स्नूपगेट २०१३ :  ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी

स्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी

‘अंडरकव्हर’ या आपल्या नवीन पुस्तकामध्ये शोधपत्रकार आशिश खेतान यांनी २०१३ मध्ये त्यांनी उघडकीस आणलेल्या कुप्रसिद्ध स्नूपगेट स्टोरीबाबत सांगितले आहे.

‘निग्रह सोडला तर सगळं काही गमावलंय’
नागरिकत्व कायदा राबवणारच – गृहमंत्री
निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!

सप्टेंबर २०१३ मध्ये मी गुलैल नावाचे एक शोधपत्रकारिता करणारे न्यूज पोर्टल चालवत होतो, तेव्हा एका सूत्राने मला एक पेन ड्राईव्ह दिला. त्यामध्ये गुजरात सरकारचे गृहराज्य मंत्री अमित शहा – जे त्यावेळचे गृहमंत्री (आणि मुख्यमंत्री) नरेंद्र मोदी यांच्याबरोबर थेट काम करत होते – आणि गुजरातमधील उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्या दरम्यानच्या शेकडो मुद्रित दूरध्वनी संभाषणे होती.

मोदी यांचे सर्वात जवळचे राजकीय सहकारी आणि सध्या केंद्रात गृहमंत्री असलेले शहा हे २००३ पासून २०१० मध्ये सोहराबुद्दिन शेख यांच्या न्यायप्रक्रिया-बाह्य हत्येमध्ये त्यांना अटक होईपर्यंतची सात वर्षे गुजरातमध्ये गृहराज्य मंत्री होते. सिंघल हे डी. जी. वंजारा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या हिट-स्क्वॅडचे महत्त्वाचे सदस्य होते. या स्क्वॅडने अनेक मुस्लिमांना दहशतवादी म्हणून घोषित करून चकमकीत मारले होते.

पेन ड्राईव्हमधील मुद्रणे म्हणजे प्रशासनाच्या भयोन्मादी मोदी मॉडेलचे जवळून आणि अस्वस्थ करणारे दर्शन होते. या मॉडेलमध्ये प्रत्येकावर सतत नजर ठेवली जात होती. निवडक पोलिस अधिकाऱ्यांना एसआयबी, गुन्हे शाखा, कमिशनर कार्यालय आणि दहशतवादविरोधी पथकामध्ये (ATS) उच्च पदांवर नियुक्त करण्यात आलेले होते. या विशेष पोलिस पथकांना फोन संभाषण ऐकणे, हेरगिरीचे जाळे तयार करणे, संशयितांना पकडणे आणि चौकशी करणे अशा विशेष आधिकारिक क्षमता होत्या आणि त्यांना बराच पैसा (अनेकदा कोणत्याही ऑडिटशिवाय) आणि मनुष्यबळ उपलब्ध केले जात असे. कालांतराने हे अधिकारी स्वतःच कायदा बनत. ते अनेकदा त्यांच्या राजकीय मालकांची सेवा करताना मर्यादा ओलांडत – कायदेशीर आणि व्यावसायिक. वरिष्ठ नेत्यांना ते हवेच असत त्यामुळे मग त्यांना बढती दिली जाई, पुरस्कार मिळत आणि चौकशी आणि तपासांपासून त्यांचा बचाव केला जाई. त्यांना मिळालेल्या या संरक्षणामुळे कधीकधी हे वरिष्ठ पोलिस अधिकारी खंडणीचे रॅकेट चालवत आणि अनेक व्यावसायिक, बिल्डर, तसेच त्यांच्या आज्ञांचे पालन न करणाऱ्या त्यांच्याच सहकाऱ्यांनाही धमक्या देत (सोहराबुद्दिन प्रकरणातील सीबीआय आरोपपत्रांमध्ये याचे तपशील नोंदवलेले आहेत).

हे सगळे पद्धतशीरपणे केलेले होते. या सगळ्याचे धागेदोरे मुख्यमंत्र्यांपर्यंत कधीच जात नसत, फार तर कधीकधी ते शहांपर्यंत पोहोचत. मोदी, ज्यांना शहा ‘साहेब’ म्हणत, फारच क्वचित पोलिस अधिकाऱ्यांशी थेट बोलत. ते फक्त शहांशीच संवाद करत, ज्यांच्यामार्फत त्यांची सगळी सत्ता चालत असे.

सिंघल यांना फेब्रुवारी २०१३ मध्ये सीबीआयने अटक केली. मुंब्रा इथल्या १९ वर्षांची विद्यार्थिनी इशरत जहाँ हिला गुजरात पोलिसांनी चकमकीत मारले होते. तिच्या आईने त्याबाबत स्वतंत्र तपास व्हावा अशी याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर ही अटक झाली होती. सुरुवातीला इशरच्या हत्येचा तपास गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाकडे होता. नंतर गुजरात उच्च न्यायालयाने तो तपास सीबीआयकडे सोपवला. अटकेपूर्वी सहा महिने त्यांच्या किशोरवयीन मुलाने आत्महत्या केली होती. या दुःखाच्या काळात आपल्या कुटुंबाबरोबर राहू इच्छिणाऱ्या सिंघल यांनी तपासकर्त्यांबरोबर एक बोली केली असे त्या तपास पथकातील एका प्रमुख सदस्याने मला सांगितले. सिंघल यांनी २६७ मुद्रित दूरध्वनी संभाषणे सीबीआयकडे सोपवली ज्यामध्ये गुजरात पोलिसांचे तीन प्रमुख विभाग – एसआयबी, ज्याला सीआयडी असेही म्हणतात, गुन्हे शाखा आणि एटीएस – यांनी २००९ मध्ये एक महिन्याहून अधिक काळ एका विशीतल्या तरुणीचा पाठलाग केल्याचे उघड होत होते. सीबीआयने ९ जून २०१३ मध्ये हा पेन ड्राईव्ह ताब्यात मिळाल्याचा पंचनामा केला.

सिंघलने सीबीआयला सांगितले की हे विचित्र भासणारे पाळत ठेवण्याचे काम केवळ तोंडी सूचनांनुसार करण्यात आले होते आणि त्यासाठी कोणतीही कायदेशीर अधिकृत कागदपत्रे नव्हती. आणि शहा या दूरध्वनी संभाषणात ज्यांचा सतत साहेब म्हणून उल्लेख करत होते त्यांच्या मदतीने ही पाळत ठेवली जात होती. सिंघल यांनी ते आणि अमित शहा यांच्या जवळचे आणखी काहीजण ज्या जर्मन बनावटीच्या एनक्रिप्टेड सेल फोनचा वापर करत होते त्याबद्दलही सीबीआयला सांगितले. असे चार फोन खरेदी करण्यात आले होते आणि प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, जेणेकरून ते गुप्तपणे एकमेकांशी बोलू शकतील. ते बहुतेक वेळा खोट्या चकमकी दडपून टाकण्यासाठी कोणते कायदेशीर डावपेच वापरायचे याबद्दलच बोलत असत असे सिंघल यांनी सीबीआयला सांगितले.

सीबीआय सिंघल यांचा इशरत जहाँ आणि तीन मुस्लिम पुरुषांच्या न्यायबाह्य हत्यांमध्ये हात होता का याबाबत तपास करत होती. आणि त्या तरुणीवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणाबद्दलच्या टेपचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. खरे तर खोट्या चकमकी सोडा, कुठल्याच पोलिस केसशी त्यांचा काही संबंध नव्हता. पाळत ठेवण्याचे कारण अगदीच खाजगी होते असे सिंघल यांनी सीबीआयला सांगितले. ती तरुणी मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबातली आर्किटेक्ट होती. एक खाजगी व्यक्ती, जिच्यावर राज्याचे पैसे आणि मनुष्यबळ खर्च केले जात होते.

का?

त्या टेपमधून सिंघल यांना एवढेच दाखवायचे होते की चकमकीत मारणे असेल नाहीतर खाजगी व्यक्तीवर पाळत ठेवणे असेल, ते केवळ साखळीच्या सर्वात वरच्या लोकांच्या सूचनांबरहुकूम काम करत होते. सीबीआयला दिलेल्या त्यांच्या निवेदनात म्हटले आहे: ‘मी पुन्हा ही वस्तुस्थिती नमूद करू इच्छितो, की यापूर्वी मला कायद्याच्या प्रक्रियेत अडथळा येईल अशा विशिष्ट कामांमध्ये सहभागी होण्यास व मदत करण्यास जबरदस्ती करण्यात आली होती. हे काम बेकायदेशीर, अनैतिक आणि अयोग्य असले तरीही मी सूचनांचे पालन करण्याला नकार दिला नाही  कारण या प्रकरणामध्ये माझ्यावर संशयाची सुई होती आणि श्री. अमित शहा हे असे दाखवत होते की त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळेच मी आणि माझ्या हाताखालचे अधिकारी तुरुंगवासापासून बचावलो होतो.’ हे निवेदन सीबीआय आरोपपत्राचा भाग आहे, परंतु खटला चालूच न झाल्यामुळे कायदेशीररित्या त्याची अजून तपासणी झालेली नाही.

या टेप आणि माहितीच्या बदल्यात सीबीआयने अटकेनंतर नव्वद दिवसांच्या संवैधानिक मर्यादेपर्यंत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करू नये अशी सिंघल यांची इच्छा होती. तसे केल्यास ते जामीन मिळण्यास पात्र ठरले असते. सिंघल एजन्सीबरोबर सहकार्य करत होते त्यामुळे सीबीआयने आरोपपत्र ठेवण्यास मुद्दाम उशीर केला आणि मे २०१३ मध्ये त्यांना जामीन मिळाला.

या कथेतील अनेक सुटे धागेदोरे एकत्र करायला मला तीन महिने लागले. मी टेपमध्ये नमूद केलेल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यासाठी अहमदाबादला अनेक चकरा मारल्या. जिचा पाठलाग केला जात होता त्या महिलेची ओळख मला लागली. ती गुजरातमधील असली तरी अनेक वर्षे बंगलोरमध्ये काम करत होती. तिचा आता अहमदाबाद येथील एका व्यावसायिकाशी विवाह झाला असल्याचेही मला समजले. तिचे खाजगीपण जपण्यासाठी मी तिला ‘माधुरी’ हे टोपणनाव ठेवले.

ही बेकायदेशीर पाळत शहा यांच्या सूचनांनुसार जुलै २००९ मध्ये चालू झाली होती आणि बरेच आठवडे ठेवली जात होती असे सिंघल यांनी सीबीआयला सांगितले. ४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात सिंघल यांनी त्यांच्या शहांबरोबरच्या सेलफोनवरच्या संभाषणांचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले. कदाचित पुढे कधीतरी या टेपमुळे मिळणाऱ्या संरक्षणाची त्यांना गरज भासेल असे त्यांना वाटले असेल. त्यांनी जून २०१३ मध्ये सीबीआयसमोर गुन्ह्याशी स्वतःचा संबंध दर्शवणारी तीन निवेदने नोंदवली. आणि सीबीआयने २६७ दूरध्वनी मुद्रणांना ताब्यात घेताना दहा पानांचा पंचनामा तयार केला. ‘२००९ च्या दुसऱ्या सहामाहीत जेव्हा अहमदाबादमधील एटीएसमधील एसपी (पोलिस पर्यवेक्षक) म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा श्री. अमित शहा यांनी मला अनेक वेळा प्रदीप शर्मा यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. ते त्यावेळी भावनगरचे म्युनिसिपल कमिशनर होते. त्यांनी मला *** नावाच्या एका तरुण महिलेवर पाळत ठेवण्यासही सांगितले. मी अमित शहा यांनी सूचना दिल्यानुसार गुन्हे शाखेच्या काही लोकांना (एटीएसकडे हाताखालच्या कर्मचारीवर्गाची कमतरता होती) तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी ठेवले. ” सिंघल यांनी सीबीआयला सांगितले.

या टेपमध्ये असेही दिसून येत होते की एक महिनाभर गुजरात पोलिस आणि पाळत ठेवण्यासाठीची त्यांची सर्वात आधुनिक साधने माधुरीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने देखरेख ठेवण्यासाठीच्या रहस्यमय कामात वापरली गेली होती. ती कोणत्याही प्रकारे संशयित नव्हती आणि तरीही तिच्यावर इतकी पाळत ठेवली जात होती, हे नक्कीच कायद्याच्या विरोधात होते. तिची संभाषणे ऐकली जात होती, ती मॉलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा आईसक्रीम खायला गेली तरी त्यावर नजर ठेवली जात होती. जिममध्ये, सहलींना गेली असताना, चित्रपट पाहत असताना तिच्यावर लक्ष ठेवले जात होते. तिने विमानाने प्रवास केला असता किंवा ती हॉटेलमध्ये राहिली असता तिच्यावर पाळत ठेवली जात होती. ती एकदा अहमदाबादहून विमानाने इतरत्र गेली असता दोन पोलिसांना त्याच विमानाने प्रवास करण्याचा आदेश देण्यात आला होता. ती तिच्या आईला रुग्णालयात भेटायला गेली असताना गुजरात पोलिस तिथेही होते, तिच्या हालचालींवर आणि ती कुणाला भेटते यावर लक्ष ठेवत होते. जणू ती शीतयुद्धाच्या काळात पूर्व जर्मनीतली असंतुष्ट होती. हे सगळे विचित्र होते आणि कदाचित माधुरी कोणत्या पुरुषांना भेटते आणि हॉटेलमध्ये राहताना ती एकटी आहे की कुणा पुरुषाबरोबर यामध्ये शहा यांना जे स्वारस्य दिसून येत होते ते जास्त विचित्र होते. माधुरीचा फोन अर्थातच बेकायदेशीरपणे टॅप केला जात होता, पण तिचे कुटुंबीय आणि मित्रांचेही फोन टॅप केले जात होते. सिंघल यांच्या लोकांना जी काही माहिती मिळत होती ती लगेचच्या लगेच शहांकडे पोहोचवली जात होती, जे नंतर ती माहिती ‘साहेबां’पर्यंत पोहोचवत होते.

माधुरीवर पाळत ठेवणे या गोष्टीला इतके महत्त्व होते, की राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना स्वतः तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. सीबीआयला दिलेल्या टेप्सवर शहा सिंघलकडे ही तक्रार करताना ऐकू येत होते की त्यांचे लोक पुरेसे बारकाईने काम करत नाहीत कारण साहेबांना माधुरीच्या हालचालींबद्दल स्वतंत्र व्यक्तींकडून आणखी माहिती मिळत होती आणि त्यांचे माहिती मिळवण्याचे नेटवर्क कधीकधी शहांपेक्षा जास्त वेगवान होते.

गुलैलने अनिरुद्ध बहल या शोधपत्रकाराला ही स्टोरी प्रकाशित करण्यासाठी बरोबर घेतले. आम्ही त्याला “The Stalkers” असे शीर्षक दिले. माध्यमांनी त्याला स्नूपगेट म्हटले. आम्ही साप्ताहिक वार्तापत्राला बातमी प्रकाशित करण्यासाठी दिली. वार्तापत्राने ती कव्हर स्टोरी करण्याचे ठरवले. पण नोव्हेंबर २०१३ पर्यंत ओपिनियन पोल्समध्ये मोदी पुढचे पंतप्रधान होतील असे दिसू लागले होते. मालकांकडून दबाव आल्यामुळे या साप्ताहिकाने बातमी शेवटच्या मिनिटाला रद्द केली. बहल आणि मी स्टोरी प्रकाशात आणण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे ठरवले. कदाचित आम्ही आमची वेळ नीट निवडायला हवी होती, कारण आमच्या परिषदेच्या वेळी सचिन तेंडुलकर भारतासाठी त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळत होता. सचिन १४ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर फलंदाजीला उतरला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पुन्हा क्रीजवर आला तेव्हा ३८ धावांवर खेळत होता. जवळजवळ संपूर्ण देश पाहत होता, निवृत्त होण्यापूर्वी त्याचे अजून एक शतक व्हावे म्हणून प्रार्थना करत होता. सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असूनही टेलिव्हिजन न्यूज चॅनेल प्रत्येक चेंडूची बातमी देत होते. 

सचिनला देव मानणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या पिढीतलाच मीही आहे. मी लहान असताना प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तो लवकर बाद झाल्यानंतर इतका निराश होई की मला खावेसेही वाटत नसे. त्या दिवशी मात्र मी मनातल्या मनात सचिन लवकर बाद व्हावा अशी आशा करत होतो हे मला कबूल केले पाहिजे. त्याने शतक केले असते तर ते त्याचे एकशेएकावे शतक झाले असते आणि आमची बातमी कोसळली असती. त्या वेळी तेंडुलकर चौऱ्याहत्तरवर बाद झाला. दुपारी ३ वाजता नवी दिल्लीमधील प्रेस क्लबमध्ये आम्ही जमा झालेल्या प्रसारमाध्यमांना या टेप्सवर आम्हाला जे काही आढळले होते ते सांगितले. ही स्टोरी प्रत्येक वर्तमानपत्राच्या मुख्य पृष्ठावर होती आणि संध्याकाळच्या बातम्यांच्या डिबेट शोवर तिची (जोरजोरात, अर्थातच) चर्चा झाली.

(अंडरकव्हर: माय जर्नी इनटू द डार्कनेस ऑफ हिंदुत्व. लेखक आशिश खेतान. प्रकाशक वेस्टलँड/कॉंटेक्स्ट, जानेवारी २०२१ या पुस्तकातील लेखकाच्या परवानगीने घेतलेला काही भाग.)

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: