सातपाटील कुलवृत्तांत: काळाचा अजस्त्र पट उलगडणारी महाकादंबरी

सातपाटील कुलवृत्तांत: काळाचा अजस्त्र पट उलगडणारी महाकादंबरी

७०० वर्षांचा विस्तृत काळ आणि अहमदनगर ते थेट अफगाणिस्तान असा अफाट अवकाश कादंबरीत आला आहे. इतका मोठा पट उभे करणारा लेखक नक्कीच महत्त्वाकांक्षी आहे. तशी महत्त्वाकांक्षा रंगनाथ पठारे यांच्या या आधीच्या कादंबऱ्यांतही दिसून येते.

विद्वेषाच्या आगीत दिल्लीची संवेदना खाक
बलात्काराच्या गुन्ह्यांत २० टक्क्याने वाढ, सर्वाधिक बलात्कार राजस्थानमध्ये
देखणे ते चेहरे

२१ सप्टेंबर रोजी रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. प्रकाशनाआधीही ती अनेकांनी वाचलेली होती. त्यांचे अभिप्राय इथे तिथे ऐकायला/वाचायला मिळत होते. त्यात सर्वांनी सातपाटील कुलवृत्तांतला महाकादंबरी असे म्हटले होते. मराठीत याआधी कुठल्याही कादंबरीला प्रामुख्याने महाकादंबरी असे म्हटले गेले नाही. भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू’ या कादंबरीनंतर मात्र तशी शक्यता निर्माण झाली आहे असे वाटू लागले. आता ‘हिंदू’चा पुढचा भाग लवकरच येतो आहे असेही नेमाडेंनी सांगितले आहे. त्यामुळे ‘हिंदू’च्या चार भागांकडून महाकादंबरीची अपेक्षा बाळगण्यास नक्कीच जागा आहे. दरम्यान ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही भक्कम ८०० पानांची कादंबरी ‘शब्दालय प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाली आहे. प्रकाशन होण्याआधीच तिला महाकादंबरी म्हटले जाऊ लागले हे वर आलेच. मात्र ते केवळ पृष्ठसंख्येमुळे नव्हे, तर एकूण कादंबरीच्या अवकाश-काळाचा विस्तृत पट सामावून घेण्यामुळे हे कादंबरी वाचताना ध्यानात येते.

कादंबरीचा नायक हा एकविसाव्या शतकातील आधुनिक जाणिवांचा, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला, नास्तिक प्राध्यापक आहे. कर्मकांडाचा त्याला तिटकारा आहे, परंतु कुटुंबाची, कळपाची गरज म्हणून तो ते निमूटपणे विनातक्रार करत आहे. अशाच एका प्रसंगी आपला कुलवृत्तांत कथन करत आहे. तो कुलवृत्तांत म्हणजेच ही कादंबरी.

कादंबरीची सुरवात १३व्या शतकापासून अल्लाउद्दीन खिलजीच्या पैठणवर केलेल्या आक्रमणापासून होते. तिथून रंगनाथ पठारे इतिहासाचा वेध घेत मलिक अहमद निजाम शहाचा कार्यकाळ, पानिपतचे युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, ईस्ट इंडिया कंपनी ते थेट एकविसावे शतक असा विस्तृत पट मांडतात.

ऐतिहासिक तपशिलांचा हा एक मुख्य दोर आहे. दुसरा एक मुख्य दोर आहे तो कथनाचा, जो कादंबरीचा मुख्य भाग आहे. वरवर पाहता हे कथानक कालानुक्रमाणे सलग आलेले आहे. पण त्याला रूढ अर्थाने नायक नाही. नायक म्हणता येतील अशी अनेक प्रमुख पात्रं आहेत. श्रीपती, साहेबराव, दसरथ, जानराव, पिराजी, शंभुराव आणि देवनाथ हे सारे स्वतंत्र आख्यायिकांचे नायक ठरतील असे आहेत. इतिहासाच्या मुख्य दोराला समांतर असे या नायकांचे जीवनपट आहेत. त्यांनी केलेल्या लढाया आहेत. त्यांची सुख-दुःखं, नाती, कौटुंबिक कलह आहेत. त्यांच्या कथनातूनही त्या त्या काळच्या जगण्याचे, जाणिवांचे संदर्भ टोकदारपणे व्यक्त झालेले आहेत.

खेरीज या दोन मुख्य दोरांसोबतच उपकथांचे, मिथकांचे, संस्कृतीच्या विविध अंगांचे मानवी भावभावनांचे, देवदेवतांच्या आख्यायिकांचे, मिथकांच्या समांतर आणि पर्यायी भानाचे असे अनेक सूक्ष्म दोर आहेत. हे सारे दोर रंगनाथ पठारे यांनी विलक्षण कौशल्याने वळले आहेत. त्यातून कादंबरीचा एकसंध असा दोरखंड निर्मित झाला आहे. लेखकाने तो इतक्या कौशल्याने वळला आहे की त्याची वीण ८०० पृष्ठांच्या विस्तृत पटावर कुठेही सैलावत नाही.

७०० वर्षांचा विस्तृत काळ आणि अहमदनगर ते थेट अफगाणिस्तान असा अफाट अवकाश कादंबरीत आला आहे. इतका मोठा पट उभे करणारा लेखक नक्कीच महत्त्वाकांक्षी आहे. तशी महत्त्वाकांक्षा रंगनाथ पठारे यांच्या या आधीच्या कादंबऱ्यांतही दिसून येते. ‘दिवे गेलेले दिवस’ पासून ते प्रस्तुत कादंबरी यांत त्यांनी केलेले प्रयोग याची साक्ष देतात. ‘नामुष्कीचे स्वगत’मध्ये तर त्यांची शैली थेट दस्तयवस्कीच्या ‘Notes from the underground’ आणि मार्केझच्या ‘Autumn of the patriarch’ या कादंबरीतील लेखनकुळीशी साध्यर्म दाखविणारी आहे. कादंबरी ऐतिहासिक तपशिलांनी भरपूर असली तरी, हे तपशील केवळ पृष्ठे भरण्यासाठी येत नाहीत. मुख्य कथनाचे अविभाज्य भाग म्हणून ते येतात. त्यामुळे ‘सातपाटील कुलवृत्तांत’चे वाचन करणे विलक्षण आनंददायी आणि सुखकारक असा अनुभव आहे.

कादंबरीच्या प्रकाशन समारंभात राजन गवस म्हणाले तसे ‘सातपाटील कुलवृत्तांत’ मध्ये रंगनाथ पठारेंची भाषा सहज सोपी होत गेली आहे. ‘नामुष्कीचे स्वगत’मध्ये दीर्घ पल्ल्याची, प्रसंगी एक पृष्ठाहून अधिक लांबीच्या गुंतागुंतीची आणि कठीण वाक्यांची रचना करणारे पठारे सर प्रस्तुत कादंबरीत विलक्षण सोपे आणि हळुवार होत गेले आहेत ते खरेच आहे. सोपे लिहिणे हे श्रेष्ठ लेखकाचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणता येईल. व्यंकटेश माडगूळकर नवोदित लेखकांना सहज सोपे लिहिण्याचा सल्ला देत असत असे म्हणतात. कारण तेच सर्वात कठीण असते.

मात्र सोपे असले तरी ते एकसुरी, कंटाळवाणे असे नाही. किंबहुना ८००  पृष्ठांच्या अवकाशात तसे झाल्याचे कुठेही आढळत नाही. चार दशकांहून अधिक काळ लिहीते असणाऱ्या लेखकाची कमावलेली भाषा, त्याचा Unmistakable Tone कादंबरीत जाणवतो. खेरीज त्यांनी केलेले भाषिक प्रयोग. निवेदकाची भाषा कथनाच्या निकडीनुसार कशी प्रवाहित होत जाते तेही पाहण्यासारखे आहे. पेशव्यांचा काळ कथन करताना ती जितक्या सहज बखरींच्या शैलीत व्यक्त होऊ लागते तितक्याच सहज आणि सामर्थ्याने रामदेवराव जाधव यांचा काळ कथन करताना महानुभवांच्या लिळाचरित्राच्या शैलीत प्रकट होऊ लागते. शिवाय बोलीभाषा आहेतच.  कठाण-निठाण, आंदोर, चिंभावणं, खंडीभर पेंढी, इरिशिरी, मेनकाशी मेंढी, तुंदिलतनू असे  बोलीभाषेतील अनेक कमी/अपरिचित शेकडो शब्द.  या भाषिक प्रयोगांनी कादंबरीला एक निराळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

मात्र लेखकाला केवळ एक ऐतिहासिक कादंबरी लिहायचे नाही हे स्पष्ट आहे. त्यातून तो निराळे काही शोधू पाहतो आहे. कादंबरीच्या उत्तरारार्धात देवनाथ हा नायक म्हणतो तसे तो त्याच्या कुळाचा माग इतिहासात घेतो आहे. आपण आज जे काही आहोत, जसे आहोत त्याची मुळं भूतकाळात, पूर्वजांच्या असण्याच्या प्रकाशात त्याला तपासायची आहेत.

तसा माग घेताना त्याला त्याच्या पूर्वजांच्या अनेक विलक्षण आणि चकित करणाऱ्या गाथा ठाऊक झाल्या आहेत. आपल्या कुळाचा माग त्याला थेट अफगाणिस्तान ते इंग्लड इथवर गवसला आहे. जात आणि धर्मशुचितेचे वर्चस्व असणाऱ्या त्याच्या वर्तमान काळ आणि स्थळासंदर्भात दोन ध्रुवांवर असणाऱ्या वंशाची अशी बिनदिक्कत सरमिसळ त्याला चक्रावून टाकणारी आहे. त्याचा त्याने त्याच्या परीने शोध घेतला आहे. त्या तिव्रकोमल प्रकाशात त्याच्या वर्तमानाच्या स्वरूप समजावून घेतले आहे.

रंगनाथ पठारेंनी आणखी एक गोष्ट या कादंबरीत केली आहे. त्यांनी वाचकाला इतिहासाकडे पाहण्याची विशाल दृष्टी बहाल केली आहे. त्यांच्याच इतर कादंबऱयांचे वाचन करताना होते तसे वाचक निवेदकाच्या सोबतीने घटितांचे एक एक तुकडे तपासत त्याचे अर्थनिर्णय करत पुढे जात नाही. तर अरुण कोलटकरांच्या ‘सर्पसत्र’ या दिर्घकवितेतल्या सर्पासारखे एकदम उंचावर जाऊन खालचा काळाचा प्रवाह पाहू लागतो. खाली विशाल जनसमूह अखंड येत – जात राहतात, विनाशकारी युद्धे होतात, त्याबरोबर इतिहासाचे वळण बदलते, सोबत भूगोलही, जगण्याच्या रेट्यात माणसे कुठल्या कुठे फेकली जातात, वादळात सापडलेल्या क्षुद्र पानांसारखी भिरभिरत जाऊन अज्ञात ठिकाणी विसावतात, त्या स्थळाला आपलेसे करून कायमचे तेथले होऊन जातात, कुणी भूतकाळाचे ओझे झुगारण्यासाठी वाडवडलांच्या गावातून परागंदा होऊन भटकत राहतात, नव्या ठिकाणी नवी गावे वसवतात, त्याची सुरवात एका पुरुष आणि स्त्रीच्या वसण्याने होते, वंशवेली बहरत – पसरत राहतात, आदिम मानवाने वसविलेल्या, राहण्याजोगी केलेल्या मानवी जगाच्या स्थापनेच्या अनेक छोट्या आवृत्त्या दिसू लागतात.

या पसाऱ्यातून पठारे जीवनाची क्षणभंगुरता ध्यानी आणून देतात. नंतरच्या काळात तर अफाट विश्वविस्तारातून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या आकाशगंगा, त्यातील तारे, त्यांच्याभोवती भ्रमण करणारे ग्रह यांची आठवण देऊन या अफाट पसाऱ्यापुढे आपण नेहमी विनीत असायला हवे याचे स्मरण करून देतात. सोबत या साऱ्याला ज्ञानाच्या कक्षेत आणू पाहणाऱ्या, अणूंचेही विभाजन करू शकणाऱ्या मानवी कुतूहल आणि सामर्थ्याचा आवाका लक्षात आणून देतात. आणि हे सारे कादंबरीच्या अवकाशात, मुख्य कथनापासून दूर न जाता, रटाळ तपशीलांची भरणा न करता ओघाने येत राहते. हे लेखक म्हणून रंगनाथ पठारेंचं मोठं सामर्थ्य आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0