मंटो आणि लेखकांच्या अस्मितांची राजकीय संरचना

मंटो आणि लेखकांच्या अस्मितांची राजकीय संरचना

मंटोची मुळे काश्मीरी होती आणि त्यांचा त्याला अभिमान वाटत असे. त्यांच्या कुटुंबात काश्मीरी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्णता प्रेमपूर्वक जपली आणि जोपासली जात असे. मंटोने पंडित नेहरूंना एक पत्र लिहिले होते.या पत्रामध्ये मंटो आणि नेहरू या दोघांमधील काश्मीरशी असलेल्या संबंधांचा उल्लेख आला आहे. काश्मिरी असण्याचा दुसरा अर्थ सुंदर असणे असा आहे, असे या पत्रात मंटोने म्हटले आहे.

महासाथ कराराला विरोध आवश्यक का आहे?
उ. प्रदेशः मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीखाली २ शेतकरी चिरडून ठार
केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण

सआदत हसन मंटो १९१२ साली त्या काळातील ब्रिटिश साम्राज्यातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका गावात जन्माला आला. अमृतसर व अलिगढ या शहरांमध्ये काही काळ राहिला. पुढे मुंबईला आला. फाळणीनंतर पाकिस्तान नावाच्या देशातील लाहोर शहरात स्थलांतरित झाला. तेथेच त्याचा १९५५ साली अकाली मृत्यू झाला. तेथील सरकारने २०१२ साली ‘निशान-ए-इम्तियाज’ हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्याच्या नावे जाहीर केला. मंटोची ओळख अशी बहुदेशी आहे. तो ब्रिटिश भारतात जन्माला आला. स्वतंत्र भारतात काही वर्षे जगला. नंतर पाकिस्तानात काही वर्षे जगला. अधिक तपशिलात उतरायचे झाल्यास त्याची ओळख पंजाबी म्हणूनही आहे. पण त्याने लेखन पंजाबीमध्ये केले नाही. त्याने उर्दूमध्ये लिहिले. त्यामुळे तो उर्दू लेखक आहे. धर्म नावाची गोष्ट तो विशेष गांभीर्याने घेत होता असे दिसत नाही. तरीही तो मुस्लिम लेखक आहे. ऐन तारुण्यात तो इंडियन प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशनमध्ये सामील झाला होता. ही डावीकडे कल असलेली मार्क्सवादी वळणाची संघटना होती. म्हणजे त्याला मार्क्सवादी लेखक असेही म्हणता येते.

त्याच्या लेखकीय आणि सांस्कृतिक अस्मितेच्या दृष्टिकोणातून महत्त्वाची असलेली आणि आजच्या वर्तमानात वादग्रस्त ठरलेली माहिती ही की त्याच्या कुटुंबाचे धागेदोरे काश्मीरपर्यंत पोहोचतात. तिथून विस्थापित झाल्यावर मंटोचे पूर्वज पंजाबात पोहोचले. मंटोची मुळे काश्मीरी होती आणि त्यांचा त्याला अभिमान वाटत असे. त्यांच्या कुटुंबात काश्मीरी संस्कृतीची वैशिष्ट्यपूर्णता प्रेमपूर्वक जपली आणि जोपासली जात असे. मंटोने पंडित नेहरूंना एक पत्र लिहिले होते.या पत्रामध्ये मंटो आणि नेहरू या दोघांमधील काश्मीरशी असलेल्या संबंधांचा उल्लेख आला आहे. काश्मिरी असण्याचा दुसरा अर्थ सुंदर असणे असा आहे, असे या पत्रात मंटोने म्हटले आहे.

आता या मंटोचे काय करायचे? अस्मितेच्या कुठल्या चौकटीत त्याला बंदिस्त करायचे? त्याला भारतीय म्हणावे, तर तो पाकिस्तानीही होता. पंजाबी म्हणावे तर तो काश्मीरीही होता. त्याला धर्माच्या सापळ्यात अडकवून तो मुस्लिम लेखक होता असे म्हटले तर त्याचे डावे असणे दचकावून टाकत पुढे येते. पंजाब, काश्मीर, मुंबईच्या गल्ल्याकुच्या आणि लाहोरमधले मुहाजिर असणे या सर्व परस्परविरोधी असलेल्या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकत्र आल्या होत्या. मंटो असा लेखक होता, की ज्याला या सर्व गोष्टींशी व अस्मितांशी जोडता येते, पण कुठल्या तरी एकाच गोष्टीशी जोडता येत नाही.

पण भोवतालच्या राजकारणाला एकमेकांना पर्याय ठरणाऱ्या, अनेकदा परस्परविरोधी असणाऱ्या, व्यामिश्र अस्मितांची ही अनेकविधता मान्य होत नाही. या राजकारणाला अस्मितेचे प्रश्न सोपे, बटबटीत, ढोबळ आणि राजकीय दृष्टिकोणातून सोयीचे करायचे असतात. त्याच्या लेखी अस्मिता म्हणजे कुठलीही संदिग्धता नसलेला, सहज ओळखता येणारा गणवेष असतो. हा गणवेष घातला की लेखक आपला तरी ठरतो किंवा त्यांचा तरी ठरतो. ही दृष्टी साहित्यविचाराच्या क्षेत्रावरही प्रभाव गाजवते. मंटोच्या बाबतीत असेच झाले आहे.

सआदत हसन मंटोचे इंग्रजीत भाषांतरित केलेले एक पुस्तक अलीकडेच पाहण्यात आले. पुस्तकाचे नाव ‘व्हाय आय राइट’ असे आहे. आकार पटेल यांनी या पुस्तकाचे भाषांतर आणि संपादन केले आहे. मंटोचे विवेचनपर गद्य या पुस्तकात समाविष्ट झाले आहे. आकार पटेल यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत मंटोविषयी माहिती दिली आहे. सआदत हसन मंटो हा पाकिस्तानमधील सापळ्यात सापडलेला भारतीय होता या अर्थाच्या वाक्याने प्रस्तावनेचा प्रारंभ होतो.पटेल पुढे सांगतात की मंटोची अस्मिता धर्मावर आधारलेली नव्हती, ती अंशतः भूगोलावर, पण प्रामुख्याने ‘आपल्या’ संस्कृतीशी असलेल्या आपलेपणाच्या नात्यातून निर्माण झालेली होती आणि या ‘आपल्या’ संस्कृतीविषयी त्याने मोठ्या कौशल्याने लिहिले. ही आपली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. ती अर्थातच पाकिस्तानी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. पटेलांचा निष्कर्ष असा आहे, की मंटो थोर भारतीय लेखक होता. त्याचा अनुभव भारतीय होता. तो भारतीय भाषेमध्ये लिहीत होता आणि त्याचा वाचक भारतीय होता.

मंटोच्या लेखनाचा समावेश पटेल भारतीय साहित्यात करतात, आणि भारतीय साहित्याच्या संकल्पनेमधून पाकिस्तानला निःशंकपणे वगळतात. स्वातंत्र्य आणि फाळणीपूर्वी म्हणजे सत्तरेएक वर्षापूर्वी पाकिस्तान हे राष्ट्रच अस्तित्वात नव्हते. आज पाकिस्तानात असलेल्या प्रदेशातील त्या वेळच्या लेखनाला भारतीय साहित्य म्हणायचे की नाही, की पाकिस्तानीच म्हणायचे हा अवघड प्रश्न पटेलांना पडत नाही. राजकीय फाळणी झाल्यामुळे सांस्कृतिक फाळणी होते का, होत असल्यास तिची प्रक्रिया काय असते, हाही प्रश्न त्यांना पडत नाही. राष्ट्रीय अस्मिता ही स्वाभाविक गोष्ट नसून ती घडवली जाणारी गोष्ट असते, याचे भानही त्यांना नाही. वर्गीकरणाची एक अत्यंत सोपी पद्धत म्हणून ते भारतीय लेखन व पाकिस्तानी लेखन यांच्यात भेद करतात. मंटो पाकिस्तानी लेखक आहे असा गैरसमज होण्याची कारणेही आपल्या परीने पटेलांनी सांगितली आहेत. तो नस्तालिक लिपीमध्ये लिहीत होता, व ही लिपी अलीकडे भारतासाठी परदेशी लिपी झाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. फाळणीपूर्वी पंजाबी लोकांकडून ती सर्रास वापरली जात होती, अशी माहिती ते देतात. नंतर ती परदेशी कशी पाठवली गेली याचा काही खुलासा त्यांनी केला नाही. ही लिपी उर्दू लिहिण्यासाठी वापरली जात असे हे सांगण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. मंटो साध्यासरळ हिंदुस्तानी भाषेत लिहीत होता, असे ते सांगतात. थोडक्यात, गैरसोयीचे गैरसमज टाळले आणि सोयीस्कर योग्य समज करून घेतले की मंटोचे भारतीयत्व अबाधित राहते आणि त्याचे अपहरण टळते असे पटेलांना वाटत असावे.

अर्थातच पाकिस्तानातही पटेल आहेतच. तिथल्या पटेलांनी मंटोच्या आयुष्यातील शेवटची सातेक वर्षे पाकिस्तानात गेली आणि बहुधा तो मुस्लिम आहे म्हणून तो पाकिस्तानी लेखक आहे असे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच पाकिस्तानी पटेलांनी मृत्यूनंतर सत्तावन्न वर्षांनी मंटोला मरणोत्तर ‘निशान-ए-इम्तियाज’ हा पुरस्कार बहाल केला असणार. विकिपिडियामध्ये रोमन लिपीमध्ये व इंग्रजीमध्ये सआदत हसन मंटोचा शोध घेतला तर मंटो पाकिस्तानी लेखक असल्याचे समजते. विकीपिडियामध्येच देवनागरी लिपीत हिंदी भाषेत शोध घेतला तर तो कुठला लेखक आहे याविषयी मौन बाळगले गेले आहे.

पटेल म्हणतात मंटो हा थोर भारतीय लेखक आहे. यात अंशतः भौगोलिक अस्मितेचा भाग आहे. म्हणजे मंटो भारतात मरण पावला नसला तरी त्याच्या आयुष्याचा बराचसा कालखंड भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय भूप्रदेशात गेला आहे. तथापि, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक दृष्टिकोणातून मंटो भारतीय आहे, म्हणून त्याने लिहिलेले साहित्य ‘भारतीय साहित्य’ आहे, असे पटेलांना वाटते.

मंटोचे निमित्त करून आपण ‘भारतीय साहित्य’ या संकल्पनेपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. साहित्याभ्यासाच्या, विशेषतः तौलनिक साहित्याभ्यासाच्या क्षेत्रातील ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. तिच्या तपशिलात उतरलो तरी अस्मितेच्या खिळ्यांनी राजकारणाच्या क्रुसाला लेखकाला खिळवून ठेवण्याची प्रक्रिया तिथेही चालू आहे, हे आपल्या लक्षात येते. ही संकल्पना फार प्राचीन नाही. वसाहतवादाच्या विरोधातील चळवळीतून झालेल्या राष्ट्रसंकल्पनेच्या उभारणीत तिची मुळे आहेत. भाषिक भेद बाजूला ठेवून सांस्कृतिक परंपरेतून निर्माण झालेली एकात्मता, मूल्यव्यवस्थेच्या पातळीवरील एकात्मता तिच्यात मूल्ययुक्त मानली गेली आहे. तिच्या मुळाशी राजकीय स्वरूपाची राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा सांस्कृतिक प्रकल्प आहे. भारतीयत्वाचे इतिहासातीत असे काही मूलभूत आणि अपरिवर्तनीय घटक या प्रकल्पात गृहीत धरले गेले आहेत. हा भारतीय संस्कृतीचे सत्त्व शोधण्याचा प्रयत्न आहे. असे काही शोधण्याचा प्रयत्न केला की संस्कृतीच्या बहुविधतेवर मर्यादा घातल्या जातात आणि ही बहुविधता खोटी, भ्रामक व तात्पुरती ठरू लागणार, हे उघडच आहे. यातूनच अस्मितांना असलेले भिन्न संदर्भ नामोहरम होऊन भारतीयत्वाची केंद्रिय सत्ता सर्वत्र प्रस्थापित होते. परंपरेच्या जडणघडणीच्या मुळाशी असलेले संघर्ष दडपून टाकले जातात आणि एकरस असे सुसंगतीचे साम्राज्य सर्वत्र प्रस्थापित होते. हे साम्राज्य अपरिहार्यपणे ‘हिंदू’ साम्राज्य असते. सांस्कृतिक सत्त्वाचा किंवा संस्कृतीच्या अपरिवर्तनीय गाभ्याचा शोध घेणारे साहित्य म्हणजे भारतीय साहित्य असे ठरवले गेले की भारतातच निर्माण झालेल्या, भारतीय संस्कृतीमधील अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्या, संस्कृतीविषयी चिकित्सक दृष्टिकोण असणाऱ्या, संस्कृतीच्या वर्चस्ववादी शिबिरात सामील न झालेल्या साहित्याला भारतीय साहित्याच्या कक्षेबाहेर ठेवले जाऊ लागते. सांस्कृतिक प्रादेशिकतेचा बळी दिला जातोच, पण त्याशिवाय परसंस्कृतीशी असलेले संवादसंघर्षात्मक संबंधही बाद केले जातात. मंटोचा मार्क्सवाद किंवा पाश्चात्त्य स्त्रीवाद, किंवा दलित साहित्य भारतीय साहित्याच्या संकल्पनेत प्रवेश करू शकत नाही. या भारतीय संस्कृतीच्या गाभ्यात न बसणाऱ्या गोष्टी आहेत असे जाहीर केले जाते किंवा त्यांची धार बोथट केलेली भारतीय रूपे भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे लेप चढवून अकादमिक बाजारात दाखल होतात.

संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात व तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते. टोबा टेक सिंह हे गाव पूर्वी होते तिथेच असून ते पाकिस्तानात किंवा हिंदुस्तानात कसे जाऊ शकते, हे जसे बिशनसिंहला समजत नाही, तसेच लेखकाच्या सर्जनशीलतेच्या सीमारेषांना राजकीय मर्यादा घालणारे उपक्रम या लेखकांना समजत नाहीत. त्यांच्या मुक्तीच्या राजकारणात या संकुचित होत जाणाऱ्या सीमारेषांशी झगडणे मोलाचे मानले जाते. ‘टोबा टेक सिंह’ या मंटोच्या कथेमध्ये प्राणत्यागासाठी कुठल्याही राष्ट्राची मालकी नसणारी ‘नो मॅन्स लॅन्ड’ बिशनसिंहसाठी उपलब्ध आहे. अशा मुक्त अवकाशांनाही आजकाल विद्युतभारीत तारांनी बांधून टाकले जात आहे. त्यांचा अनुभव घेणाऱ्या आजच्या लेखकाला, हा लेखक कुठल्याही देशात राहत असला तरी, सआदत हसन मंटो आपला पूर्वजच वाटणार यात शंका नाही.

साभार : मुक्त शब्द संपादकीय, सप्टेंबर, २०१९

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0