सत्यशोधक समाज

सत्यशोधक समाज

ओतूर, जुन्नर २० एप्रिल १८७७ सत्यरूप जोतीबा स्वामी यास, सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत,  पत्रास कारण की गेले १८७६ साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रत

ब्रिटीश खासदाराचा भारत प्रवेश नाकारला
मी आणि गांधीजी – ३
आमार कोलकाता – भाग २

ओतूर, जुन्नर
२० एप्रिल १८७७

सत्यरूप जोतीबा स्वामी यास,
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत, 

पत्रास कारण की गेले १८७६ साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही. जनावरांना चारापाणी नाही. यास्तव कित्येक देशांतर करून आपले गाव टाकून जात आहेत…असे इकडचे भयानक वर्तमान आहे.

सत्यशोधक मंडळींनी या भागातील लोकास अन्न धान्य पुरविण्यास्तव धीर देण्यास्तव दुष्काळनिवार कमिट्या स्थापल्या. भाऊ कोंडाजी व त्यांच्या उमाबाई मला जीवापलीकडे सांभाळतात. ओतूरचे शास्त्री गणपती सखाराम, डुंबरे पाटील वगैरे आपल्या समाजाचे सत्यशोधक तुम्हांस भेटण्यासाठी येणार आहेत… रा. ब. कृष्णाजी पंत लक्ष्मणशास्त्री हे आपणास विश्रुत आहेत. त्यांनी माझ्या समवेत दुष्काळी गावात जाऊन दुष्काळाने हैराण झालेल्या लोकांना द्रव्यरूपाने मदत केली. दुसरी चिंतेची बाब अशी की सावकारांना लुटावे, त्यांची नाके कापावीत अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत… हे श्रवण करून कलेक्टर येथे आला. ५० सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलविले. तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की, पाटील का दरोडे घालतात? त्यांना सोडून दे… कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत…

सावित्री जोतिबा

____________________________

१८७३ साली महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपल्या समाजाची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दुर्दशा संपवण्यासाठी  सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाईंनी लिहिलेल्या या पत्रातून या लढ्याचं स्वरूप अधिक स्पष्ट होतं. ज्या संघटनेच्या नावातच समाज हा समष्टीदर्शक किंवा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या लोकांचा समुदाय अशा अर्थाचा शब्द आहे, ती संघटना अर्थातच व्यापक पायावर उभी होती. तिच्या स्थापनेपासूनच अनेकविध माणसांचे पाठबळ या संघटनेला मिळालेलं होतं.  शिवाय जोतीराव प्रत्यक्ष सहभागी नसतानाही एकदिलाने, पण अनेक लोकांच्या प्रयत्नातून ही समता व बंधुतेची लढाई लढली जात होती हेही स्पष्ट होतं.
इंग्रजांचं निदान तत्त्वत: तरी कायद्यानुसार समानता मानणारं राज्य आणि त्यापूर्वीचं सामाजिक विषमतेच्या पायावर उभं असलेल्या पेशवाईचं राज्य या दोन पर्यायांमध्ये दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानं सत्यशोधक समाजाने इंग्रजांच्या आधुनिक राज्याची निवड केली होती. त्यामुळे स्वातंत्र्यासारख्या राजकीय बाबी तत्काळ विचारात न घेता माणसांना माणूस म्हणून समानतेचं आणि बंधुतेचं जगणं जगता यावं यासाठी सत्यशोधक समाज प्रयत्नशील राहिला. यामुळे जातींवर आधारलेली पिळवणूक थांबवणं, आर्थिक विषमता दूर करणं, स्त्रीपुरुषांची समानता आचारविचारात बाणवणं यासाठी समाजानं अनेक प्रयत्न केलेले दिसतात.
समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले यांना देखील सत्यशोधक समाज हा एकखांबी तंबू करून आपल्या वैयक्तिक गौरवासाठी त्याचा वापर करणं अजिबातच अभिप्रेत नव्हतं. त्यामुळेच जरी महात्मा फुल्यांच्या वैचारिक नेतृत्वासह या समाजाचं कार्य सुरू राहिलं असलं, तरीही त्याचं एक सार्वजनिक – म्हणजे सर्व लोकांसाठी असणारी संस्था असं स्वरूप हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. ज्या काळात सत्यशोधक समाज स्थापन केला गेला, तेव्हा भारतातील सांस्कृतिक प्रबोधनाची वाटचाल घडवणाऱ्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज यांसारख्या सामाजिक संघटनांचे सभासद हे बहुतेककरून सुशिक्षित, उच्च जातवर्गीय पुरुषच होते. मात्र सत्यशोधक समाजाच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीत विविध जातींचे, धर्मांचे व आर्थिक परिस्थितीमधले स्त्रीपुरुष सहभागी होते असे दिसते. त्यामुळे महात्मा फुल्यांनी या समाजाचे विचार, आचार आणि धारणा स्पष्ट करणारी पुस्तिका लिहिताना सार्वजनिक सत्यधर्म असा शब्दप्रयोग केला होता हे उचितच होते.
सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यापासून कायमच त्याच्या वेळोवेळी झालेल्या सभांचे अहवाल हे सर्व लोकांसाठी खुलेपणाने वृत्तपत्रांमध्ये छापले जात. यात समाजाला मिळालेल्या देणग्या, त्यांचा केलेला विनियोग, आयोजित केलेले समारंभ, समाजाच्या उपदेशानुसार कोणत्याही जातीला विशेष महत्त्व न देता माणूस म्हणून प्रत्येकाची प्रतिष्ठा मान्य करून पार पाडलेले विवाहासारखे समारंभ, किंवा विद्यार्थ्यांना दिलेली बक्षिसे, अशा अनेक बाबींचा समावेश असे. केवळ दीनबंधु सारख्या सत्यशोधक विचारांचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रातच नव्हे तर निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या कट्टर विरोधी विचारांच्या लेखकांकडेही हे कामाचे अहवाल परीक्षणासाठी पाठवले जात. परिणामी होणारी विखारी आणि अनाठायी टीकादेखील ऐकून घेऊन, पारदर्शी पद्धतीने आपल्या कार्याची माहिती देणारी अशी समकालीन संस्था दुर्मिळच म्हणावी लागेल.
महात्मा फुल्यांच्या एकखांबी नेतृत्वावर सत्यशोधक समाज अवलंबून नसल्यामुळे त्यांचं १८९० मध्ये निधन झाल्यानंतरही समाजाचं कार्य  विस्तारतच राहिलं. सावित्रीबाई आणि डॉक्टर यशवंतराव फुले या दोघांनी आपल्या कामांतून जोतीरावांचा वैचारिक वारसा पुढे नेला हे सर्वश्रुतच आहे. परंतु या कौटुंबिक परीघाबाहेर असणाऱ्या अनेक सत्यशोधकांनी समाजाचा प्रवाह वाहता ठेवला ही बाब अधोरेखित करणं गरजेचं आहे. नाहीतर महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचं सत्त्व मंदावत गेलं असा गैरसमज रुजत राहतो. सावित्रीबाईंच्या पत्रात उल्लेख आलेल्या सहकाऱ्यांखेरीज  फातिमाबी शेख, नारायण मेघाजी लोखंडे, कृष्णराव भालेकर, धोंडिराम नामदेव कुंभार, सोमनाथ रोडे , नारो बाबाजी महाधट, वासुदेवराव आणि तानुबाई बिर्जे, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, विश्राम रामजी घोले, हाजी काझी वकील, मुकुंदराव पाटील अशा अनेकांनी सत्याच्या शोधाचा प्रवास थांबू दिला नाही.
केवळ व्यक्तींच्या रूपात नव्हे तर विविध नियतकालिकांच्याही माध्यमातून सत्यशोधक विचारांचा ओघ छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव महाराज अशा संस्थानिकांपासून ते तोटा सोसूनदेखील विधवांच्या केशवपनाचं निर्दय काम करायला नकार देणाऱ्या, त्यासाठी संप करणाऱ्या सामान्य व्यावसायिकांपर्यंत पोचला होता. दीनबंधु, दीनमित्र, शेतकऱ्याचा कैवारी, हंटर, मजूर, जागृती, विजयी मराठा अशी साठाहून अधिक नियतकालिके मुंबई इलाख्यात लोकप्रिय होती.  याशिवाय सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यामध्ये जलसे या लोकनाट्यप्रकाराचाही महत्त्वाचा सहभाग होता. भीमराव विठ्ठल महामुनी, भाऊराव पाटोळे, मोतीराम वानखडे अशा अनेक जलसाकारांनी समाजामध्ये प्रबोधन घडवण्यासाठी या नाट्यप्रकाराचा उत्तम उपयोग केलेला दिसतो. ‘मी लाडकी, अण्णा तुमची लाडकी| मला कशी करिता हो बोडकी || तुम्ही सोडा हट्ट| लावा माझा पाट| करा बेत तुम्हीं हाच की||’ अशा शब्दात तरुण विधवा मुलीची व्यथा जलशाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली होती.
१८५६ साली महात्मा फुलेंच्या खुनाची सुपारी ज्यांना पुण्यातील सनातनी लोकांनी दिली होती, त्या धोंडिराम नामदेव कुंभार यांचं जोतीरावांशी बोलता बोलता मतपरिवर्तन झालं. त्यानंतर फुल्यांच्या सल्ल्यानुसार संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून धोंडिराम हे पंडित धोंडिराम झाले. त्यांनी आपल्या संस्कृत भाषेच्या आणि धर्मज्ञानाच्या बळावर १८९४ मध्ये शंकराचार्यांसमोर झालेल्या वादविवादात अनेक पंडितांना हरवले आणि शंकराचार्यांचे सरसुभे असल्याची पदवी मिळवली. या सर्व घटनाक्रमाचे चित्रण करणारं सत्यशोधक काव्यनाट्याचा उत्तम नमुना ठरेल असं पुस्तक लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमधून उपलब्ध झालं.
पंडित धोंडिराम नामदेव, आहे ही सत्य ज्ञानाची पेव, येतां महाराजांना अनुभव, उतरला चेहरा || सत्यवादी मिळाला म्हणे आम्हां आज पुरा || ब्रह्मवृंदात आनंदाने, दिली मग द्वाही फिरवुनी || राहा धोंडीराम वंदुनी, आठवण धरा ||  सत्यशोधकांचा अनुभव घ्या करा त्वरा ||  धोंडीराम सांगतील त्यावत्, राहाटी चालवा समस्त, शिक्कामोर्तबासहित, सुचविते झाले || धर्माधिकारी शृंगेरी कुडलगीवाले ||
सत्यशोधक समाजाच्या विचारांबद्दल आदर वाढीस लागून त्या विचारांच्या प्रसाराची गती महात्मा फुल्यांच्या पश्चातदेखील कायम राहिली होती हा मुद्दा यावरून स्पष्ट व्हावा.
महाराष्ट्राच्या आर्थिक चर्चाविश्वामध्ये सत्यशोधक समाजानं नेहमीच ‘नाही रे’ वर्गाच्या आयुष्याला केंद्रस्थानी ठेवलं. सावित्रीबाईंच्या पत्रात वर्णन केलेले १८७५-१८७८ दरम्यान घडलेले दख्खनचे दंगे असोत किंवा नंतर १९२०च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलमी  अधिकारी व सावकारांविरुद्ध केलेले विद्रोह असोत, सत्यशोधकांनी  रयतेवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाच्या निवारणासाठी प्रयत्न करणे सोडले नाही. दीनमित्र या सत्यशोधक विचारांना वाहिलेल्या आणि १९१० ते १९६७ अशी सलग ५७ वर्षं चाललेल्या ग्रामीण वृत्तपत्राच्या अग्रलेखावर छापला जाणारा काव्यखंड अर्थपूर्ण आहे.
ज्याशी दु:खांनी गांजिले| तेचि सोयरे आपुले| ठेवी मुक्तीला गाहाण| काढी तयांकरिता ऋण|
तोचि दीनांचा कैवारी| दीनां मानी देवापरी|  ऐसा साधु सत्पात्र| म्हणा तया दीनमित्र||
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील  यांनी १९१० ते १९६७ हा प्रदीर्घ काळ ‘दीनमित्र’ हे वृत्तपत्र अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी गावामधून चालवून  दर्जेदार ग्रामीण पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. सत्यशोधक विचारसरणीवर अविचल निष्ठा ठेवून आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, आपला निष्पक्ष बाणा जपत हे कार्य त्यांनी आजीवन अखंड चालू ठेवले. विसाव्या शतकातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी आणि त्यांचे महाराष्ट्रीय आणि भारतीय समाजावर उमटलेले ठसे समजून घ्यायचे असतील, तर दीनमित्रातील लेख – आणि विशेषत: मुकुंदरावांचे अग्रलेख आणि ‘आसुडाचे फटके’ सारख्या सदरातील स्फुटलेखन हे मौलिक स्वरूपाचं  ऐतिहासिक साधन ठरतं. या काळात दोन जागतिक महायुद्धे झाली. भारतीय उपखंडातील स्वातंत्र्यलढे लढले गेले आणि स्वातंत्र्यानंतरचा आशादायी असा नेहरूविअन कालखंडही साकारला.  दीनमित्र हे जरी मराठीसारख्या प्रादेशिक भाषेतलं, त्यातही ग्रामीण वृत्तपत्र असलं, तरी त्याचे विषय आणि आवाका अजिबात मर्यादित नव्हता. एकीकडे भारतातील आणि विलायतेतील घडामोडींवर भाष्य करतानाच इथल्या समाजवास्तवाचं भान दीनमित्रानं कधीही सुटू दिलं नाही. इथल्या मातीशी इमान राखून आणि आपल्या मराठी भाषिक, नवशिक्षित आणि मध्यम व कनिष्ठ मानलेल्या जातींतील वाचकवर्गाला जागतिक आणि राष्ट्रीय घडामोडींशी आपलं नातं नक्की  कुठं आणि कसं जुळतं याची जाणीव मुकुंदराव करून देत राहिले.
पत्रकारितेच्या माध्यमातून दीनमित्रानं सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर ही ओळख असणाऱ्या समाजाची जडणघडण केली. आपण सत्यशोधक म्हणजे नक्की काय आहोत, काय असले पाहिजे आणि काय नसले पाहिजे याचं भान समाजाला दीनमित्र देत राहिला. . हा काळ अनेकार्थांनी संधिकाल आहे. या काळात राष्ट्रीय नेतृत्वाचं संक्रमण टिळकांकडून गांधींकडे होत होतं. त्याचवेळी दीनमित्रानं ब्राह्मणेतर व अस्पृश्य जातींना स्वत:वरील अन्यायाची जाणीव करून दिली, आणि या अन्यायाचं निवारण करण्यासाठी प्रातिनिधिक राजकीय नेतृत्वाची आवश्यकता आहे, असं आग्रही प्रतिपादनही केलं. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर या दोन्ही नेतृत्वांना जनमान्यता मिळवून देण्यात दीनमित्राने मोठा वाटा उचलला.
१८७३ सालापासून ते आजतागायत अखंडपणे सत्यशोधकी विचारांचा ओघ केवळ सत्यशोधक समाजापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेच्या प्रवाहात अमिटपणे मिसळून गेला आहे.  ११ एप्रिल २०१९ रोजी आपण महात्मा जोतीराव फुले यांची १९२वी जयंती साजरी करत आहोत. उत्तम नेतृत्वाचं लक्षण म्हणजे नेत्याच्या अनुपस्थितीतही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी चळवळीचे विचार आणि कृती अखंडितपणे प्रवाही ठेवणे. या लक्षणानुसार पाहिलं तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारधारेच्या संदर्भात उत्तम नेतृत्व निभावलं असं दिसतं आणि त्यांच्या कालजयी विचारांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

श्रद्धा कुंभोजकर, दक्षिण आशिया, स्मृति अभ्यास आणि महाराष्ट्रातील समकालीन जातीव्यवस्थेच्या अभ्यासिका असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.

(महात्मा फुले यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रावरून ११ एप्रिल २०१९ रोजी प्रसारित झालेले भाषण.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: