शिवसेनेने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला

शिवसेनेने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला

सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथमच चर्चा झाली.

आरटीआयचा दुरुपयोग : सरन्यायाधीशांच्या दाव्यात तथ्य किती?
दिल्लीत पोलिस आणि वकिलांचा संघर्ष रस्त्यावर
करोना व्हायरस – शरीरात कसा वागतो?

महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज दुपारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्याच्या हॉटेल ताजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने पाठींब्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिल्याचे समजते.

उद्धव यांच्याबरोबर आदित्य ठाकरे उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या बाजूने शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते.

भाजप काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सरकार स्थापन करू शकते, तर महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस का बरोबर येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

“खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’, अशा शब्दात ट्वीट करून शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

भारतीय जनता पक्षाने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितल्या नंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ‘एनडीए’मधून बाहेर पडणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

– दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान राज्यपालांकडे शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याची माहिती.

– राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी सेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी रात्रभर चर्चा सुरु होती.

– काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि हुसेन दलवाई यांनी सांगितले.

– सकाळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहण्याचा निर्णय.

– राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका फक्त नवाब मलिक मांडणार, संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी मीडियासमोर बोलणे टाळावे, असा राष्ट्रावादीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

– काँग्रेस वर्किंग कमिटीची सकाळी दिल्लीमध्ये बैठक. संध्याकाळी ४ वाजता महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

– पर्यायी सरकार देण्याची जबाबदारी आमची, मात्र कोणताही निर्णय हा काँग्रेसबरोबरच घेतला जाईल – राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

– काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना तातडीने दिल्लीत बोलावले.

– महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या ४४ पैकी ३९ आमदारांची शिवसेनेबरोबर जाण्यासाठी संमती मिळाल्याची माहिती.

– मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत यांची नावे चर्चेत.

– काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी होणार असल्यास दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्याची शक्यता.

– विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादी स्वतःकडे घेण्याची शक्यता.

– मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांची दिल्लीमध्ये घोषणा. राजीनामा देण्यासाठी पंतप्रधानांची वेळ मागितली होती, पण मिळाली नसल्याने पत्राद्वारे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. विश्वासाला तडा गेल्याचे सावंत यांनी म्हंटले.

९ नोव्हेंबरला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी पाचारण केले होते. काल संध्याकाळी भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले. शिवसेनेला आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

२८८ जागा असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी १४४ आमदारांच्या पाठींब्याची गरज आहे.

शिवसेनेच्या ५६ जागा निवडून आल्या आहेत, तर ८ अपक्ष आणि इतर आमदारांचा मिळून ६४ जागा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेला अजून ८० आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ जागा आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0