सबकुछ प्वाटिए, टू सर विथ लव्ह

सबकुछ प्वाटिए, टू सर विथ लव्ह

अभिनयातील प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले कृष्णवर्णिय अभिनेते सिडने प्वाटिए यांचे गेल्या आठवड्यात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ‘टू सर विथ लव्ह’, ‘इन द हीट ऑफ़ द नाइट’, ‘गेस हूज़ कमिंग टू डिनर’ यासारखे अप्रतिम चित्रपट त्यांनी दिले. त्यांच्या ‘टू सर विथ लव्ह’, या चित्रपटावर प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ३० मे १९७०च्या ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी...

निराळ्या पीएम-केअर फंडाची गरज काय?
‘लोकसत्ता’च्या संपादकांवर संमेलनात शाईफेक
सर्व जिल्ह्यांत ‘पुस्तकांचे गाव’

त्या माणसाकडे निळे डोळे नाहीत. भुरभुरते सोनेरी पिंगट केस नाहीत. धारदार नाक नाही. एखादी मुरड पडताच स्त्रीजातीचे भान हरपावे असे ओठ आणि जिवणी नाही. त्याला रूपच नाही. आणि तरीही जगातल्या सर्वांत मोठ्या चित्रनगरीत त्याच्यासाठी आज चित्रपट घेतले जातात. त्याच्या सोयीने कथानके शोधून त्या कथानकांवर त्याच्या भूमिकेला प्राधान्य देणाऱ्या पटकथा तयार केल्या जातात. सवडीने या पटकथांवर चित्रपट घडतात आणि केवळ त्याचे नाव आहे म्हणून हजारो प्रेक्षक विश्वासाने या चित्रपटांकडे धाव घेतात.

‘टु सर विथ लव्ह’ हा असा चित्रपट आहे. सिडने प्वाटिए या विलक्षण ताकदीच्या कृष्णवर्णिय नटासाठी हा चित्रपट घेतला आहे. या चित्रपटाच्या इंचाइंचात या कृष्णवर्णिय नटाचे तगडे, सभ्य, स्फोटक, हळुवार व्यक्तिमत्व भरले आहे. प्वाटिएभोवतीच एखाद्या गोफासारखा हा चित्रपट फिरत राहतो आणि त्याच्याशीच संपतो.

पूर्वी तुरुंगातून पळालेला गुन्हेगार, अमेरिकन गुप्त पोलीस खात्यातील अधिकारी, गोऱ्या तरुणीचा सुसंस्कृत नीग्रो प्रियकर, असल्या भूमिका केलेला प्वाटिए या चित्रपटात शिक्षक झाला आहे. लंडनच्या दरिद्री पूर्व भागातल्या एका शाळेत तो शिक्षक होतो. शिक्षकाचा त्याचा पेशा नाही. तो पत्करण्याची त्याची इच्छाही नाही. पेशाने तो इंजिनियर आहे. त्याच्या क्षेत्रात त्याला एखादी बरी नोकरी मिळेपर्यंत तात्पुरती चरितार्थासाठी तो मास्तरकी पत्करतो आणि अशा अडल्या माणसांना तात्पुरत्या नोकऱ्या देणाऱ्या शाळा जशा असाव्यात तशीच ही शाळा आहे. दरिद्रीवर्गातली किंवा इतर शाळांतून काढून टाकलेली मुलेच इथे शिकतात. शिकण्यासाठीमुळी बहुतेक मुले या शाळेत येतच नाहीत. ती येतात वेळ घालवण्यासाठी. त्यात ही शाळा मुलांमुलींची एकत्र आहे. वरच्या वर्गातून लग्नाच्या वयाच्या मुली आणि मिशी फुटलेले मुलगे दिसतात. त्यांचे खुशाल शिक्षकांसमोर एकमेकांशी प्रेमचाळे चालतात, इतकेच नव्हे तर सर्व मिळून एखाद्या शिक्षकाला आपल्या अनंत खोड्यांनी आणि उपद्व्यापांनी इतके सळो की पळो करून सोडतात की शाळा सोडून पळण्यापलीकडे त्या शिक्षकाला दुसरा पर्यायच उरत नाही.

असा एक शिक्षक पळतो.

त्याच्या जागी येतो तो सिडने प्वाटिए.

या नटाची एक गंमत आहे. त्याच्या अनेकविध परस्परविरूद्ध भूमिकांत तो आपल्या व्यक्तिमत्त्वात दृश्य स्वरूपाचा कोणताही बदल करीत नाही. असा बदल होऊही शकणार नाही इतके त्याचे व्यक्तिमत्त्वही ठसठशीत आहे. या चित्रपटात गुप्त पोलीस किंवा तुरुंग फोडून पळालेला गुन्हेगार सिडने प्वाटिए मास्तर बनतो तो केवळ त्याच्या समजदार अभिनयकौशल्याने. मास्तर म्हणून उगाच कोणत्याही लकबी न घेता, साधा, एकादा चष्माही डोळ्यांवर न ठेवता अगदी सहजी तो मास्तर होऊन आपल्यापुढे वावरतो, बोलतो आणि आपल्याला पटतो.

तो वर्गावर पहिल्या दिवशी जातो. समोर विद्यार्थी असणार ही त्याने केलेली कल्पना संपूर्ण चुकते. समोर बाकावर बुटाच्या तंगड्या रचलेले, च्युइंगम चघळणारे, एकमेकांना शिव्या घालणारे, वेडेवाकडे पोषाख केलेले आणि ‘आयला, हे कोण आलं आणखीन्’ म्हणून वाकून बघणारे काही तरुण स्त्री-पुरुष त्याला दिसतात. यांना शिकवायचे या कल्पनेनेच कुणाही शिक्षकाच्या तोंडचे पाणी पळावे. प्वाटिएसरांच्या तोंडचे पाणी सहजासहजी पळणे शक्य नसते. डोके बिनसू न देता, ते शिकण्याची तिळमात्र इच्छा नसलेल्या या चेहऱ्यांपुढे क्रमिक पुस्तकांतल्या विषयांची गीता कर्तव्यबुद्धीने वाचतात. परिणामी समोरच्या बाकांवर चालतो तो गोंधळ दिवसगतीने कमी होण्याऐवजी वाढतच जातो. हरप्रकारे या नव्या ‘काळे सरां’चा पाणउतारा त्यांचे गुंडपुंड आणि बंड विद्यार्थी करतात. सरांच्या शिकवण्यात पुस्तके एकमेकांवर फेकण्यापासून आणि जांभया देण्यापासून बाहेर जाताना वर्गाचे दार धडाडदिशी लावण्यापर्यंत आणि ते पुन्हा उघडून सॉरी सर म्हणण्यापर्यंत अनेक चमत्कारिक व्यत्यय आणणे, ते बूट खाड्खाड् वाजवीत शाळेच्या इमारतीत रुबाबात शिरत असता पाण्याने भरलेली प्लास्टिकची पिशवी वरून त्याच्या डोक्यावर बदाक्कन् आपटणे, वर्गात काहीतरी पेटवून देणे, असल्या अकल्पित आणि एकाहून एक भयंकर चाळ्यांनी या नव्या सरांनाही वाटेस लावण्याची वर्गाची जिद्द; पण काळेसर वेळोवेळी संताप गिळून संयमपूर्वक आपले अध्यापनाचे प्राप्त कर्तव्य करीत राहतात.

हा संयम एक दिवशी संपतो. पोरांनी (!) टेबलाचा एक पाय कापून तो होता तसा अल्लद लावून ठेवला आहे. सर येतात. अभ्यासाला सुरुवात करतात. टेबलावर सवयीप्रमाणे रेलतात आणि टेबलासकट प्लॅटफॉर्मवरून पोरांमध्ये कोसळून भुईसपाट होतात. पोरे पोट धरधरून हसताहेत. सर उठतात. टेबलाचा पद्धतशीर कापलेला पाय त्यांना दिसताच त्यांचा एवढ्या दिवसांचा ताणलेला संयम तुटण्याच्या घाईला येतो. तो लाकडी भक्कम पाया तसा हाती धरून समोरच्या हसणाऱ्या छद्मी चेहऱ्यांकडे पाहताना त्यांच्या मनातला क्रोध उफाळून उठतो आणि वाटते की या खुंटाने सर्वांना बडवून काढावे – खुंट मोडेपर्यंत !

सर वर्गातून निघून जातात. स्टाफ-रूममध्ये वारंवार दहा आकड़े मोजतात; पण क्रोध आवरत नाही. हेही कळते की, क्रोध उपयोगाचा नाही, विवेकाचीच गरज आहे. क्रोधाने प्रश्न सुटणार नाही, आणखीच चिघळेल. आत्मपरीक्षणाची गरज आहे. का असे घडते आहे ? त्यांच्या लक्षात येते, ही मुले पांढरपेशा नाहीत. ही सुस्थित कुटुंबातली आणि चाकोरीतून पुढे एखादा हुद्दा पकडून जगणारी मुले नाहीत. ही वेगळी आहेत. यांची आयुष्ये, वळणे वेगळी आहेत. सरांना एकदम उमगते की यानंतर आजपर्यंतच्या पद्धतीने जाऊन चालणार नाही, ही पद्धत चुकली. या मोठाड मुलांना क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणात कदापि रस वाटणे शक्य नाही. त्यांना गरज असलीच तर वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची आहे. हे शिक्षण क्रमिक पुस्तकात नाही. दुसऱ्या दिवशी सर वर्गावर जाऊन जवळची पुस्तके सर्वांसमोर कचऱ्याच्या टोपलीत शांतपणे टाकून घोषित करतात की आजपासून पुस्तके शिकवणे बंद ! तुम्ही आता लहान नाहीत. उद्या तुम्हीच उघड्या जगात जाऊन आपल्या बळावर जगणार आहा. अनेक प्रश्न तुमचे तुम्हाला तुमच्यापुरते सोडवावे लागणार आहेत. जगायचे कसे हा मुख्य प्रश्न. हा सोपा नाही. यात अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. रोजगार, संसार, मुले अशा अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. तुम्हाला हे जग काय आहे ते समजले पाहिजे. लैंगिक व्यवहार समजावून घेतला पाहिजे, त्याचे परिणाम आणि धोके कळले पाहिजेत.

‘पोरे’ चकित होतात. मास्तरांचे नवे रूप त्यांना धक्का देते. मास्तर सांगतात, तुम्हाला हे शिकले पाहिजे आणि फार लवकर हे सर्व शिकले पाहिजे. एरवी जगण्याच्या स्पर्धेत हराल, नामुष्की पदरी येईल, छीःथू होईल. आज वागता तसे विचार बंद ठेवून गुंडांसारखे वागलात तर कदाचित तुरुंग पाहावा लागेल. म्हणून लवकर शहाणे व्हा. मी तुम्हाला पुस्तकांऐवजी हे जगण्याचे शिक्षण देणार आहे. तुम्ही हे असे चित्रविचित्र कपडे घालता, वेड्यावाकड्या फॅशन्स करता, रीतीविरूद्धच नवनव्या गोष्टी शोधून त्या करता, याचा अर्थ काय ? जे आज आहे त्याविरूद्ध हे तुमचे बंड आहे. आहे ठाऊक? प्रस्थापिताविरूद्ध तुमचे बंड आहे…..

एकाहून एक मोठाड पोरे बिगारीच्या वर्गात असावीत तशी ‘आ’ वासतात.

काळेसर म्हणतात, पण हे तुम्हाला आहे का माहीत की जे आज तुम्ही करता ते सारे पूर्वी कुणीतरी केलेलेच आहे? तुमच्या आजच्या केशरचना, तुमचे कपडे, दोनचारशे वर्षांपूर्वीची माणसे त्या काळात करीत….

काळेसर वर्गाला एके दिवशी म्युझियममध्ये नेतात. तिथे प्रत्यक्षच साम्य दाखवितात. ऐतिहासिक मानवांचे पुतळे, चित्रे आणि ते पाहणारी वर्गातली आजची पोरे – दोहोत मजेशीर सारखेपणा. काळाची दरी बुडवून टाकणारी पुनरावृत्ती… नवे नवे नाही, जुने जुने नाही… सारे मिळून एक आवर्त आहे….. त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा…. तीच आवर्तने फिरून फिरून….

शिक्षणाच्या या नव्या पद्धतीने पोरे खूष होतात, पण शहाणी होतच नाहीत. शिस्त शिकत नाहीत. ते त्यांच्या रक्तातच नाही. सर्व प्रकारच्या शिस्तीचे त्यांना वृत्तीनेच वावडे आहे. मात्र, काळे सरांना या वर्गावर शिकवणे आता पूर्वीएवढे अवघड आणि क्लेषदायक राहात नाही.

एक बदलही घडतो. मुले आपला विक्षिप्त पोषाख आणि सवयी टाकून जरा ‘माणसा’त येतात. त्यांच्या ‘बंडा’ची धार किंचित् कमी होते – पण ती फक्त काळेसरांपुरतीच. पी.टी.च्या शिक्षकांशी त्याचा एकदा जोराचा खटका उडतो. वर्गातल्या एका लठ्ठ मुलाला हा शिक्षक इतर मुलांबरोबरीने न झेपणारी एक कसरत करायला लावतो आणि तो मुलगा पोटात वर्मी मार लागून कळवळतो. लोळतो. यासरशी इतर मुले खवळतात. त्यातला एक तेथल्या तेथे त्या शिक्षकाचे डोकेच फोडणार असतो- पण काळेसर तेवढ्यात धावत पोहोचतात. त्या मुलाला यापासून परावृत्त करतात. हिंसेने प्रश्न सुटत नाहीत हे समजावतात. मुले ‘सरां’चे ऐकतात. पण त्यांना यातले काही पटते असे नव्हे.

पण ‘सरां’ची बदली पी.टी.चे शिक्षक म्हणून केली जाते. वर्गातली आडदांड पोरे ही संधी घेऊन ‘सरां’ना मुष्टियुद्धाचे आव्हात देतात. ‘सरां’चे रक्त नीग्रो; आफ्रिकन. किती सुसंस्कृत झाले तरी आव्हान खाली पडू देणे या रक्तात नाही. मुष्टियुद्ध होते. ‘सर’ अपेक्षेनुसार आरंभी बराच मार खातात. पोरांना वाटते, या सरांमध्ये काहीच दम नाही, पण मग प्रतिस्पर्धी झालेल्या आणि हिंस्त्रपणे ‘सरां’वर तुटून पडणाऱ्या मुलाच्या पोटात ‘सर’ एकच गुद्दा नेमका ठेवतात. त्याने तो पार वाकडा तिकडा होऊन कोसळतो. पोरे चकित होतात. काहीशी वचकतात. ‘सर’च त्या मुलाला ‘दुरुस्त’ करतात आणि बजावतात, अंगबळ नेहमीच फायद्याचे ठरेल असे नाही. एखाद्यावेळी आपल्याहून उजवाही भेटतो. म्हणून विवेकाने घेतले पाहिजे.

पण ‘सरां’च्या, त्यांच्या इंजिनियरिंगच्या क्षेत्रातल्या एखाद्या चांगल्याशा नोकरीसाठी चाललेल्या खटपटीला एव्हाना यश येते आणि हा तात्पुरता पेशा सोडण्याची वेळ येते. ‘सर’ वर्गाच्या एका नृत्यसमारंभात तसे जाहीर करतात. मुले त्यांना मोठा ‘सेंडॉफ’ देण्याचा घाट घालतात आणि ‘काळेसरां’ना वर्गातर्फे एक भेट दिली जाते. ‘सर’ गहिवरतात. बंद शोभिवंत खोक्यातली ही भेट उघडण्यासाठी अश्रू लपवीत ते एका बाजूला – रिकाम्या वर्गात – जातात. ही भेट म्हणजे शालेय सामन्यात जिंकतात त्यांना देण्यात येतात तसाला चांदीचा मोठा चषक आहे. तो चषक ‘सरां’ना एकदम पुष्कळ काही सांगून जातो. तो चषक सुचवतो की मुलांनी तुला आपले मानलेच नाही, तू ‘सामन्या’त जिंकला आहेस एवढेच ती मान्य करीत आहेत. मुलांविरुद्धच्या सामन्यात? घडला तो सामना होता?

‘सामना’ जिंकण्यासाठी आपण ते सर्व केले? मग मुलांवर आपण काही संस्कार करतो आहोत असे मानले त्याचे काय झाले? ते सारे शेवटी व्यर्थच ! सगळा शेवटी सामनाच ? ‘सर’ विलक्षण अस्वस्थ होऊन जातात. तेवढ्यात एक मुलगा, एक मुलगी वर्गात झुकतात. आजपासून ‘सर’ त्यांचे सर नाहीत. दोघे ‘सरां’पाशी येऊन एकमेकांत म्हणतात, च्यायला, सुटलो. पुढच्या वर्षी ही पिडा नाही, चला. आणि निघून जातात. ‘सरां’ना हे मनस्वी झोंबते. पुन्हा एकदा आव्हान! आपण जे मनाशी ठरवले त्यात असे हरून इथून जायचे? सुसंस्कारांचा आपला सामना नामुष्कीने अर्धाच टाकून पळायचे ? पराभव पत्करायचा ? पराभव ?

‘सर’ शांतपणे उठतात. खिशातून नव्या, इंजिनिअरच्या नोकरीचे नियुक्तीपत्र काढतात. त्याचे फाडून चिटोरे-चिटोरे करतात. शांतपणे. एका निर्धाराने.

ते सामना अर्धा टाकणार नाहीत. ते तो पुरता लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी शिक्षकच राहाणार आहेत सुसंस्कार विरूद्ध माणसातल्या दुष्ट प्रवृत्ती असा सामना. विवेक विरुद्ध हिंसेचा सामना. संस्कृती विरुद्ध जंगलीपणाचा सामना. कधीच न संपणारा सामना.

असा हा ‘टु सर, विथ लव्ह’ एक जुना तरी चांगला विषय घेऊन एका मोठ्या नटाच्या गरजांना पुरा पडू पाहणारा चित्रपट. सब कुछ प्वाटिए. त्याच्यापासून तो चालू होतो, त्याच्याभोवतीच रुंजी घालतो आणि त्याच्याशीच संपतो. एका अर्थी हा चित्रपट त्याचा केंद्रबिंदू सोडून मागेपुढे सरकतच नाही, त्यामुळे प्वाटिए या गुणी नटाला पुष्कळ पाहिले हे या चित्रपटापासून मिळणारे प्रमुख समाधान आणि असमाधान. कारण वस्तुतः या चित्रपटाचा विषय अधिक मोलाचा आणि मूलभूत होता. तो या चित्रपटात काहीसा खुंटीसारखा वापरण्यात आला आहे, आणि त्यावर प्वाटिएची संपन्न गुणवत्ता निमित्तानिमित्ताने टांगण्यात आली आहे. या गुणवत्तेलाही न्याय मिळालेला नाही. विषयातल्या हाताळणीतल्या जुजबीपणामुळे आणि बेतलेपणामुळे ‘सरां’चे व्यक्तिमत्त्व एखादा अविस्मरणीय आकार घेतच नाही, ते देखील बेतलेले राहते. प्वाटिएच्या अभिनयगुणांचे जोहुकूम आणि तरीही विलक्षण सहज असे दर्शन काय ते सातत्याने घडत राहते आणि चित्रपट संपल्यावर आठवतात ते या मोठ्या नटाचे पूर्वीचे अनेक चित्रपट.

एकाच नटासाठी हा चित्रपट असला तरी त्यात बाजूचा नटवर्गदेखील तसा पारखूनच घेतलेला आहे. लंडनच्या गरीब भागातली शाळा, तिच्यातली मुले, शिक्षक यांचे चित्रण पुष्कळ पटते. आपल्याकडल्या या प्रकारच्या शाळांची, त्यातल्या वांड, आडदांड मुलांची आणि अडल्या शिक्षकांची आठवण ते पदोपदी देते. तुलनेने काही वेळा वास्तव वाटत नाहीत ते खुद्द प्वाटिए सर. त्यांच्यातला ‘हीरो’ पुन्हा पुन्हा डोकावतो-अभिनयात नव्हे, त्यांच्यासाठी बेतलेल्या घटनात. त्यांचा ‘सर’ आपल्याकडल्या हिंदी-मराठी चित्रपटांतून ‘हीरो’ जमातीला बेतून देण्यात येणाऱ्या प्रोफेसर, शिक्षक, इंजिनिअर, वैमानिक आदि तकलादू आणि जुजबी भूमिकांचे स्मरण अनेक जागी देतो. दोन-तीन गाणी आल्यामुळे हे स्मरण आणखीच बळावते. म्युझिअमला ‘सर’ मुलांसकट भेट देतात त्या प्रसंगीचे गाणे तर तद्दन ‘हिंदी’ सिच्युएशन निर्माण करते.

हे सारे असूनही हा चित्रपट अखेरपर्यंत बांधून ठेवतो. यातला श्रेयाचा सिंहाचा वाटा अर्थातच प्वाटिए याचाच. मोठ्या नटाच्या व्यक्तिमत्त्वातच एक अशी मोहिनी असते की तो नट समोर असेपर्यंत आपल्याला दुसरे काही सुचूच शकत नाही. हडसभडस बसका चेहरा, जाड ओठ, आखूड केस, काळा वर्ण, चिरेबंदी बांधा या साऱ्यानिशी प्वाटिए एकदा समोर आला की आपल्या मोजक्या अचूक स्फोटक अभिनयाने काही क्षणांतच अनेक ताण निर्माण करतो, आपल्यावर मंत्र टाकतो आणि मग काहीही आपण तास दीड तास पाहत राहतो. उदाहरणार्थ, हा चित्रपटच.

(३० मे १९७०च्या माणूसमधून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0