संगणकाचे भाऊबंद – २

संगणकाचे भाऊबंद – २

संगणकाच्या उत्क्रांतीचे वैशिष्ट्यच हे की एका हेतूने विकसित केलेले तंत्र अनेकदा तेवढे एकच काम न करता आणखी दोन पावले पुढे जाताना दिसते.

एका बाजूने संगणकाचे भाऊबंद दस्त-निर्मिती, छपाई आणि साठवण या तीन प्रकाराने काम करत असतानाच, दुसरीकडे संगणकाने तयार केलेला दस्त त्याच्या पडद्यावरच वाचता येत असल्याने, प्रत्येक दस्ताची छपाई करण्याची आवश्यकता राहिली नाही. कायदेशीर दस्त बनवणे किंवा संगणक उपलब्ध नसणार्‍या व्यक्तिकडे हा दस्त पोचवणे अशा काही कारणांमुळे आवश्यक नसेल तर त्याची छापील प्रत तयार करण्याची गरज संपली. इतकेच नव्हे तर काही सेकंदात त्याची प्रत बनवून फ्लॉपी डिस्क आणि तिचा वारसा सांगणार्‍या अन्य साठवणूक उपकरणांच्या साहाय्याने हा दस्त संगणक-प्रतीच्या स्वरुपातच अन्य व्यक्तीला देणे शक्य झाले. महत्वाचे म्हणजे इथे कागदी प्रतीच्या विपरीत मूळ प्रत देणार्‍याकडे शिल्लक राहात असल्याने नेणार्‍याने परत न केल्याने अथवा गहाळ केल्याने पुस्तक परत न मिळण्याचा धोका संपुष्टात आला.

दस्तऐवज बनवणे, साठवून ठेवणे, त्यात बदल करणे, अथवा भर घालणे, त्याची प्रत बनवून हस्तांतरित करणे आदि कामे संगणकामुळे सहज-सोपी झाल्यामुळे, आता लहान दस्तांच्या पलीकडे पुस्तकांसारखे अनेक पानांचे दस्तऐवजही संगणकावर तयार करणे शक्य झाले. इतकेच नव्हे, तर एका व्यक्तीने तयार केलेल्या अशा दस्तऐवजामध्ये इतरांना भर घालणे, दुरुस्ती करणे शक्य झाले. याचा दुसरा फायदा असा झाला, की पुस्तकासारखा मोठा दस्तऐवज तयार करण्याचे काम एकाहून अधिक व्यक्ती वाटून घेऊ शकत होत्या. शिवाय एवढ्या मोठ्या दस्तऐवजात अपरिहार्यपणे राहणार्‍या चुका अथवा दोष, एकाहून अधिक वेळा – एकाहून अधिक व्यक्तींनी – वाचून दुरुस्त करणे सुलभ झाले. त्याचबरोबर अखेरची प्रत तयार झाल्यावर त्यापुढे त्यात बदल करू नयेत, किंवा पुस्तकासारख्या अथवा कायदेशीर दस्तऐवजाच्या प्रतींमध्ये कुणी अनधिकाराने बदल करू नये, यासाठी त्यांची ’वाचनमात्र’ प्रत बनवून वितरित करण्याची सोय संगणकामार्फत उपलब्ध झाली. यातून अशा ’ई-बुक्स’ची निर्मिती आणि त्यांचा वापर वाढू लागला.  शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तकांसाठी वा संदर्भग्रंथांसाठी हे नवे तंत्र उपयुक्त ठरू लागले.

ज्या विद्यार्थ्याला केवळ पुस्तकच वाचायचे आहे त्याला ई-बुक वाचण्यासाठी पुरा संगणक गरजेचा नव्हता. त्यामुळे संगणकाच्या कार्यप्रणालीचा आवश्यक तेवढाच भाग घेऊन अमेजन या प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्या कंपनीने ’किंड्ल’ नावाचे संगणकाचा भाऊबंद असलेले उपकरण बाजारात आणले. यात ई-बुक्स मध्ये पुस्तकातील विशिष्ट महत्वाच्या मजकुरांचे ’बुकमार्क’ तयार करता येऊन त्यांची स्वतंत्र अनुक्रमणिका तयार करता येऊ लागल्याने, कागदी पुस्तकांत हवा तो मजकूर शोधण्यासाठी अनेक पाने उलटण्याचा नि शोधाशोध करण्याचा वेळ वाचला.  कॅफेमध्ये, बस-स्टॉप अथवा रेल्वे-स्टेशनवर, विद्यापीठाच्या आवारात एखाद्या सर्वसाधारण पुस्तकाच्या लांबी-रुंदीचे पण अनेकपट कमी जाडीचे हे उपकरण घेऊन बसलेले विद्यार्थी सहज दिसून येतात. या एकाच उपकरणामध्ये हजारो पुस्तके एकाच वेळी साठवून ठेवता येतात.

अशा सुटसुटीत वापराच्या ’ई-बुक रीडर्स’मुळे अमेरिका आणि युरप सारख्या प्रगत देशांतील शैक्षणिक क्षेत्रात छापील पुस्तकांचा वापर हळूहळू कमी होत गेला आहे, आणि त्यांची जागा ई-बुक्सने व्यापण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या दशकातच अशी छापील शैक्षणिक पुस्तके अस्तंगत होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

संगणकाच्या निर्मितीचा मुख्य हेतू गुंतागुंतीचे गणिती काम तयार करणारे यंत्र बनविणे हा होता.  ब्लेझ पास्कलच्या ”पास्कलाईन” यंत्राच्या धर्तीवर किमान गणिती प्रक्रिया करू शकणारे ’फॅसिट मशीन’ सारखी यंत्रे माणसाला सर्वसाधारण आकडेमोड करण्यात साहाय्य करत होती. संगणकाने इलेक्ट्रॉनिक युगात प्रवेश केल्यानंतर या यंत्रांची जागाही ’डिजिटल कॅल्क्युलेटर’ या उपकरणाने घेतली. साध्या बेरीज, गुणाकारासह मूलभूत गणिती प्रक्रियांपासून वर्गमूळ, घातांकासह भौमितिक सूत्रे वगैरे आणखी काही गणिती प्रक्रियांसह हे आणखी एक उपकरण तयार करण्यात आले. ज्याप्रमाणे किंडल हे केवळ दस्तवाचनाचे काम करत होते, त्याचप्रमाणॆ हे उपकरण निव्वळ गणिती प्रक्रिया करणारे होते.

स्कॅनरच्या तंत्राने एक पाऊल पुढे टाकून छायाचित्रे काढणार्‍या कॅमेर्‍यातून फिल्मला हद्दपार करून डिजिटल कॅमेरा निर्माण केला. याच फिल्मचा वापर करणारे चित्रपट हे चलच्चित्र तंत्राचा वापर करत होते. एका सेकंदात २६ अथवा ३० फ्रेम अथवा स्थिरचित्रे, एका-पाठोपाठ एक अशी पडद्यावर प्रक्षेपित करून, गतीचा आभास निर्माण केला जात होता. संगणकाच्या जमान्यात स्थिरचित्रणातून फिल्म वगळल्याने, आणि त्या स्थिरचित्रांवर संगणकाच्या साहाय्याने विविध प्रक्रिया सहजपणे करता येऊ लागल्याने, हेच तंत्र  चलच्चित्रांच्या प्रत्येक फ्रेम अथवा स्थिरचित्रांवर वापरणे शक्य झाले.  त्यामुळे स्थिरचित्रांबरोबरच चलच्चित्रांच्या निर्मिती, दुरुस्ती आणि सुधारणेचे कामही संगणकाने ताब्यात घेतले. ज्या डिजिटल कॅमेर्‍याने स्थिर-छायाचित्र काढता येत होते त्याची कार्यक्षमता नि वेग वाढवून त्यातच चलच्चित्र (video) मुद्रित करणे शक्य होऊ लागले. डिजिटल कॅमेरा या उपकरणाने जुन्या फिल्म कॅमेर्‍याची व्याप्ती ओलांडून सामान्य माणसाला चलच्चित्रे तयार करणारे, सहज हाताळता येण्याजोगे उपकरण उपलब्ध करून दिले.

पण छायाचित्रे ते चलच्चित्रे या प्रवासात त्यांना आणखी एक प्रवाह येऊन मिळाला होता. तो होता ध्वनिचा! चित्रपट असोत वा माहितीपट, त्यात हलत्या चित्रांबरोबरच निवेदन अथवा संवादांची जोड असते. चलच्चित्रे संगणकावर आणताना त्याला या ध्वनिची जोड मिळायला हवी होती. द्विमित चित्रांना हाताळणारे तंत्र विकसित झाल्यानंतर, तेच तंत्र ध्वनिसाठी वापरणे फारसे अवघड नव्हते. चित्रांसाठी ज्याप्रमाणॆ चित्राची पूर्ण व्याप्ती अतिशय लहान अशा चौरसांमध्ये – पिक्सल – मध्ये विभाजित करून प्रत्येक चौरसांचे गुणधर्म हे आकड्यांच्या स्वरूपात रूपांतरित करून साठवले जात, त्याच प्रमाणे ध्वनि – उदा. एखादा संगीताचा तुकडा – हा त्याच्या ध्वनि-वारंवारता, आवाजाचा पल्ला आदि गुणधर्मांना पुन्हा आकड्यांत रूपांतरित करून साठवले जाऊ लागले. या ’डिजिटायजेशन’ मुळॆ पुन्हा संगणकाचा वापर त्यात बदल करणे सोपे झाले. ज्याप्रमाणे जुने फोटो स्कॅन करून संगणकीय तंत्राने त्यात सुधारणा करता येऊ लागल्या, त्याचप्रमाणे जुन्या तबकड्या अथवा कॅसेट्स वरील संगीत संगणकीय प्रतींमध्ये रूपांतरित करून त्यात सुधारणा करणे शक्य होऊ लागले. अत्यंत खराब स्थितीतील संगीत, त्यातील पार्श्वभूमीवरचे नकोसे आवाज, तबकडी अथवा कॅसेट जुनी असल्याने ऐकू येणारी खरखर आदि दोष नाहीसे करून त्याची प्रतवारी कमालीची सुधारता येऊ लागली. या संगणकीकरणाचा पल्ला आता इतका वाढला आहे, की ए. आर. रेहमानसारखा एखादा संगीतकार त्याचे संपूर्ण संगीत हे संगणकीय तंत्रानेच तयार करतो आहे.

ज्याप्रमाणॆ डिजिटल दस्तऐवजाच्या वापराची व्याप्ती वाढवण्यासाठी ’अमेजन’ने किंडल हे उपकरण आणले त्याचप्रमाणॆ डिजिटल संगीताची बाजारपेठ ओळखून अ‍ॅपल कंपनीने ’आयपॉड’ या उपकरणाची निर्मिती केली. ज्याप्रमाणॆ किंडलमध्ये असंख्य पुस्तके अथवा दस्त ऐवज साठवून ठेवून वाचण्याची सोय झाली, त्याचप्रमाणे आयपॉड’मध्ये असंख्य गाणी अथवा संगीताची ध्वनिमुद्रणे साठवून ठेवता येऊ लागली. या उपकरणाला हेडफोन अथवा श्रवणयंत्र जोडून त्याचा सर्वस्वी वैयक्तिक वापर करण्याची सोय होती. पुस्तके वाचणार्‍यांपेक्षा संगीत ऐकणार्‍यांची संख्या अधिक असल्याने आणि संगीत ऐकताना अन्य कामे करणे शक्य असल्याने (किंवा अन्य कामे करताना हे संगीत ऐकता येत असल्याने) या उपकरणाचा प्रसार ’किंडल’पेक्षा अनेक पट वेगाने आणि व्याप्तीने झाला आहे.

संगणकाच्या उत्क्रांतीचे वैशिष्ट्यच हे की एका हेतूने विकसित केलेले तंत्र अनेकदा तेवढे एकच काम न करता आणखी दोन पावले पुढे जाताना दिसते. मुळात संगीत ऐकण्यासाठी निर्माण केलेले हे उपकरण खरेतर केवळ ध्वनिमुद्रण ऐकवणारे उपकरण होते. त्यामुळे त्यात केवळ संगीतच ऐकावे असे बंधन नव्हते. त्याऐवजी एखादे भाषण, व्याख्यानही ऐकणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थी शाळा अथवा महाविद्यालयातील एखाद्या शिक्षकाचे व्याख्यान ध्वनिमुद्रित करून पुन्हा ऐकू शकत होता. त्याहीपुढे जाऊन आपण उपस्थित नसलेल्या व्याख्याने इतर कुणी केलेले ध्वनिमुद्रणच थेट त्यावर घेऊन ऐकू शकत होता. याचा पुढचा टप्पा म्हणजे एखाद्या प्राध्यापकाने शिकवलेला एखादा २५ अथवा ४० सत्रांचा अभ्यासक्रम घरबसल्या ऐकून शिकू शकत होता.

शैक्षणिक क्षेत्रासाठी हा क्रांतिकारी बदल होता. यातून अनेक शक्यता निर्माण झाल्या. पहिली म्हणजे प्रत्यक्ष शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश न घेता शिक्षण घेणार्‍या दूरस्थ विद्यार्थ्यांना या तंत्राचा मोठाच फायदा होता. त्यातही छापील अथवा डिजिटल पुस्तक डोळ्यासमोर धरुन वाचण्याऐवजी कानात श्रवणयंत्र लावून डोळ्यांवर कोणताही ताण न घेता हा अभ्यास करता येऊ लागला. अनेकदा बस अथवा तत्सम वाहनाने प्रवास करतानाही हे काम करणे शक्य झाले. याचा शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राने आणखी फायदा घेतला. विविध प्राध्यापकांचे अभ्यासक्रम, व्याख्याने ध्वनिमुद्रित करून त्यांची व्यावसायिक विक्री सुरु झाली. ’द टीचिंग कंपनी’, ’मॉडर्न स्कॉलर’ यासारख्या व्यावसायिक शैक्षणिक कंपन्या उदयास आल्या. या व्यावसायिकतेचा एक फायदा असा झाला की एखाद्या विषयातील ख्यातनाम प्राध्यापकाच्या शिक्षणसंस्थेत शिकत नसूनही, त्याचा विषय त्याच्याकडूनच ’शिकता’ येऊ लागला. यातून जगात कुठेही असलेल्या त्या त्या विषयातील जगप्रसिद्ध प्राध्यापकांकडून शिक्षण घेणे शक्य झाले. पुढे इंटरनेटच्या आगमनानंतर यांचा पल्ला नि आयाम आणखी वाढले.  त्याच्या मार्फत त्या शिक्षकांना या ’एकलव्यां’शी जोडून घेऊन अप्रत्यक्ष शिक्षणाला प्रत्यक्ष शिक्षणात रूपांतरित करणे शक्य झाले.

संगणकावर एकाच वेळी दस्त (documents),  चित्र (image, photo, graph), ध्वनि (audio) आणि चलच्चित्रे (video) यांची निर्मिती, दुरुस्ती आणि वितरण शक्य होऊ लागल्यानंतर या ई-बुक्सना त्यांची जोड देणे शक्य आहे. अशा बहुआयामी पुस्तकांची परिणामकारकता  छापील पुस्तकांपेक्षा अनेक पट असू शकते. हे जरी सहज शक्य असले त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. आज इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विकीपीडिया अथवा तत्सम माहितीकोषात मजकुराच्या जोडीला चित्रांचा वापर केला जात असला तरी ध्वनि आणि चलच्चित्रांचा वापर अजूनही होत नाही. अशा संस्थळावर तर हे शक्य आहेच पण किंडलसारख्या उपकरणांत या सर्व प्रकारांची सोय आहे. परंतु अद्यापही हे चारही प्रकार एकत्रितपणॆ वापरणारी ’मल्टिमीडिया ई-बुक्स’ अजूनही जवळजवळ नाहीतच.

’हॅरी पॉटर’ या प्रसिद्ध पात्राच्या कथांवर आधारित चित्रपटामध्ये हलती चित्रे असलेले वर्तमानपत्र दाखवले होते. मुद्रित माध्यमांत हे शक्य नसले तरी डिजिटल माध्यमांत हे सहज शक्य आहे.  विविध वृत्तपत्रांची अथवा व्यावसायिक संस्थळे संगणकावर ही सरमिसळ सहज वापरत असली, तरी किंडलसारख्या उपकरणांवर अथवा शैक्षणिक उपयोगाच्या क्षेत्रात त्यांचा वापर अद्यापही नगण्य म्हणावा असाच आहे.

डॉ. मंदार काळेसंख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS