राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे – अरुंधती रॉय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे – अरुंधती रॉय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शतकात ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे. देशाची सत्ता त्यांच्याच हातात असून, गोमुत्र हे त्यांचे अमृत पेय असल्याची टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे.

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जगातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. तो हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी गाजवू पाहत आहे. लपून वार करणे, दहशत निर्माण करणे आणि हुकुमशाही लादण्याचे काम देशात सध्या सुरू आहे.”

भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानतर्फे गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेमध्ये माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, माजी आयपीएस एस. एम. मुशरीफ, माजी आय ए एस अधिकारी गोपीनाथ कन्नन, अबिदा तडवी, आयेशा रेन्ना उपस्थित होते.

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला रॉय यांनी आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. आंदोलनामध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शेतकऱ्यांमध्ये फुट पाडण्याचे आणि त्यांना भडकवण्याचे काम सुरू असून, आपण आत्ता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे रॉय म्हणाल्या.

‘भीमा-कोरेगाव-१६’, असे ज्यांना म्हणण्यात येते त्या सर्व राजकीय कैद्यांची त्वरीत सुटका झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले जुलमी कायदे हटविण्यात आले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, की देशातील जातीयवाद अजून संपलेला नाही. धर्माची सर्कसही अजून संपलेली नाही. आजही जाती आणि धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात असून, देशातील जनतेला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. या विरोधात सर्वांना एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आता आरएसएस विरुद्ध रेझिस्टन्स अशी ताकद उभी करावी लागेल, असे रॉय म्हणाल्या.

जात, धर्म आणि पुरुषत्व सरकारच्या मनात असून, त्यामुळे लव्ह जिहादविरोधी निर्णय घेतले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल म्हणजे त्यांचाच गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचे रॉय म्हणाल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत अरुंधती रॉय म्हणाल्या, की ही एल्गार परिषद भारतीय राज्यघटनेच्या विरोधात काम करणारी परिषद नाही. शहरांमधील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार करणारे आणि लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही आहोत.

लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा नरेंद्र मोदी यांचाच माणूस होता, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.

कोळसे पाटील म्हणाले, की पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नसताना दहशतवादी पोहोचलेच कसे? मोदी यांनी देशासाठी खूप काही केल्याचे चित्र उभे केले जाते मात्र प्रत्यक्षात काहीचे केलेले नाही.

“मनुवादी आणि मनीवादी (भांडवलदार) एकत्र येऊन जात, पंथ, धर्माच्या नावाने आपले शोषण करत आहेत. मात्र असे अनेक मोदी येतील आणि जातील पण अखेरच्या श्वासापर्यंत मनुवादाविरोधात आमची लढाई सुरू राहील, असे कोळसे पाटील म्हणाले.

COMMENTS