अनैधिकता आणि भाषांतर: बाबुराव बागुलांची कथा

अनैधिकता आणि भाषांतर: बाबुराव बागुलांची कथा

जर आपण या मुद्द्याशी सहमत असू की भाषांतर हे वाचन असते तर असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की मीरा मनवी यांचे आई या कथेचे इंग्रजी भाषांतर मूळ कथेचे प्रस्थापित वाचन प्रस्तुत करते.

जात नको आर्थिक निकषावर आरक्षण मागा – केरळच्या न्यायाधीशांचे ब्राह्मणांना आवाहन
बसपाची उ. प्रदेशातील आजपर्यंतची खराब कामगिरी
ताजमहालच्या बंदिस्त खोल्यांचे फोटो पुरातत्व खात्याकडून प्रसिद्ध

बाबुराव बागुल यांच्या मरण स्वस्त होत आहे या कथासंग्रहातील आई या कथेचे मीरा मनवी यांनी केलेले इंग्रजी भाषांतर Mother या शीर्षकाखाली Poisoned Bread: translations from Modern Marathi Dalit Literature या मराठी दलित साहित्याच्या इंग्रजी भाषांतराच्या पहिल्या संकलनात १९९२ या वर्षी प्रकाशित झाले.

दलित साहित्याचे इंग्रजी भाषेत होणारे भाषांतर व त्या भोवतालचे राजकारण अशा काही मुद्द्यांचे विवेचन आई ह्या कथेच्या भाषांतराचे उदाहरण घेऊन करताना सुरुवातीलाच काही नोंदी नमूद करणे उचित ठरेल.

आई या कथेचे भाषांतर करताना भाषांतरकाराने पुरेशी काळजी न घेता निष्काळजीपणे आणि घाई घाईत भाषांतर केलेले दिसते. भाषांतराच्या प्रक्रियेत भाषांतरकाराने बऱ्याच ठिकाणी वाक्ये काढून टाकलेली आहेत, तर काही ठिकाणी स्वतःची वाक्ये मिसळलेली आहेत. आता ही घुसळण किंवा गाळण वाचकाला बऱ्याच अंशी नैसर्गिक वाटण्याची शक्यता असते. परंतु एक अभ्यासक म्हणून अशा प्रसंगी सावध असणे जास्त जरुरीचे आहे.

बाबुराव बागुल यांचा मूळ कथासंग्रह 'मरण स्वस्त हॉट आहे'.

बाबुराव बागुल यांचा मूळ कथासंग्रह ‘मरण स्वस्त हॉट आहे’.

हे भाषांतर म्हणजे अर्थनिर्णयनाचे फसलेले उदाहरण आहे असे दुभाषी वाचक म्हणू शकतात. मराठी दलित साहित्य मोठ्या प्रमाणावर इंग्रजीत भाषांतरित झालेले आहे.  गेल  ऑमव्हेट,  माया पंडित आणि शरणकुमार लिंबाळे म्हणतात, की दलित साहित्याच्या भाषांतराची मागणी जगभरात होत आहे म्हणूनच ते जास्त प्रमाणात भाषांतरित केले जाते. मला असे वाटते की मागणीचा हाच ओघ या साहित्याच्या हौशी, निष्काळजी आणि घाई घाईत केल्या जाणाऱ्या भाषांतरांचे कारण ठरते आणि त्याचाच परिणाम म्हणजे भाषांतर करताना बऱ्याच त्रुटी राहून जातात आणि भाषेचे सूक्ष्म भेद भाषांतरात हरवतात. दलित साहित्य हे बऱ्याचदा बोली भाषेत (येथे भाषा या शब्दाचा अर्थ ‘शैली’ असा लावण्याची चुक करू नये.)[i] लिहिलेले असल्याने भाषांतर करताना शब्द आणि भाव, भाषेतील सूक्ष्म भेद याकडे लक्ष पुरविणे आवश्यक असते. प्रमाण किंवा पुळचट इंग्रजीचा वापर दलित साहित्याचे भाषांतर करताना करणे म्हणजे बाबुराव बागुलांच्या कथेतील व्यक्तिरेखांची अनैधिकता[ii] हिरावून घेण्यासारखे आहे. बाबुराव बागुलांच्या आई या कथेतील वंचित व्यक्तिरेखांची अनैधिकता आणि त्याचे भाषांतर यांच्या परस्पर संबंधांचा उलगडा करण्याचा प्रयत्न या लेखात पुढे येईल. बागुल यांची आई ही कथा आणि तिचे इंग्रजी भाषांतर वर नमूद केलेल्या परस्पर संबंधाचा उलगडा करण्याची चांगली सुरुवात ठरू शकते. सुरुवातीला कथेतील पहिल्या उतार्‍याचे भाषांतर उदाहरण म्हणून घेऊ. मूळ मराठी कथेची सुरुवात पुढील प्रमाणे आहे:

“तास घ्यायला आलेल्या मास्तरांनी आई ही कविता अशी शिकवली मागास वर्गातील ती मुले तासभर तरी तळापासून वर उचलली गेली. शिक्षक पाठ संपवून बाहेर गेले आणि वर गेलेली मुले कवितेच्या कवितेतून सटासट सटकू लागली. खाली आदळू लागली. अनोळखी अद्भुतता पाण्याच्या पायाने पळून गेली आणि मुले पुन्हा होती तशी झाली.” (पृ. २९)

भाषांतरकार हा उतारा पुढील प्रमाणे भाषांतरित करते:

“The children looked up- backward children with their peaked ragged faces- at the teacher. The poem was about a mother, and they remembered the warmth of the mother’s lap, the only place where they ever felt secure.” (पृ.२०९)

इथे नेमके काय घडते? भाषांतरकार मूळ उतार्‍यात असणार्‍या अनुप्रास अलंकाराकडे दुर्लक्ष करून स्वत:चे अर्थनिर्णयन त्यात मिसळते व तिच्या अर्थनिर्णयनाची त्यात भर घालते. ‘अ’ ‘त’ आणि ‘म’ पहिल्या तर ‘क’ आणि ‘स’ या दुसर्‍या वाक्यातील ध्वनिमांच्या वारंवारितेकडे आणि त्यांनी निर्माण होणार्‍या लयींकडे भाषांतरकार लक्ष पुरवित नाही. मूळ कथेमध्ये कुठेही शाळेतील मुले त्यांच्या मास्तरांकडे पाहत आहेत किंवा त्यांना त्यांच्या आईच्या मांडीची आठवण येते आहे किंवा आईच्या मांडीवर त्यांना सुरक्षित वाटते असा उल्लेख नाही. मूळ कथा कुठेही ‘आई’ या आकृतीचे किंवा तिच्या मातृत्वाचे महात्म्य सांगत नाही.

ही कथा माधव जूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन- १८९४-१९३९) या कवीच्या आईची आठवण या कवितेचा केवळ उल्लेखच करीत नाही तर त्या कवितेचे पुनर्मूल्यांकन[iii] देखील करते. मराठी साहित्याचे वाचक ज्या पद्धतीने ‘आई’ या आकृतीमध्ये भावना आणि मुल्ये वाचतात ती वाचन पद्धती बागुलांच्या कथेमध्ये बदलतांना दिसते. पारंपरिक ब्राह्मणी मराठी साहित्याचा मागोवा घेतला तर आपण असे म्हणू शकतो की पारंपरिक मराठी साहित्यात आई या आकृतीचे महात्म्य आणि विशेषत्वाने मातृत्वाचे चित्रण नेहमीच उच्च जातीतील आईच्या आकृतीला समोर ठेवून केले गेलेले आहे. यानुसार आई ही एक आदर्श आकृती असते जी आपल्या मुलांसाठी सगळ्या सुखांचा त्याग करते. अशा अर्थाच्या दोन प्रसिद्ध कविता म्हणजे,  ग. दि. माडगूळकरांची आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही आणि कवी यशवंत यांची आई म्हणूनी कोणी, त्याचप्रमाणे साने गुरुजींचे श्यामची आई  हे पुस्तक, इत्यादींचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

 

दलित साहित्याचे इंग्रजीतील भाषांतर.

दलित साहित्याचे इंग्रजीतील भाषांतर.

कथेतील मुले आईची आठवण  ही आईबद्दलची कविता ऐकून भारावून जातात. कथनकार पांडू, कवितेचे शीर्षक विसरतो आणि ‘आई’ इतकेच लक्षात ठेवतो. कवितेचा त्याच्यावर इतका प्रभाव होतो, की त्याला त्याची आईदेखील वात्सल्यसिंधू भासू लागते आणि त्याला तिची महती आणि उदात्तता पटू लागते. परंतु, इतर मुले त्याच्या आईला प्रियकर आहे म्हणून शिव्याशाप देऊन त्याला चिडवू लागतात. त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आजूबाजूला राहणारे बरेच पुरुष त्याच्या आईचे लैंगिक शोषण करण्याचा तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे बायका तिच्या सौंदर्याचा मत्सर करतात आणि तिला प्रियकर आहे म्हणून शिव्याशाप देतात. ती पैसे कमावून मुलाचे संगोपन करतेय, विधवेसारखं जगतेय, आणि मातृत्व आणि कामेच्छा अशा पेचात सापडलेली आहे. तिचा मुलगा देखील त्याच्या बापाप्रमाणे तिच्या लैंगिक व्यवहारावर संशय घेतो.

ही कथा अनैधिक (रुढार्थाने वंचित) स्त्रीचे इतर अनैधिक (तसेच नैधिक) व्यक्तिरेखांकडून केल्या जाणाऱ्या शोषणाचे  चित्रण करते. गेली कित्येक वर्षे दलित स्त्रिया उच्च जातीतील पुरुषांनी व दलित पुरुषांनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला तोंड देत आहेत. अशा प्रकारचे वंचित जिणे जगणार्‍या व्यक्तिरेखांची उदाहरणे, म्हणजे व्यक्तिरेखांची जात, वर्ग आणि लिंग लक्षात घेतले नाही तरी, जरी मराठी साहित्यात आढळत असली तरीही ज्या पद्धतीने बागुलांच्या कथा वंचित व्यक्तिरेखा उभ्या करतात त्या पद्धतीने तरी निश्चितच इतर लेखकांनी उभ्या केलेल्या दिसत नाहीत.

एकोणिसाव्या शतकात मराठी साहित्याने व नाटकाने वाचकांना तसेच प्रेक्षकांना नैतिक धडे देणे अपेक्षित होते. बऱ्याचशा मराठी टीकाकारांनी आणि लेखकांनी त्याचप्रमाणे नाटककारांनी वाचकांना तसेच प्रेक्षकांना नैतिक धडे द्यावेत ही उत्कट इच्छा व्यक्त करून साहित्याचे कार्य हे उपदेश करणे, नैतिक धडे देणे असते हे जाहीर करून टाकले होते. एक उदाहरण येथे उद्धृत करते. शेक्सपीअरचे Cymbeline हे नाटक मराठीत तारा या शीर्षकाखाली १८७९ मध्ये प्रकाशित झाले आणि १८७७ मध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला होता. विष्णू मोरेश्वर महाजनी, या नाटकाचे भाषांतरकार, प्रस्तावनेत सुचवितात, “नाटक केवळ मनोरंजन करिते असे नाही, तर थोर पुरूषांच्या चरितांचे वर्णन करून त्यांच्या प्रमाणे वर्तन ठेवावे अशी मनाचि प्रवृत्ति करिते. यावरुन लोकसुधारणा होण्याला उत्तम नाटक हे एक अंग आहे असे सिद्ध होते. म्हणुन अशी नाटके जितकी मराठीत होतिल तितकी बरी.” (प्रस्तावना पृ. ३)

वर निर्देशित केलेल्या कवितांच्या संदर्भात असे विधान करणे वावगे ठरणार नाही की या कविता वाचकांना नैतिक निष्कर्षांपर्यंत व निर्णयांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात. वाचक साध्या-सरळ निष्कर्षांपर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारची वाचन पद्धती एकोणिसाव्या शतकातील प्रस्थापित वाचन पद्धतीतून साधित झालेली आहे हे तारा या नाटकाच्या उदाहरणाद्वारे म्हणता येऊ शकेल. अशा पद्धतीने एकोणिसाव्या शतकात मराठी साहित्याच्या कार्याची संकल्पना काम करते. परंतु बागुलांच्या कथा या वाचन पद्धतीला अपवाद आहेत. या कथा वाचकांच्या नैतिक निष्कर्षांची शक्यता आणि क्षमता स्थगित करतात कारण त्यांच्या कथांचे शेवट हे नेहमीच खुले असतात. त्यामुळे वाचक नैतिक संभ्रमावस्थेत (नैतिक निष्कर्ष देण्यात असमर्थ ठरतात) सापडतात-  जशी बागुलांच्या कथेतील आई मातृत्व आणि कामेच्छा अशा संभ्रमावस्थेत सापडलेली दिसते. अशा प्रकारचे अनिर्बंध शेवट आणि नैतिक अनिर्णयनक्षमता वाचकांना अनैधिक बनवते. कुठल्याही प्रकारचे नैतिक निष्कर्ष काढण्यापासून व देण्यापासून वंचित करते. या कथांचे वाचक देखील कथांमधील व्यक्तिरेखांप्रमाणे नैतिकदृष्ट्या वंचित होतात कारण ते या व्यक्तिरेखांच्या वर्तणुकीवर नैतिक निष्कर्ष किंवा निर्णय देण्यास असमर्थ ठरतात.

बागुलांच्या आई या कथेचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला म्हणजे ही कथा वाचकांना नीतिमूल्यविषयक निष्कर्ष काढण्यापासून रोखते आणि दुसरा पैलू म्हणजे अनैधिक व्यक्तिरेखा रेखाटताना संस्कृतप्रचुर मराठी भाषेचा उपयोग अनुप्रास अलंकाराची गद्यात योजना करते ज्यामुळे कथेची भाषा अलंकारिक बनते. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करून वंचित व्यक्तिरेखा रेखाटण्याचा मराठीतला हा बहुधा पहिलाच प्रयत्न असावा. अनुप्रास हा अलंकार जो मराठीत बहुत करून कवितेच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता योजलेला आढळतो तो बागुलांनी कथेत योजलेला आहे. अशा पद्धतीच्या संस्कृतप्रचुर मराठी भाषेची योजना केली नसती तर बागुल यांची ही कथा निव्वळ वास्तववादी ठरली असती. इथे हे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे की कथेची भाषा संस्कृत प्रचुर जरी असली तरीही त्यात योजलेल्या व्यक्तिरेखा व घटना पारंपारिक मराठी साहित्यात क्वचितच आढळतात. दलित साहित्य वंचित व्यक्तिरेखांची तपशीलवार वर्णने व त्यांच्या दैनेचे चित्र उभे करते.

आई या कथेची भाषांतरकार भाषांतर करतांना अर्थनिर्णयनाच्या प्रयत्नात नवनिर्मिती करण्याऐवजी कथेचा सारांश देते आणि स्वत:च्या वाक्यांची भर त्यात घालते. भाषांतरकाराने मूळ कथेचे अर्थनिर्णयन करतांना स्वत:च्या वाक्यांची भर पुढील प्रमाणे घातली आहे:

  1. He had no father, and now everyone was saying that his mother was a whore. (पृ. २१०)
  2. His mother and unprotected widow. (पृ. २१०)
  3. And will she come home tonight or will she run away forever like Gangu next door? (पृ. २१२)
  4. Pandu’s mother, secure in her new found love, rejoicing in the great physical prowess of the overseer, burned with anger, but walked straight, and threaded her way through to the hostile crowd. The women started hurling abuse at her. (पृ. २१३)
  5. Pandu was just an infant then.  The kitchen fires had to be kept going, and he needed medicines and milk and fruit. All day should work at the construction sites hauling bricks and cement. (पृ. २१४)
  6. Then she suddenly saw him as he really was: totally vulnerable, totally dependent on her, even as his father had been before him. (पृ. २१५)
  7. Do you know something, son? I was beautiful… Walji Seth would send a 50 rupee note through Messenger every Saturday night and ask me to go over to his bungalow… I could have lived a merry life, but I gave up everything, son. I lived for you, hoping you would grow up, be my support, but you have betrayed me. (पृ. २१७)

वरील वाक्यांचा बारकाईने विचार केला तर हे सहज लक्षात येते की भाषांतरकार जेव्हा क्रमांक सातचा संवाद भाषांतरात जोडते तेव्हा ती पांडूच्या आईच्या वर्तनाचे समर्थन करते. पांडूची आई त्याला म्हणते की ती खूप सुंदर होती आणि बरेच पुरुष तिला आधार द्यायला तयार असतांनादेखील तिने केवळ तिच्या मुलासाठी, पांडूसाठी, सर्व सुखांचा त्याग केला. परंतु त्यानेही आता तिचा विश्वासघात केलेला आहे असा अर्थ भाषांतरात येतो. भाषांतरकार गंगू नावाची नवीन व्यक्तिरेखा भाषांतरात आणते आणि पांडू त्याच्या आईची गंगूशी तुलना करतो आणि तीही गंगुसारखीच घर सोडून प्रियकरासोबत पळून जाईल अशी भीती व्यक्त करतो. हे क्रमांक तीनच्या वाक्यावरून स्पष्ट होते. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मूळ संहितेत कुठेही आईच्या मांडीचा सुरक्षित जागा म्हणून उल्लेख नाही. अशा वाक्यांच्या रचनेवरून हेच निदर्शनास येते की भाषांतरकार तिच्या प्रस्थापित वाचनपद्धतीवर मात करू शकली नाही. त्याचप्रमाणे अनैध व्यक्तिरेखांच्या परिस्थितीवर नैतिकता लादते व नैतिकतेच्या (काय चांगले, काय वाईट) दृष्टिकोनातून कथेतील आईच्या वागण्याचे समर्थन करू पाहते. या भाषांतरात बागुलांच्या कथेच्या अगदी उलट घडते. बागुल यांची कथा वाचकांना अशा वळणावर आणून सोडते जिथे वाचकांना नैतिक पर्याय नाही. काय नैतिक किंवा अनैतिक आहे हे ठरवणे अवघड होऊन बसते आणि त्यांची अस्तित्वात असणारी नैतिकता स्थगित होते. तथापि, भाषांतरकार भाषांतर करताना तिची स्थापित नैतिकता वापरते आणि वाचकांना नैतिकतेच्या दृष्टिकोनातून भाषांतरित कथा वाचण्यास भाग पाडते.

बागुल यांची कथा केवळ अनैध व्यक्तिरेखांचे प्रतिनिधित्व करते असे नाही तर वाचकांना देखील नैतिक मूल्यांचे निर्णयन करण्यापासून वंचित करते. मूळ संहितेतील कथनकार देखील कुठेही पांडूच्या आईच्या वर्तणुकीचे समर्थन किंवा खंडन करीत नाही. भाषांतरकार मात्र ही व्यक्तिरेखा उच्च जातीतील स्त्रियांच्या वर्तनाला साजेशी करून टाकते. कशी? तर कथनकाराचे आईच्या मांडीला गौरवान्वित करणे जे राजहंस माझा निजला इत्यादी कवितांमध्ये केलेले आढळते.

जर आपण या मुद्द्याशी सहमत असू की भाषांतर हे वाचन असते तर असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की मीरा मनवी यांचे आई या कथेचे इंग्रजी भाषांतर मूळ कथेचे प्रस्थापित वाचन प्रस्तुत करते. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक तिच्या पॉलिटिक्स ऑफ ट्रान्सलेशन या २००० साली प्रकाशित झालेल्या दीर्घ निबंधात म्हणते की, “भाषांतर ही अत्यंत जिव्हाळ्याची प्रक्रिया असते. जेव्हा मी भाषांतर करते तेव्हा मी संहितेला शरण जाते.” (स्पिवाक, पृ. ३९८) इथे स्पिवाकला असे सुचवायचे आहे की भाषांतरकाराने भाषेच्या अलंकारिकतेकडे विशेष लक्ष पुरविणे अत्यंत गरजेचे असते. स्पिवाक घाई घाईत केलेल्या भाषांतरांमध्ये आणि भरपूर वेळ गुंतवून, खर्च करून आणि अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या भाषांतरांमध्ये फरक करते. ती म्हणते की…

मला स्वत:ला घाई घाईत आणि सोप्या आणि उतावीळपणे, निष्काळजीपणे आणि अवघड पद्धतीने भाषांतर करणे यात कुठेही पर्याय दिसत नाही. जबाबदार किंवा विश्वासार्ह भाषांतराने भाषांतरित होताना जास्त वेळ का घ्यावा यामागे मला काहीही कारण दिसत नाही. भाषांतर करताना पूर्वतयारी करायला कदाचित जास्त वेळ लागेल आणि त्यावरील तिचे प्रेम कदाचित वाचन कौशल्याशी निगडित बाब असेल. यासाठी संयमाची आवश्यकता असते. चिकाटीची निकड असते. परंतु संहितेचे केवळ मूर्त भौतिक उत्पादन हे धीमे असण्याचे काहीच कारण नाही. (स्पिवाक, पृ.३९९)

आपण जर स्पिवाकशी सहमत असू तर असे म्हणणे अनुचित ठरणार नाही की हे भाषांतर संहितेचे घाई घाईत झालेले आणि निखालस भौतिक उत्पादन आहे. भाषांतरकाराने साहित्याच्या अलंकारिकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. भाषांतरकार भाषांतर करताना अनुप्रास अलंकाराचा वापर करीत नाही. एका बाजूला बाबुराव बागूल यांची कथा साहित्याच्या उपदेशपर त्याच प्रमाणे नीतिपर वाचन पद्धतीला स्थगित करते तर दुसऱ्या बाजूला भाषांतरकार भाषांतराच्या माध्यमातून सहित्याचे नीतिपर वाचन भाषांतराच्या माध्यमातून पुढे आणते. ती मूळ संहितेचे अर्थनिर्णयन करताना संहितेत भर घालते. काही वाक्य गहाळ करते तर काही ठिकाणी वाक्यांचा सारांश देते जे अर्थनिर्णयनात अपरिहार्य असते. कारण भाषांतर तसेच अर्थनिर्णयन हे दोन्हीही न टाळता येणारे मुळ संहितेवरचे अपरिहार्य हल्ले असतात. तथापि मूळ संहितेचे भाषांतराच्या प्रक्रियेत अर्थनिर्णयन करताना भाषांतरकार अनैधिकतेच्या तत्वाच्या सर्व प्रक्रिया काढून टाकते ज्या मूळ संहितेत उपस्थित आहेत.

बागुल यांची कथा साहित्याच्या सुपरिचित, प्रस्थापित वाचनाची परवानगी नाकारते. साहित्याचे प्रस्थापित वाचन हे ‘अंतोनियो ग्रामशी’च्या शब्दात ‘कॉमन सेन्स’ पद्धतीचे वाचन असते. कॉमन सेन्स[iv] पद्धतीचे साहित्याचे वाचन हे साहित्याचे प्रस्थापित वाचन पद्धतीच्या आधारावर केलेले वाचन म्हणजेच साहित्याचे अशा पद्धतीचे वाचन ज्यात व्यक्तिरेखांच्या कृतींचे हेजीमोनिक (hegemonic) नैतिक पायावर समर्थन केले जाते. जेव्हा मी प्रस्थापित वाचनपद्धती असे म्हणते तेव्हा मला असे म्हणावयाचे आहे, की साहित्य वाचतांना हा विश्वास  बाळगणे कि साहित्य, नैतिकता/नितीमुल्ये शिकविते आणि साहित्याच्या साहित्यत्वाकडे (अलंकार आणि लेखनशैलीकडे) दुर्लक्ष करणे. भाषांतरकार देखील मूळ संहितेचे प्रस्थापित वाचन प्रस्तुत करते आणि अनुप्रास अलंकाराकडे दुर्लक्ष करते, त्याचबरोबर पांडूच्या आईच्या अनैतिक संबंधांचे समर्थन करते कारण तिला प्रियकर आहे. भाषांतरकार तिला ‘असुशिक्षित विधवा’ असे संबोधते आणि एका संवादाची भर घालते जिथे ती म्हणते की तिने तिच्या आयुष्यातील आनंदाचा तिच्या मुलासाठी त्याग केलेला आहे.

मला असे वाटते की भाषांतरकार दलित साहित्याच्या भाषांतराच्या जागतिक मागणीच्या दबावाखाली येऊन घाईघाईत भाषांतर करते. हेच मत अनेक दलित लेखक आणि विद्वानांनी व्यक्त केलेले आहे की दलित साहित्याच्या भाषांतराच्या जागतिक मागणीमुळे अपरिपक्व भाषांतरांची भरमसाठ निर्मिती होत आहे. शरणकुमार लिंबाळे त्यांनी संपादित केलेल्या भारतीय दलित साहित्य २०१३ या दलित साहित्य विषयक लेखांच्या संकलनाच्या प्रस्तावनेत म्हणतात की:

सन १९७२ ते १९९२ या दोन दशकात मराठी दलित साहित्याने भारताचेच नव्हे, तर जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. हिंदी आणि इंग्रजी अनुवादामुळे दलित साहित्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. सुरुवातीच्या काळात गाजलेली चर्चित ठरलेली पुस्तकेच अनुवादासाठी निवडली जायची. दलित आत्मकथांची वादळी चर्चा व्हायची. म्हणून अनुवादकही दलित आत्मकथनांचा अनुवाद करणे अधिक पसंत करायचे… दलित कथा दलित कादंबऱ्या अशा पुस्तकांचाही अनुवाद झाला. दलित साहित्याचा अनुवाद छापला जातो हे लक्षात आल्यानंतर अनेक हौशी आणि नवशिक्या अनुवादकांनी दलित साहित्याचा धडाडीने अनुवाद करणे सुरू केले. त्यामुळे दलित साहित्याच्या अनुवादाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतांना दिसतील. (लिंबाळे, पृ. २७-२८)

हे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे की दलित साहित्याच्या भाषांतराची जागतिक मागणी या साहित्याच्या उतावीळपणे केलेल्या भाषांतरांचे कारण ठरते आणि दलित साहित्यातील अनैधिकतेच्या वर्णनाच्या साऱ्या शक्यता भाषांतरात नाकारते.

संदर्भ

[i] बागुलांच्या लेखनशैलीबद्दल अधिक माहिती साठी अनिकेत जावरे ह्यांच्या काळे पांढरे या लेखसंग्रहातील व्यंजनांचे महत्व: बाबुराव बागुलांच्या काही कथा  हा निबंध बघावा. 

[ii] अनिकेत जावरे त्यांच्या “Destitute Literature” ह्या मुंबई विद्यापीठ, महात्मा फ़ुले अध्यासनासाठी दिलेल्या व्याख्यानात “Destitute”, “Destitution” ह्या नव्या संकल्पना अप्रस्थापित सामाजिक घटक व साहित्याच्या वर्णनासाठी वापरतात. ‘अनैध’ हा शब्दप्रयोग “Destitute” ह्या शब्दाचे भाषांतर म्हणून करावा असा निष्कर्ष मा‍झ्या अनिकेत जावरेंसोबत फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या चर्चेअंती निघाला.

[iii] अनिकेत जावरे साहित्याचे मूल्य (value) आणि पुनर्मुल्यांकन (revaluation) ह्याची चर्चा Destitute Literature मध्ये पृ. १३ वर करतात.

[iv] Common Sense ह्या संकल्पनेच्या अधिक माहिती साठी आंतोनिओ ग्राम्शी, “प्रिझन नोट्बुक्स खंड १३” पृ. १७३ बघावे. येथे ‘Common Sense’ ह्या संकल्पनेचा वापर अप्रस्थापित समाज घटकांच्या साहित्य वाचनाच्या व अर्थनिर्णयनाच्या पद्धती प्रस्थापित समाज घटक कसे आकारतो हे समजुन घेण्यासाठी केलेला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0