संगणकाचे भाऊबंद – १

संगणकाचे भाऊबंद – १

संगणक युगाने संगणक-साक्षर लोकांसाठीच असलेल्या बुद्धीजीवींपुरते मर्यादित न राहता, प्रथमच ब्लू-कॉलर अथवा कौशल्याधारित रोजगार निर्माण केला. प्रिंटरच्या आगमनाने गमावलेला सायक्लोस्टाईल यंत्राच्या क्षेत्रातील रोजगार या फोटोकॉपी यंत्राने पुनर्स्थापित केला. इतकेच नव्हे तर या यंत्राच्या सुटसुटीतपणा मुळॆ त्याची व्याप्तीही अनेक पटींनी वाढवली.

संगणकाचा ‘गृहप्रवेश’
गणक-यंत्र
आभासाशी जडले नाते

संगणकपूर्व काळात दस्तऐवजांची निर्मिती आणि छपाई किंवा प्रती तयार करणे या दोन प्रक्रिया, अनुक्रमे टाईपरायटर आणि सायक्लोस्टाईल (याला मराठीमध्ये ‘प्रतिरूप मुद्रण’ अशी संज्ञा काही ठिकाणी वापरली जाई.)  अशा दोन यंत्रांच्या साहाय्याने केल्या जात असत. संगणकाने दस्तनिर्मितीचे अनेक पर्याय देऊन आणि ती प्रक्रिया सोपी, सहज पुनरावृत्त करण्याजोगी बनवून टाईपरायटर या उपकरणाची सद्दी संपुष्टात आणली. आता प्रती बनवण्याचे काम सुलभ करणे ओघाने आलेच. सायक्लोस्टाईल प्रक्रियेमध्ये, ज्या पानाच्या प्रती काढायच्या त्यांचे ‘टेम्प्लेट’ (template) किंवा ‘स्टेन्सिल’ (stensil)  प्रथम बनवले जाई. हे स्टेन्सिल मेण-कापडाचे अथवा मेण-कागदाचे बनवलेले असे. स्टेन्सिल बनवताना प्रथम टाईपरायटरमधील शाईची रिबीन काढून टाकून, हा कागद टाईपरायटरमध्ये घालून त्यावर टाईप केले जाई. त्यामुळे टाईपरायटरचे ठसे आवश्यक त्या मजकुराच्या ठिकाणी कागदाला भोके पाडत. त्यानंतर हा कागद सायक्लोस्टाईल यंत्रावर बसवून त्याच्या आवश्यक तितक्या प्रती बनवल्या जात.

संगणकाचा सोबती म्हणून आलेल्या प्रिंटर (printer) हा एकाच वेळी टाईपरायटरचे आणि सायक्लोस्टाईल उपकरणाचे तंत्र घेऊन अवतरला. टाईपरायटरमध्ये ज्याप्रमाणॆ ठसा-छपाई होत असे, त्याच तंत्राने यातही छपाई होते; फक्त ठसा उमटवणारी जागा आणि कागद यांच्या भूमिका नेमक्या उलट झाल्या आहेत. टाईपरायटरमध्ये ठसा उमटवणारी जागा निश्चित असे (साधारणपणे यंत्राच्या मध्यभागी) आणि जसजसे ठसे उमटत मजकूर पुढे जाई तसतसा कागद डावीकडे सरकत जाई. याचा एक तोटा असा की या यंत्राच्या रुंदीइतकीच जागा डावीकडे नि उजवीकडे मोकळी ठेवणे आवश्यक होते. प्रिंटरमध्ये कागद स्थिर ठेवून ठसा उमटवणारे ‘हेड’ उजवीकडून डावीकडे सरकत जाण्याने प्रिंटरला डावी-कडे उजवीकडे अतिरिक्त जागा सोडण्याची गरज उरली नाही. (काही प्रिंटर्समध्ये ते एक ओळ डावीकडून उजवीकडे आणि पुढची उजवीकडून डावीकडे असेही काम करे. यातून प्रत्येक ओळीनंतर पुढच्या ओळीवर जाताना काहीही न छापता एक पूर्ण ओळ डावीकडे जाण्याची अनुत्पादक क्रिया वाचते.)

संगणकपूर्व काळात ज्या प्रमाणे टायपिंग शिकवणाऱ्या संस्था अथवा ‘इन्स्टिट्यूट’ असत, त्याचप्रमाणे तुमच्या मजकुराच्या प्रती बनवून देणारे ‘प्रतिरूप मुद्रक’ असत. तुम्ही बनवलेले अथवा बनवून घेतलेले स्टेन्सिल त्यांच्याकडे देऊन त्यांच्याकडून प्रतींची छपाई करून घेता येत असे. ही छपाई करणारी व्यक्ती केवळ दिल्या मजकुराच्या प्रतीच बनवत असल्याने, तिला टायपिंगचे तर सोडाच पण भाषेचे ज्ञान नसले तरी चालत असे. केवळ दिल्या स्टेन्सिलवरून शाईचा रूळ फिरवणे, आणि छापून तयार झालेला कागद उचलून बाजूला काढणे इतकेच काम तिला करावे लागे. त्यामुळे एखादी अशिक्षित व्यक्तीदेखील हे काम सहज करू शकत असे. प्रिंटरला थेट संगणकाकडून मजकूर पुरवला जात असल्याने वेगळे स्टेन्सिल बनवण्याची गरज संपली. त्याचबरोबर या उपकरणाला चालवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता न उरल्याने, एकच व्यक्ती दस्तनिर्मिती आणि छपाई दोन्ही क्रिया सहज करू शकत होती. त्यामुळे प्रतिरूप मुद्रणासाठी स्वतंत्र व्यक्तीची गरज संपली.

टाईपरायटरचा वापर जरी कमी होत गेला, तरी एक अंगभूत कौशल्य म्हणून टायपिंग अस्तित्वात राहिले. त्यासाठी वापरले जाणारे उपकरण बदलले इतकेच. संगणकाचे कामचलाऊ प्रशिक्षण घेऊन, टायपिस्ट आपला रोजगार काही प्रमाणात अबाधित राखू शकले.  पण प्रिंटरच्या आगमनानंतर अकुशल कामगारांसाठी उपलब्ध असलेला सायक्लोस्टायलिंगचा धंदा मात्र पूर्ण संपला. पुढे टायपिंग प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक संगणकावरच मिळू लागल्याने त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूट हळूहळू अस्तंगत होत गेल्या.

एका बाजूने संगणकाचा प्रवास रोजगाराची आणि कौशल्याची जुनी दारे बंद करत असतानाच, काही पर्याय नव्याने निर्माणही करत होता. दस्तनिर्मिती आणि प्रती बनवणे या पलीकडे जाऊन, संगणकावर मूळ दस्त साठवून ठेवता येत होता. काही काळानंतर त्याच्या प्रती नव्याने बनवणे अथवा त्यात भर घालणे किंवा फेरफार करून नवा दस्त बनवणे शक्य होते. ही मूळची प्रत कागदी प्रतीप्रमाणे नाशवंत नसल्याने, दीर्घकाळ ‘जशीच्या तशी’ सांभाळून ठेवता येते. तिची गुणवत्ता घसरत नाही. हा फायदा छापील प्रतींमध्ये नसतो. त्यामुळे संगणकपूर्व छापील प्रतींच्या संगणक-प्रतींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ‘स्कॅनर’ (Scanner) या उपकरणाची निर्मिती करण्यात आली.

याचे काम सायक्लोस्टाईल यंत्राच्या नेमके उलट होते. तिथे मजकुराच्या स्टेन्सिलवरून प्रत बनवली जात असे तर इथे उपलब्ध मूळ दस्त-प्रतीवरून प्रिंटरसाठी जणू स्टेन्सिलप्रमाणे काम करू शकणारी त्याची संगणक-प्रत बनवली जाते. साध्या घरगुती वापराच्या स्कॅनरची कार्यपद्धती पाहिली तर सायक्लोस्टाईल मशीनप्रमाणॆच कागदावरून एक रुळ फिरवून त्याच्याद्वारे कागदावरचा मजकूर वाचला जातो नि त्याचे रुपांतर संगणकीय दस्तामध्ये केले जाते. अर्थात कागदावर मजकुरापासून चित्रे, कमी-जास्त आकाराचा अथवा जाडीच्या अक्षरांचा, बहुभाषिक मजकूर असणॆ शक्य असल्याने ही गुंतागुंत सोडवण्यासाठी प्रथम तो ‘आहे तसा’, म्हणजे एखाद्या फोटोप्रमाणेच वाचला जातो. नंतर संगणकावर त्या चित्रातील अक्षरे, चित्रे यांना वेगळे करून भाषिक स्वरुपात त्याचे रूपांतर केले जाते. चित्रावरून अक्षरे ओळखण्यासाठी संगणकामध्ये OCR म्हणजे Optical Character Recogniser तंत्राचा वापर केला जातो. या स्कॅनर आणि OCR जोडगोळीने अतिशय जुन्या, विवर्ण होत चाललेल्या दस्तऐवजांना जीवदान दिले आहे. टायपिंग असो वा छपाई, संगणकपूर्व काळात ही कौशल्ये म्हणून अस्तित्वात होती. त्या कामांना साहाय्यभूत होणारी यंत्रेही अस्तित्वात होती. पण स्कॅनिंग हे तंत्र आणि त्यासाठी तयार झालेले उपकरण ही सर्वस्वी संगणक-युगाची देणगी आहे.

या स्कॅनिंगच्या तंत्रामध्ये कागदाचा संपूर्ण पृष्ठभाग हा हजारो लहान चौरसांनी विभागला जातो. प्रत्येक चौकटीला ‘पिक्सल’ म्हटले जाते. हा कागद वाचताना या पिक्सलमधे दिसणाऱ्या सूक्ष्म चित्राचे रूपांतर रंग, पोत, प्रखरता आदि घटकांच्या साहाय्याने आकड्यांमध्ये केले जाते, ज्याला पिक्सलायजेशन असे म्हटले जाते. नंतर हे आकडे विशिष्ट क्रमाने एक प्रकारच्या दस्त ऐवजाच्या स्वरुपातच साठवून ठेवले जातात. या दस्ताची साठवणुकीची पद्धत निश्चित असल्याने उलट दिशेने तो वाचून तंतोतंत तेच चित्र संगणकाच्या पडद्यावर, आणि नंतर प्रिंटरच्या माध्यमातून कागदावर उमटवणे शक्य होते. OCRमध्ये अक्षरे ओळखण्याचे काम या आकड्यांमुळेच सुलभ होते.

हे स्कॅनिंग पुरे झाल्यावर, त्याची प्रत संगणकात साठवून ठेवून हवी तेव्हा तिची प्रत काढणे शक्य झाले. परंतु जेव्हा एखाद्या दस्त ऐवजाची अथवा फोटोची प्रत केवळ एखादीच प्रत आवश्यक असेल आणि भविष्यकालीन वापरासाठी त्याची संगणक-प्रत राखून ठेवण्याची आवश्यकता नसेल, तेव्हा संगणकाच्या मध्यस्थीची गरज नव्हती. त्यामुळे अशा कामांसाठी स्कॅनर तंत्राची प्रिंटरसोबत सांगड घालून ‘फोटोकॉपी मशीन’ची (ज्याला सर्वसामान्यपणे झेरॉक्स  या पहिल्या उत्पादकाच्या नावानेच ओळखले जाते) निर्मिती केली गेली. ज्यातून संगणकाच्या मदतीशिवाय, त्यासंबंधीच्या माहितीशिवाय अगदी मर्यादित आज्ञावलीच्या साहाय्याने एकाच दस्ताच्या अनेक प्रती तयार करता येणे शक्य झाले. यामुळे आता संगणक युगाने संगणक-साक्षर लोकांसाठीच असलेल्या बुद्धीजीवींपुरते मर्यादित न राहता, प्रथमच ब्लू-कॉलर अथवा कौशल्याधारित रोजगार निर्माण केला. प्रिंटरच्या आगमनाने गमावलेला सायक्लोस्टाईल यंत्राच्या क्षेत्रातील रोजगार या फोटोकॉपी यंत्राने पुनर्स्थापित केला. इतकेच नव्हे तर या यंत्राच्या सुटसुटीतपणा मुळॆ त्याची व्याप्तीही अनेक पटींनी वाढवली.

स्कॅनर हा दस्तांना ‘जसे आहे तसे’ किंवा जणू त्याचा कॅमेऱ्याने फोटो काढला आहे अशा प्रतीच्या स्वरुपात रूपांतरित करून देत असल्याने, फक्त दस्तऐवजांचीच अशी प्रत तयार करता येईल असे बंधन उरले नाही. त्याच्या साहाय्याने माणसाच्या स्मरणरंजनाचे मुख्य साधन असलेल्या छायाचित्रांची संगणक-प्रत बनवून  सहजपणे आणि दीर्घकाळ साठवून ठेवण्याची सोय करून दिली. ज्याप्रमाणॆ स्कॅन केल्यानंतर तयार झालेल्या दस्त ऐवजावर  OCR मार्फत प्रक्रिया करून त्यातील मजकूर वेगळा ओळखणे शक्य झाले, त्याचप्रमाणे स्कॅन केलेल्या जुन्या फोटोंमधील दोष सुधारून घेत त्यांचा दर्जा सुधारणारे तंत्रही संगणकावरच विकसित करण्यात आले. याशिवाय प्रथम सेल्युलॉईड फिल्म, संगणक, छापील प्रत आणि तिचे अखेर स्कॅनिंग करून बनवलेली संगणक-प्रत हा लांबलचक प्रवास साऱ्या मधल्या टप्प्यांना वगळून आखूड करत कॅमेरा थेट संगणक-प्रतच बनवून देईल असे तंत्र विकसित करण्यात आले आणि ‘डिजिटल कॅमेरा’ नावाच्या उपकरणाचा जन्म झाला.

scienceandart.org  वरुन साभार

scienceandart.org  वरुन साभार

डिजिटल कॅमेरा या तंत्राने फोटोग्राफी या माध्यमाचा विस्तार अनेक पटींनी वाढला. मधला फिल्म आणि छपाईचा खर्चच नसल्याने एकदा कॅमेरा हाती असला, की सामान्य माणसे हव्या तितक्या संख्येने फोटो काढू लागली. हे फोटो प्रचंड माहिती साठवू शकणाऱ्या बोटभर लांबीच्या मेमरी कार्डस वर साठवून ठेवणे शक्य झाल्याने, फोटो काढताना फारसे चोखंदळ राहण्याची आवश्यकता उरली नाही. आधी अनेक फोटो काढून, त्यातले न आवडलेले काढून टाकून बाद करण्याची सोय झाली. त्यामुळे फोटो काढतानाच त्याच्या विविध पैलूंबद्दल फारसा विचार न करता, धडाधड फोटो काढणे सुरू झाले.

प्रगतीच्या वाटेवर हटकून होते तेच इथेही घडले, ते म्हणजे गुणवत्तेला मागे सारून संख्याबळाने मुसंडी मारली. पण असे असले, तरी छायाचित्रकाराची उत्तम नजर असलेल्या- पण फिल्म छपाई यासाठी पुन्हा पुन्हा करावा लागणारा खर्च न परवडणाऱ्या  सामान्य आर्थिक कुवतीमुळे त्यापासून वंचित राहिलेल्या अनेकांना यामुळे या क्षेत्रात मुशाफिरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली हे नाकारता येत नाही.

पुढे स्मार्टफोनच्या आगमनानंतर या डिजिटल कॅमेऱ्याने त्याच्यासोबत आघाडी करून ‘ज्याचे हाती मोबाईल, तो फोटो काढी’ पर्यंत प्रगती (?) केली. काही व्यावसायिक छायाचित्रकार आता अवजड डी.एस.एल. कॅमेऱ्यांना सुटी देऊन उच्चप्रतीचे कॅमेरे असणाऱ्या मोबाईलकडे वळले आहेत. थोडक्यात या स्मार्टफोनने स्वतंत्र कॅमेरा उत्पादकांच्या पायाखालची जमीन हादरवायला सुरूवात केली आहे.

डॉ. मंदार काळे, संख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: