अवकाशातून येणारे आगंतुक पाहुणे

अवकाशातून येणारे आगंतुक पाहुणे

उद्या १४ सप्टेंबर २०१९ला अजूनही एक अवकाशीय खडक आपल्या ग्रहाजवळून मार्गस्थ होणार आहे. हा खडक किंवा अश्मी सुमारे ६५० मीटर उंच आणि ३०० मीटर व्यासाची आहे जी २३,००० किलोमीटर प्रति ताशी इतक्या वेगाने प्रवास करत आहे.

चंद्रयान -२ : प्रेरणादायी मिशन
चीनचे यान चंद्रावर उतरले
खगोल मंडळात या – तुमच्यासाठी अवकाशाचे दरवाजे उघडतील

२८ ऑगस्ट २०१९ला दोन छोटे अवकाशीय पाहुणे पृथ्वी जवळून सूर्याकडे, पृथ्वीला कोणतीही इजा न करता, निघून गेले. आता उद्या १४ सप्टेंबर २०१९ला अजूनही एक अवकाशीय खडक आपल्या ग्रहाजवळून मार्गस्थ होणार आहे. हा खडक किंवा अशनी  सुमारे ६५० मीटर उंच आणि ३०० मीटर व्यासाची आहे जी २३,००० किलोमीटर प्रति ताशी इतक्या वेगाने प्रवास करत आहे.

आपण पाहतो आकाशात अनेक ग्रह, तारे व तारका विहरत असतात. त्यांची एक लयबद्ध हालचाल व आखून दिल्यासारखा एकाच मार्गावरून प्रवास सुरू असतो. त्यामुळे सहसा अवकाशात दोन ग्रह एकमेकांना आडवे जात नाहीत. तिथल्या साऱ्या घटकांचे परिक्षेत्र ठरलेले असते व कोणीही एकमेकांच्या वाट्याला जात नाहीत. पण या शांतीला बाधक काही घटक निश्चितच अवकाशात विहरत आहेत.

सृष्टीची उत्पत्ती व अशनीचा वावर

सृष्टी जन्मावेळी महास्फोटाच्या माध्यमातून अगणित ठिकऱ्या पूर्ण अवकाशभर पसरले आहेत व त्यातूनच ग्रह व चंद्रासारखे उपग्रह निर्माण झाले. पण काही घटक ग्रह किंवा उपग्रह बनण्याएवढे सक्षम नव्हते. असे ‘खडक’ कमी जाडीचे व व्याप्तीचे असल्याकारणाने त्यांच्यावर गुरुत्वाकर्षणाचे बल मोठ्या ग्रहांपेक्षा कमी प्रमाणात कार्यरत असते. अशा खडकांना अशनी  म्हणतात व यांचे वास्तव्य मंगळ व गुरु ग्रहांच्या मध्य अवकाशात असते. कधीकधी या दोन ग्रहांच्या भ्रमणकक्षेतून ते बाहेर पडतात व एका नवीन प्रवासाला सज्ज होतात. गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापासून ते कसे व का बाहेर पडतात हा अजूनही एक संशोधनाचा विषय आहे.

अशमींचा प्रवास

अवकाशीय खडक आपल्या मार्गाने जात असले तरी कधीकधी ते मोठ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणीय प्रभाव पट्ट्यात येतात व त्यांच्याकडे खेचले जातात. पृथ्वीच्या या बलाच्या प्रभावाखाली आल्यानंतर मात्र थोडे वेगळे घडते. आपल्या ग्रहावर वातावरण असल्याकारणाने अशनीचे छोटे तुकडे पडतात व वातावरणाशी घर्षण घडून ते जळून खाक होतात. असल्या जळणाऱ्या खडकांना आपण ‘शूटींग स्टार्स’, उल्का म्हणतो. आपले पूर्वज रात्री दिसणाऱ्या दिमाखदार प्रकाश वर्षावाने घाबरून, गोंधळून व दिपून जात असत. त्यांच्या मनात कुतूहलमिश्रित आश्चर्य घर करून राहत असे. नंतर त्यांनी जाणले की हे शूटिंग स्टार्स खऱ्या अर्थाने तारे नसतात.

ऍरिस्टोटल यांनी पहिल्यांदा या घटकांची तार्किक मीमांसा केली होती. मात्र रेनेसौच्या कालखंडात अवकाशातून येणाऱ्या खडकांबद्दल अनेक विचारवंतांच्या मनात फार मोठ्या प्रमाणावर शंका अस्तित्वात होत्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता की आकाशातून खडक पडतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफर्सन याना सुद्धा अशनी बद्दल साशंकता होती.

अशमींचा अभ्यास काय सांगतो?

अमेरिकेत जेव्हा लियोनिद वर्षाव झाला त्यावेळी या साऱ्या शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला. वैज्ञानिक पद्धतीने अवकाशीय खडकांचा अभ्यास करण्याचे एक महत्त्वपूर्ण पर्व या वर्षावानंतरच सुरू झाले. आज आपण उपग्रहांच्या मदतीने अवकाश पादाक्रांत केले आहे. पण त्याकाळी अवकाशीय जगताची माहिती याच खडकांच्या परीक्षणाच्या मदतीने होऊ शकत होती. त्यामुळे असे ‘अश्म’ भूशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अवकाशशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ अशांसाठी खूप मोलाचे ठरले होते. अशाच काही अश्मींच्या संशोधनातून विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी अतिशय उपयुक्त माहिती जमा झालेली आहे. आपल्या विश्वाची उत्पत्ती १४ अब्ज वर्षांपूर्वी झाली याची निश्चिती अवकाशीय खडकांच्या मदतीनेच करण्यात आलेली आहे.

अशनी कोणत्या प्रकारच्या असतात?

 अवकाशीय अश्म दोन प्रकारचे असतात- स्टोनी व लोह प्रकारचे. पहिल्या प्रकारात सिलिकेटचे प्रमाण जास्त असते तर दुसऱ्यात ९० टक्के फेरस, नऊ टक्के निकेल आणि उरलेला एक टक्का इतर रासायनिक घटक असतात. पण पृथ्वीवर आदळणाऱ्या अश्मित स्टोनी अशनीचे प्रमाण लोहाच्या तुलनेत फार जास्त असते.

सामान्य लोकं अशनी व पृथ्वीवर आधीच अस्तित्वात असणाऱ्या काळ्या खडकात गल्लत करू शकतात. बरेचदा काही चिकित्सक मंडळी फौंड्रीत वितळून टणक झालेला स्लाग घेऊन येतात व तो अवकाशीय अशनी असण्याचा दावा करतात. फौंड्रीतल्या स्लागमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे चुंबकाकडे ते लागलीच खेचले जातात. पण चुंबकाकडे आकर्षित होणे ही एकच कसोटी अशनी  ओळखले जाण्यासाठी अवलंबिली जात नसते. त्याच्या संरचनेकडे सुद्धा लक्ष दिले जाते. वातावरणातून खाली भूपृष्ठाकडे झेपावताना त्यांचे बाह्यांग जळत असल्याकारणाने त्यांच्या बाह्यांगाची फेररचना होत जाते. थंड झाल्यानंतर या खडकाच्या मूळ गाभ्यावर छोट्या खाचा व छिद्रे निर्माण होतात. दोरी सारख्या खुणा सुद्धा काही अश्नींवर उमटतात. वितळलेल्या स्वरूपातील अशनी वातावरणातील अनेक घटकांबरोबरच्या परस्परक्रियेमुळे रासायनिक व भौतिकदृष्ट्या पूर्णपणे बदलून जातात. त्यामुळे त्यांना ओळखणे तितकेसे सोपे नसते.

एका अंदाजानुसार पृथ्वीवर दरवर्षी ५०० अशनी  येऊन आदळत असतात. मात्र त्यातील फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच काही अशनी  आपल्या हाती लागतात. अशनी घात सजीवांसाठी फार घातक असतो. १९०८ साली उत्तर सैबेरियात अशनी घाताने १५० फूट परिघाचे विवर तयार झाले होते. त्याकाळी तिथे फार मोठे जंगल अस्तित्वात होते त्यामुळे फारशी मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाली नाही. तिथले जंगल मात्र फार मोठ्या प्रमाणावर जळून गेले होते. पण हा अस्मानी खडक जर त्याच अवकाशीय मार्गावरून ५ तासानंतर आला असता तर त्याचे लक्ष्य सेंट पीटरबोरो, ही त्याकाळची रशियाची राजधानी, ठरली असती. इथे अशनी घात झाला असता तर संपूर्ण शहरच बेचिराख झाले असते. एका अंदाजानुसार हा खडक सुमारे ४० हजार टन वजनाचा होता. सैबेरिया येथेच व्लाडिव्होस्टोक या ठिकाणी १९४७ साली आणखी एका अशनी चा आघात झाला होता.

ऐतिहासिक कालखंडात फार कमी अशनी घातांचा अनुभव आपल्या ग्रहाने घेतला आहे. इतिहासपूर्व काळात मात्र अनेक अवकाशीय खडक आपल्या भूस्तरावर येऊन विसावलेले आहेत. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आज पुसट झालेल्या आहेत किंवा पूर्णपणे पुसल्या गेलेल्या आहेत. याला कारण वारा, बर्फ व पाण्यावाटे घडून येणारे क्षरण. त्यातच अर्ध्यापेक्षा जास्त खडक महासागराच्या पाण्याखाली गायब झालेले आहेत.

महासागराखाली अशनी घाताच्या माराने अनेक विवरे तयार झाली असतीलही, पण त्यातले फक्त नोव्हा स्कोशीयाच्या किनारी, मोंटेनास येथे, ६० किमी रुंदीचे, सुमारे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले विवर शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. तरीही आजपर्यंत फक्त १२० जमिनीवरील विवरांचा योग्य वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास झालेला आहे. अनेक विवरांचा अभ्यास अजून व्हायचा आहे.

यांच्या अभ्यासाचा काही व्यावहारिक उपयोग आहे का?

तसे पाहायला गेले तर पृथ्वीच्या संपूर्ण इतिहासात हजारो-लाखो वेळा अशनी घाताची क्रिया पार पडलेली आहे. ते जेव्हा जमिनीवर आपटतात तेव्हा कहरच होतो. ध्वनीच्या ५० पट वेगाने सर्व दिशांना धूळ पसरते व भूस्तराचा खडक जळून बेचिराख होतो. या दोन्ही एकत्रित क्रियांचा परिणाम म्हणून तिथे कैक मैल रुंदीचा खड्डा तयार होतो. ही सारी क्रिया झाल्यानंतर मात्र सजीवसृष्टीला त्याचे भयावह परिणाम सोसावे लागतात. पर्यावरणीय बदलांचा प्रतिकूल परिणाम त्यांना कित्येक दशके व शतकांसाठी भोगावा लागतो.

अशनी घातामुळे काही प्राण्यांचा व वनस्पतींचा समूळ नाश होतो. काही सजीवांचे हे नष्टचक्र अशनी घातामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे झाले का हेही शोधून काढणे गरजेचे ठरते. त्याचबरोबर उत्क्रांतीच्या फेऱ्यात घडलेले कोणते बदल हे अशनी घातामुळे झालेले आहेत याचा वेध घेणेही महत्त्वपूर्ण ठरते. हवामानबदलाची व्याप्ती कशाप्रकारे एखाद्या प्रदेशात अशनी घातामुळे कमी किंवा वाढलेली आहे याचाही शोध घेणे अगत्याचे ठरते.

आपला देश चंद्र आणि मंगळावर चाल करून जात आहे. चंद्रयानने काहीच दिवसांपूर्वी चंद्राची छायाचित्रे पाठवलेली आहेत. त्या साऱ्या फोटोत चंद्रावर पदोपदी विवरांचा संचार आहे असे दर्शवतो. चंद्र व मंगळावरील विवरे अशनी घातातूनच निर्माण झालेली आहेत यात कोणतीच शंका नाही. तिथल्या व इथल्या विवरांवर कोणत्या प्रकारची समानता व असमानता आहे याचा शोध घेणे आपल्याला गरजेचे आहे. जर मानव मंगळावर व चंद्रावर वस्त्या वसविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे, तर अशनी घाताचा सविस्तर संशोधन ही काळाची गरज बनलेली आहे.

प्रवीण गवळी, हे भारतीय भूचुंबत्व संस्थेत वैज्ञानिक आहेत.

(लेखाचे चित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0