‘कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी’

‘कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी’

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेव

दाभोलकरांचे मारेकरी साक्षीदाराने ओळखले
महिलांची निराशा करणारे बजेट
सर्वोच्च न्यायालयाची ‘देशद्रोह’ कायद्याला स्थगिती

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता  स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

प्रकरण काय घडले?

बुधवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छ. शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्यावर शाई फेकण्यात आली. त्यानंतर तणाव वाढत गेला. या घटनेचे पडसाद मराठी भाषिक बेळगावमध्ये दिसून आले. येथे संभाजी चौकात महाराष्ट्र समर्थकांनी निदर्शने करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. काही ठिकाणी दगडफेक झाली, त्यात डझनभर वाहनांचे नुकसान झाले. या हिंसाचारात स्वातंत्र्य सैनिक संगोली रायन्ना यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी बेळगावमध्ये जमावबंदीचा आदेश जारी केला. बेळगावमध्ये अनेक सभांवर बंदी घालण्यात आली आहे.

शनिवारी कर्नाटकातल्या या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटित घडले आहे, त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका असे केंद्राला सांगितले. ठाकरे म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे.

नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे. राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत असे स्पष्ट शब्दांत सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे.

बेळगावात मराठी भाषिकांची गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे खपवून घेतले जाणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: