गोटाबाया राजपक्षे पळाले, श्रीलंकेत आणीबाणी

गोटाबाया राजपक्षे पळाले, श्रीलंकेत आणीबाणी

कोलंबोः देशावर आलेले आर्थिक अरिष्ट व त्यानंतर संतप्त जनतेचा उठाव पाहता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर मालदिवला पलायन केल्याचे

श्रीलंकेत आंदोलन चिघळले
अघोषित आणीबाणीची ७ वर्षे
१९७४ सालचे ‘आंदोलनजीवी’ नरेंद्र मोदी

कोलंबोः देशावर आलेले आर्थिक अरिष्ट व त्यानंतर संतप्त जनतेचा उठाव पाहता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर मालदिवला पलायन केल्याचे वृत्त आहे. भारताच्या मदतीने त्यांनी मालदिवला पलायन केल्याची काही वृत्ते पसरली होती. पण भारताने हा आरोप फेटाळला आहे.

दोन दिवसांपूर्वीही गोटाबाया राजपक्षे यांनी पलायनाचा प्रयत्न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या बंधुंनीही प्रयत्न केला होता पण कोलंबो विमानतळावरील इमिग्रेशन खात्याने यांना रोखले होते. पण बुधवारी गोटाबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर मोठ्या प्रमाणात जमावाने ‘गोटा चोर, गोटा चोर’ अशा घोषणा दिल्या. श्रीलंकेच्या राजकारणात कित्येक वर्षे अत्यंत शक्तिशाली म्हणून राजपक्षे घराण्याचे राज्य होते. आता जनतेच्या उठावामुळे सध्या गोटाबाया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केले आहे. पण त्यांचे बंधु व माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि अर्थमंत्री बसिल राजपक्षे अद्याप श्रीलंकेत असल्याचे बोलले जात आहे. बसिल हे श्रीलंकेतून पलायन करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण ते अमेरिकेचे नागरिक आहेत.

या दरम्यान बुधवारी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली असून देशाच्या पश्चिम प्रांतात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. रानील यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास संसदेच्या सभापतीकडे देशाची सूत्रे जाऊ शकतात. सध्या रानीलच राष्ट्रपती व पंतप्रधान अशा दोन पदांचा कारभार पाहात आहेत.

गेले ४ दिवस कोलंबोमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक व पोलिस यांच्यात चकमकी सुरू आहेत. मंगळवार व बुधवारपासून मोठ्या संख्येचा जमाव विक्रमसिंघे यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. काही लोक कार्यालयाच्या इमारतीवरही पोहचले होते. या जमावाला पांगवण्यासाठी सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहे. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशांतता असलेल्या ठिकाणी लष्करी हेलिकॉप्टरमधून टेहळणी केली जात आहे. जमावाला पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्रुधूर व लाठीमार पोलिसांना करावा लागला. तरी नागरिक हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: