संजय राठोड प्रकरणः आपण कुठे चुकत आहोत!

संजय राठोड प्रकरणः आपण कुठे चुकत आहोत!

‘पुरुषी’ राजकारण स्त्रियांना वाटाघाटी करायला भाग पाडते. ज्या स्त्रियांना राजकीय पार्श्वभूमी तसेच उच्च जातीची पार्श्वभूमी असते त्यांना सार्वजनिक क्षेत्रात येण्याचे मार्ग खुले असतात. परंतु ज्यांची उच्च जातीची तसेच आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसते त्यांना मात्र सार्वजनिक तसेच राजकीय क्षेत्रात येण्याचे कुठलेच मार्ग खुले ठेवले जात नसतात.

पंतप्रधान वस्तुसंग्रहालयात नेहरूंना जागा नाही
अनाथांच्या १ टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

सध्या शिवसेनेचे आमदार व राज्याचे वनमंत्री संजय राठोड (ज्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे) यांच्या संदर्भातल्या घटनेमुळे ‘राजकारण, सत्ता आणि स्त्रियांचा संबंध’ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसा तर राजकारण आणि पुरुषप्रधान समाजाचा खूप जवळून संबंध येतो हे आपणही जाणतो. मात्र आता या लैंगिकतेच्या राजकारणात आणखी किती बळी जातील याची कल्पना न केलेली बरी. ‘राजकीय बळी’ जाण्याच्या घटना वारंवार घडणे म्हणजे याचाच अर्थ या ‘समाज’ नावाच्या संस्थेचे आतले चित्र वेळोवेळी बाहेर येत आहे.

एक हुरहुन्नरी मुलगी स्वतःला सिद्ध करत समोर येते. सार्वजनिक क्षेत्रात तिचा वावर वाढतो. तिच्या सारख्याच अशा कित्येक मुली ज्या राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून राजकारणात आपले पाय रोवू पाहात असतात. राजकारणातली एक तरी संधी शोधण्यासाठी त्या धडपडतात. मग अशा मुलींना समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे तपासले तर त्याचे वास्तव मात्र चिंताजनकच आहे.

‘सार्वजनिक क्षेत्रातला महिलांचा वावर आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’ याचा आपण यानिमित्ताने परत एकदा विचार करायला हवा. सार्वजनिक क्षेत्रात स्त्रिया जेव्हा येतात खास-करून ज्या स्त्रिया राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असतात त्यांनी कुठल्या तरी सत्ताधारी राजकीय पुरुषांसोबत लैंगिकतेची देवाणघेवाण/ वाटाघाटी करणे आवश्यक आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडत असणार परंतु कुणीही त्याच्या खोलात न जाता वर वर स्त्रियांनाच दोषी ठरवून मोकळे होतात.

राजकारणात येण्यासाठी स्त्रियांना संधी उपलब्ध होताना थोडक्यात त्यांचे दोन वर्ग पडतात. राजकारणात तसेच सत्तेवर पोहचण्यासाठी मार्ग काय आहेत आणि कुठल्या स्त्रियांना ते कशा प्रकारे उपलब्ध होतात ते पाहणे महत्त्वाचे ठरते. एक असा प्रस्थापित वर्ग असतो ज्यातून स्त्रियांना/ मुलींना राजकारणात उतरवलं जातं तो म्हणजे राजकीय घराणी आतून आलेली किंवा सत्ताधारी पुरुषाची पत्नी / मुलगी/बहीण. दुसरा वर्ग म्हणजे सामान्य कुटुंबातून, कौशल्यांच्या आणि संघटनाच्या बळावर येणाऱ्या महिला. या दुसऱ्या वर्गातील मुलींना राजकारणात पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन ठरलेलाच असतो. आपण आजूबाजूला, सोशल मीडिया वर अशी वाक्य ऐकतो की, “राजकारणात असलेल्या मुली सत्तासंपादन करण्यासाठी, पक्षातील पदे मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात,” ही वाक्ये कुणाच्याही तोंडी सहजासहजी येत नसतात. त्या दृष्टिकोनाला एक पार्श्वभूमी असते. एक संकुचित मानसिकता त्या मागे कार्यरत असते. या मानसिकतेला बरेच आयाम असतात. ते म्हणजे तरुण मुली स्वतःच्या जोरावर, संघटनाच्या पाठबळावर, हुशारी, वक्तृत्व या आधारे वरपर्यंत जातात. मात्र त्यांच्या प्रगतीला समाजाकडून सकारात्मकपणे बघितले जात नाही.

मात्र या क्षेत्रात एक गट असाही असतो, ज्यांना कुठल्या तरी पातळीवर वाटाघाटी, तडजोडी करून वर जाण्याचा शॉर्ट कट हवा असतो. मग या स्त्रियांना कुठल्या तरी सत्ताधारी राजकीय पुरुषासोबत लैंगिक वाटाघाटी करणे तडजोडी करणे गरजेचे वाटते. आपण म्हणतो, “बायका राजकारणात येण्यासाठी शॉर्ट कट घेतात”, मात्र त्या मागील वास्तव आणि याच्या मागची कारणे हे आपण विचारातच घेत नाही. जात-पुरुष सत्तेच्या दृष्टिकोनातून सत्तेची ही संरचना आहे ती अशी बनवली गेली की, “कुठल्याही स्त्रीला स्वायत्तपणे सत्तेमध्ये तसेच राजकीय संरचनेमध्ये शिरकाव नाही”. त्यामुळे व्यवस्था अशी घडते की स्त्रियांना राजकीय क्षेत्रात यायचं असेल तर तिला कुणीतरी ‘गॉडफादर’ लागत असतो. नाहीतर मग तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तगडी असावी लागते.

थोडक्यात ही गुंतागुंत समोर येते की, स्त्रीने शॉर्ट कट घेतला म्हणजेच तिने शारीरिक संबंध ठेवले आणि ते उघड झाले की तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा काहीसा ठरतो की, त्या संबंधांमध्ये जणू काही ती एकटीच होती. मग तिच्या चारित्र्यावर आरोप लावले जातात. योनीशुचितेच्या संकल्पनेमध्ये ती स्त्री चारित्र्यहीन ठरते. वास्तवात ‘पुरुषी’ राजकारण स्त्रियांना वाटाघाटी करायला भाग पाडते. ज्या स्त्रियांना राजकीय पार्श्वभूमी तसेच उच्च जातीची पार्श्वभूमी असते त्यांना सार्वजनिक क्षेत्रात येण्याचे मार्ग खुले असतात. परंतु ज्यांची उच्च जातीची तसेच आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसते त्यांना मात्र सार्वजनिक तसेच राजकीय क्षेत्रात येण्याचे कुठलेच मार्ग खुले ठेवले जात नसतात. थोडक्यात स्त्रियांनी त्यांच्या लैंगिकतेच्या आधारे पुढे जाणे, या शिवाय इतर मार्ग बाकी ठेवले जात नाहीत.

आणि मग या वाटाघाटीच्या टप्प्यांवरती स्त्रिया येतात आणि कालांतराने त्या वाटाघाटी फिस्कटतात तेव्हाच संपूर्ण दोष हा स्त्रियांकडे येतो. मग असे “बघा हल्लीच्या मुली पुढे जाण्यासाठी वाटेल त्या थराला जातात” सहज बोलून मोकळे होतात. मात्र कधीच त्या दोघांमध्ये असलेली ‘सत्तेची असमानता’ न पाहता ते थेट त्या मुलीच्या चारित्र्यावर हल्ला करतात. वाटाघाटी करायला तयार झालेल्या मुलींचा जेव्हा ‘राजकीय बळी’ जातो,  तेव्हा “सत्तेत असणार्‍या उच्चपदस्थ पुरुषाला खाली खेचण्यासाठी बघा त्या मुलीने ‘हनी ट्रॅप’ केलं असं बोललं जातं.

राजकीय क्षेत्रात त्यातल्या त्यात सत्तेवर असणाऱ्या पुरुष व्यक्ती या राजकीय क्षेत्रात नवीन येऊ पाहणाऱ्या मुलींना काय असं सहज-सोपं अडकवत नाहीत तर, “तुझ्या मध्ये नेतृत्व गुण आहेत, तुला नगरसेवक, महापौर, आमदार बनवतो”, अशी स्वप्नं दाखवली जातात. त्यांच्या मनावर स्वतःच्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली जाते. आणि मग हळूहळू त्यांना सत्ताचक्रात गुरफटून ‘चकवा’ दिला जातो. त्यांची फसवणूक केली जाते. जिथे सत्तेचा हव्यास तिथे लिंगभेद आवरून राजकारण केलं जातं. मग ‘ति’च्या इच्छा-आकांक्षा, कर्तृत्व, कलाकौशल्य यांचं काय? पण तिला तर माणूस म्हणून गणलं जातच नाही. एक उपभोगाची वस्तू किंवा सेवा पुरविणारी व्यवस्था म्हणून समजलं जातं. आणि हाच ‘समज’ धर्म-जात समाजाचा स्त्रीविषयक असणारा दृष्टिकोनाचा गाभा आहे.

प्रत्येक घटनांत जात आणि ही व्यवस्था स्त्रियांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे सर्व दोषाचे खापर त्यांच्यावर फोडण्याची प्रवृत्ती ही त्या-त्या समाजाच्या धर्मगुरूंनी प्रस्थापित केली आहे. राजकीय क्षेत्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार हे पुरुषी समाजाच्या संकुचित विचारांचा परिपाक आहे. आणि त्यातून प्रस्थापित पुरुषांच्या सोयीचे ‘हिंस्त्र’ राजकारण उभे करण्यात येते. त्यातून ‘बाईपणाकडे’ बघण्याचा दृष्टिकोन ही घडत जातो. मग “आमच्या स्त्रिया, तुमच्या स्त्रिया” ही वृत्ती समोर येते. स्त्रियांचे शरीर, लैंगिकता या सर्वांचे राजकारण फार आधीपासूनच जातीय/जातअंतर्गत अधिकाधिक घट्ट होत जाते. अलीकडे झालेल्या घटना लक्षात घेता इथे ‘समाज’ ‘जातीची’ महिलांवरील मालकी वारंवार अधोरेखित केली जाते. “आम्ही आमच्या स्त्रियांचं बघून घेऊ”, अशा वृत्तीचा आणि योनीशुचितांचा संबंध हा थेट धर्माशी/संस्कृतीशी असतो. नियम, संस्कृती, संस्काराची वाहक फक्त स्त्रीच असते असे वारंवार बिंबवले जाते.

‘खाजगी नाती आणि विनिमयाचा सत्तासंबंध’, येतोच परंतु तो कशामुळे येतो तर, पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या संरचनेमुळे होय. जेव्हा एक गट दुसर्‍या गटावर सत्ता गाजवतो तेव्हा त्या दोहोंमधील नाते राजकीय होते. जेव्हा ही व्यवस्था बऱ्याच काळापासून चालत राहते तेव्हा त्यातून सरंजामशाही प्रणाली तयार होते, आणि या सरंजामशाही राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून पुरुषांची सत्ता स्त्रियांवर निर्माण होते. कोणतेही सरकार सत्तेद्वारे उभे राहते. असे सरकार मताधिक्यातून, सहमतीतून पाठिंबा मिळवून घडते आणि मग हिंसाचाराच्या साहाय्याने अशी सरकारे जनतेवर लादली जातात. बऱ्याचदा सहमतीमधून सत्ता गाजवली जाते परंतु जेव्हा सहमती काढून घेतली जाते तेव्हा त्यासाठी अचानक हिंसाचाराचा आसरा घेतला जातो. आणि मग बलात्कार, जप्ती, मारहाण तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, खून अशा प्रकारची प्रकरणे उद्भवतात. तसेच माध्यमातून आपण पाहताच असतो की स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना किती भडकपणे दाखविल्या जातात. मात्र अशा प्रकरणांमध्ये आई-वडिलांच्या इभ्रतीचा प्रश्न समोर येतो. आपल्या मुलीवर अन्याय झाला म्हणून उघडपणे न्याय मागायचा की, संभाव्य आरोपीच्या भीतीने ‘आमच्या मुलीचे कुणाशीही संबंध नव्हते म्हणून वारंवार जगाला सांगायचे’?

पुरुषी लैंगिक रूपे ही फक्त ‘बळी’ गेलेल्या बाई वर लादली जातात असे नाही. हे लादण्यात फक्त पुरुषांच्या हातात असतो असेही नाही तर विशेषतः स्त्रिया आपला बळी जाण्याला सहमती दर्शवितात आणि ते स्वीकारतात सुद्धा. लैंगिकतेच्या राजकारणाला सहमती मिळविली जाते तीही पुरुषसत्ताक धोरणांना अनुकूल वातावरण निर्माण करूनच. सत्ताधारी पुरुष नावाचा वर्चस्ववादी वर्ग लक्षात घेऊन त्यांच्या शारीरिक व व्यावहारिक गरजा पायाभूत समजून त्यांची व्यक्तिमत्वे रचली जातात. ‘नर’ म्हटला की अरेरावी, बुद्धिनिष्ठता, बळजबरी, तत्परता असे गणित दिसते. आणि ‘मादी’ म्हटलं की, अज्ञान, सहनशीलता, कृतीहीनता, प्रभावहीनता, परावलंबित्व असं गणित तयार केलं जातं.

लालसा, वासना आणि त्यांची तृप्ती यामागे सत्ता आणि अधिकार यांची तर्कप्रणाली असते. तसेच महिलांवरील नियंत्रण, स्वामित्व या ही गोष्टी आहेत. आणि मग या नियंत्रणाला सहमती दिली की, त्या नियंत्रणातून हिंसा सक्षमपणे अस्तित्वात येतेच. ज्या स्त्रियांवर नियंत्रण, सत्ता गाजविण्यात येते त्या फक्त त्या पुरुषाची पत्नीच असते असे नाही तर विवाहबाह्य संबंधातून देखील स्त्रीवर अधिकार गाजवला जातो. आणि यात जेव्हा संबंध खराब होतात, गुंतागुंतीचे बनतात तेंव्हा त्या स्त्रियांना संपवलं जातं. या हिडीस अत्याचारात स्त्रिया देखील सहभागी असतात. जातीच्या, धर्माच्या, कुटुंबाच्या चौकटीत अडकलेल्या स्त्रिया या हिंसाचारात सहभागी होतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे, २००३ मध्ये उत्तर प्रदेशमधील राजकीय नेता अमरमणी त्रिपाठी यांनी तेथील कवयित्री मधुमिता शुक्ला हिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याचे वय ५५ तर तिचे २२ होते. मधुमिता त्याच्या पासून गरोदर राहिली होती म्हणून आता त्याची वाच्यता कुठेही होऊ नये म्हणून तिची हत्या करण्यात आली होती. पाठपुरावा केल्यानंतर असे सत्य बाहेर आले की, या हत्येमध्ये त्याची पत्नी देखील सहभागी होती. यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो की, प्रतिमा जपण्यासाठी पतीच्या समर्थनार्थ  बोलले जाते.

विवाहबाह्य संबंध जाहीररित्या सांगितले जातात आणि ते चुकीचे असून सुद्धा त्याला ‘समाजमान्यता’ मिळते. परंतु या पाशवी चक्रांमध्ये स्त्रियांनी देखील अडकले नाही पाहिजे. एका क्षुल्लक गोष्टीसाठी आपल्या आयुष्यासोबत तडजोड न केलेलीच बरी. शारीरिक संबंध, लैंगिक आकर्षण जरी नैसर्गिक असलं तरी ते समोरच्या व्यक्तीने आपल्यावर लादलेलं असू नये. लैंगिकतेच्या आधारावर पुढे जाण्यापेक्षा योग्य वेळी थांबले पाहिजे. या चक्रामध्ये आपण कुठे थांबले पाहिजे हे लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तो एक गोंधळलेला आणि वाट चुकलेला दृष्टिकोन आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: