जम्मू-काश्मीर: पीएम केअर फंडातील १६५ व्हेंटिलेटर खराब

जम्मू-काश्मीर: पीएम केअर फंडातील १६५ व्हेंटिलेटर खराब

तीन कंपन्यांनी पीएम केअर फंडातून श्रीनगरमधील श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयाला १६५ व्हेंटिलेटर पुरविले होते, त्यापैकी एकही काम करत नाही. या तीनपैकी दोन कंपन्यांच्या व्हेंटिलेटरच्या दर्जाबाबत यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या केंद्रशासित प्रदेशातून या व्हेंटिलेटरची कोणतीही मागणी नसतानाही, हे पुरविण्यात आले आहेत.

अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध
हरीयाणामध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार
उद्योगांचाही कोव्हिडविषयक टास्क फोर्स

नवी दिल्ली: वादग्रस्त पीएम केअर फंडाअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये गडबड झाल्याचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयाला(एसएमएचएस) पीएम केअर फंडातून १६५ व्हेंटिलेटर देण्यात आले होते, परंतु ते सर्व खराब असल्याचे आढळून आले आहे.

माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की या व्हेंटिलेटरची चाचणी केली असता ते योग्य नसल्याचे आढळून आले, परिणामी त्याचा रुग्णांना फायदा झालेला नाही.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने या व्हेंटिलेटरची कोणतीही मागणी केलेली नव्हती.

जम्मू-स्थित कार्यकर्ते बलविंदर सिंग यांनी आरटीआय कायद्यांतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, रुग्णालयाने सांगितले, की यापैकी बहुतेक उपकरणे ‘आवश्यक मानकांची (स्टँडर्ड) पूर्तता करत नाहीत’ आणि हे व्हेंटिलेटर अचानक बंद पडत आहेत, ज्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सिंग यांनी ‘द वायर’ला सांगितले, की त्यांना अनेक डॉक्टरांकडून माहिती मिळाली होती, की ‘हे व्हेंटिलेटर काही उपयोगाचे नाहीत’. मात्र, रुग्णालयातील लोक त्यांना या दाव्याचा पुरावा देऊ शकले नाहीत, त्यानंतर त्यांनी याची खातरजमा करण्यासाठी आरटीआय अर्ज दाखल केला.

श्वासोच्छवासासाठी आवश्यक असणारे हवेचे प्रमाण फुफ्फुसांमध्ये सोडू शकत नाही, असे व्हेंटिलेटर योग्य मानले जात नाहीत.

सिंग यांनी २०२० साली अनेक आरटीआय अर्ज दाखल केले, परंतु त्यांना पहिल्या अपीलानंतरच उत्तर मिळाले. सिंग यांना दिलेल्या उत्तरात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), श्रीनगर येथील भूलशास्त्र आणि क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख यांनी, डॉक्टरांनी सांगितलेल्या दाव्याचीच खात्री केली आहे.

श्रीनगरमधील हॉस्पिटलला भारत व्हेंटिलेटरकडून ३७ युनिट्स, ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडकडून १२५ युनिट्स आणि एजीव्हीए(AgVa) व्हेंटिलेटरकडून तीन युनिट्स मिळाले होते. ते सर्व  खराब निघाले.

ज्योती सीएनसीला ५००० व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १२१ कोटी रुपये मिळाले. तसेच एजीव्हीए कंपनीला प्रति व्हेंटिलेटर १.८ लाख रुपये मिळाले. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे निर्मित भारत व्हेंटिलेटरला ३०,००० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी पीएम केअर्स फंडातून १ हजार ५१३.९२ कोटी रुपये मिळाले.

या आधारावर अंदाज लावला, तर खराब निघालेल्या १६५ व्हेंटिलेटरची एकूण किंमत ३०४.४ कोटी रुपये होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पीएम केअर्स फंडाच्या एवढ्या पैशांचा जनतेसाठी काहीही उपयोग झालेला नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलशास्त्र विभागाला एसएमएचएस रुग्णालयाकडून ३७ व्हेंटिलेटर मिळाले होते, परंतु विभागाने तपासणी केली असता, ती सर्वच नादुरुस्त असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी एसएमएचएस हॉस्पिटलला ते परत केले.

ज्योती सीएनसी आणि एजीव्हीए कंपनीचे व्हेंटिलेटर वादग्रस्त ठरले आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुजरातच्या ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीला कोविड-१९ उपचारांसाठी व्हेंटिलेटर वितरीत करण्यास मान्यता दिली नव्हती.

गेल्या वर्षी मे महिन्यात, ज्योती सीएमसी ऑटोमेशनचे ‘धमन-१’ व्हेंटिलेटर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक जे.व्ही.मोदी यांनी राज्य सरकारच्या वैद्यकीय सेवा विभागाला पत्र लिहिले होते, की हे व्हेंटिलेटर ‘इच्छित परिणाम देण्यास सक्षम नाहीत.’

गुजरात सरकारच्याद्वारे ज्या कंपनीने (ज्योती सीएमसी ऑटोमेशन) ‘दहा दिवसांत’ कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बनवण्याचा दावा केला होता, त्याबद्दल राज्यातील डॉक्टरांनी ही व्हेंटिलेटर मानकांची पूर्तता करत नसल्याचे सांगितले होते. ‘द वायर’ने त्यावेळी एक खास वृत्तांत करून सांगितले होते, की त्या कंपनीचे प्रवर्तक, हे त्याच उद्योगपती कुटुंबातील आहेत, ज्यांनी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे नाव लिहिलेला सूट भेट दिला होता.

या व्हेंटिलेटर बनवणाऱ्या कंपनीचे प्रवर्तक भाजप नेत्यांच्या जवळचे असल्याचेही वृत्तांतात सांगितले होते.

‘ एजीव्हीए’ ही एक अशी कंपनी आहे, की ज्यांनी यांपूर्वी कधीही व्हेंटिलेटर बनवले नव्हते, परंतु असे असूनही, पीएम केअर्स फंडातून त्या कंपनीला १०,००० व्हेंटिलेटर पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या तांत्रिक समितीने व्हेंटिलेटरचे मूल्यांकन करण्यापूर्वीच हे करण्यात आले होते.

असे प्रकरण पहिल्यांदाच समोर आलेले नाही. यापूर्वी मे २०२१ मध्ये औरंगाबाद मेडिकल कॉलेजने ज्योती सीएनसीच्या १५० ‘धमन’ व्हेंटिलेटरपैकी ५८ खराब निघाल्याचे सांगितले होते.

तसेच जून २०२१  मध्ये, न्यू इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते, की पीएम केअर फंडातील ५,५०० व्हेंटिलेटर आरोग्य मंत्रालयाच्या गोदामात धूळ खात पडून आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0