हैदराबाद एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

हैदराबाद एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

नवी दिल्लीः हैदराबादेतील एका महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेले चार आरोपी पळून जात असल्याचे कारण त्यांचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर बनावट अस

उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!
अपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर
विकास दुबे एन्काउंटरः सर्व आरोपी पोलिसांना क्लिनचीट

नवी दिल्लीः हैदराबादेतील एका महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेले चार आरोपी पळून जात असल्याचे कारण त्यांचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर बनावट असल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणाऱ्या न्यायिक आयोगाने काढला आहे. तसेच या एन्काउंटरमध्ये सामील असणाऱ्या १० पोलिस अधिकाऱ्यांवर हत्या केल्याचे आरोप दाखल करावेत अशी शिफारसही न्यायिक समितीचे अध्यक्ष न्या सिरपूरकर यांनी राज्य सरकारला केली आहे.

एका महिला डॉक्टरची हत्या केल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी चार जणांना अटक केली होती व या चौघा आरोपींना घटनास्थळी आणण्यात आले होते. त्यांनी हा गुन्हा कसा केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात होती. याच वेळी या चार आरोपींपैकी एका आरोपीने पळून जाण्यासाठी तिघांजणांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या या हल्ल्यामुळे स्वसंरक्षणार्थ म्हणून पोलिसांना या चारही आरोपींना ठार मारावे लागले असे स्पष्टीकरण त्या हैदराबाद पोलिसांकडून दिले गेले.

पण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगाने आरोपींनी पोलिसांचे पिस्तुल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवता येत नसल्याचे स्पष्ट म्हटले. याचे पुरावेही मिळालेले नाही, असे न्या. सिरपुरकर यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. एन्काउंटरमध्ये मारण्यात आलेल्या चार आरोपींपैकी तिघेजण अल्पवयीन होते, त्यांच्यावर पोलिसांनी अशा पद्धतीने गोळ्या मारल्या होत्या की ते मरण पावले पाहिजेत, असे निरीक्षण न्या. सिरपूरकर यांनी नोंदले आहे.

नेमके प्रकरण काय?

२७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैदराबाद शहरापासून दूर असलेल्या एका भागात एका २७ वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली होती. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती.

ही महिला रात्री ड्युटीवरून घरी परतत असताना एका टोलनाक्यावर तिने पार्क केलेली स्कुटी पंक्चर झालेली दिसली. त्यानंतर या महिलेने आपल्या बहिणीला फोन करून झालेली घटना सांगितली. बहिणीने तिला कॅबने घरी येण्यास सांगितले. दरम्यान दोन युवक तिच्याजवळ आले आणि त्यांनी स्कुटी दुरुस्त करून देऊ असे तिला सांगितले.

त्या महिलेने आपल्या बहिणीला फोन करून स्कुटी दुरुस्त करण्यासाठी काही तरुण मदत करत असल्याचे सांगितले. पण नंतर काही काळानंतर तिचा फोन बंद झाला. अखेर फोन लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी तपास सुरू केला असता दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी त्यांना एका बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरनजीक अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. या मृतदेहावर असलेला स्कार्फ व कपड्यांवरून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी तिची ओळख पटवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन युवकांच्या मदतीवर महिला डॉक्टरने विश्वास ठेवला आणि ती वाट पाहात बसली. या दरम्यान टोलनाक्याच्या रस्त्यावर एकेक करून ट्रक येऊन थांबत होते. या ट्रकचा आसरा घेत त्या युवकांनी महिला डॉक्टरला झाडीत फरफटत नेले आणि तिच्यावर सामूहीक बलात्कार केला. नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह काही किमी अंतरावर नेऊन जाळला. पोलिसांना घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर त्या महिलेची अंत:वस्त्रे मिळाली, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला असे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली होती. २७ नोव्हेंबरच्या या घटनेने देशभर संतापाची लाट पसरली होती. संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते. तेलंगण सरकारने या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा म्हणून जलद न्यायालय स्थापन
केले होते.
पण या घटनेनंतर दोनेक दिवसानंतर या चार आरोपींना घटनास्थळी आणण्यात आले होते व त्यांनी हा गुन्हा कसा केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात होती. याच वेळी या चार आरोपींपैकी एका आरोपीने पळून जाण्यासाठी तिघांजणांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला व पोलिसांवर हल्लाही करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पोलिसांकडील हत्यारेही खेचून घेण्याचा प्रयत्न केला. आरोपींच्या या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्वसंरक्षणार्थ म्हणून पोलिसांनी या चारही आरोपींना ठार मारले होते. या घटनेनंतर पोलिसांच्या एन्काउंटरविरोधात तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक समिती नेमून त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

या आयोगाने पोलिसांचे एन्काउंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत १० पोलिसांवर हत्या केल्याचे आरोप ठेवावेत अशी सूचना केली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: