आमचे शुभमंगल

आमचे शुभमंगल

‘एस.ए. डांगे : एक इतिहास’ या बृहद््ग्रंथाच्या सहलेखिका, माजी लोकसभा सदस्य आणि भारतातल्या कम्युनिस्ट पक्षांच्या जडणघडणीच्या साक्षीदार रोझा देशपांडे यांचे १९ सप्टेंबर २०२० रोजी, दादर येथे राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी लिहिलेल्या डांगेंवरील चरित्रातला, राजकीय उलथापालथी दरम्यान पार पडलेल्या त्यांच्या विवाहाचे वर्णन करणारा हा आत्मपर उतारा...

पक्षांतर आणि सामान्य मतदार
स्वातंत्र्य, समता, मानवतेचे गीत गाणारा द्रष्टा
कम्युनिस्ट सरकारे महसुलासाठी मंदिरांचा ताबा घेतात: न्या. मल्होत्रा

डी (वडील श्रीपाद अमृत उर्फ भाई डांगे) भारतात आल्यानंतर पुन्हा भूमिगत गेले. तेव्हा ताई त्यांना भेटली होती. ताई उघडपणे कलकत्त्याला गेली होती. सी.आय.डी.चा ससेमिरा मागे असतानाही ताईला सुब्रतो बॅनर्जीच्या आईने बाजारात नेऊन तेथील गल्लीबोळातून डी असलेल्या भूमिगत जागेत नेले. तो मोठा जुना वाडा होता. डींना पाहून ताई रडू लागली. पण डींनी ‘मी लवकर येतो’ असे सांगून तिला हसत परत पाठविले.

श्रीपाद अमृत उर्फ भाई डांगे आणि रोजा देशपांडे.

श्रीपाद अमृत उर्फ भाई डांगे आणि रोजा देशपांडे.

यानंतर माझ्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा होता. आमच्या लग्नाची गोष्ट अशी. १९४७ मध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या परिषदेला विद्याधर लक्ष्मण देशपांडे उर्फ बानी देशपांडे आले होते. बानी बैतुलमध्ये शाळेत शिकत असल्यापासून विद्यार्थी चळवळीचे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे नेतृत्व करीत होते. मॅट्रीक झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना नागपूरला जावे लागले. नागपूरला त्यांचे थोरले बंधू दिनकर लक्ष्मण देशपांडे यांच्याजवळ राहून ते सायन्स कॉलेजमध्ये शिकू लागले. एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून सायन्स कॉलेजमध्ये बानी प्रसिद्ध होते.

बानींच्या मित्रांचा एक गट होता. ते सर्वजण डॉक्टर होणार होते. नागपूरमध्ये विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून बानींची साहजिकच तेथील कम्युनिस्ट पुढारी ए. बी. वर्धन, भूना मुखर्जी, एच. के. व्यास यांची ओळख झाली. कॉलेजमध्ये सकाळचे सत्र झाले की, लोकवाड्मय गृहात वाचन करणे हा त्यांचा नियम. नंतर १९४८च्या पार्टी काँग्रेसमध्ये रणदिवेंनी पक्षाला घोषणा दिली; ती म्हणजे ‘यह आझादी झूठी है’ म्हणून नेहरु सरकार उलथवून पाडले पाहिजे. नेहरु हे ब्रिटिशांचे दलाल आहेत. वगैरे, वगैरे. पक्षाच्या धोरणाप्रमाणे रुळ उखडणे, पिस्तुले जमा करणे इ. कार्ये करण्याबाबतच्या वर्ध्याच्या भूमिगत सभेला ते गेले असता त्यांना अटक करण्यात आली. या गुप्त सभेला त्यांच्याबरोबर बाळाजी हुद्दारही होते. बानींनी तुरुंगात गेल्यानंतरही अन्नसत्याग्रह करणे, मुद्दाम भांडणे करून गोळीबार करून घेणे हे धोरण नागपूरलाही अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. भांडणे केल्यामुळे बानींना तीन महिन्याची अंधार कोठडीची शिक्षा झाली होती. अंधार कोठडी ब्रिटिशांच्या परंपरेतली. वर्तमानपत्र बंद, घरची पत्रे बंद, चहा बंद. फक्त दोन वेळा ५ गाकड व मीठ आणि पाणी हेच जेवण मिळायचे. आंघोळ आणि इतर सर्व विधी देखील खोलीतच. ही खोली ८ बाय ८ ची असे. पांघरायला एक आणि अंथरण्यासाठी एक घोंगडी. खोलीत दिवा नसे. त्यामुळे ५ वाजताच अंधार होत असे, आणि हे नागपूरचे जून महिन्याचे उन्हाळ्यातील दिवस होते. या महिन्यात उष्णता उच्चांकावर असते. तुरुंगात बानी सर्वात लहान म्हणजे २२ वर्षांचे होते.

बानींची आई दादा धर्माधिकारी यांना भाऊ मानत असे. बैतुलमध्ये दोन्ही घराणी जवळ जवळ राहत असतं. त्यामुळे नातेवाईकांप्रमाणे संबंध निर्माण झाले होते.

बानी तुरुंगात असताना आईने दादा धर्माधिकारींना बानींना तुरुंगातून सोडविण्याबद्दल सांगितले. तेव्हा दादांनी बानींना माफी मागण्याचा पर्याय दिला. दादांना ते मनोमन माहित होते की बानी माफी मागणार नाही. आणि झाले ही तसेच. बानींनी दादांचा हा पर्याय साफ फेटाळून लावला आणि तीन महिन्यांची अंधार कोठडी स्विकारली. बानी या शिक्षेत टिकले याचाच ताई व डींना अभिमान होता.

बानींचे कुटुंब मोठे होते. हे दहा भाऊ-बहिणी असे होते. बानींचे वडिल लक्ष्मणराव देशपांडे राष्ट्रीय चळवळींशी संबंधित व पुरोगामी विचारांचे होते. ताईला अगदी १९४७ सालापासून बानींचे व माझे लग्न व्हावे असे वाटत होते. डींनी मात्र बानींना पाहिलेले नव्हते. बानीदेखील तुरुंगातून डी १९५० साली सुटल्यानंतर सुटले. बानींनी मुंबईस येऊन मला लग्नाबद्दल विचारले. मी ‘हो’ म्हटल्यावर डींना विचारावे असे ठरले.

ताई डींना भेटली तेव्हा तिने बानींबद्दल डींशी बोलून ठेवलेच होते. परंतु डी भूमिगत असल्याने त्यांनी आम्हांला दोघांना कलकत्त्याला बोलावून घेतले. आम्ही दोघेही कलकत्त्याला गेलो. भूमिगत व्यवस्थापकांनी फक्त मला भेटता येईल असे सांगितले. त्यामुळे डींची व बानींची भेट होऊ शकली नाही. ताईप्रमाणे मीही गल्ल्याबोळातून त्या वाड्यावर पोहचले. पाहते तो तेथे एका लग्नासारखी तयारी चालली होती. वाडा सजवलेला होता. मी आत गेल्यावर डींना भेटले. त्यांना बानींबद्दल सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “तो चळवळीतीला मुलगा आहे. दोन वर्षे तुरुंगात काढली आहेत. अंधार कोठडीही पाहिली आहे. तू तर चळवळीत कायम राहणार. कारण तुझा जन्मच त्यातला आहे. तेव्हा माझा होकार समज. येथे दुसरी पक्ष परिषद चालू आहे. म्हणून हा लग्नाचा शो, तू जरा स्वयंपाकघरात जाऊन भाजी शिजवायचे दाखवून दे. स्वयंपाकी नाहीत.” झाले! माझी मुलाखत इथेच संपली. मी स्वयंपाक घरात जाऊन शंभराहून अधिक माणसांना पुरेल एवढी भाजी फोडण्या वगैरे देऊन शिजवायला ठेवून निघाले. काही पुढार्यांच्या बायका होत्या. पण त्यांना स्वयंपाक येत नव्हता, असो.

कलकत्त्याहून मी व बानी मुंबईस परत आलो. बानी नागपूरला गेले. डींनी लग्नाला मान्यता दिल्याने ताईंचा आनंद काय विचारावा? ती लग्नाच्या तयारीलाच लागली. तेव्हा डींनी ‘रजिस्टर लग्न करावे’ असे बानीच्या वडिलांना सुचविताच त्यांनी ते मान्य केले.

दादरच्या लक्ष्मी नारायण बाग हॉलमध्ये १० डिसेंबर १९५१ रोजी आमचे लग्न झाले. लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. तरीही जी. एल. रेड्डी यांनी डींशी वाद घालून थोडीशी रोषणाई केलीच. रजिस्टर लग्न व स्वागत समारंभ एकत्र झाला. फक्त थंड पेय देण्यात आले. बानींची बहिण सौ. शशीताई देशमुख सोडून बानींकडचे सर्वजण लग्नाला आले होते. रेशनचे दिवस असल्याने त्यांची जेवणाची सोय खानावळीत केली होती. लग्नाला ताईच्या गिरणी कामगार मैत्रीणी म्हणजे माझ्या सर्व आज्या, मावशा आल्या होत्या. पक्षाचे कामगार, कार्यकर्ते आले होते. मुंबईचे पूर्ण मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, मोरारजी देसाई, गुलजारीलाल नंदा, वैकुंठलाल मेहता सर्वजण आवर्जुन आले होते. माझे घाटे काका, मिरजकर काक, लालजी काका असे सर्व हजर होते. सारे खूष होते. मिरत कटाच्या खटल्याच्यावेळी जन्मलेल्या पक्षाच्या एकमेव मुलीचे लग्न होते. आमच्या लग्नात फक्त एकच फोटो काढला होता. तेव्हा फोटोंची फारशी सोय नव्हती. अशा प्रकारे आमचे लग्न आटोपले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: