समुद्र किनारी पक्षीः किनारपट्टी, पाणथळ जागेचे सूचक

समुद्र किनारी पक्षीः किनारपट्टी, पाणथळ जागेचे सूचक

आज जगात सर्व ठिकाणी पाणथळ प्रदेश धोक्यात आहेत आणि किनारी समुद्र पक्षी हे या प्रदेशातील पर्यावरण आणि नैसर्गिक परिस्थितीचे उत्तम सूचक आहेत. हे पक्षी आणि त्यांच्या अनुषंगाने या सर्व किनारपट्ट्या व पाणथळीच्या जागा वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणूनही जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक समुद्र किनारी पक्षी दिन’ जाणला जातो.

६ सप्टेंबर हा ‘जागतिक समुद्र किनारी पक्षी दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस या पक्ष्यांचा अविश्वसनीय स्थलांतर प्रवास जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या वरील संशोधन, त्यांचे निरीक्षण आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी जगभर साजरा केला जातो. किनारपट्टीवर सापडणाऱ्या या पक्ष्यांचे संवर्धन आणि संरक्षणाबद्दल जनजागृती करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. आज जगात सर्व ठिकाणी पाणथळ प्रदेश धोक्यात आहेत आणि किनारी पक्षी हे या प्रदेशातील पर्यावरण आणि नैसर्गिक परिस्थितीचे उत्तम सूचक आहेत. हे पक्षी आणि त्यांच्या अनुषंगाने या सर्व किनारपट्ट्या व पाणथळीच्या जागा वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणूनही जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक समुद्र किनारी पक्षी दिन’ जाणला जातो.

महाराष्ट्रात जवळजवळ एकूण ५७७ प्रजातींचे पक्षी सापडतात. त्यापैकी साधारणतः ७०-८० प्रजाती या सागरी किनाऱ्यावर आढळणाऱ्या  पक्ष्यांच्या आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण किनारपट्टीवर बरेच रहिवासी आणि स्थलांतरित किनारी पक्षी आढळून येतात. नावाप्रमाणे हे पक्षी विशेषतः नदी, समुद्र, पाणथळी प्रदेश यांच्या काठावर चिखलात आढळतात. या पक्ष्यांची काही वैशिष्ट्ये म्हणजे या सर्वांचा आकार, त्यांची रचना एकमेकांपासून वेगवेगळी असते. त्यांचा अन्न पचनाचा दर खूप जास्त असतो आणि त्यामुळे ते सतत खात असतात. ते बहुदा अळ्या, जंत, कठीण कवचाचे उभयचर प्राणी इत्यादी आहार करतात व कधी कधी जल वनस्पती, छोटे मासे यावरही आपला उदरनिर्वाह करतात.

वेगवेगळ्या प्रजातीचे किनारी पक्षी एकाच भागात एकत्र राहू शकतात कारण वरकरणी जरी हे सारखेच दिसत असले तरी त्यांचे आकार, गुणधर्म आणि रचना वेगवेगळ्या असतात. विविध प्रजातीच्या पक्ष्यांच्या चोचीचा आणि पायाचा आकार, लांबी सुद्धा विविध असते. यामुळे ते किनारपट्टीवरील निरनिराळी क्षेत्रेही वापरू शकतात, जमिनीतील विविध खोलीवर सापडणाऱ्या अन्नघटकांचा लाभ घेऊ शकतात आणि समुद्रकिनाऱ्यावरील अन्नसाखळीत स्वतःसाठी एक विशिष्ट जागा तयार करू शकतात. सगळ्या पक्षी जगतात, किनारी पक्षी सर्वाधिक स्थलांतर करतात. आपल्या महाराष्ट्रात सापडणाऱ्या पैकी सुद्धा बरेच किनारी पक्षी हे स्थलांतरित असतात आणि त्यातले बहुतेक दरवर्षी लांब पल्ल्याचा प्रवास पार पडतात.

पक्ष्यांचे स्थलांतर हा एक खूप गहन परंतु आकर्षक विषय आहे. ते एका वर्षात पार आर्क्टिक खंडातून आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियापर्यंत स्थलांतर करून उन्हाळ्यात आपापल्या घरी परततात. हे स्थलांतर मुख्यतः त्यांची जगण्याची शक्यता वाढवणे, प्रजननासाठी सर्वोत्तम संसाधने मिळवणे आणि ऋतूंप्रमाणे अधिवास बदलणे किंवा विविध अन्न घटक मिळवणे यासाठी केले जाते. स्थलांतर कालावधी पक्ष्यांची जात, अंतर, वेग, मार्ग, हवामान, इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असतो. पक्षी बदलत्या ऋतूंचा अंदाज सूर्याच्या मार्गक्रमणावरून आणि दिवसाच्या कालावधीवरून घेतात. स्थलांतराच्या आधी सर्व पक्षी त्यांचे वजन चरबीच्या रूपात भरपूर प्रमाणात वाढवतात. ही चरबी ते लांब पल्ल्याचा प्रवास करताना लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरतात. काही पक्षी जवळजवळ दुपटीने आपलं वजन वाढवतात. ही अतिरिक्त चरबी साठवण्यासाठी हे पक्षी शरीरातील इतर अववय संकुचित करतात.

पक्ष्यांच्या या आश्चर्यकारक स्थलांतराचे एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच समुद्र किनारी सापडणारा ‘पट्टेरी शेपटीचा पाणटिवळा’ (Bar-tailed Godwit). एका संशोधनात पाणटिवळ्याने आपला पश्चिम अलास्का ते न्यूझीलँड हा ११,९८० किलोमीटरचा प्रवास ९ दिवसात अविरत पूर्ण करून, जागतिक विक्रम नोंदवला आहे.

महाराष्ट्राला विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. त्याव्यतिरिक्त खारफुटीची जंगले, अनेक नद्या, ओढे, छोटी-मोठी तळी, धरणांमुळे तयार झालेले तलाव, दलदलीचे आणि पाणथळीचे प्रदेश यामुळे भरपूर किनारी पक्षी बघायची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पक्षी निरीक्षणाला जाताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी म्हणजे दुर्बिण आणि पक्ष्यांचे मार्गदर्शनाचे पुस्तक बरोबर असणे महत्त्वाचे आहे, योग्य जागा आणि ऋतू बघितला पाहिजे. महाराष्ट्रात किनारी पक्षी निरीक्षण सर्वात जास्त हिवाळ्यात करता येते. किनारी पक्षी बघताना भरती-ओहोटीच्या वेळा महत्त्वाच्या ठरतात.

खालील काही ठिकाणे पक्षी निरीक्षणासाठी नावाजलेली आहेत. – मुंबई किनारपट्टी, दातिवरे, नवी मुंबई, ठाणे खाडी, आक्षी (अलिबाग), गुहागर, मालवण – तारकरली. तसेच काही पाणथळीच्या जागा म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर, जायकवाडी, भिगवण, वीर धरण इत्यादी.

सामान्यतः महाराष्ट्रात सर्वत्र सापडणाऱ्या काही पक्ष्यांची नावे : शेकाटया (Black-winged Stilt), टिटवी (Red-wattled Lapwing), सामान्य टिलवा (Common Redshank), छोटा टिलवा (Little Stint), छोटा कंठेरी चिखल्या (Little-ringed Plover), तुतारी पक्ष्याच्या विविध प्रजाती (Common, Marsh, Green, Wood, Terek, Curlew Sandpipers), पट्टेरी आणि काळ्या शेपटीचा पाणटिवळा (Bar-tailed and Black-tailed Godwits), लहान आणि युरेशिअन कोरल (Whimbrel and Eurasian Curlew), इत्यादी|

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास फॉर्म भरा

छायाचित्र सौजन्यः आदेश शिवकर

ऋजुता फडके, या मुंबईस्थित हौशी पक्षी निरीक्षक आहेत.

COMMENTS