शार्जील उस्मानी आणि त्याचे एल्गार परिषदेतील भाषण

शार्जील उस्मानी आणि त्याचे एल्गार परिषदेतील भाषण

शार्जील उस्मानीला ३० जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात भाषण देण्याचे निमंत्रण मिळाले, तेव्हा त्याने लगेच होकार दिला. एल्गार परिषदेच्

लोकशाहीत, जातीमागचा तो ‘कास्ट कोड’ तसाच आहे!
एल्गार परिषदः नवलखांचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला
भीमा कोरेगाव हॅकींग प्रकरणात पोलिसाचे नाव उघड

शार्जील उस्मानीला ३० जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात भाषण देण्याचे निमंत्रण मिळाले, तेव्हा त्याने लगेच होकार दिला. एल्गार परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमानंतर अनेक कार्यकर्ते-विचारवंतांना अटक झाली आहे हे वास्तव त्याला अडवू शकले नाही. सीएएचा निषेध केल्यामुळे आधीच दोन महिने तुरुंगात काढावे लागले असूनही तरीही तो ठाम होता. आत्तापासून स्वत:ला वाचवायची सवय लागली तर एक मुस्लिम नागरिक म्हणून सगळ्या आदर्शांचा, इच्छांचा, स्वप्नांचा, आशांचा बळी द्यावा लागेल, असे या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या २३ वर्षीय माजी विद्यार्थ्याने आवर्जून सांगितले.

“आमचे अस्तित्व नेहमीच केवळ बिर्याणी-कबाबाशी किंवा फारतर कव्वालीशी जोडले जाते,” असे शार्जील सांगतो. “मी एक भारतीय आहे आणि भारतीय समाजात मला न्याय्य वाटा मिळावा म्हणून लढतोय.”

“एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात बोलणे टाळले असते, तर तीन वर्षांपासून चाललेल्या दलितांच्या बदनामीच्या प्रयत्नांना मदत केल्यासारखे झाले असते. मुस्लिमांना बदनाम करण्याची प्रक्रियाही संथगतीने सुरू आहे आणि याचे ओझे आझमगढमध्ये लहानाचा मोठा होत असताना मी वागवले आहे,”  असे शार्जील सांगतो.

“एल्गार प्रकरणातही हेच आहे. या संघटनेशी जोडलेले लोक मूलगामी आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे लावणे योग्यच आहे अशी सरकारची भूमिका आहे. त्याबद्दल बोलणे टाळून आपण सरकारच्या दडपशाहीला मान्यता देत आहोत,” असे मत त्याने व्यक्त केले.

एल्गार परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’ या संघटनेने केले होते. बी. जी. कोळसे-पाटील आणि पी. बी सावंत या दोन माजी न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. त्यानंतर अटकसत्र सुरू झाले. या प्रकरणाचा तपास प्रथम पुणे पोलिसांनी महाराष्ट्र सरकारच्या (त्यावेळी भाजप सरकार होते) आदेशांवरून केला, महाराष्ट्रातील सरकार बदलल्यानंतर केंद्र सरकारने तपास आपल्या हाती घेतला. ३० जानेवारी झालेल्या दुसऱ्या कार्यक्रमानंतर शार्जीलवर देशद्रोहाच्या केसेस करण्यात आल्या. यातील एक महाराष्ट्रात, तर दुसरी उत्तर प्रदेशात झाली.

शार्जीलने त्याच्या भाषणात मुस्लिमांवर गेली सहा वर्षे सातत्याने चाललेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाज ‘सडला’ आहे असे विधान केले होते. हिंदूंनी आपल्या मनातील मुस्लिमद्वेषाशी लढण्याची गरज आहे, असे तो म्हणाला होता.

एक मुस्लिम तरुण महाराष्ट्रात येऊन हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करतो हे हिंदुत्ववादी पक्षांना सहन होण्याजोगे नव्हते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शार्जीलवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर फिर्याद दाखल झाली असून पोलिस त्याला अटक करतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शार्जीलला उत्तर प्रदेशात अटक करण्याची मागणी केली. लखनऊमध्ये शार्जीलविरोधात दाखल फिर्यादीमध्ये देशद्रोहासह १० गुन्हे लावण्यात आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून दाखल झालेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांपैकी ९६ टक्के राजकीय नेते व सरकारवर टीका केल्याबद्दल लावले गेले आहेत. त्यातील बहुतांश केसेसमध्ये पंतप्रधान व आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात आली आहे.”

“आपल्याला पुढे त्रास होईल म्हणून स्वत:वर सेन्सॉर लावणे मला मान्य नाही. हे सरकार मनमानी पद्धतीने लोकांना त्रास देत आहे. यात त्रास सहन करणे किंवा प्रतिकार करणे हे दोन पर्याय आहेत. मी नेहमीच दुसरा पर्याय निवडेन,” असे शार्जील म्हणाला. पुन्हा तुरुंगात जावे लागण्याच्या शक्यतेबद्दल तो म्हणतो की, अलीगढ मध्यवर्ती कारागृहातील वातावरण आझमगढमधील शाळेतील वातावरणासारखे होते. हिंदू व मुस्लिम एकमेकांशी सभ्यतेने वागत होते पण एकमेकांचे मित्र नव्हते. भारतातील लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण १४ टक्के आहे पण कैद्यांमध्ये हे प्रमाण २० टक्के आहे आणि यातील १९.७ टक्के अंडरट्रायल कैदी आहेत. “मी मुस्लिम घेट्टोमध्ये वाढलो. तुरुंग हाही मुस्लिम घेट्टोच होता,” असे शार्जील सांगतो.

भाषणाची तयारी

२०१४ मध्ये उस्मानी कम्प्युटर इंजिनीअरिंगमधील डिप्लोमासाठी एएमयूमध्ये आला, त्यावेळी मोदी केंद्रात सत्तेवर आले होते. भाजपने एएमयूमध्ये राजकीय खेळ्या सुरू केल्या होत्या. २०१६ मध्ये शार्जील राज्यशास्त्राचा विद्यार्थी झाला. त्यानंतर २०१८ मध्ये अलीगढच्या भाजप खासदारांनी विद्यापीठाच्या आवारातील मोहम्मद अली जिन्नाह यांच्या पोट्रेटवरून वाद सुरू केला. २०१९ मध्ये यूपी पोलिस व सीएएचा निषेध करणारे एएमयूचे विद्यार्थी यांच्यामध्ये हिंसाचार झाला. यात एका विद्यार्थ्याने हात गमावला. गेल्या वर्षी तर हिंदू महासभेने एएमयू ही “दहशतवाद्यांची शाळा” असल्याचा दावा केला. एएमयूमध्ये आल्यापासून शार्जील वक्तृत्वाचा सराव करत होता. “आता मी आमच्या हक्कांसाठी लढत आहे. भारतात मुस्लिमांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून जगावे लागणे आम्हाला मान्य नाही. आम्हाला समान दर्जा हवा आहे.”

एल्गार परिषदेचा कार्यक्रम हा त्याला मुस्लिमांहून अधिक हिंदू श्रोते मिळवून देणार होता ही बाबही महत्त्वाची होती. मुस्लिम श्रोत्यांपुढे बोलताना वापरली जाणारी इस्लामी प्रतिके त्याने या भाषणात वापरली नाहीत. त्याच्या भाषणात बेकायदा काहीच नव्हते असा निर्वाळा अनेक वकिलांनी दिला आहे. “एकंदर समाजात सडकेपणा आहे आणि मी तो दाखवून दिला. त्याने भावना दुखावल्या जात असतील तर त्यात माझी चूक नाही. एक मुस्लिम म्हणून मुस्लिम समाजाला वाटणाऱ्या भयाबद्दल, त्यांच्या इच्छांबद्दल बोलणे माझी जबाबदारी आहे. मी काही कव्वाली किंवा गझलगायक नाही. त्यामुळे मी माझे मत साखरेत घोळवून सांगण्याची गरज मला वाटत नाही.”

या कार्यक्रमात लेखिका अरुंधती रॉय, ३७०वे कलम रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देणारे कन्नन गोपीनाथन, जामिया मिलिया इस्लामीयाची विद्यार्थिनी आयशा रेना, पत्रकार प्रशांत कनोजिया यांची भाषणे झाली.

गोपीनाथन म्हणाले, “शार्जील जे बोलला ते मी किंवा अन्य हिंदू वक्ता बोलला असता, तर कारवाई झाली नसती. त्याला मुद्दाम अडकवण्यात आले आहे.”

शार्जील हा मुस्लिम आहे आणि ठाम मते असलेला मुस्लिम आहे म्हणूनच त्याच्यावर गुन्हे लावले गेले, असे मत कार्यक्रमाच्या आयोजकांनी व्यक्त केले.

दीर्घकाळापासून साचत आलेला राग

शार्जीलच्या मनातील राग अनेक वर्षांपासून साचत आलेला आहे. रागाला वाट करून देण्याच्या वयाचे झालो तेव्हा भाजप सत्तेत आहे. मात्र, आझमगढमधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्यापासून आपण पूर्वग्रह, संशय आणि अपमानाचा सामना करत आहोत, असे तो सांगतो. भारताच्या प्रत्येक शहराच्या पोटात दोन शहरे आहेत. एक म्हणजे ते शहर आणि दुसरे म्हणजे त्यातील मुस्लिम घेट्टो. त्याचे शहर होते रहमत नगर. एएमयूमधून पीएचडी झालेले त्याचे वडील तारीक उस्मानी कॉलेजमध्ये भूगोल शिकवायचे. त्यांच्या आसपास मुस्लिमच राहायचे. वकील, डॉक्टर, इंजिनीअर, व्यापारी, कारागीर, खाटिक, बेकर्स आणि भिकारी. सगळे मुस्लिम. शहरातील ‘पॉश’ सुविधा मुस्लिमांसाठी नव्हत्या. त्याच्या वडिलांनी आपल्या सहा मुलांना चांगले शिक्षण व आरोग्य देण्यासाठी सगळे काही केले. शार्जील घरापासून चार किलोमीटर अंतरावरील ज्योती निकेतन स्कूलमध्ये जात होता. ख्रिस्ताचा फोटो लावणाऱ्या शाळेत हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी एकत्र शिकत होते पण एकमेकांचे मित्र नव्हते, तो सांगतो. शाळेचे व्यवस्थापन कॅथलिक असले तरी सर्व शिक्षक ‘उच्चवर्णीय हिंदू’ होते. सातवीत असताना कागदाची गन तयार करण्यावरून एक शिक्षक त्याला ‘टेररिस्ट’ म्हणाले होते. बाटला हाउस चकमकीनंतर परिस्थिती आणखी वाईट झाल्याचे तो सांगतो. आझमगढमधील मुस्लिम घरांमध्ये छापे टाकले गेले, तरुण मुस्लिमांना चौकशीच्या नावाखाली उचलले जाऊ लागले, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. खरे तर त्या काळात राज्यात किंवा केंद्रात कोठेच भाजपची सत्ता नव्हती, तथाकथित सेक्युलर पक्ष सत्ते होते. आझमगढचा उल्लेख ‘आतंकगढ’ असा होऊ लागला. या प्रकरणानंतर शार्जीलचे वडील कॉलेजची ट्रिप घेऊन राजस्थानात गेले होते. तेथे त्यांना कोणत्याच हॉटेलमध्ये जागा मिळाली नाही. शार्जील तेव्हा दहा वर्षांचा होता. आझमगढमधील परिस्थिती अजूनही तशीच आहे. मुस्लिमांकडे कमालीच्या संशयाने बघितले जाते, असे तो सांगतो. “विश्वासाची खूप मोठी दरी तयार झाली आहे आणि हा अविश्वास मुस्लिम दाखवत नाही आहेत.” कुटुंबातील वातावरण

शार्जीलच्या घरात सर्वाधिक चर्चा होते ती शिक्षणाची. त्याचा एक भाऊ इंजिनीअरिंगला आहे. बहिणीला सायकोलॉजीत करिअर करायचे आहे. ती चार्ल्स डिकन्स, गॅब्रिएल ग्रेशिया मार्केझ, एजी नुरानी वाचते. एक भाऊ कवी आहे. एक कायद्याचा विद्यार्थी आहे. शार्जील सक्रिय कार्यकर्ता झाला तेव्हाही वडिलांनी त्याला थांबवले नाही. जुलै २०२० मध्ये शार्जीलला अटक झाली तेव्हा लखनऊ पोलिसांनी कुटुंबियांनाही अनेक प्रश्न विचारले. हुकूमशाही राजवटीत जगत असताना कुटुंबाकडूनच आधार मिळतो, असे तो सांगतो.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0