शार्जिल इमामच्या विरोधात ५ राज्यांकडून देशद्रोहाचे गुन्हे दाखल

शार्जिल इमामच्या विरोधात ५ राज्यांकडून देशद्रोहाचे गुन्हे दाखल

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भाषण करताना भारताचा पूर्व भाग देशापासून तोडायला हवा, असे विधान करणाऱ्या जेएनयूतील पीएचडी

कन्हैयावर खटला चालवण्यास केजरीवाल यांची मंजुरी
बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे
२०१९मध्ये देशद्रोहाच्या ९३ प्रकरणांची नोंद

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भाषण करताना भारताचा पूर्व भाग देशापासून तोडायला हवा, असे विधान करणाऱ्या जेएनयूतील पीएचडी करणारा विद्यार्थी शार्जिल इमाम याच्या विरोधात पाच राज्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. ही राज्ये आसाम, उ. प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर व दिल्ली अशी असून शार्जिल इमामने १६ जानेवारी रोजी अलिगड विद्यापीठात भाषण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने आसाम व उ. प्रदेश सरकारने शनिवारी त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

त्यात आसामने दहशतवादविरोधी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला. रविवारी दिल्ली व उ. प्रदेश पोलिसांच्या एका पथकाने इमामचा शोध सुरू केला. दिल्ली पोलिसांनी आपले काही अधिकारी बिहारमधील इमामचे खेडे काको येथे पाठवले. तेथून त्याच्या तीन नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व सुमारे चार तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. नंतर रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी जेहानाबाद येथील इमामच्या काही नातेवाईकांच्या घरी छापा टाकला पण तो अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यात सोमवारी दिल्ली विधानसभा प्रचारादरम्यान रिठाला येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शार्जिल इमामविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचा गौप्यस्फोट केला. शर्जिलने देशाचे तुकडे करण्यावर जोर दिला, त्याला पूर्वेची राज्ये तोडायची होती, याची गंभीर दखल घेत मोदींनी पोलिसांना शर्जिलच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यास सांगितले, असे शहा म्हणाले.

आपल्या भाषणात सीएएच्या मुद्द्यावर बोलताना इमामने देशातील कोणतीही राजकीय आघाडी मुस्लिमांच्या बाजूने उभी राहणारी नाही. राज्यघटना मुस्लिमांची सुटका करू शकेल असे समजणेही आत्महत्या करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला संताप वापरला गेला पाहिजे, अशी विधाने केली. इमामने असेही म्हटले की, आपल्यामागे पाच लाख लोक असतील तर आपण ईशान्येचा भाग कायमचा नाही तरी किमान एक-दोन महिने भारतापासून वेगळा करू शकतो. आसाम और इंडिया कटके अलग हो जाये, तभी ये हमारी बात सुनायेंगे. आसाम हा भारताला जोडणारा भाग आहे व तेथे आपली लोकसंख्या अधिक असल्याने आपण असे करू शकतो, असे विधान इमामने केले होते.

आपल्या विधानाबाबत ‘द संडे एक्स्प्रेस’ला स्पष्टीकरण देताना इमामने आपण रस्त्यांची नाकाबंदी करण्याबाबत बोललो होतो. ही नाकाबंदी आपण शांततामय मार्गाने करावी, चक्काजाम करावा असे आपले म्हणणे असल्याचा खुलासा केला होता.

इमाम हा जेएनयूमध्ये आधुनिक भारत या विषयात पीएचडी करणारा विद्यार्थी होता त्या अगोदर त्याने आयआयटी मुंबईतून कम्प्युटर सायन्स शाखेत पदवी घेतली आहे. इमाम दिल्लीतल्या शाहीनबाग आंदोलनातही काही काळ होता.

दरम्यान इमामच्या आईने त्याच्या वक्तव्याची मोडतोड करून पोलिस त्याला बळीचा बकरा करत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या कुटुंबियांना पोलिस त्रास देत असल्याचेही एक पत्रक २६ जानेवारी रोजी अफसान रहीम यांनी जाहीर केले आहे. माझा मुलगा निर्दोष असून तो अत्यंत हुशार मुलगा आहे तो खिसेकापू नाही. तो आता कुठे आहे याची मला काहीच माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्याने चक्काजामचे आवाहन केले होते तो देशाचे तुकडे करण्याची भाषा करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

इमामच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गेल्या शनिवारी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी इमामचे भाषण हे जिहाद पुकारल्याचे खरे उदाहरण असून शाहीन बागमध्ये देशविरोधी कट शिजत असल्याचा आरोप केला. तर आसामचे मंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी शाहीन बागचे आंदोलन उभे करण्यामागे इमामचा सहभाग असल्याचा दावा केला. या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा भारताची फाळणी करण्याचे मनसुबे आखले जात असून आणखी एक पाकिस्तान तयार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी अशी विधाने देशाचे सार्वभौम व अखंडता यांना आव्हान देतात अशी प्रतिक्रिया दिली. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एम. एन. बिरेन सिंग यांनी इमामच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

दरम्यान जेएनयूमधील इतिहास विभागाने एक पत्रक काढले असून इमामच्या विधानांशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: