सिद्धार्थ वरदराजन यांना ‘डीडब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार

सिद्धार्थ वरदराजन यांना ‘डीडब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार

नवी दिल्ली : ‘द वायर’चे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन यांची या वर्षीच्या प्रतिष्ठित डॉईश वेले (डीडब्ल्यू) फ्रीडम ऑफ स्पीच पुरस्कारासाठी

लिथियम बॅटरीसाठी तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल
भयमुक्तीचे आग्रही स्वगत
‘द वायर’ला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे ‘फ्री मीडिया पॉयोनिअर अॅवॉर्ड’

नवी दिल्ली : ‘द वायर’चे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन यांची या वर्षीच्या प्रतिष्ठित डॉईश वेले (डीडब्ल्यू) फ्रीडम ऑफ स्पीच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मानवाधिकार व भाषणस्वातंत्र्यांसंदर्भात जनजागृती करणे आणि त्या संदर्भात सातत्याने वृत्तांकन करणार्या पत्रकारांना देण्यात येतो.

वरदराजन यांच्या समवेत १४ देशांमधील अन्य १७ पत्रकारांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून ३ मे रोजी आंतरराष्ट्रीय पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा ज्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, त्या सर्व पत्रकारांना कोरोना संकटात सत्तेची दमनशाही व प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले. प्रसंगी तुरुंगवासही भोगावा लागला.

कोविड-१९चे संकट असताना राम नवमी साजरी करण्यासाठी उ. प्रदेश प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. त्या संदर्भात वृत्तावर वरदराजन यांनी टिप्पण्णी केल्याने उ. प्रदेश पोलिसांनी मुख्यमंत्री आदित्य नाथ यांच्यावर ‘टीका’ केल्याचा आरोप करत वरदराजन यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती आणि त्यांना लॉकडाऊनच्या काळात अयोध्येत येण्याचे आदेश दिले होते.

डॉईश वेले (डीडब्ल्यू) फ्रीडम ऑफ स्पीच पुरस्कार विजेते १६ पत्रकारांची ओळख

आना लालिक, सर्बिया – Nova.rs या न्यूज वेबसाइट काम करणार्या आना यांनी नोवि साद शहरातील वैद्यकीय उपकरणे व सुरक्षित साधने यांच्या कमतरतेसंदर्भात वृत्तांकन केले होते. पण त्यांना या वृत्तासाठी दोन दिवसांचा तुरुंगवास देण्यात आला होता.

ब्लाज जगागा, स्लोवोनिया –  या मुक्त पत्रकार असून त्यांच्या शोध पत्रकारितेमुळे त्यांच्या काही वृत्तांनी स्लोवोनियामध्ये खळबळ माजली होती. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अत्याचार केले व त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.

सेर्गेय साजुक, बेलारुस : ऑनलाइन वर्तमानपत्र ‘येजहेदनेवनिक’ या साठी काम करणारे सेर्गेय यांनी कोरोना महासाथीसंदर्भात सरकारवर टीका केली होती. त्यावरून सरकारने सेर्गेय यांना २५ मार्चला अटक करून ४ एप्रिलला त्यांची सुटका केली होती. सेर्गेय यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप सरकारने ठेवला आहे.

एलेना मिलाशिना, रशिया : २००९मध्ये एलेना यांना ह्यूमन राइट्स वॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यावर या वर्षी जानेवारीत चेचेन्यात प्राणघातक हल्ला झाला. १२ एप्रिलला त्यांच्या नोवोया गजेटामध्ये चेचेन्या प्रशासनाच्या विरोधात आलेल्या वृत्तांमुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. सोशल मीडियात चेचेन्याचे अध्यक्ष कादिरोव द्वारा त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

डार्विंसन रोजास, व्हेनेझुएला : कोरोना विषाणू संदर्भात एक वृत्त दिल्यानंतर मुक्त पत्रकार डार्विंसन रोजास यांच्या प्राणघातक हल्ला करण्यात आला, शिवाय त्यांना १२ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. २ एप्रिलला त्यांची सुटका करण्यात आली.

मोहम्मद मोसाएद, इराण : यांनी कोरोना संदर्भात सरकारवर टीका केल्याने त्यांना अटक करण्यात आली. शिवाय न्यायालयाने त्यांना काही दिवस पत्रकारिताही करण्यास बंदी घातली. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले आहे.

बेटिफिक न्गुंबवांडा, झिम्बाब्वे : टेलजिम या साप्ताहिकात काम करणार्या बेटिफिक यांना वृत्तसंकलन करताना ८ एप्रिल रोजी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली गेली.

डेव्हिड मुसीसी कार्यानकोलो, युगांडा : बुकेडे टीव्हीचे पत्रकार असलेल्या डेव्हिड यांना घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर सुमारे १० तास ते बेशुद्धावस्थेत होते.

नुरकान बायसाल, तुर्कस्थान : नुरकान यांच्यावर समाजात तेढ भडकवल्या प्रकरणात आरोप आहेत. वास्तविक नुरकान यांनी कोविड१९ संदर्भात तुर्की प्रशासनाच्या कारभारावर टीका केली होती. त्यांनी कैदेत असलेल्या आरोपींच्या परिस्थितीसंदर्भात वृत्त दिले होते.

इस्मेत सिगित, तुर्कस्थान : एसईएस कोकैली या वर्तमानपत्राचे संपादक असलेल्या इस्मेत यांना गेल्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या २ रुग्णांबाबत लिहिल्यामुळे तुरुंगवास ठोठावण्यात आला होता.

फारेस सायेध, जॉर्डन : रोया टीव्हीमध्ये काम करणार्या फारेस यांनी कोविड-१९च्या लागणीसंदर्भात अनेक वृत्ते दिली होती. त्यांनी अनेकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यावर सरकारने आक्षेप घेत त्यांना तुरुंगवास ठोठावला होता.

सोवान रिथी, कंबोडिया : सोवान टीव्हीएफही न्यूज वेबसाइटचे प्रमुख असलेल्या सोवान रिथी यांनी टॅक्सी चालकांच्या आर्थिक मदतीसंदर्भात पंतप्रधान हुन सेन यांनी मदत न केल्याचे एक वृत्त प्रसिद्ध केले होते. पण त्यांच्या वृत्तामुळे सरकारने त्यांच्यावर अराजकता फैलावल्याचा आरोप केला व त्यांना अटक केली. त्यांच्या वृत्तसंस्थेचा परवानाही सरकारने रद्द केला.

मारिया व्हिक्टोरिया बेलत्रॉन, फिलिपाइन्स : सेबु शहरात राहणार्या मारिया या लेखिका व अभिनेत्रीही असून त्यांनी सेबु शहरातल्या कोरोना विषाणूमुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर सोशल मीडियात भाष्य केले होते. त्यावर सरकारने त्यांच्यावर फेक न्यूजचा आरोप ठेवला.

चेन किऊशी, चीन : चेन हे पेशाने वकील, सामाजिक कार्यकर्ता, मुक्त पत्रकार असून हाँगकाँगमधील किउशीमध्ये झालेल्या जनआंदोलनाचे वृत्तांकन केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे वाईबोवरील अकाउंट बंद करण्यात आले. त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर वुहान शहरात त्यांनी डॉक्टर व नागरिकांच्या काही मुलाखती घेतल्या होत्या व ते वृत्त त्यांनी यूट्यूब, ट्विटरवर प्रसिद्ध केले होते. ६ जानेवारी २०२० पासून ते बेपत्ता आहेत.

ली जेहुआ, चीन : वुहानमध्ये आलेल्या कोरोना संकटाचे वृत्तांकन ली जेहुआ यांनी मुक्त पत्रकार म्हणून केले होते. ते २६ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. पण २२ एप्रिलला त्यांनी एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला त्यात आपण विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले. पण यावर संभ्रम आहे.

फेंग बिन, चीन : एक व्यावसायिक ते सिटीजन जर्नालिस्ट बनलेल्या फेंग यांनी २०२०च्या जानेवारीत वुहान शहरातील परिस्थितीवर काही बातम्या देण्यास सुरुवात केली होती. एका रुग्णालयाच्या आवारात काही बॅगांमध्ये मृतदेह ठेवल्याचा त्यांनी चित्रित केलेला एक व्हिडिओ जगभर चर्चिला गेला होता. २ फेब्रुवारीला पोलिसांनी त्यांचा लॅपटॉप जप्त केला. ९ फेब्रुवारीपासून ते बेपत्ता आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: