भाऊ साठे: एक मुक्तचिंतन

भाऊ साठे: एक मुक्तचिंतन

“दैन्याला वेळीच जोखता यायला हवं. ते आलं की, वेदनांचं ओझं सहज पार करता येतं” हे शिल्पकार भाऊ साठे यांचं वाक्य आठवतं. शिल्प कोरावं तसं मनावर कोरलेलं. दोन हजार चारची गोष्ट. राज्य नाट्यस्पर्धेच्या निमित्तानं कल्याणमध्ये तळ होता, नाटकं आचार्य अत्रे थिएटरमध्ये. माझी एक सवय होती. नाटकाला सुट्टी असली की कल्याणचा सुभेदारवाडा गाठायचा. भाऊशी गप्पा मारायला. भाऊ म्हणजे शिल्पकार भाऊ साठे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा भाऊ बघण्याची इच्छा गेटवे ऑफ इंडिया जवळील अश्वारुढ पुतळा बघितला तेव्हाच त्यावेळीच मनात आली होती. मनात आलेलं सगळंच पूर्णत्वाकडे जातं असं होत नाही. जेव्हा तसं घडतं त्याला योगायोग असं समजत नाही. मनातली माणसं कोण कुठं आहेत याची डायरी मजकडं असतं. कामानिमित्त महाराष्ट्रभर भटकताना त्याचा उपयोग होतो. भाऊची भेट त्यातून झाली. मुंबईतील शिवाजी महाराजांचा आणि दिल्लीतील महात्मा गांधीजींचा पुतळा पाहिल्यानंतर भाऊंना भेटायचं मनात आलं होतं. पत्रकारितेचं हे फलीतच म्हटलं पाहिजे. कलेविषयीची समज वाढवण्यासाठी त्याची गरज असते. या सवयीतून शिल्पकार, चित्रकार, काष्ठकार भेटले. त्यांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या सौंदर्यपूर्ण कलाकृतींना भेटता आलं, बोलता आलं. त्यापैकी भाऊ एक. त्यांचा जन्म कल्याणचा. कर्मभूमी तीच. देशविदेशात पोहचलेल्या या कलावंताला भेटलो तेव्हा त्यांंचं वय पंच्च्याहत्तरीच्या आसपास असावं. त्यांच्या तोंडून ऐकलेला मस्तकलंदराचा प्रवास कानात साठवून घेतला तो दिवस.

भाऊंचा स्वभाग देवगडच्या हापुससारखा गोड. माणूस अबोल. पण अबोल माणूसच साहित्य असो किंवा अन्य कला, ती रसिकासमोर जीवंत ठेवू शकतो. ते जे काही बोलले ते अगदी थोडं. पण कला आणि कलावंत यांच्याविषयीच्या अल्पमतीविषयी, उपेक्षेच्या भावनेविषयी. भारतातील कलावैभवाची जाणीव जेव्हा वाढीला लागेल तेव्हा हा सौंदर्यासक्त व्यवहार हिरव्या पालवीसारखा टवटवीत राहील, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातही पुन्हा विनम्रतेचा पदर होता. ऋजूताही होती. ‘सँड कास्टिंग’ प्रकारात त्यांच्या जवळपास जाणारा शिल्पकार मिळणं कठीण. नवागतांना ते भरभरून कलेचं ज्ञान वाटत राहिले. त्यात त्यांनी कंजुषी कधीच केली नाही. स्वत:ची अवस्था सांभाळून. स्वसामर्थ्याचा डंका न वाजवता, स्वत:च्या मनाशी संवाद साधत राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, वीर मुरारबाजीची केलेली शिल्पकलेतली तेजोमय साधना. तरीही पाय जमिनीवर. मन प्रसिद्धीपासून दूर.

आणखी या भेटीमुळे साधलेली दुर्मीळ गोष्ट. ब्रिटनला गेलो त्यावेळेची. बंकिंगहॅम  राजवाड्यातील प्रिन्स फिलिप स्मारक. भाऊंनी राजवाड्यात राहून, बसून आकाराला आणलेलं. समृद्ध भवतालाची पार्श्वभूमी लाभलेलं. शिल्प बोललं पाहिजे. मनाला जागं करण्याची कला ज्यांच्या होतात होती, ते भाऊ पुन्हा बंकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रिन्स स्मारकाच्या रूपाने दिसले असे जरुर म्हणता येईल. दैवदुर्लभ आनंदच तो.

कोणत्या ना कोणत्या वास्तवापर्यंत जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न झाला तर मूल्यात्मकता समजण्यास मदत होते. मग स्वयंघोषित पदव्या घेतलेल्या माणसाचा आवाका लक्षात यायला भाऊंसारख्या माणसाची मदतच होते. अशा ठिकाणी आपुले मस्तक वाकविले पाहिजे. निसर्गसत्ता व मानवसत्ता यांच्या पलीकडे जाण्याचं बळ फक्त कलावंतच देऊ शकतात.

‘गेटवे’जवळचा शिवाजी महाराजांचा पुतळा हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो आहे असा भास होतो. त्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो. मग तो नसेल तर केवळ हाती येते ती हवेत विरून जाणारी घोषणा. पण हे एकाच बाबतीत घडते असे नाही. त्यासाठी समाज विचार करणारा असावा लागतो. महापुरुषाविषयीचे प्रासंगिक प्रेम मनावर उमटलेले तरंग असतात. भाऊ साठे यांच्या शिल्पाकृतीच्या त्रिमितीत शिरल्यानंतरच कलाकाराच्या अवस्थांतराचा अंदाज येतो. आशयाच्या अविष्काराच्या चिरंतन चिंतनाचं मूर्त रूप घडविणाऱ्या अवजारातील जडत्वाचा अंदाज रसिकांना घेता आला, तर त्याच्याइतका आनंद नसतो. त्यातून कळून येते ते लालित्यपूर्ण अंगसौष्ठव्य. ती अवजारसिद्ध नक्कल असत नाही. दाद देण्यावर कलावंताची कलाकृती कधीच अवलंबून नसते, हे स्पष्ट होतं. भावविश्वाचं आकलन कलावंताच्या वाद-संवादातून होतं तसं त्याच्या कलाजीवनाच्या सर्वस्वातूनच. व्यक्तिमत्वाचं आकलनही. संपूर्ण कलागारातील श्वासोश्वासातून. माणसाचं जसं भावविश्व असतं तसं काळाचंही असतं. फिरत्या दिनचक्रावर ते सारखं फिरत असतं. त्यातून फिरणारी गतीसूचकता भाऊच्या हातातून साकारलेल्या कलाकृतीतून येते.

रायगडावरील शिवाजी महाराजांचं स्मारक असो अथवा नवशिल्पतंत्रातून केलेल्या अन्य कलाकृती. अनेक राष्ट्रीय स्मारकातील भाऊंचं योगदान लक्षात घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. त्यापैकी सोव्हिएट रशिया एक. सांस्कृतिक प्रतिनिधित्व करताना तो कलावंत असतो. आणि ज्या देशातून तो जातो, त्या मातीचा तो असतो हेच भाऊंनी वारंवार त्यांच्या वर्तनातून दाखवून दिलं, अनुबंध न विसरता. द्वैत मिटू न देता. उरातला सूर जपत जपत. प्रगल्भ प्रत्यत देत.

शिल्पकला आणि अन्य कलांतून समाजप्रवाहाची आपली उजळणी होत असते. त्यातून समाजातील विविध घटकांचा अभ्यास होत असतो. उत्सवप्रियता हा वरील गोष्टीतील फार मोठी बाधा असतो हे कलावंतांना ठाऊक असतं म्हणून त्यांना एकांत प्रिय असतो. तो यासाठी की, त्याला स्वत:शीच मौनातून संवाद साधायचा असतो. वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती घडवण्यासाठी, मनातील ऊर्जेच्या समूहाला पकडण्याकरिता, अभिप्रेत असलेल्या कलेला विश्वासात आणण्यासाठी काही एक पल्ला गाठावा लागतो. भाऊंंनी नंतर अटकेपार छलांग मारलेली दिसते. देव्हारा न माजवता, त्याचं झालेलं दर्शन विलोभनीयच असतं. कोणत्याही भिंगातून पहा हवं तर. खास छटाच दिसतील. भाऊंच्या या कलावैशिष्ट्याचा अनुभव घ्यायचा असेल तर डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीतील सदाशिव साठे शिल्पप्रतिष्ठानाच्या शिल्पालयाला भेट दिली पाहिजे. वाराणसीच्या प्रचंड पंडितांचंच कौतुक करण्यात असं म्हणणाऱ्यांना कदाचित भाऊंचं कलावैधव कदाचित मूठभरही हातात धरता आलेलं नसावं. कारण आविष्कार साधनेला समजून घेणं अनेकदा आपल्याला जमत नाही. नको तिथे आपला शक्तिपात होतो.

मूर्तीच्या चेहऱ्यावरील बोलकी रेषा ही एक किमया असते. त्यातील सुक्ष्म छिद्रांचं तत्त्व कळून आलं की, त्याची ओळख उपरी राहत नाही. कलावंताचा आलेश समजून घेण्यात लेखकाला त्याची मदतच होत असते. स्वत:ला प्रवाहित ठेवण्याकरिता. परंतु सहजसाध्य होणाऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपण येऊ देत नाही म्हणून भाऊंसारख्या शिल्पकारांचं मूळ स्वरूप लक्षात घ्यायला बराच काळ लागतो. तशी धारणा असेल तर कलाविष्कार कळतो. अगदी ठोसपणे. आणि अज्ञाताच्या पलीकडे जाण्याचा तोच मार्ग असू शकतो. बंद असलेलं किंवा बंद करून घेतलेलं आपण आपलं बेट उघडलं तरच कळून येईलना ‘कल्याणच्या सुभेदारवाड्यातील जग प्रसरलेलं एक अनोखं विश्व’. हळूवारपणे शिवाजी महाराजांच्या डोळ्यात कोरलेला आणि पापण्यावर दिसणारा इतिहासही वाचताय यायला हवा. तो वाचता आला की, एकात्मका काय असते याचे प्रकटीकरण होत जाते. वेगळ्या उत्कटतेतून. मग लागते ती समूर्त समाधी. एकात्मता साधणारी. अतीव देखणी. वैयक्तिक आणि अनुभवसिद्ध. व्याप, ताप सांभाळूनही करता येतात, जोपासता येतात हे छंद नवनिर्माण करणाऱ्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून. एखाद्या कलावंताच्या कीर्तीमान आयुष्याचे संदर्भ लक्षात घेतले तर यशमान प्रवासाचे टप्पे लक्षात येतात. कलात्मक उंचीच्या कळसाचा अन्वयार्थ लावता येतो. क्षेमतेचं साकल्य कलात्मक पातळीवर गेलं तर कळतं. आस्था विषयाची ओळख होते. आपल्याच हालचालींना ऊर्जा मिळते. जे ठाऊक नसते ते ठाऊक होते. सहज चालता चालता. भाऊ साठे यांच्या भेटीत हे कळलं. रितं मन भरलं. निर्मिती ऋणानुबंध माणसात असतातच. ते कोणत्याही क्षेत्रातील असो. एखाद्या क्षेत्रात रमणं काय असतं हे समजून घेणं अशा गोष्टीतून जमतंच जमतं. लयकल्पनेपासून गहनगुढतेपर्यंतचा प्रवास कळून येतो. हळुहळू आपला होतो. हा माझा अनुभव. नाहीतर आपलं काय होईल कवी नीरज म्हणतात तसं-

क्यों है ऐसा क्यों है वैसा?

इसका बस अनुमान रहेगा?

असं होऊ नये म्हणून जे, जे वाटतं ते समजून घेतलं पाहिजे. दीर्घकाळची दृष्टी सोबत असावी म्हणून. उद्दिष्ट ठेवून. भाऊंच्या कलेतील नावीन्य आणि शैली त्यातील सौंदर्यस्थळांसह कळावीत यासाठी त्यांच्या विश्वात जाणं पसंत केलं. घाट, पोत समजून घेण्याकरिता.

कलावंत माणून आतून, बाहेरून कळायला अवघड असतो पण भाऊंच्या बाबतीत सोपं गेलं. त्याचं कारण असं असावं की, त्यांना भेटण्याआधी समजून घेतलेली पार्श्वभूमी. स्वभाव. त्यामुळे मला त्यांच्यापर्यंत जाणं सोपं गेलं. ‘मी’चा अनुभव तसा रसिकांसाठी चांगला असतोच असं नाही. बाह्यप्रतिमेत न गुंतता हे करायला हवं. कलासृष्टीत रमताना वरील गोष्टीची काळजी घेतली तर भाऊ साठे यांच्यासारखी माणसं नक्कीच समजू शकतात. प्रतीत होतात. आपण निरागस व्यक्तीगानापासून दूर राहू शकतो.

धुव्वाधार पावसात अत्रे थिएटरपर्यंत सुभेदारवाड्याकडून विश्रांतीस्थळापर्यंत केलेला प्रवास जसा आठवतो तसा ‘भाऊ’ साठे यांचा प्रवासही. त्यांचा जे. जे. कला महाविद्यालयातील तीन वर्षांचा काळ, शालेय जीवनात काकांच्या हाताखाली शाडूच्या मूर्तींना रंगवण्याचं काम. मग सुवर्णपदकासह घेतलेली ‘मॉडेलिंग अँड स्कल्प्चर’मधील पदवीका. शांताराम बापूंच्या राजकमल स्टुडिओत कलादिग्दर्शक म्हणून केलेलं काम, सेटनिर्मिती, पुतळ्यांची प्रासंगिक उभारणी या गोष्टी विसरता येत नाहीत. प्रारंभ आणि आरंभ ह्यांचं महत्त्व असतं कळसापर्यंत जाताना. कळसापूर्वी पायाकडे बघता आलं तर कलावंतांचं यशस्वी जीवन कळत जातं.

१९५२ला राजधानी नवी दिल्लीत अल्पवेतनावर सुरू केलेली साधना साध्यापर्यंत घेऊन जाताना ‘भाऊ’ साठे अखेरपर्यंत भाऊच राहिले. महात्मा गांधीजींच्या अप्रतिम बोलक्या पुतळ्यासाठी  राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण गौरव, नासिकचा गोदागौरव, बॉम्बे आर्ट सोसायटीने केलेला सन्मान, यांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला पाहिजे. कारण, ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ठरतात म्हणून. ज्ञानाच्या श्वासाला मिळालेली ही जोड फुटपट्टीने मोजायची नसते. भाऊ साठे यांनी कलेसाठी जगलेल्या ओळीओळीत ती कोरलेली असते.  मूल्यप्रमाणात. विवंचनेतून केलेल्या अथांग सागराचा प्रवास कळावा म्हणून!

महावीर जोंधळे, ज्येष्ठ संपादक आणि लेखक आहेत.

COMMENTS