‘आध्यात्मिक शक्तीकडून चालवले जात होते एनएसई’

‘आध्यात्मिक शक्तीकडून चालवले जात होते एनएसई’

नवी दिल्लीः नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) माजी एमडी व सीईओ चित्रा रामकृष्ण एका अज्ञात योगीच्या प्रभावाखाली एनएसईचे अनेक वित्तीय निर्णय घेत असल्याच

चिरस्थायी विकास आणि भाजप-काँग्रेसचे जाहीरनामे
असहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये!
समीर वानखेडे यांची डीआरआयमध्ये बदली

नवी दिल्लीः नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) माजी एमडी व सीईओ चित्रा रामकृष्ण एका अज्ञात योगीच्या प्रभावाखाली एनएसईचे अनेक वित्तीय निर्णय घेत असल्याची माहिती सेबीच्या तपासातून उघडकीस आली आहे. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एमडी व सीईओ म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी त्यांच्या २० वर्षे ओळखीचे हिमालयात राहणारे एक योगी, ज्यांना चित्रा रामकृष्ण शिरोमणी म्हणत असतं, त्यांच्याकडून अनेक आर्थिक अडचणीवर वा धोरणांवर सल्ले घेत असत. हे योगी चित्रा रामकृष्ण यांना व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातही सल्ले देत असत.

चित्रा रामकृष्ण या योगींना एनएसईचे पाच वर्षांचे वित्तीय आकडे, कार्यकारी मंडळाच्या बैठकीतील अजेंडे, एनएसईचे अंदाज याबद्दल माहिती पुरवत होत्या. चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखाही या योगींकडे पाठवत होत्या व या कर्मचाऱ्यांच्या बढतीवर चर्चा करत होत्या, त्यांच्यांकडून सल्ले घेत होत्या, असे सेबीचे म्हणणे आहे. हे योगीच एनएसई चालवत होते, चित्रा त्यांच्या हातातल्या बाहुल्या होत्या असा आरोप सेबीचा आहे.

हे योगी नेमके कोण आहेत हे कुणालाच माहिती नाहीत पण ही एक हिमालयात राहणारी अध्यात्मिक शक्ती होती व ती स्वतःच्या इच्छेनुसार प्रकट होत होती, तिचे स्वतःचे असे भौतिक रुप नव्हते, अशी सेबीच्या तपासातून माहिती बाहेर आली आहे.

चित्रा यांची नवऱ्यावरही मेहेरबानी

एनएसईच्या सीईओच्या कार्यकाळात चित्रा सुब्रह्मण्यम यांनी आपले पती आनंद सुब्रह्मण्यम यांना एनएसईचे संचालक व स्वतःचे सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. हे आनंद सुब्रह्मण्यम या तथाकथित योगीचे निकटचे होते असेही सेबीचे म्हणणे आहे. २०१३मध्ये चित्रा यांचे सल्लागार म्हणून आनंद यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांचे वार्षिक वेतन १.६८ कोटी रु. इतके होते. त्यानंतर मार्च २०१४मध्ये चित्रा यांनी आपल्या पतीच्या वेतनात २० टक्क्यांची वाढ करत हे वेतन २.०१ कोटी रु. इतके केले होते. त्यानंतर पाच आठवड्यातच आनंद यांच्या वेतनात ते उत्तम काम करत असल्याचा हवाला देत १५ टक्क्यांची वाढ दिली व हे वेतन २.३१ कोटी रु. इतके केले. २०१५पर्यंत आनंद यांचे वेतन ५ कोटी रु. पर्यंत वाढवत नेले गेले. चित्रा यांनी आपल्या पतीला आनंद यांना स्वतःच्या जवळ एक केबिन देऊ केली होती. आनंद यांना प्रथम श्रेणीच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचीही सवलत देण्यात आली होती. आनंद यांच्यावर इतकी मेहेरबानी करण्याचे एक कारण योगींनी दिलेला सल्ला होता, असे सेबीचे म्हणणे आहे.

दरम्यान सेबीने आनंद सुब्रह्णण्यम यांच्या कथित नियुक्तीवरून चित्रा रामकृष्ण, रवी नारायण व अन्य काही जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून आर्थिक दंड लावला आहे. चित्रा सुब्रह्मण्मय यांच्यावर ३ कोटी रु., रवी नारायण व आनंद सुब्रह्ण्यम यांच्यावर प्रत्येकी २ कोटी रु., मुख्य नियामक अधिकारी वी. आर. नरसिम्हन यांच्यावर ६ लाख रु.चा दंड लावला आहे.

२०१६मध्ये चित्रा सुब्रह्मण्यम यांनी व्यक्तिगत कारणाचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी या प्रकरणाबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

२०१७मध्ये एनएसई स्वतःचा आयपीओ घेऊन बाजारात उतरणार होते पण त्या संदर्भातील मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती काही अधिकाऱ्यांकडून अगोदर फुटल्याने सेबीने एनएसईची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत एनएसईच्या कारभारातील त्रुटी आढळल्यानंतर त्यांना सुमारे ९० दशलक्ष डॉलरचा दंडही सेबीने ठोठावला होता. एनएसईने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

चित्रा सुब्रह्मण्यम यांचे काही गोपनीय इमेल सेबीला मिळाले. हे इमेल योगींना केलेले दिसून आले. त्या संदर्भात चित्रा यांचा खुलासाही सेबीने मागितला होता. त्यावर एखाद्या आध्यात्मिक शक्तीला माहिती पुरवणे हा गोपनीयेता भंग होत नाही, असे उत्तर चित्रा यांनी सेबीला दिले होते.         

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: