गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’वर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’वर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील हाथरस पोलिसांनी २९ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर, बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या सन्मानार्थ आग्रा येथे होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या 'रेत समाधी' या पुस्तकात भगवान शिव आणि पार्वतीचे ‘आक्षेपार्ह चित्रण’ असून त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

काश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार? : सर्वोच्च न्यायालय
आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत – मुंबई हायकोर्ट

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात २०२२ च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका गीतांजली श्री यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम रद्द केल्याची घटना समोर आली आहे. हा कार्यक्रम ३० जुलै रोजी होणार होता. गीतांजली यांना त्यांच्या ‘रेत समाधी’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीसाठी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हातरस पोलिसांनी २९ जुलै रोजी दाखल केलेल्या एका तक्रारीनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या ‘रेत समाधी’ या पुस्तकात आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

हाथरस येथील सादाबाद येथील रहिवासी संदीप पाठक यांनी ही तक्रार दिली आहे. पाठक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की, ‘रेत समाधी’ या ‘टॉम्ब ऑफ सँड’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे. या पुस्तकात भगवान शिव आणि पार्वतीचे ‘आक्षेपार्ह चित्रण’ आहे, ज्याने ‘हिंदूंच्या भावना दुखावल्या’ आहेत.

त्यानी दावा केला की ‘रेत समाधी’मध्ये ‘अत्यंत अश्लील शेरे’ आहेत आणि पुस्तकातील आक्षेपार्ह परिच्छेद पाठक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना टॅग केले आहे.

आग्रा येथे गीतांजली श्रींच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजक ‘रंगलीला सोशल अँड कल्चरल ट्रस्ट’चे अनिल शुक्ला आणि आग्रा थिएटर क्लबचे हरविजय बहिया यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की गीतांजली श्री उत्तर प्रदेशच्या रहिवासी आहेत आणि त्यांचे वडील आग्रा विभागात आयएएस अधिकारी होते.

अनिल शुक्ला यांनी ‘द वायर’शी बोलताना सांगितले, की कार्यक्रमाचे आयोजक आणि आग्रा येथील सिव्हिल सोसायटी सदस्य शनिवारी एकत्र येऊन नवीन कृती आराखडा ठरवण्यासोबतच  या घटनेचा निषेध करणार आहेत.

शुक्ला पुढे म्हणाले, ‘आम्ही आंदोलन करू. तसेच गीतांजली श्रींच्या ‘प्रायव्हेट लाइव्ह’ या कथेवर ‘दास्तंगोई’सारखा हिंदी कथा वाचनाचा कार्यक्रमही आयोजित करण्याचा आमचा विचार आहे.

मात्र, पाठक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.

शुक्ला म्हणाले, की गेल्या एका आठवड्यात खूप तणाव निर्माण झाला आहे. ते म्हणाले, की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांनी गेल्या २७ जुलै रोजी जेएनयू शिक्षक संघटनेने (जेएनयूटीए) आयोजित केलेल्या कार्यक्रमात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून अनेक गट अनेक समस्या निर्माण करत आहेत आणि हा (गीतांजली श्रीशी संबंधित) कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गीतांजली श्री या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत.

गेल्या मे महिन्यात गीतांजली श्री यांना अनुवादक डेझी रॉकवेल यांच्यासोबत त्यांच्या ‘रेत समाधी’, ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार हिंदी आणि भारतीय भाषा साहित्यातील पहिला पुरस्कार आहे. हे पुस्तक फाळणीनंतर पाकिस्तानला गेलेल्या ८० वर्षीय महिलेची कथा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0