युक्रेनमधील महत्त्वाच्या ४ शहरांत युद्धविराम

युक्रेनमधील महत्त्वाच्या ४ शहरांत युद्धविराम

युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियाच्या फौजांनी काही शहरात युद्धविराम लागू केला आहे. हा युद्धविराम युक्रेनची राजधानी कीव्ह, दक्षिणेतील बंदर मारियुपोल, युक्रेनमधील दुसऱ्या क्रमाकांचे आकाराने मोठे शहर खारकीव्ह व सूमी येथे लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये लाखो नागरिक अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी वा त्यांना सुरक्षितस्थळी आसरा मिळावा म्हणून युद्धविराम लागू केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. हा युद्धविराम किती दिवसांचा असेल याबद्दल अद्याप कोणतेही निवेदन रशियाकडून आलेले नाही.

शनिवार व रविवारी मारियुपोल येथे हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे दोन प्रयत्न असफल झाले होते. रेडक्रॉसच्या मते या शहरातून सुमारे २ लाख नागरिक सुरक्षितस्थळी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. पण रशियाच्या सैन्याकडून गोळीबार, तोफगोळ्यांचा वर्षाव व हवाई दलाकडून हल्ले सुरू असल्याने लाखो  नागरिक अडकून पडले आहे.

सोमवारी युक्रेन व रशियाच्या अधिकाऱ्यांनी संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने तिसरी बैठक सुरू झाली आहे. त्याचा तपशील अद्याप आलेला नाही.

दरम्यान, रविवारी रशियाने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बेलारुस व रशियाचा मार्ग वापरावा असा प्रस्ताव युक्रेनपुढे ठेवला होता. पण युक्रेनने हा प्रस्ताव फेटाळला आहे. रशियाच्या प्रस्तावानुसार कीव्हमध्ये अडकलेल्या नागरिकांना बेलारुसमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही तर खारकीव्ह व सूमी येथे अडकलेल्या नागरिकांना बेलगोरोद येथे पाठवल्यास परिस्थितीवर नियंत्रण येईल, असे रशियाचे म्हणणे आहे. पण हा प्रस्ताव युक्रेनने फेटाळला. रशियाने संपूर्ण सैन्य मागे घ्यावे या भूमिकेवर युक्रेन अजून ठाम आहे.

१७ लाख नागरिकांचे युक्रेनमधून पलायन

रशिया व युक्रेन यांच्यातल्या संघर्षाला १२ दिवसापासून अधिक दिवस होत असून आतापर्यंत युक्रेनमधील १७ लाख नागरिकांनी पलायन केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. यातील सर्वाधिक निर्वासित-१० लाख- पोलंडमध्ये आश्रयास गेले असून १ लाख ८० हजार नागरिकांनी हंगेरी व १ लाख २८ हजार नागरिकांनी स्लोवाकिया येथे आश्रय घेतला आहे.

मूळ बातमी

COMMENTS