‘प्रतिभावंत असाल तर कोणत्याही प्रकारे फिल्म बनवा’

‘प्रतिभावंत असाल तर कोणत्याही प्रकारे फिल्म बनवा’

१९७४ मध्ये पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटच्या १२ व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यजित राय यांनी भाषण केले. राय सारख्या जगद्विख्यात कलाकाराची ही पुण्यात यायची ही केवळ दुसरी आणि अंतिम वेळ होती . १९६९ मध्ये सत्यजित राय पहिल्यांदा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आले होते आणि तीन दिवस ते प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसमवेत होते. राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि फिल्म इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच संपन्न झालेल्या हीरक महोत्सवानिमित्त त्यांच्या इंग्रजी भाषणाचा हा अनुवाद. यात व्यक्त केलेली अनेक मते अजूनही तितकीच लागू पडतात हे त्याचे वैशिष्ट्य. या भाषणाचा प्रकाश मगदूम यांनी केलेला अनुवाद.

कंगनाच्या घरावरचा बीएमसीचा हातोडा अवैध
काही जणांना भेटू दिले नाही : ईयू सदस्याची प्रतिक्रिया
गणपत वाणी बिडी पिताना…

फिल्म इन्स्टिट्यूटचे शिक्षण संपवून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देणे ही एक विसंगत गोष्ट आहे असे मला तीव्रतेने वाटत आहे. एक तर तुमच्यासारखे अधिकृत शिक्षण मी घेतलेले नाही आणि अशा फिल्मचे शिक्षण देणाऱ्या संस्थांकडे वर्षानुवर्षे मी संशयानेच पाहिले आहे. मी चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वीपासूनच हा संशय माझ्या मनात घर करून आहे आणि माझ्यासारख्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न गेलेल्या अनेक लोकांसमवेत काम करून तो अधिकच बळावला आहे.

जेव्हा माझे मित्र गिरीश कर्नाड (फिल्म इन्स्टिट्यूटचे तत्कालीन संचालक) यांनी निमंत्रण दिले आणि दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांशी बोलायला विनंती केली तेव्हा मी होकार दिला तो अपराधी भावनेतूनच. मी कित्येक वेळा हे आमंत्रण अगोदर नाकारले आहे आणि माझ्या या औद्धत्याचे परिमार्जन करण्याची वेळ आता आली आहे. म्हणून मी यायचे कबूल केले. मग मला लक्षात आले की अशा फिल्म इन्स्टिट्यूटबद्दल आता काहीतरी चांगले बोलायला पाहिजे. पुण्याला जेव्हा मी ५-६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आणि तेही  एकदाच आलो होतो तेव्हा माझ्या मनावर काय छाप पडली होती ते आठवायचा मी मग प्रयत्न केला. मी आठवणींचा कानोसा घेतला आणि मला त्याचे उत्तर सापडले. ते म्हणजे या परिसरातला तजेलदारपणा. चित्रपटाबद्दल गहन चर्चा करताना, त्याची मीमांसा करताना, त्याबद्दल विचार करताना, वाचन करताना आणि वादविवाद घालताना आणि कदाचित चित्रपटाची स्वप्ने पाहताना असे चित्रपटाच्या वेडात गुंग होऊन गेलेले तरुण-तरुणी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. मी पाहिला तो आशावाद आणि निष्ठुर अशा फिल्म इंडस्ट्रीच्या दबावाचा स्पर्शही न झालेला उत्साह. हे सर्व आनंददायी होते आणि असे फक्त एका फिल्म स्कुलमध्येच होऊ शकते असे मला वाटले.

सत्यजित राय यांच्या चित्रपट कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आंध्र प्रदेश मधील काकीनाडा फिल्म सर्कलने १९८० मध्ये काढलेला हा विशेषांक . प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बापू यांनी काढलेले राय यांचे रेखाटन मुखपृष्ठावर आहे. या विशेषांकात राय यांचा लेख प्रसिद्ध झाला होता..

सत्यजित राय यांच्या चित्रपट कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आंध्र प्रदेश मधील काकीनाडा फिल्म सर्कलने १९८० मध्ये काढलेला हा विशेषांक . प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बापू यांनी काढलेले राय यांचे रेखाटन मुखपृष्ठावर आहे. या विशेषांकात राय यांचा लेख प्रसिद्ध झाला होता..

आतापर्यंत मी नेहमी पाहत आलो होतो त्या फिल्म स्टुडिओतील दृश्याची आणि तिथल्या वातावरणाची मला सवय झाली होती. इथल्या लोकांचे शिक्षण वेगळ्या प्रकारचे होते. काही लोक आजूबाजूचे पाहून, मन लावून आपापल्या परीने शिकले होते आणि प्रगतीच्या शिड्या चढले होते. बाकीचे लोक इथल्या प्रस्थापित कलाकारांबरोबर बरीच वर्षे काम केल्यामुळे शिकले होते. पण ही  प्रक्रिया काही आपोआप झाली नव्हती तर ही विद्या त्यांना बळजबरीने मागून घेऊन मिळाली होती. काही प्रस्थापित कॅमेरामन तर आपली व्यावसायिक गुपिते अशी राखून ठेवायचे की त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मदतनिसांना शॉटनुसार कॅमेराची पोझिशन कशी राहणार आहे याची माहिती मिळणे सुद्धा मुश्किल व्हायचे. पण निदान कॅमेरामन जवळ काही गुपिते तरी असायची जी ते लपवून ठेवायचे. आणि आपल्या सर्वाना माहिती आहे की जी लोकं मायक्रो फोन सांभाळत किंवा जे लोक सेट बनवायचे त्यांना ते शक्य होत होतं कारण त्यांच्याजवळ व्यावसायिक ज्ञान असायचे आणि त्यामुळे दुसऱ्यांना ही माहिती ते देऊ शकत होते. एखादा अनुभवी नट सुद्धा चार युक्तीच्या गोष्टी त्याच्याबरोबर सीन करत असलेल्या नवशिक्या अभिनेत्याला सांगू शकतो. परंतु या सर्वांना सांभाळणारा असा दिग्दर्शक, त्याचे काय? त्याच्याजवळ सर्वांपासून लपवण्याजोगी काही गुपिते असतात का? दिग्दर्शकाजवळ (या कलेस आवश्यक) असे शिक्षण असते का? की खरेच त्याला अशा शिक्षणाची गरज असते?

मी खात्रीपूर्वक सांगतो की निदान आपल्या देशात तरी ज्या प्रकारचे चित्रपट बनतात त्यामध्ये दिग्दर्शकाचे काडीचेही योगदान नसते. किंबहुना जे काही योगदान असते ते सकारात्मक नसते. तुमच्यापैकी ज्यांना दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे त्यांना माझे हे विधान धक्कादायक वाटेल. दिग्दर्शक काही करत नाही कारण त्याला काही माहितच नसते. तुम्ही विचाराल हे कसे शक्य आहे. तर उत्तर अगदी सोपं आहे. चित्रपट बनवत असताना अनेक कला प्रकारातील लोक आपापल्या परीने योगदान देत असतात. त्यापैकी दिग्दर्शकाचे नक्की काय योगदान असते ते अचूकपणे सांगणे खूप कठीण बाब असते. या गोष्टीचाच नेमका फायदा हा स्वयंघोषित दिग्दर्शक उठवतो. अभिनेते, छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक यांचे काम आपण पाहू शकतो आणि जोखू शकतो. कर्णेंद्रियांद्वारे आपल्याला आवाजाची गुणवत्ता कळू शकते. अभिनेता जे संवाद बोलतो त्याद्वारे लेखकाचे काम आपण तपासतो. ज्या प्रकारे कथा पुढे सरकते त्याद्वारे पटकथेची ताकद आपल्याला कळते. आता जर एखादा निपुण दिग्दर्शक असता तर या सर्व कला प्रकारांना व्यवस्थित एका सूत्रात बांधून त्याला हवी तशी फिल्म बनवू शकतो. जेणेकरून त्या चित्रपटावर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची छाप आढळून येईल. हे तो कितपत साध्य करतो हे त्या फिल्मशी निगडित असणाऱ्या थोडक्या मंडळींव्यतिरिक्त इतरांना याची सुतराम कल्पना नसते. पण मजेची गोष्ट म्हणजे या दिग्दर्शकाजवळ ना ती कुवत असते ना त्याला कोणावर प्रभाव टाकायचा असतो. आपली पोटापाण्याची सोय कशी होईल याच्याशीच फक्त त्याचा मतलब असतो आणि शूटिंग संपले रे संपले की त्या फिल्मशी त्याला काही देणे-घेणे नसते. पुढचे सगळे तो एडिटरवर सोपवून मोकळा होतो. काही जणांच्या मते या दिग्दर्शकाचे चातुर्य एवढेच असते की जेवढे काही शूटिंग झालेले आहे त्याची एक सूत्रबद्ध मांडणी करू शकेल असा आणि त्याला अपेक्षित असे काम करू शकणारा एडिटर त्याने निवडलेला असतो. कंटिन्युइटीची काळजी घेणारा, शॉट बरोबर आहेत की नाही ते पाहणारा आणि कदाचित दिग्दर्शकाला ऍक्शन असे ओरडण्याची तसदी देण्यापासून वाचवणारा असे अनेक उत्तम सहाय्यकही त्याने जमा केलेले असतात. एवढा चाणाक्षपणाही त्याच्यात नक्की असतो.

आता तुम्ही विचाराल की असल्या अडाणी माणसावर विश्वास ठेवून निर्माता का बरे पैसे लावेल. तर त्याचे उत्तर नाही असे आहे. निर्माता विश्वास ठेवतो तो बाकीच्या गोष्टींवर म्हणजे मुख्यतः स्टार्सवर, त्याचप्रमाणे गाण्यांवर आणि कधी कधी चुकूनमाकून कथेवर सुद्धा. पण सर्वात धोक्याची बाब आणि जे खरे कलावंत असतात त्यांच्यासाठी नाउमेद करणारी गोष्ट म्हणजे हा डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही शिकलेला आहात त्या विद्येशी दुरान्वयेही संबंध न आलेल्या मनुष्याने मी आत्ताच वर्णन केलेल्या परिस्थितीमध्ये  बनवलेल्या अशा चित्रपटाला लोकप्रियता मिळू शकते, स्वयंघोषित समीक्षक अशा चित्रपटाची प्रशंसा करतात आणि दैव दुर्विलास म्हणजे अशा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळू शकतो.

अशा प्रकारची व्यवस्था बदलण्याची क्षमता फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आहे असे म्हणावेसे मला खूप वाटते. परंतु तशी परिस्थिती नाही. एक समांतर सिनेमा बनवण्याची ताकद मात्र नक्कीच आहे आणि त्याच्या चाहूलखुणा आपल्याला पुष्कळच दिसत आहेत. हा असा सिनेमा असेल जो चित्रपट माध्यमावर प्रेम असणाऱ्या, तंत्राची ओळख असलेल्या, जो भरपूर पैसा आणि झटपट यश अशा प्रलोभनांना न भुलणाऱ्या, आपल्या देशाबद्दल आणि समकालीन पिढीबद्दल काही सांगू इच्छिणाऱ्या, ज्याच्या जाणिवा इथल्या मातीत रुजलेल्या आहेत आणि आपल्या पाठ्यक्रमामध्ये असलेल्या ब्रेसो, गोदार्द आणि अँटोनींनी यांना आत्मसात करूनसुद्धा ज्यांना याची जाणीव आहे की त्यांचा प्रेक्षक हा फ्रेंच आणि इटालियन नाही तर आपलाच भारतीय देशबांधव आहे अशा तरुण कलाकारांनी बनवलेला असेल.

मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेक जण माझ्यासारखाच विचार करत असतील. किंबहुना तुमच्या शिक्षकांनी याच गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या असतील. त्याच बरोबर माझ्या स्वतःच्या वीस वर्षांच्या अनुभवातून उमजलेल्या काही गोष्टी मला तुम्हाला आता सांगायच्या आहेत जेणेकरून तुमच्या ज्ञानात काही भर पडेल. अनुभवाऐवजी मी इथे शिक्षणही म्हणू शकलो असतो. कारण दोन्ही बाबी जवळपास एकसारख्याच आहेत आणि जोपर्यंत एखादा काम करत राहिला तोपर्यंत त्या गोष्टी वाढतच जातात.

माझे स्वतःचे चित्रपटाविषयीचे शिक्षण ज्यावेळी मी शाळेत शिकत होतो त्या सुमारासच सुरू झाले आणि चित्रपटगृहे म्हणजे माझा जणू वर्गच होता. त्याच्यात भर पडली ती सिनेमांवरची पुस्तके वाचून आणि मग नंतर चित्रपट बनवायच्या धंद्यात प्रत्यक्ष पडल्यानंतर. जो व्यावसायिक सिनेमा म्हणून ओळखला जातो तो मी सार्वजनिक चित्रपटगृहांमध्ये पाहिला. हे जे चित्रपट होते ते इंग्रजी भाषेत होते; काही ब्रिटिश, बाकीचे बहुतेक अमेरिकन आणि या मध्ये कधी कधी भारतीय, फ्रेंच किंवा सोवियत सिनेमे. त्या काळात माझ्यासाठी व्यावसायिक ही संज्ञा काही लांच्छनास्पद नव्हती. सिनेमाची आर्थिक परिभाषा समजण्यास त्यामुळे उलट मदतच झाली. कारण फिल्म बनवायची म्हणजे भरपूर पैसे घालावे लागणार आणि तो पैसा परत मिळवायचा तर जास्तीत जास्त लोकांनी तो पाहिला पाहिजे.

यापैकी काही व्यावसायिक चित्रपट चांगले तर काही वाईट होते. असे खराब सिनेमे म्हणजे काय करू नये याविषयी एक चांगला धडाच होता आणि चांगल्या चित्रपटाइतकीच त्यांची उपयुक्तता होती. वाईट चित्रपटाबद्दलची माझी व्याख्या सुस्पष्ट होती; जो चित्रपट आपले ध्येय गाठण्यात अयशस्वी ठरतो तो वाईट. याचीच दुसरी बाजू म्हणजे जो सिनेमा आपले म्हणणे मांडण्यात सफल होतो तो चांगला चित्रपट म्हणायचा. अतिशय भिकार  चित्रपटांपासून ते अत्यंत तरल अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांना ही व्याख्या लागू होते. ज्या ज्या वेळी मी सिनेमा पाहण्यास गेलो तेव्हा प्रत्येक चित्रपट हा कलात्मकच असला पाहिजे हे काही माझ्या डोक्यात नव्हते. खरे म्हणजे जर मी फक्त अत्युत्तम कलाकृतीच पाहिल्या असत्या तर कदाचित मी काहीच शिकलो नसतो.

प्रेरणा ही एक अनाकलनीय गोष्ट असते आणि त्या प्रेरणेतून निर्माण झालेली कलाकृतीही गूढच राहते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे तिचे आकलन अशक्य होते. जास्त काही शिकवण्यापेक्षा असे चित्रपट बोधप्रद असतात. ठळक आणि स्पष्ट अशा कथेतून आणि ज्यामध्ये फार काही अस्पष्ट गंभीरता नाही अशा चित्रपटातूनच बऱ्यापैकी शिकवण मिळते. म्हणजे सक्षम अशा कलाकारांनी बनवलेला चित्रपट. तांत्रिक बाबी तर यातून शिकण्यासारख्या असतातच पण अनेकदा कला आणि वाणिज्य यांचा जो सुंदर मेळ यांत साधलेला असतो तो जास्त अनुकरणीय असतो. हे समीकरण ज्यावेळी बिघडते आणि चित्रपट अयशस्वी ठरतो त्यावेळी सगळा दोष मात्र दिग्दर्शकाच्या पदरात येतो. चित्रपटाच्या दर्जाच्या पातळीपर्यंत पोचू न शकलेल्या प्रेक्षकांना दोष देण्याची प्रथा त्या काळात नव्हती. कारण चित्रपट बनवण्यापूर्वी ज्या प्रकारचा प्रेक्षक आहे त्याची पातळी दिग्दर्शकाने विचारात घेणे अपेक्षित असायचे.

इथे आपल्याला स्वयंपाक करायच्या प्रक्रियेबरोबर तुलना करता येईल. समजा खूप लोकं जेवत आहेत आणि त्यांना एखादी ठराविक भाजी आवडली नाही तेव्हा स्वयंपाक्याला असे म्हणायला बिलकुल वाव नाही की त्याने बनवलेल्या पदार्थाची चवच त्या लोकांना कळली नाही. ज्या प्रकारचा चित्रपट तुमच्यापैकी बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्या चित्रपटाची निर्मिती ही अशा आहाराप्रमाणे त्याचे ग्रहण करण्याच्या आणि आस्वाद घेण्याच्या हेतूनेच झालेली असते. जोपर्यंत रिळे डब्यात पडून असतात तोपर्यंत तो चित्रपट मृतवत असतो. थिएटरमध्ये लागल्यानंतर प्रेक्षक ज्यावेळी पडद्यावर पाहतात त्याचवेळी तो सिनेमा जिवंत होतो आणि त्याचा हेतू साध्य होतो.

तुम्ही विद्यार्थ्यांनी जरी डिप्लोमा मिळवलेला असला तरी अशा प्रकारच्या  प्रेक्षकांना तुम्हाला विचारात घ्यावेच लागेल. एक पुरोगामी, राजकीय आणि तुम्हाला हवा तसा सिनेमा बनवण्याची स्वप्ने तुम्ही पाहता आहात तर अशा प्रेक्षकांचा तुम्ही विचार केलाच पाहिजे. फक्त स्वान्त सुखाय असा किंवा काही थोडक्या समूहाच्या आनंदाकरिता सिनेमा बनवण्याच्या इच्छेमध्ये मूलतः काही गैर नाही. परंतु ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात, तिथे तुम्ही आर्थिक बाबींचा विचार पूर्णपणे बाजूला सारून दिल्यावरच हे शक्य आहे. तुमच्यापैकी ज्याला कोणाला असा स्वान्त सुखाय सिनेमा बनवायचा आहे आणि आर्थिक बाबींशी काहीही देणे घेणे नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्याला एक उदार निर्माता मिळो अशी प्रार्थना करायला सुरू करा किंवा खरेच सांगायचे झाले तर हलक्या दर्जाच्या सुविधा मिळण्यास तयार राहा. जर तुम्ही खरे प्रतिभावंत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे फिल्म बनवा; आज नाही तर उद्या तुम्हाला तुमचा प्रेक्षकवर्ग निर्माण करता येईल. असे नसेल आणि तुम्हाला या धंद्यात टिकून राहायचे असेल तर मात्र तडजोडीच्या नियमाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही गत्यंतर नाही.

पण तुमच्यापैकी बहुतेक सर्वांसाठी तुमचे कार्यक्षेत्र जरी सिनेमा व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात नसले तरी त्याच्या कडेला, परीघावरती  तुम्हाला नक्कीच जागा असेल. समांतर सिनेमाला सुद्धा आपले मार्केट आणि स्वतःचा प्रेक्षक शोधावा लागेल. अशा या परिस्थितीत जर तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवलेले असतील तरच तुम्हाला स्वप्ने पाहणे परवडू शकेल. ही गोष्ट अशक्यप्राय वाटू शकेल पण तसे नाही. आपले स्वत्त्व न गमावता खूप मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात यशस्वी झालेल्या कलावंतांची अशी भरपूर उदाहरणे सिनेमाच्या इतिहासात आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्जनशीलतेला थोडीशी समज आणि जराशा चातुर्याची जोड देता तेव्हाच हे शक्य होते. जर एका कलाकारासाठी ही बाब अयोग्य आहे असे जर तुम्हाला वाटेल तर मी तुम्हाला सांगतो की ओरसन वेल्लेस सारख्या दिग्दर्शकानेसुद्धा त्याचा पहिला चित्रपट (‘सिटीझन केन’) जो साऱ्या परंपरा तोडणारा होता त्याचा विषय निवडताना हा विचार केला होता. खरे म्हणजे माझ्या स्वतःच्या पहिल्या ‘पाथेर पांचाली’ चित्रपटाच्या विषयाची निवड करताना माझ्या डोक्यात हेच होते की माझ्यासारख्या नवीन दिग्दर्शकाकडे अविश्वासाने पाहण्यापेक्षा या लोकप्रिय कादंबरीमध्ये (बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांची ‘पाथेर पांचाली’ ही कादंबरी) प्रेक्षकांना जास्त रस  असेल .

प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करणे ही त्यामागची कल्पना. राहिलेलं सर्व मग त्या चित्रपटावरती अवलंबून. लक्षात ठेवा की प्रेक्षक हा असा प्राणी आहे की जो बदलू शकतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे प्रेक्षकांच्या अभिरुचीमध्ये बदल होत असतो. आता हे खरे आहे की आधुनिक मानव ज्याला म्हणता येईल अशा टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी अजून खूप मोठ्या प्रेक्षकवर्गाच्या अभिरुचीत आणि विचारशक्तीत बदल व्हावा लागेल. पण तुम्ही त्याची एवढी काळजी करायची काही आवश्यकता नाही. अजून एक दुसरा वर्ग आहे, जो जास्त आधुनिक आहे, पण त्यांची संख्या खूप कमी आहे, त्यांनी आपापली झाडे सोडली आहेत, त्यांच्या शेपट्या गळून गेल्या आहेत आणि ते आपल्या दोन पायांवर उभे राहून शिकार करत आहेत. त्यांना जे भक्ष्य हवे आहे ते तुम्ही देऊ शकता.

तुम्ही जे काही शिकलेला आहात आणि तुम्हाला बाकीच्यांनी जे काही सल्ले दिलेले आहेत ते विचारात घेऊनसुद्धा मला तुम्हाला सावधानीचा इशारा द्यायचा आहे की तुमचे काम सोपे असणार नाही. इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्या देशात चित्रपट कलावंताच्या मार्गात इतके अडथळे आणि अनपेक्षित संकटे असतात की त्यापासून कसा बचाव करायचा त्याचे शिक्षण तुम्हाला कोणत्याच शाळेत मिळत नाही. तुमच्यापैकी ज्यांनी डिप्लोमा फिल्म बनवलेली आहे त्यांना आतापर्यंत यापैकी काही अनुभव आलेलेच असतील. त्याला हजाराने गुणा म्हणजे मग एक व्यावसायिक कलाकार म्हणून आपल्याला कशाचा सामना करायचा आहे हे तुम्हाला थोडेफार लक्षात येईल.

अशा आव्हानांना सामोरे जाताना धैर्य कधीच सोडायचे नाही आणि अगदी शेवटपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहायचे हे मी अनुभवांतून शिकलेलो आहे. कोणास ठाऊक तुम्ही कदाचित या लढाईत जिंकू शकाल. असे पूर्वी घडलेले आहे. पुन्हा एकदा असे का घडू नये याला कोणतेच कारण नाही .

अनुवाद : प्रकाश मगदूम

प्रकाश मगदूम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक आहेत.

(साभारः मूळ लेख १५ मे २०२१च्या दैनिक लोकमतमध्ये संपादित स्वरुपात आला होता.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: