सनातन जीवनलीला

सनातन जीवनलीला

एका शतकापूर्वीही मनुष्याच्या अध्यात्मिक, नित्यजीवनाच्या केंद्रस्थानी असणारी असणारी नदी आता किळसवाण्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली पाहणं वेदनादायी आहे. कित्येक लहान-मोठ्या नद्या शेवटच्या घटका मोजत असण्याच्या अशा काळात काका कालेलकरांच्या “जीवनलीला” या ग्रंथाचं वाचन करणं म्हणजे नद्यांच्या गतवैभवाचं, मानवी संस्कृतीतील त्यांच्या अमूल्य स्थानाचं स्मरण करण्यासारखं आहे.

टॅटूवाला विराट
बायडन यांचा प्रवास मांडणारे पुस्तक
असहमतीचे आवाज

वस्तुतः पंचमहाभूतांच्या संयुगाने जीवन अस्तित्वात येते. असे असले तरी आपल्या लोकांनी केवळ पाण्यालाच जीवन म्हटले आहे, यांत मोठे रहस्य दडले आहे. पृथ्वीच्या सभोवताली भले वायुमंडळ घेरलेले असले, आणि या वातवरणाशिवाय भले क्षणभरही आपण जगू शकत नसलो तरी पृथ्वीचे महत्त्व आहे ते तिला कवटाळणाऱ्या उदक-आवरणामुळेच. पाण्यांत जो ताजेपणा आहे, जे जीवन तत्व आहे, ते ना अग्नीच्या ज्वालांमध्ये आहे, ना वायू, ना वादळ-वाऱ्यात आहे. पाणी जेथून वाहते, तिथे शतलता प्रदान करत जाते, वाळवंटाला उपवन बनविते आणि प्राणीसृष्टी अनेक प्रकारचे जीवन-प्रयोग करू शकेल अशा सुविधा बहाल करते. पाण्याचा स्वभाव चंचल आहे, तरल आहे, ऊर्मिल आहे आणि याहून विशेष म्हणजे वत्सल आहे.

  • काका कालेलकर

मानवी सभ्यतेत नदीचे महत्त्व कोण मान्य करणार नाही? जगभरच्या अनेक संस्कृतींची मूळं तर नदीच्या तीरावरच रुजून फोफावली आहेत. केवळ मनुष्याच्या शारीरिक आणि भौतिक गरजांची पूर्ती लक्षात घेतली तरी नद्यांच्या अस्तित्वाशिवाय जीवनाचा विचार करणे केवळ अशक्य आहे. या भौतिक गरजांचा विचार करता पाण्याचे नदीशिवायही अनेक स्रोत आपण सभोवताली पाहतोच. जलाशय, सरोवरे, विहिरी, कुपनलिका अनेक. पण जे स्थान आपण आणि आपल्या पूर्वजांनी नदीला दिले, ज्या भक्तिभावाने आपण नदीला पूज्य मानले,  आपल्या श्रद्धेय देवालयांची स्थापना तिच्या तीरावर केली, तेवढ्या ममतेने आणि पूज्यभावाने क्वचितच आपण इतर स्रोतांकडे पाहिले.

आपल्या पूर्वजांनीही लोककथा, गीते यांमधून नदीचे पदोपदी स्मरण केले आहे. निरंजना नदीच्या काठावर सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त झाले. किती अलौकिक घटना. हजारो-लाखो वर्षांतून एकदा एखादा मनुष्य बुद्धत्वाची प्राप्ती करतो. ज्ञानाचे अत्युच्च शिखर गाठतो. मानवी जीवनातील दु:खाचे निदान करतो आणि मुक्तीचा मार्ग सर्वसामान्य मनुष्यासाठी खुला करतो. सृष्टीचा आद्य मनोविश्लेषक आणि मनुष्याला त्याच्या बुद्धीवर विसंबून राहण्याची शिकवण देणारा प्रथम बुद्धीप्रामाण्यावादी बुद्ध झाला.  त्या घटनेलाही नदी साक्ष झाली. नदीच्या केवळ भारतीय पुराणकथेतच नव्हे तर जगभर प्राचीन ग्रंथकार, तत्वज्ञ आणि कवींनी नदीची महती गायली आहे. तत्वज्ञान आणि काव्य एरवी परस्परविरोधी अशा गोष्टी. तत्वज्ञान रुक्ष आणि कठोर विश्लेषण करणारे मानवी प्रज्ञेचे अविष्करण तर काव्य मानवाच्या सूक्ष्मतर जाणीवा आणि भावना जागविणारे हृद्य गायन. पण नदीने या दोहोंतील भेद लीलया संपविले.

आद्य ग्रीक तत्वज्ञ हेराक्लीटस म्हणतो, “तुम्ही एकाच नदीत दोनवेळा पाय ठेवू शकत नाही.” नदीच्या पाण्यात एकदाच पाय ठेवता येते. दुसऱ्या वेळेला नाही. कारण दुसऱ्या खेपेस पाय ठेवले तर ती नदी पूर्वीचीच राहत नाही. नदी म्हणजे तिचा किनारा नव्हे. किनारा स्थिर असतो. नदी म्हणजे दोन किनाऱ्यांच्या मर्यादेत राहून अनिरुद्ध वाहणारे जीवन.

पाणी ते तर सतत प्रवाहित असते. नदीच्या पात्रातला हरेक क्षण निघून जाणाऱ्या क्षणासारखा एकमेवद्वितीय असतो. अलौकिक असतो. निघून गेलेला क्षण माघारी येत नाही. तुम्ही ज्या नदीत पाय ठेवले ती नदी तर कधीच वाहून गेली. आता ज्या नदीत तुम्ही पाय ठेवले ती एक दुसरीच नदी आहे. तुम्ही एकाच नदीत दोनवेळा पाय ठेवू शकत नाही. हेराक्लिटस जीवनप्रवाहाला, काळाच्या गतीला नदीची उपमा देताना किती विलक्षण काव्यमय भाषेत जीवनाचे तत्वज्ञान मांडतो ते पाहिले की, माझ्यासारख्या नास्तिक मनुष्याचेही हात नदीच्या दर्शनाने आपोआप जोडले जातात. नदीविषयी अपार कृतज्ञता दाटून येते. एका अनामिक आणि विलक्षण भावबंधाने नदीची महती गाणाऱ्या पूर्वजांशी आपण जोडले जातो.

नदीविषयी वाटणाऱ्या अशा कृतज्ञ भावनेने नत होऊन आणि तिच्या सौंदर्याने मोहित होऊन काका कालेलकर यांनी नद्यांची महती गाणारा ‘जीवनलीला’ हा ग्रंथ आधुनिक काळात लिहिला आहे. या ग्रंथाला त्यांनी ‘भारताच्या नद-नद्या, तलाव-सरोवरे, प्रपात आणि समुद्र यांची सनातन जीवनलीला’ असे उपशीर्षक दिले. भारतीय नद्यांची महती गाणाऱ्या या ग्रंथाचे स्वरूप गद्य असले तरी त्यांतील काव्यमय भाषेच्या सौंदर्याने दिपून जायला होते. या ग्रंथाची केवळ प्रस्तावना पाहिली तरी नदीविषयी लिहिताना काका कालेलकर एकाचवेळी जीवनाचे गंभीर तत्वज्ञान आणि नदीच्या सौंदर्याचे वर्णन यांची अनिंद्यसुंदर गुंफण किती विलक्षण कौशल्याने आणि प्रतिभेने करतात ते मुळातूनच वाचायला हवे.

“नदीकडे पाहताच मनात विचार येतो-नदी येते कुठून आणि जाते कुठवर? हा विचार वा प्रश्न सनातन आहे. नदीला आदी आणि अंत असायलाच हवा. जितक्या वेळा नदीकडे पहावं, तितक्या वेळा हा प्रश्न मनात उमटतो. आणि हा प्रश्न जसा जुना होत जातो, तेव्हढाच अधिक गंभीर, अधिक काव्यमय आणि अधिक गूढ बनत जातो. शेवटी मन राहवत नाही, पाय थांबत नाहीत, मन एकवटून प्रेरणा देतं आणि पाय चालू लागतात. आदी आणि अंत यांचा शोध घेण- या सनातन शोधाची प्रेरणा आपल्याला बहुधा नदीपासून मिळाली असावी. म्हणूनच आपण जीवन प्रवाहाला नदीची उपमा देत आलो आहोत. उपनिषदाचे निर्माते, अन्य भारतीय कवी, तसेच मॅथ्यू अर्नोल्ड यांसारखे युरोपिअन कवी आणि रोमां रोलाँसारखे कादंबरीकार जीवनाला नदीची उपमा देतात.  या विश्वाचा प्रथम प्रवासी नदी आहे, म्हणून प्राचीन प्रवासी लोकांनी नदीचा उगम, नद्यांचा संगम आणि नदीचे मुख यांना अत्यंत पवित्र स्थान मानले आहे.

जीवनाची जणू प्रतीकच अशी ही नदी येते कुठून आणि जाते कुठवर? शून्यातून येते आणि अनंतात सामावून जाते. शून्य म्हणजे अत्यल्प, सूक्ष्म परंतु प्रबळ आणि अनंत म्हणजे विशाल आणि मौन. शून्य आणि अनंत, दोन्ही एकाहून गूढ आहेत, अमर आहेत, दोन्ही एकच आहेत. शून्यातून अनंताकडे- ही सनातन लीला आहे. कौशल्या अथवा देवकीच्या प्रेमात सामावण्यासाठी परमेश्वराने बालरूप धारण केले, तसेच कारुण्याने प्रेरित होऊन स्वत: अनंत शून्यारूपात आपल्यासमोर उभे ठाकते. जसजशी आपली आकलनशक्ती वाढू लागते, तसा शून्याचा विकास होत जातो आणि आपलाच विकास वेग सहन न होऊन साऱ्या मर्यादांचं उल्लंघून करून वा त्या झुगारून स्वत:च अनंत बनतो – थेंबाचा सागर बनतो.

मानवी जीवनाची स्थिती याहून भिन्न नाही. व्यक्ती ते कुटुंब, कुटुंब ते जाती, जाती ते राष्ट्र, राष्ट्र ते मानवता आणि मानवता ते विश्व- असा हृद-भावनांचा विकास होत जातो. स्वभाषेतून आपण प्रथम स्वकियांचं हृदय समजावून घेतो आणि अखेरीस साऱ्या विश्वाचं आकलन करून घेतो. गांव ते प्रांत, प्रांत ते देश आणि देश ते विश्व असा ‘स्व’ चा विकास करत करत आपण ‘पुर्णा’ मध्ये सामावले जातो.

नदी आणि जीवनाचा क्रम सारखाच आहे. नदी स्वधर्माचे पालन करून आपल्या कुल-मर्यादेचं रक्षण करते, म्हणूनच प्रगती करते. आणि अखेरीस नाम-रूपाचा त्याग करून समुद्रात विलीन होते. विलीन झाली तरी ती स्थगित अथवा नष्ट होत नाही, अखंड चालतच राहते. असा आहे नदीचा क्रम. जीवन आणि जीवन-मुक्तीचा क्रम याहून भिन्न नाही.”

आज आपल्याला नदीचे स्मरण होते ते तिच्या सौंदर्यामुळे नव्हे तर तिच्या प्रदूषित झालेल्या पात्रामुळे. नदीच्या दूषित झालेल्या पात्राने फैलावलेल्या रोगराईमुळे आणि नदीच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही तिच्या स्थितीत तसूभरही सुधारणा न झालेल्या वस्तुस्थितीमुळे. कधीकाळी नव्हे केवळ एका शतकापूर्वीही मनुष्याच्या अध्यात्मिक, नित्यजीवनाच्या केंद्रस्थानी असणारी असणारी नदी आता किळसवाण्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली पाहणं वेदनादायी आहे. कित्येक लहान-मोठ्या नद्या शेवटच्या घटका मोजत असण्याच्या अशा काळात काका कालेलकरांच्या “जीवनलीला” या ग्रंथाचं वाचन करणं म्हणजे नद्यांच्या गतवैभवाचं, मानवी संस्कृतीतील त्यांच्या अमूल्य स्थानाचं स्मरण करण्यासारखं आहे. गंगा, सिंधू या नद्यांना वगळून भारताच्या इतिहासाचा आणि भूगालाचा विचार करता येईल? नाईल वगळता इजिप्तच्या संस्कृतीत काय उरतं? जिचा उगम नदीच्या काठी झाला नाही अशी प्रमुख संस्कृती सांगता येईल? या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करायला हवा. हा केवळ नद्यांच्या अस्तित्वाचा नव्हे आपल्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे.

लेखाचे छायाचित्र – लडाखमधील झंस्कार नदी – श्वेता भणगे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: