पीच केलं होतं. आता पारडं फिरलं आहे. पाण्यात प्रतिबिंब दिसायची पाळी आता चीनची. आणि ती रिपब्लिकन पक्षाला दिसत आहेत. ही सर्व पराभूत आणि भेकड वृत्तीची लक्षणं आहेत. एवढं अफगाणिस्तान झाल्यानंतर अमेरिका आपला पवित्रा बदलेल, अशी अपेक्षा होती. स्वत:चं घर मोडलंय तिथे लक्ष द्यायला पाहिजे. तिथली डागडुजी आधी, लष्करच्या भाकर्‍या नंतर. पण तसं झालं तर गेली ऐंशी वर्षे अमेरिकन लोकांचं रक्त पिऊन माजलेले वॉशिंग्टोनीयन राजकीय श्रेष्ठी बेकार होतील त्याचं काय? गप्प बसणं त्यांच्या रक्तात नाही.

आताच आलेल्या ताज्या बातम्यावरून बायडनने ऑस्ट्रेलियाला चीनविरुद्ध लढण्यासाठी अणुशक्तीवर चालणार्‍या पाणबुड्या द्यायचा करार केला आहे. पण युद्धखोर रिपब्लिकनना हे पुरेसं नाही. बायडन हा चीनपुढे नांगी टाकतो, हे त्यांचं पालूपद चालूच आहे.

डॉ. द्रविड, हे फिजिक्समधील पीएच.डी. असून यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे.

(मुक्तसंवाद १ ऑक्टोबर २०२१च्या अंकातून साभार)

COMMENTS