समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली

समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाचे वादग्रस्त संचालक समीर वानखेडे यांची अखेर डायरोक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलिजन्स (डीआरआय)मध्ये बदली करण्यात आली. ही बदली म्हणजे एनसीबीतील त्यांचा कार्यकाल संपुष्टात आणल्याचे बोलले जाते. डीआरआय ही एनसीबीची मुख्य प्रशासकीय संस्था आहे. आता मुंबई एनसीबीच्या विभाग संचालकपदी इंदोर विभाग प्रमुख ब्रिजेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिजेंद्र चौधरी हे २००९च्या भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असून त्यांचे काडर कस्टम अँड इनडायरेक्ट टॅक्स हे आहे.

वानखेडे २००८च्या भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असून ऑगस्ट २०२०मध्ये त्यांची नियुक्ती एनसीबी मुंबई विभागाच्या प्रमुखपदी झाली होती. ऑगस्ट २०२०मध्ये बॉलीवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणात अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी व काही अभिनेते असल्याचा संशय होता, त्या संबंधांची चौकशीचे काम वानखेडे यांच्याकडे देण्यात आले होते. वानखेडे यांचा कार्यकाल हा एक वर्षांचा होता पण ऑगस्ट २०२१मध्ये त्यांना चार महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा डीआरआयमध्ये पाठवण्यात आले. सरकारने त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात नकार दिल्याचे समजते.

डीआरआय ही तपास संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ इन्डायरेक्ट टॅक्स अँड कस्टमच्या अंतर्गत चालवली जाते.

वानखेडे यांना एनसीबीत पुन्हा मुदतवाढ देऊ नये अशीही एनसीबीची भूमिका होती.

एनसीबीच्या मुंबई विभाग संचालकपदी आल्यानंतर वानखेडे यांची कारकीर्द गाजली ती त्यांनी बॉलीवूड जगतातील हाय प्रोफाइल केस हाती घेतल्यानंतर. ऑक्टोबर २०२१मध्ये बॉलीवूड स्टार शाह रुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एक ड्रग्ज पार्टीत अटक करण्यात आली. या घटनेनंतर वानखेडे अधिक चर्चेत आले. वानखेडे प्रसार माध्यमांत हिरोसारखे वावरू लागले व त्यांच्या ‘प्रामाणिकपणाच्या, सचोटीच्या’ गोष्टी सोशल मीडियात व्हायरल होऊ लागल्या. पण आर्यन खान केसला वळण लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सध्याचे महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनी. वानखेडे हे खंडणी घेऊन बड्या हस्तींना अमली पदार्थ व्यापाऱ्याच्या जाळ्यात अडकवतात असा थेट, सनसनाटी आरोप मलिक यांनी केला. मलिक यांनी वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचेही पुरावे सोशल मीडियात व न्यायालयात सादर केले. वानखेडे यांनी मलिक यांचा जावई समीर खान याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणात पूर्वी अटक केली होती. या प्रकरणानंतर मलिक व वानखेडे यांच्यात वाद वाढत गेला होता.

मूळ बातमी

COMMENTS