राजबिंडा, रोमँटिक, संवेदनशील, भावुक

राजबिंडा, रोमँटिक, संवेदनशील, भावुक

चिंटू जे करू शकत होता, त्यात त्याचा हात धरणं दुसऱ्या कोणालाही शक्य नव्हतं.

थोरोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..
रस्त्यावरचा प्रतिभावंत गिरीश कर्नाड!
दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….

चिंटूला मी पहिल्यांदा भेटलो, ते ‘सरगम’ नुकताच हिट झालेला असताना. त्याने ‘दुनिया’ आणि ‘सागर’साठी शूटिंग सुरू केलेलं होतं. बरेचदा शनिवार, रविवारी मी मार्वेला जात असे आणि चिंटू, डिंपल, कमल हसन आणि रमेश सिप्पीबरोबर गप्पा मारत असे. मित्र म्हणून तो किती चांगला आहे आणि माणूस म्हणून किती हुशार आहे, याची प्रचिती मला तेव्हाच आली. ‘तुला सांगतो, मी या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहू शकलो, हे मी माझं सुदैव समजतो. ‘बॉबी’ आला, तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतला रोमान्स विझू लागला होता. अमिताभमुळे एक अशी लाट आली होती, ज्यात इतर कोणत्याही प्रकारचे चित्रपट वाहून जात होते. अक्शन सिनेमे करावेत, तर माझ्यापाशी ती उंची नव्हती, की चेहरा नव्हता आणि तरीही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत मी १५ वर्षे या चित्रपटसृष्टीत टिकलो. हे काही सोपं नव्हतं. आणि कपूर खानदान वगैरेची मला तशी काही मदत झाली नाही. होय, पापांनी माझ्याबरोबर ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘बॉबी’ केला. पण मला नेहमीच असं वाटतं, की घरातला एकच जण स्टार असेल, तर संपूर्ण कुटुंब त्याच्याभोवती त्याचा कणा बनून उभं राहतं. म्हणजे भाऊ त्याच्या तारखांची काळजी घेतात, बहिणी किंवा वहिनी घर सांभाळतात, जेवणखाण आणि पार्टी देणं वगैरेची काळजी घेतात. पण आमच्या घरातल्या प्रत्येकाचं स्वत:चं करिअर होतं. माझे सगळे काका, भाऊ, प्रत्येकाला स्वतःची काळजी घ्यायची होती. परिणामी, मलाही बर्याच प्रमाणात स्वत:वर अवलंबून राहावं लागलं. पण तरीही मला वाटतं, की मी नशीबवान म्हणायला हवा. मला प्रत्येक मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली, सगळ्या संगीतकारांनी मला अप्रतिम गाणी दिली आणि या चित्रपटसृष्टीतला मी पहिला हीरो आहे, ज्याने २३ नवीन मुलींबरोबर काम केलंय!’

जावेद एकदा म्हणाला होता, ‘माझं असं मत आहे, की चिंटू हा आपल्याकडच्या उत्कृष्ट अभिनेत्यांमधला एक आहे. दुर्दैवाने त्याचा चेहरा त्याच्या आड येणारा आहे. चिंटूला कधी तू डॉकयार्डात काम करणारा मजूर किंवा धरणावर काम करणारा इंजिनीअर किंवा अतिशय गंभीर डॉक्टराच्या रुपात नजरेसमोर आणू शकतोस का? तो नेहमीच एक श्रीमंत तरुण मुलगा दिसतो. तरुण मी अशासाठी म्हणतोय, कारण त्याच्या चेहर्यावर प्रगल्भता कधीच आली नाही. खरंच, हे दुर्दैव म्हणायला हवं, कारण त्याच्या त्या अत्यंत रोमँटिक इमेजमुळे आम्ही लेखक किंवा दिग्दर्शक त्याच्यातल्या टॅलेन्टचा खजिना बाहेर काढू शकलो नाही.’

पण चिंटू जे करू शकत होता, त्यात त्याचा हात धरणं दुसर्या कोणालाही शक्य नव्हतं. त्याच्याबद्द्लचं माझं व्यक्तिगत मत हे तो मला आवडत असल्याने वस्तुनिष्ठ नसेल कदाचित, पण त्याचं कौतुक करण्यासाठी मी इथे त्याच्याशिवाय माझ्याजवळ इतर लोक काय बोलले आहेत ते सांगतो. रमेश सिप्पी म्हणाले होते, ‘मी स्टार्सच्या चार किंवा पाच पिढ्यांबरोबर काम केलेलं आहे. दादामुनी, दिलीपसाब, संजीवकुमार, अमिताभ, शशी, शत्रू, मिथुन, कलम हसन, शाहरुख, पण मी ठामपणे हे सांगू शकतो, की केवळ नजरेने चिंटू जे दाखवू शकायचा, ते कोणालाही जमलेलं नाही. त्याचा चेहरा अतिशय संवेदनशील आणि भावुक होता आणि अशी कोणतीही भावना नव्हती, जी तो पकडू शकत नव्हता.’

कमल हसन म्हणालाय, ‘ऋषी कपूर हा भारतीय सिनेमामधला सर्वात चांगला स्टार अक्टर आहे. आणि मी असं म्हणतो, तेव्हा कपूर कुटुंबियांमध्ये तो सर्वात चांगला आहे, असं म्हणणं अभिप्रेत असतं.’

यश चोप्रांच्या ‘विजय’च्या शूटिंगच्या दरम्यान अनिल कपूर एका कोपर्यात बसून आपले संवाद पाठ करत असायचा, व्यक्तिरेखेमध्ये शिरायचं म्हणून त्याला कोणी डिस्टर्ब केलेलं चालायचं नाही. चिंटू मात्र सगळीकडे फिरत, विनोद करत असे. शॉट देण्याची वेळ आली, की चिंटू एका टेकमध्ये ती व्यक्तिरेखा, तिचा मूड, तिच्या भावना व्यक्त करून मोकळा होत असे. शबाना म्हणाली होती, ‘चिंटूला सगळं नैसर्गिकपणे जमतं असं मात्र कधीच समजू नकोस, तो अतिशय मेहनती अक्टर आहे आणि पूर्ण तयारीनिशी तो सेटवर येतो. तुला माहितीय, दुसर्या दिवशीची दृश्यं आणि त्याचे संवाद त्याला आज हातात मिळाले नाहीत, तर तो दुसर्या दिवशी शूटिंगला यायला चक्क नकार देतो? शिवाय इतर व्यक्तिरेखांचे संवादही त्याला माहीत असतात. त्यामुळे आपले संवाद म्हणण्यापूर्वी किती काळ जाणार, याचा अंदाज त्याला असतो. मग आपल्या सहकार्यांनी काही वेगळं केलं, तर आपल्याला कशी प्रतिक्रिया देता येईल याचे पर्याय तो मनाशी ठरवून ठेवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याची ही तयारी आणि त्याचं तंत्र कधीही त्याच्या कामात दिसत नाही, आणि म्हणून आपल्याला त्याच्या उत्स्फूर्तपणाचे कौतुक वाटतं.’

शबानाचं म्हणणं योग्य असल्याची साक्ष मीसुद्घा देऊ शकतो. एकदा मी जावेदकडे गेलेलो असताना चिंटूचा फोन आला आणि आपल्याला काही सल्ला हवाय, असं तो जावेदला म्हणाला. तो तिथे आला आणि जावेदबरोबर आतल्या खोलीत गेला. साधारण तासभराने चिंटू गेला, तेव्हा त्याचा चेहरा विचारात मग्न असल्यासारखा दिसला. जावेदने मला नंतर सांगितलं की, ‘सागर’मधल्या आपल्या आजीबरोबरच्या, म्हणजे मधुर जाफरीबरोबरच्या वादावादीच्या दृष्याची त्याला काळजी वाटत होती. दोन पद्धतींनी हे दृष्य करता येईल, असं चिंटूचं मत होतं. आणि त्यापैकी कोणती पद्धत लेखकाला योग्य वाटतेय, हे विचारायला तो आला होता. एक म्हणजे, तो थेट धमकी देतो आणि त्यामुळे काही ठराविक प्रतिक्रिया उमटते किंवा मग, मनाने हरलेला मुलगा आपल्या आजीला ‘तू जिंकलीस’ असं सांगतो. तुला स्वत:ला कोणत्या पद्धतीने ते दृश्य द्यायला आवडेल असं जावेदने विचारल्यावर तो म्हणाला, ‘कोणत्याच नाही, हरलेला मुलगा म्हणून मी तिला भेटेन, तिच्या हाती असलेल्या सत्तेमुळे ती जिंकली असली, तरी आपण सगळं गमावलेलं नाही, असं मी तिला सांगेन.’ आपल्या डोळ्यामधून एक हट्टीपणा आणि वेडेपणा दिसायला हवा, असं त्याने सुचवलं. शूटिंगच्या दिवशी ते दृश्य दिल्यानंतर सगळ्यांनी चिंटूचं तोंड भरून कौतुक केलं.

आणखी एक किस्सा मला आठवतोय, बडोद्याच्या दुष्काळग्रस्तांसाठी अमितने एक शो केला होता, तेव्हाची ही गोष्ट. अमित, जया, अमृता आणि मी, बडोद्याच्या एका मोठ्या गेस्ट हाऊसमध्ये होतो. दुपारच्या जेवणानंतर आमच्या गप्पा सुरू होत्या. विषय चिंटूचा निघाला. जयाताई म्हणाल्या, ‘आता चिंटूचंच पाहा, त्याची प्रेमातली दृश्यं किंवा नृत्य करतानाचा उत्साह पाहून मी नेहमी अमितला म्हणते, चिंटूकडे पाहा. मला वाटतं, अमित आपल्या नायिकांबरोबर फार ऑकवर्ड असतो.’ अमृता आणि गप्प बसलो. अमित पुटपुटला, ‘होय, मला ठाऊकेय. तो इतक्या सहजी कसं करतो ते?’

तो हे कसं करतो हे एक रहस्यच आहे. नीतूबरोबरच्या त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये त्याने तिला खाऊनच टाकलेलं आहे. नीतू खूप छान वाटते, पण चिंटूचं काम लक्षात राहतं. एकदा जेवायला बसलेलो असताना नीतू कौतुकभरल्या सुरात तक्रार करत मला म्हणाली, ‘गौटी, (मला हे नाव अजिबात आवडत नाही, पण नीतूसारख्या गोड बाईने मला कोणत्याही नावाने हाक मारली तरी मला चालतं) तुला सांगते, ‘खेल खेल मैं असो किंवा ‘कभी कभी’, आमचं नृत्य असेल, तेव्हा बॉब (तिने लाडाने चिंटूला ठेवलेलं नाव) नऊ वाजताची शिफ्ट घ्यायला सांगायचा आणि राज मास्टर किंवा कमल मास्टरांबरोबर तो तालीम करत राहायचा. मी तिथे साडेदहा वाजता पोहोचायचे, माझ्या स्टेप्स शिकायचे आणि त्याची तालीम होईपर्यंत तिथल्या बाकड्यावर बसून राहायचे. टेक व्हायचा दुपारी चार वाजता आणि तरीही, सिनेमा रिलीज झाला, तेव्हा बॉब किती चांगला नाचलाय असंच लोक म्हणाले. ‘यावर चिंटूचं म्हणणं होतं, ‘होय, माझं फूटवर्क भयंकर होतं. पण कमरेच्या वर माझे हात आणि माझा चेहरा यामुळे माझ्याबरोबर कितीही चांगलं नृत्य करणारी हिरॉईन असली, तरी मी तिला खाऊन टाकत असे.’ आपण काही तरी केल्याचं श्रेय चिंटूने घेतल्याची गेल्या वीस वर्षांतील ही एकमेव वेळ. नाही तर, मी जेवढ्या वेळा मला त्याचा अभिनय किंवा काम आवडल्याचं सांगितलंय, तेवढ्या वेळा त्याची प्रतिक्रिया विचित्र झालीये. त्याला कौतुक जणू स्वीकारताच येत नाही. उलट तो जितक्या लवकर तो विषय बदलता येईल तितकं बरं, असा वागतो. ऋषी कपूर आणि नीतू सिंग म्हणजे फ्रेड अस्टर किंवा जिंजर रॉजर्स या प्रसिद्ध जोडीसारखे होते, असं आपल्याला वाटतं!

विख्यात दिवंगत छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या ‘चेहरे’ या पुस्तकातील हा संपादित उतारा आहे. ऋषी कपूर यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला होता.

साभार –जीवन गाणी, प्रकाशक : प्रसाद महाडकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: