‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव

‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव

नातेसंबंध आणि लैंगिकता - ‘प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो’, ही कल्पना काही आजची नाही. मात्र लोक आपल्या नात्याला कोणते नाव देतात व ते तसे का देतात, हे आजच्या काळात वेगळे समजून घेणे गरजेचे आहे. कारण नात्याकडे आपण कसे बघतो, यावर त्या त्या नात्यातल्या वागणूकींचे पदर उलगडत जातात.

प्रतिनिधीशाही, निवडणुका आणि मतदार
बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?
जातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार

नात्याला नाव देण्याची तऱ्हा त्या त्या काळातल्या समज-कल्पनांनुसार ठरत असते. या कल्पना काळानुसार बदलतातच, इतर सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांचीही त्यातली भूमिका महत्त्वाचीच आहे. उदाहरणच द्यायचं, तर आम्ही ज्या तरुण-तरुणींशी ‘युथ इन ट्रान्झिशन’ संशोधनामध्ये मध्ये बोलत असू ते पुण्यात राहणारे होते. शिकायला नोकरीला आलेले असतील पण आता पुण्याच्या वातावरणात राहणारे होते आणि तिथल्या तरुणाईच्या नात्यांबद्दलच्या कल्पनांच्या चौकटी आपल्या नात्याला लावून पाहत असणार, हे साहजिकच होते.

ह्या मुलामुलींनी अनेक प्रकारच्या नात्यांबद्दल आपले म्हणणे आमच्यासमोर मांडले.

नाते ‘सीरीयस’ आहे, असे म्हणणार्‍यांना त्या नात्यात  भावनिक गुंतवणूक आहे हे मान्य होते, इतकेच नाही तर दोघांपैकी कुणीही इतर कोणा व्यक्तीसोबत नाते ठेवायचे नाही याची अगदी पक्की समजूत होती.  तिसऱ्या व्यक्तीसोबत नाते  म्हणजे आधीच्या नात्यात विश्वासघात! त्याचा परिणाम  नात्यावर तर होणारच, पण मनावर अगदी खोलवर परिणाम होणार. अशी समजूतही होती. या  ‘सिरीयस’ नात्याचा कालावधीदेखील लांब पल्ल्याचा असणे त्यांनी गृहीत धरलेले होते. लग्न (किंवा त्यासारखे  काही) या नात्यातून उगवावे असा त्यामागचा मनसुबाही बहुतेक ठिकाणी होताच. जात व वर्गातील फरकामुळे काहींनी घरादाराचा विरोध अपेक्षित धरून नाते, ‘सिरीयस’ मानूनदेखील फार लांबवर तूर्त पहायचे नाही, असे ठरवले होते किंवा विरोधाच्या भीतीने कधी नाते संपले.

त्याउलट नाते ‘कॅज्युअल’ आहे असे म्हणत असता, दोहोंकडूनही कमी भावनिक गुंतवणूक, एकनिष्ठतेच्या तसेच नात्याच्या टिकाऊपणाबद्दलच्या अपेक्षाही कमीच होत्या.

‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ हा तुलनेने नवा मैत्रीचा – नात्याचा  एक प्रकार.  या मैत्रीत लैंगिक जवळीक असू शकते. हे संबंध लिंगप्रवेशीच असतील असे नाही, पण लैंगिक जवळीक आहे याचा अर्थ ते एकमेकांना ‘जोडीदार’ मानतील असेही मुळीच नाही.

अनेकदा नात्याची सुरवात होताना एक मोकळीक हवीशी असते. ‘ओपन रिलेशनशिप’ या नात्याच्या प्रकारात ती गृहीत धरलेली आहे. या व्यवस्थेमध्ये दोन्ही जोडीदारांनी परस्परसंमतीने ठरवलेले असते की ते इतर लोकांमध्येही  रस घेऊ शकतात, अगदी  लैंगिक नातेही ठेवू शकतात. ते एकास एक नाते ठेवतीलच असेही नाही. भावनिक गुंतवणूक कधी असेल तर कधी कमी-जास्त होईल. अद्याप या नात्याचा पोत आपण धुंडाळत आहोत – अशा परिस्थितीला ओपन रिलेशनशीप म्हणतात. हे नाते संपूही शकते किंवा एकमेकांशी स्वभाव, जुळले तर ‘सीरीयस’ नात्यामध्येही त्याची परिणती होऊ शकते.

नात्यांच्या या सगळ्या प्रकारांमध्ये गृहीतके अर्थातच अनेक होती.

दोन्ही बाजुंनी नात्याची समज एकसारखी असेलच असे नव्हे, अपेक्षा एकसारख्या असतीलच असे नव्हे, पण त्याबद्दलची भाषा निर्माण होणेदेखील त्यासाठीच्या संवादाला निश्चित पूरक आहे.

अनेकांनी नात्याला कुठलेच नाव देऊ शकत नाही असेही सांगितले. नात्याला नाव देण्याची घाईच त्यांना करायची नव्हती. एकदा नाव दिले की त्या नावाबरोबर येणार्‍या कल्पना आणि अपेक्षांची चौकटही मान्य करणे आले. ते नकोसे वाटते.

एकीने सांगितले, “ वडिलांच्यावर आथिर्कदृष्ट्या हालाखीची परिस्थिती आल्यावर माझ्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहणे हीच प्राधान्याची गोष्ट ठरली. लग्नाचा मी कधी मनापासून विचारच केला नाही. मी आजवर तीन जणांसोबत नात्यामध्ये होते, पण त्या नात्यास कोणतेच नाव नव्हते. आम्ही नात्याचे स्वरूप पडताळतच होतो. जेव्हा नाते तुटले तेव्हा माझ्यावर त्याचा फारसा परिणामही झाला नाही. मी मनाने स्वतःला कुणामध्ये फारसे अडकूच देत नाही.”

याचा अर्थ आजकालची तरुण पिढी – त्यांना फक्त मजा हवी असते, असा मात्र अजिबात नव्हता, किंबहुना त्याउलटच. तरुण मुलामुलींच्या वागण्याबोलण्यातून आपल्याला काय वाटते आहे, ते नेमके समजावून घेण्याचा आणि आपल्यासह नात्यात असलेल्यासह सुस्पष्ट संवाद करण्याचा, आपल्याला काय वाटते आहे ते सांगण्याचा, दुसर्‍याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न होता, असे आम्हाला जाणवले.  यामुळे नात्यातील गोंधळ आणि पर्यायाने  गैरवर्तन घडण्याच्या शक्यता कमीकमी होऊन (अर्थातच हे सर्व अजिबात घडत नव्हते असे मुळीच नाही), त्याविषयीचा मोकळेपणा, किमान जाणीव निर्माण होऊ लागली आहे.  आजची पिढी नात्यांच्या गुंत्यात गुंतून जाऊ इच्छित नाही, तर त्या नात्यांकडे गंभीरपणे पाहून त्यातल्या आकलनाच्या शक्यता आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये समतेची जाणीवही आली. त्यांची ही जाणीव कृतीमध्ये अधिक परावर्तित व्हावी, तसेच आजूबाजूच्या इतर पिढ्यांतील लोकांनीही ती स्वीकारावी, तिचा आदर करावा अशी इच्छा व्यक्त करावीशी वाटते.

एक सहभागी मुलगी सांगते,

“माझ्या खूप अवघड ब्रेकअप नंतर, मी आणि माझा बेस्ट-फ्रेंड एकमेकांच्या खूप जवळ आलो. त्याचाही नुकताच ब्रेकअप झाला होता आणि आम्ही दोघेही एकटे होतो. आम्ही एकमेकांशी सतत बोलायचो. त्यातच आम्ही कोणतीच बांधिलकी न मानता शरीराने जवळ येण्याचे ठरवले.

मला तो आवडतो, आम्ही एकमेकांना मनातले, आयुष्यातले सर्व सांगतो. माझी तब्येत किंवा मनस्थिती ठीक नसेल, तर तो माझी खूप काळजीही घेतो. आठवड्यातून एकदातरी आम्ही भेटतोच. शारीरिक जवळीक दोन-तीन महिन्यातून एकदा घडते. पण मला त्यापुढे जाऊन त्याच्याबद्दल पझेसिव्ह किंवा तीव्र प्रेमभावना असे काहीच वाटत नाही. त्याच्या आयुष्यात इतर कुणी असले तरीदेखील मला काहीच त्रास होत नाही.

तसेच आमची जातदेखील वेगळी आहे. आम्हाला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नसला तरीदेखील कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून पहाता, आम्हाला या नात्याला – ठरवले असते तरीदेखील गांभीर्याने घेणे शक्य झाले नसते. आणि कुटुंबियांच्या मते लग्न तर करावेच लागणार. लग्नाच्या बाबत मी स्वतःचा स्वतः विचार करून तरी काय उपयोग आहे? माझ्या पालकांना मी आमच्या जात-वर्गातल्याच मुलाशी लग्न करायला हवे आहे. पुढे जाऊन मी तसेच करेन.

अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल खरा पण माझ्याकडे पर्याय तरी कोणता आहे?

माझा बेस्ट-फ्रेंड आणि मी, दोघे याविषयी बोललो आहोत. तोही त्याच्या घरच्यांचे ऐकून अरेंज्ड मॅरेजच करेल.”

हे ऐकताना असे जाणवते की स्वतःला काय हवे आणि काय नको याची जाणीव असतानादेखील, परंपरागत, जातीभेद आणि अस्पृश्यतेवर आधारलेल्या लग्नसंस्थांचे वास्तव एकतर मनाविरुद्ध तरी स्वीकारावे लागत आहे किंवा मनाच्या तळाशी असलेले त्याचे अस्तित्व वरवरच्या आयुष्यामध्ये बदल घडले तरी तिथून पुसले गेलेलेच नाही.

लग्नास महत्त्वाचा टप्पा मानून इतर विचारप्रक्रिया, निर्णयप्रक्रिया त्याच्याच कडेकडेने घडत आहेत.

१२४० मुलामुलींपैकी जवळपास ५०% मुलामुलींची नाती ‘सिरीयस’ प्रकारची होती. (लग्न ठरलेले लोकही या ५०% मध्येच धरलेले आहेत.) २०% लोक वर उल्लेखलेल्या इतर प्रकारच्या नात्यांमध्ये होते.

या सगळ्याशिवाय अगदी थोड्या काळासाठी, (एका महिन्याहून कमी काळासाठी) एक तास, एक दिवस वा रात्र सोबत घालवणे, किंवा तात्पुरत्या काळासाठी- आठवडाभर किंवा दोन आठवडे नाते अनुभवणे, डेट करणे या नात्यांबद्दलही अनेकजण बोलले.

सर्व सहभागींपैकी फक्त ८०% लोकांनीच ते आजवर किमान एकातरी नात्यात (वरीलपैकी कोणत्याही पद्धतीच्या) असल्याचे सांगितले.

काहींनी मात्र कधीच, कोणत्याच नात्यात नसल्याचे सांगितले, त्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असावीत असा प्रश्न पडला. ते स्वतःच्या इच्छेने नात्यामध्ये नव्हते? की कुणाच्या दबावामुळे? की जोडीदार मिळणे त्यांच्यासाठी अवघड जात होते?

याचे उत्तर मुलगे आणि मुली यांमध्ये वेगवेगळे दिसले. मुलगे म्हणत होते की जोडीदार मिळवण्याचा प्रयत्न करूनही त्यांना ते जमलेले नाही आणि मुलींसाठी जुन्या विचारांची कौटुंबिक पार्श्वभूमी हे नाते न निर्माण करण्यामागचे प्रमुख कारण होते. त्यांनी सांगितले की त्यांनी नात्यात असणे, कुटुंबियांना अजिबात सहन होणार नाही आणि याची त्यांना चांगलीच  कल्पना होती.

मात्र नात्यात नसणाऱ्यांपैकी १६% मुले आणि १९% मुली त्यांना स्वतःलाच नात्यामध्ये असण्याची इच्छा नाही, असे म्हणत होते.

“या गोष्टी माझ्यासाठी नाहीत असेच मला वाटते. अजून मी ‘पुण्यातला’ आहे, असे मला वाटत नाही आणि मुलींशी कसे बोलायचे ते समजतही नाही. कोणी मुलगी बोलायला आल्यास मला लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाल्यासारखे वाटते आणि मग मी बोलणे पूर्णपणे टाळतो. तसेही गावाकडच्या घरी जुळवून घेईल, अशी मुलगी मला इथे कशी सापडणार?” असे एका मुलाने मुलाखतीदरम्यान सांगितले.

नात्यामध्ये असण्याचा निर्णय घेणाऱ्या आणि नात्यामध्ये नसण्याचे ठरवणाऱ्या व्यक्तींमध्ये काही फरक होता का?

आपल्याकडे लैंगिकताविषयक शिक्षण दिल्यामुळे बेजबाबदार वागणुकीमध्ये वाढ होईल अशा प्रकारचा प्रवाद वाढताना दिसतो. आमच्या संशोधनामध्ये लैंगिकताविषयक शिक्षणामुळे केवळ माहिती व ज्ञानामध्येच भर पडलेली दिसून आली. नात्यामध्ये असायचे का नसायचे, कशाप्रकारचे नाते ठेवायचे याबद्दलच्या कुठल्याही निर्णयावर लैंगिकताविषयक शिक्षण घेतल्याचा कुठलाही परिणाम वा प्रभाव नव्हता, असेच दिसून आले.

वयाने मोठे होत असताना आलेल्या अनुभवांचा मात्र मोठा वाटा या निर्णयांमध्ये होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, घरातील व्यसनाचे प्रमाण, विसंवाद, पालकांमधील सततची भांडणे या सर्वांचे तरुणांच्या निर्णयांवर परिणाम होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

ज्या तरुणांवर किशोरवयामध्ये (१० ते १८ वर्षे) मोठ्या प्रमाणावर बंधने टाकण्यात आलेली होती, मनाप्रमाणे पोशाख न करण्यासाठीचे, भिन्नलिंगी मित्रमैत्रिणींना न भेटण्यासाठीचे किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेर न राहण्यासाठीचे बंधन ज्या मुलामुलींवर घरी रहात असताना होते. त्या मुलामुलींनी सवड मिळताच नात्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता, ज्यांच्यावर बंधने लादली गेलेली नव्हती अशा मुलामुलींपेक्षा तिपटीने अधिक होती. अर्थात या गोष्टींना  ‘बंधने’ मानायची वा नाही, याबाबतचे सहभागींचे मत वेगवेगळे होते. काहीजणांनी वेळ/पोशाख/कोणाला भेटायचे/कोणास नाही याबाबत आईवडिलांचे म्हणणे ‘आपल्या भल्यासाठीच’ असते, त्याला बंधन मानता येणार नाही असेही नोंदवले.

लहानपणी झालेले लैंगिक अत्याचार यांचाही संबंध नाते निवडण्याशी असलेला काही ठिकाणी दिसला. लैंगिक अत्याचाराचे परिणाम मोठ्या काळासाठी होऊ शकतात. पुढे जाऊन जवळची नाती निर्माण करण्याची धास्ती आणि त्यामुळे अजिबात नात्यात न जाऊ शकणे किंवा याउलट अनेक कॅज्युअल नाती निर्माण करणे, असे दोन परस्पर भिन्न परिणाम होताना दिसले. परंतु यापैंकीच एक परिणाम होत होता असेही म्हणता येणार नाही.

आत्ताच्या रूढ मताप्रमाणे सोशल मीडिया, फेसबुक यावर नाती सुरु होण्याचे प्रमाण मोठे असेल असा अंदाज असतो, मात्र आमच्याशी बोललेल्या १२४० लोकांपैकी १४%च नाती अशाप्रकारे सुरु झालेली होती. डेटिंग अ‍ॅप्सवर परस्परांना भेटणाऱ्यांपेक्षासुद्धा प्रत्यक्षात भेटून नाती सुरु करणाऱ्यांचे प्रमाण बरेच अधिक होते.

एकापेक्षा अधिक नाती ठेवण्याविषयी जे बोलले, ते देखील त्याबद्दलच्या पूर्ण जाणिवेसकट आणि सबलतेने बोलले. एकापेक्षा अधिक नात्यांसाठीचे नॉर्म्स अजून बनत आहेत, त्याविषयी लोक बोलत आहेत. ही प्रक्रिया वेगाने होणार नाही. सामाजिक – सांस्कृतिक चौकटी विस्तारण्याची प्रक्रिया धीम्या गतीचीच आहे, पण त्यांतल्या अर्थ व व्याख्या कमी धूसर होत जातील अशा चित्राची कल्पना करण्यास वाव नक्कीच आहे.

पण प्रत्येकाच्या आयुष्याचे संदर्भ वेगवेगळे आहेत. शिक्षण, कामे, स्थलांतर, मित्रमंडळी, जोडीदार वेगवेगळ्या ठिकाणी असणे, घरातली पार्श्वभूमी, लहानपणीचे अनुभव इत्यादींच्या आपापल्या संदर्भांचे अर्थ आपल्यालाच लावावे लागणार, आपल्याला काय हवे आहे आणि काय नको आहे हे त्यातूनच आपल्याला उमगणार. केवळ आजवर जे चालत आले ते तसेच चालू ठेवायचे म्हणून आपण निर्णय घेऊ नयेत, या समजे-उमजेच्या वाटेवर ही पिढी पुढे निघालेली आहे. त्याला अर्थातच तंत्रज्ञान, समाजमाध्यमे, शहरीकरण यांनी निर्माण करून दिलेल्या अवकाशाची जोड आहे.

या सर्व वास्तवाला आज सरधोपटपणे दिले जाणारे बेजबाबदारपणाचे नाव नक्कीच देता येणार नाही.

(लेखाचे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे)

क्रमशः

(या अभ्यासाशी संबधीत वेब सिरीज ‘सेफ जर्नी’, येथे पाहता येईल.)

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: