सेरेना विल्यम्सचे निवृत्तीचे संकेत

सेरेना विल्यम्सचे निवृत्तीचे संकेत

टेनिसमध्ये २३ ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने (४०) मंगळवारी निवृत्तीचे संकेत दिले. आता निवृत्तीची वेळ आली आहे, काउंटडाऊन सुरू झाला आहे, असे तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर केले आहे.

टेनिसच्या इतिहासात मार्गारेट कोर्ट (२४ ग्रँड स्लॅम विजेतेपद) यांच्या नंतर सेरेना सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळवणारी खेळाडू म्हणून ओळखली जाते. सेरेनाला काही दिवसांपूर्वी पायाची दुखापत झाली होती पण तरीही तिने विम्बल्डन स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत लवकर बाद झाल्यानंतर ती निवृत्ती घेईल असे अंदाज वर्तवले जात होते. मंगळवारी तिने तसे जाहीरही केले.

सेरेनाने निवृत्तीचे संकेत दिले असले तरी आगामी अमेरिकन ओपन टेनिस चॅम्पियनशीप आपण खेळणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तिने आजपर्यंत ६ अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

आपल्या निवृत्तीचे संकेत देताना सेरेना जगभरातल्या कोट्यवधी चाहत्यांचा हिरमोडही केला आहे. कारण सेरेना दोनेक वर्ष अजून खेळत राहील व मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाची बरोबरी अथवा त्यांना मागे टाकेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण हे यश एक फँटसी वाटू लागले आहे, असे सेरेनाने म्हटले आहे.

सोमवारी टोरंटो येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक टेनिस स्पर्धांत सेरेनाने स्पेनच्या नुरिया डियाझ हिचा पराभव केला. सेरेनाला हा विजय तब्बल १४ महिन्यांनी मिळाला आहे.

१९९९मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी सेरेनाने पहिले ग्रँड स्लॅम म्हणजे अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने आजपर्यंत ७ वेळा विम्ब्लडन, ७ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, ६ वेळा अमेरिकन ओपन व ३ वेळा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २१ व्या शतकात महिला टेनिसमध्ये सर्वाधिक यश मिळवणारी सेरेना ही एकमेव खेळाडू आहे. २०१७ साली तिने आपले शेवटचे ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते. त्या वेळी ती ८ आठवड्यांची गर्भवती होती. मात्र मुलगी ऑलिम्पिया झाल्यानंतर सेरेनाला ग्रँड स्लॅमने सतत हुलकावणी दिली. पण गेल्या ५ वर्षांत तिने चार वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे, हे उल्लेखनीय आहे.

COMMENTS