पै-पाहुण्यांचे राजकारण, क्रॉस व्होटिंग व ‘करेक्ट’ कार्यक्रम

पै-पाहुण्यांचे राजकारण, क्रॉस व्होटिंग व ‘करेक्ट’ कार्यक्रम

आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा ताकदीचा अंदाज घेणारी राज्यातील विविध जिल्हा बँकेची ही निवडणूक लक्षवेधी आणि आगामी राजकारणाचे संकेत देणारी ठरली आहे. 

शिखर बँक घोटाळाः अजित पवारांसह ६९ जणांना क्लिन चीट
दि कराड जनता बँकेचा परवाना रद्द
बँक ऑफ इंडियासह ४ बँकांचे खासगीकरण?

सहकार चळवळ आणि जिल्ह्यातील आर्थिक संस्थांवर नियंत्रण ठेवत आमदारकीचा मार्ग खुला करणाऱ्या राज्यातील विविध जिल्हा बँकांच्या निवडणुकीत पक्षीय चुली बाजूला ठेवत पै पाहुण्यांचे आणि कुठे क्रॉस व्होटिंगचे तर ‘करेक्ट कार्यक्रमाचे’ राजकारण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाले. जवळपास सर्वच जिल्हा बँकांवर महाविकास आघाडीमधील पक्षांची मक्तेदारी आली असली तरी यामध्ये अनेकदा भाजपशी छुपा हनिमून करावा लागला आहे. या सर्व धुमश्चक्रीत शिवसेनेच्या एका विद्यमान मंत्र्याचा तर राष्ट्रवादीच्या एका वजनदार नेत्याचा पत्ता कट झाला.

जवळपास सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रथमच राजकीय पातळीवर लढवली गेली. यामध्ये सांगली जिल्हा बँकेची निवडणूक ‘करेक्ट कार्यक्रम’, पै-पाहुण्याचे राजकारण, ‘क्रॉस व्होटिंग’ यामुळे तुफान गाजली. आगामी निवडणुकीत येणारी राजकारणाची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सहकारी संस्थेत राजकारण आणू नये, ही भूमिका ठेवून बिनविरोधचा फॉर्म्युला आणला होता. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेने त्याला विरोध केला. त्यामुळे महाआघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. महाआघाडीतील राष्ट्रवादीने ११, काँग्रेसने ७ आणि शिवसेनेने ३ जागा लढवल्या; तर भाजपने १६ जागा लढवल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा गमवाव्या लागल्या. शिवसेनेने शंभर टक्के यश मिळवले. तर भाजपने १६ पैकी ४ जागांवर वर्चस्व स्थापन केले आहे. जतमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सावंत यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. विशेष म्हणजे सावंत हे मंत्री विश्वजित कदम यांचे जवळचे नातेवाईक आहेत. पण जयंत पाटील यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ करत तेथे आगामी विधानसभा निवडणुकीची बीज पेरली. आटपाडीत शिवसेनेच्या तानाजी पाटील यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा पराभव केला. पतसंस्था व बँक गटात धोकादायकपणे क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसले. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे राहुल महाडिक यांनी बाजी मारली. त्यामुळे अनेक गटात पै-पाहुणे खुलेपणाने राबल्याचे दिसून आले. सांगली विधानसभेसाठीचे इच्छुक विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेसाठीची तयारी ठरली आहे.

जयंत पाटील हे अगदी सुरूवातीपासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भाजपला पॅनेल करावे लागले. काही नेत्यांची इच्छा नसतानाही भाजपने शड्डू ठोकला आणि काही डावही टाकले. ‘राजकारणात सगळे माफ असते, यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपने उमेदवारी दिली. डाव जमले आणि भाजपच्या पॅनेलने धक्का देत चार जागा आरामात जिंकल्या. या निवडणुकीत तीन विद्यमान संचालकांचा पराभव झाला. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड, सुरेश पाटील यांचा विजयीत समावेश आहे. शिवाय, तज्ज्ञ संचालक ॲड. चिमण डांगे हेही संचालक झाले आहेत. अजितराव घोरपडे पूर्वी संचालक होते. तेही परतले आहेत. ही निवडणूक पक्षविरहित असली, तरी या लढतीत चार पक्षातील नेते रिंगणात होते. त्यात काँग्रेसचा दोन जागांवर, राष्ट्रवादीचा दोन जागांवर, भाजपचा १४ जागांवर पराभव झाला. शिवसेनेने तीन जागा लढवल्या आणि विशेष म्हणजे तीनही जागांवर त्यांनी विजय मिळवला. तीनही जागा सोसायटी गटातील असल्याने तीन तालुक्यांत शिवसेना नेत्यांनी आपली पकड दाखवून दिली.

असेच काटाकाटीचे राजकारण सातारा जिल्हा बँक निवडणुकीत रंगले. येथे कोण कोणाचा हेच शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान मंत्री शंभुराज देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संतापलेल्या शिंदे समर्थकांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. या निवडणुकीत अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या. या सगळ्या लढतीत महत्त्वाची लढत कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उदयसिंह पाटील यांच्यात होती. या लढतीत बाळासाहेब पाटील यांनी बाजी मारली; पण ५३ वर्षे जिल्हा बँकेत संचालक राहणाऱ्या (कै.) विलासराव पाटील उंडाळकर यांचा पराभव उंडाळकर गटासाठी धक्का देणारा ठरला. उंडाळकर गटाचं नेमके काय चुकले याबाबत आता चर्चा सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणी विलासराव पाटील उंडाळकर यांचे मोठे योगदान आहे. तब्बल तीन दशके जिल्हा बँकेची सत्ता त्यांनी आपल्या ताब्यात ठेवली होती. ते म्हणतील तो संचालक आणि ते म्हणतील तो चेअरमन असायचा. मात्र, गेल्या १० वर्षांपासून जिल्हा बँकेतील त्यांच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली. मात्र, त्यांच्या सोसायटी मतदारसंघात त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. त्याच या मतदारसंघात एवढं प्राबल्य होते, की दरवेळी त्यांच्याविरोधात उमेदवार शोधताना विरोधकांची दमछाक व्हायची. सध्या झालेल्या निवडणुकीची तयारीही त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या सुपुत्राला पराभूत व्हावे लागले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भोसले गटाला विरोध केला. त्यामुळे यापूर्वीच्या जिल्हा बँकेच्या सर्व निवडणुकीत उंडाळकरांबरोबर असलेला भोसले गट बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्याचा मोठा फटका उंडाळकर गटाला बसला. तर जावळी गटात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीमधीलच एका गटाने धोबी पछाड केले. येथे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतीलच ज्ञानदेव रांजणे हे जेमतेम ताकद असलेले उमेदवार उभे होते. मात्र त्यांना जिल्ह्यातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे बोलले जात होते. तसेच भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांचे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांचाही आशीर्वाद त्यांना होता. यातूनच ही लढत अत्यंत चुरशीची होत अखेर केवळ एका मताने शिंदे यांचा पराभव झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या शिंदे यांचा विधानसभेपाठोपाठ हा सलग दुसरा मोठा पराभव ठरला. त्यांचा पराभव होताच त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयावर दगडफेक करत जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार, बँकेचे मातब्बर संचालक प्रभाकर घार्गे यांना यंदा पक्षाने उमेदवारी नाकारली. ते सध्या कारागृहात आहेत. मात्र त्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत कारागृहातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. हाही विजय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारा समजला जात आहे. त्यांच्या विजयामागेदेखील पक्षातील बंडाळीचा हात असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दीड ते दोन महिन्यांपासून राजकारण रंगले होते. सर्वपक्षीय पॅनल होईल की नाही, यावरही बरीच खलबते झाली. ऐनवेळी काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला. भाजप नेत्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने जिल्हा बँकेवर दणदणीतपणे आपला झेंडा फडकावला. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची संकल्पना मांडली. त्यानुसार भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बैठका घेण्यात आल्या. मात्र, काँग्रेसने भाजपसोबत न जाण्याची भूमिका स्पष्ट करीत वेगळे पॅनल करण्याचा इशारा दिला होता. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती. बदलती समीकरणे लक्षात घेऊन भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.

अखेरीस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सहकार पॅनल रिंगणात उतरले. महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्यामुळे असंतुष्ट उमेदवारांनी शेतकरी पॅनलद्वारे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे नेते डी. जी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास पवार, भाजपचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र पाटील यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे ११ उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. काही जागांमध्येही शेतकरी विकास पॅनलतर्फे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला. काही ठिकाणी ही निवडणूक औपचारिकता होती. १० जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. सहकार पॅनलने बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध करत २१ पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळविला.

रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या राणे पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलने जिंकल्या. काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. सहकार पॅनेलने राणे पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. २१ पैकी १९ जागा जिंकून सहकार पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. लांजा मतदार संघात सहकार पॅनेलला पराभव पत्करावा लागला. येथे राणे गटाचा सदस्य निवडून आला. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले वर्चस्व कायम राखले  आहे. सरकार पॅनेलचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख सहकारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी १० जागांवर काँग्रेसच्या पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर ९ जागांसाठी झालेल्या मतदानातही काँग्रेसच्याच ८ जागा निवडून आल्या.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या तीनही माजी आमदारांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी विजय मिळवला आहे. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सुभाष भामरे यांच्या भावाला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी मतदान झालं होते. भाजप नेते माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे यांना हा चांगलाच धक्का मानला जातो आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला आहे.

निवडणुकीदरम्यान भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहे.

या निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्या कारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात गेली आहे.

आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा  ताकदीचा अंदाज घेणारी राज्यातील विविध जिल्हा बँकेची ही निवडणूक लक्षवेधी आणि आगामी राजकारणाचे संकेत देणारी ठरली आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: