फुलपाखरांच्या स्थलांतरातील स्थैर्य !

फुलपाखरांच्या स्थलांतरातील स्थैर्य !

फुलपाखरे इतका मोठा प्रवास करून इथे पोहोचतात तेव्हा त्यांना माहीत असतं की आपण जिथे जन्मलो तिथे परत जाणार नाही, आणि हे ही पक्कं ठाऊक असतं की पुढची पिढी हा परतीचा प्रवास नक्की करेल. हा त्यांच्या पिढ्यांमधला साधला गेलेला समतोल त्याच्या अस्तित्वाला एक स्थैर्य देऊन जातो!

नोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक – ईशान्येत भडका उडाला
भारतीय चित्रपट विश्वाचे वासे फिरले

जंगल असो, खळाळत वाहणारी नदी असो, एक उजाड माळरान असो किंवा वरून शांत वाटणारा अथांग समुद्र असो, या प्रत्येक परिसंस्थेची स्वतःची अशी एक विलक्षण जडण-घडण असते. त्यामध्ये सामावलेल्या छोट्यातल्या छोट्या भक्ष्यापासून ते मोठ्या भक्षकापर्यंत प्रत्येक जीव त्या परिसंस्थेतील स्थैर्य राखून ठेवायची जबाबदारी लीलया पेलत असतो. स्थैर्य! निसर्ग असो किंवा मनुष्य, दोघांसाठीही “स्थैर्य” हा त्यांच्या जगण्याचा, वाढीचा आणि उत्क्रांतीचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. या लॉकडाऊनच्या काळात याची प्रचिती आपणा सर्वांनाच फार जवळून आली असेल. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा एक स्थैर्य होतं हे आपल्याला तेव्हा जाणवलं जेव्हा हे सुरळीत चाललेलं रहाटगाडगं कोविड-१९च्या एका तडाख्यात पूर्ण ठप्प झालं. आपल्या आयुष्यातली धावपळ सुद्धा आपल्याला इतकी हवीहवीशी होती हे तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवलं. त्याक्षणी एक विचार मनात अनाहूतपणे डोकावून गेला,

‘निसर्गातल्या प्रत्येक जीवाचा जीवनक्रम आणि आपलं आयुष्य हे दोन समांतर रेषांवर धावत आहेत. पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक जीवाचे फक्त एकच उद्दिष्ट्य असते, ‘survival’! आणि त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची तयारी सुद्धा असावी लागते. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक प्राणी जगण्यासाठी रोज वेगवेगळ्या आव्हानांना समोर जात असतो आणि त्यातूनच तो निसर्गाच्या परिसंस्थेत आणि स्वतःच्या जीवनक्रमात एक स्थैर्य निर्माण करतो. आपण सगळेच जण या कोविड-१९च्या आव्हानाशी दोन हात करता करता आपल्या आयुष्यातले स्थैर्य गमावून बसलो आहोत. कदाचित जर नीट जवळून पाहिलं तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आणि आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ दोन्ही या निसर्गात घडणाऱ्या अद्भुत घटनांकडूनच मिळेल! आणि या विचाराबरोबरच सुरू झाला माझा प्रवास – निसर्गात अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहायचा !

असं म्हणतात कि शांततेचा पण एक आवाज असतो. आणि हाच आवाज मी जंगलामध्ये, निसर्गाच्या कुशीत खूप जवळून अनुभवलाय. या आवाजामध्ये सुद्धा एक लय आहे, प्रत्येक आवाजाची एक ठेवणं आहे, आणि त्याबरोबर गुंफली जाणारी एक वेगळी कहाणी आहे! अगदी असंख्य पक्ष्यांच्या गोड किलबिलाटापासून ते दिवस ऐकू येणाऱ्या सिकाडाच्या (cicada) कर्कश गोंगाटापर्यंत सगळे आवाज आपल्याशी गप्पा मारतात. पण मला कायम लक्षात राहिलेला संवाद मी साधला होता माझ्या फुलपाखरांशी! तिथे मी पहिल्यांदा अनुभवलं …. “फुलपाखरांच्या स्थलांतरातलं स्थैर्य ” !

प्राणी जगतात असे असंख्य प्राणी आहेत जे स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न सारखा पक्षी तर चक्क एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत ४०,००० कि.मी.चा प्रवास दरवर्षी करतो. विल्डरबीस्ट (Wildebeest), झेब्रा यांच्या आफ्रिकेतल्या स्थलांतराचा प्रवास तर अगदी नाट्यमय असतो. अगदी ३६,००० किलोचा देवमासा (Humpback Whale) सुद्धा ८००० कि.मी.चा प्रवास न थांबता, न थकता, न खाता-पिता पार करतो. पण हे सगळं का? कशासाठी? काही अन्नाच्या शोधात, काही मुलांना वाढवण्यासाठी घराच्या शोधात तर काही जगण्यासाठी योग्य वातावरणाच्या शोधात, त्यांच्यामधला सोशिकपणा वाढवत हा प्रवास करतात. मग या सोशिकपणाच्या शर्यतीत माझी फुलपाखरे तरी मागे कशी राहतील?

‘The Great Monarch Migration’ ही अशीच सगळ्या शास्त्रज्ञांना कोड्यात टाकणारी घटना आहे. या स्थलांतराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘Multigenerational relay’ अर्थात – पिढ्यांमागून होणार पिढ्यांचा प्रवास ! मोनार्क फुलपाखरे (Danaus plexippus) कॅनडा ते मेक्सिको हा ४८,००० कि.मी.चा प्रवास थंडीपासून वाचण्यासाठी सुरू करतात. जेव्हा वसंत ऋतु सुरू होतो तेव्हा त्यांचा परतीचा प्रवास चालू होतो. पण परत पोचते ती त्यांची चौथी किंवा पाचवी पिढी! या नवीन पिढीला कसं कळतं आपल्याला कुठे जायचंय ते? पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड (चुंबकीय दिशा) आणि सूर्याची दिशा वाचत वाचत ते परत पोहोचतात. सगळंच अजब, नाही का !

आपल्या देशात, दक्षिण भारतात सुद्धा फुलपाखरांचे स्थानिक स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. ‘The Milkweed Butterfly Migration’ या नावाने ते ओळखले जाते. मिल्कवीड फुलपाखरे म्हणजे त्या जातीची फुलपाखरे ज्यांच्या अळ्या पांढऱ्या चीक असणाऱ्या झाडांवर वाढतात, जसे की रुई, कण्हेर, हरणदौड, हळदी-कुंकू  (Family – Asclepiadaceae) या मुळेच ही फुलपाखरे सुद्धा भक्ष्य बनण्यापासून वाचतात. भारतात या मिल्कवीड फुलपाखरांच्या अनेक जाती आहेत. Blue tiger (Tirumala limniace), Striped tiger (Danaus genutia), Common crow (Euploea core) ह्या त्यापैकी काही सामान्य जाती ज्या प्रामुख्याने स्थलांतर करतात. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरच्या मध्ये ही फुलपाखरे पूर्वेकडून (Eastern Ghats) पश्चिम घाटाकडे येतात (Post -Monsoon Migration). आल्यावर काही आठवड्यांनंतर प्रजनन सुरू करतात आणि मग पुढच्या वर्षीच्या एप्रिल – जून दरम्यान ही पुढची पिढी पश्चिम घाटात पाऊस पोचायच्या आत परतीचा प्रवास सुरू करते, पूर्वेच्या दिशेने (Pre – Monsoon Migration). पिढ्या-पिढ्यांचा हा प्रवास असाच अखंड सुरू आहे.

ही अद्भुत घटना अनुभवण्यासाठी मी चिपळूणला गेले होते. माझ्या चिपळूणच्या मित्राने खबर दिली की फुलपाखरे आली आहेत, पटकन ये! मग काय, बॅग घेतली आणि पळत सुटले. तो अनुभव, ते दृश्य, मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही… अगदी प्रत्येक पावलागणिक हजारो फुलपाखरांचा थवा माझ्या आजूबाजूला अगदी धिंगाणा घालत होता. आणि त्या निरव शांततेत ऐकू येणारी त्या नाजूक पंखांची फडफड माझ्या मनात खोल शिरून मला शांत करत होती. जेव्हा ही फुलपाखरे इतका मोठा प्रवास करून इथे पोहोचतात तेव्हा त्यांना माहीत असतं की आपण जिथे जन्मलो तिथे परत जाणार नाही, आणि हे ही पक्कं ठाऊक असतं की पुढची पिढी हा परतीचा प्रवास नक्की करेल. हा त्यांच्या पिढ्यांमधला साधला गेलेला समतोल त्याच्या अस्तित्वाला एक स्थैर्य देऊन जातो!

फुलपाखरू हा एक अतिशय नाजूक कीटक आहे. वातावरणीय बदलांमुळे मागे पुढे होणारे ऋतू त्यांच्यावर खूप जवळून परिणाम करतात. तरी त्यांचे स्थलांतर थांबलेले नाही. येणाऱ्या पावसाचा माग घेऊन ते त्यांचे स्थलांतर सुरू करत आहेत. म्हणूनच फुलपाखरांना “Indicator Species” (सूचक जाती) मानले जाते.

फुलपाखरांसारख्या छोट्या जीवाला जर हे जमतं तर आपल्याला जमायला काय हरकत आहे? मला माझ्या आयुष्यात काय मिळालं या पेक्षाही आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय मागे ठेवतोय हे माणूस म्हणून स्थैर्य यायला जास्त महत्त्वाचे आहे, नाही का? विचार खोल आहे, पण ठरवलं तर नक्की जमेल. शेवटी यालाच तर म्हणतात “Sustainable Living “.

भारतात सप्टेंबरचा महिना “The Big Butterfly Month” म्हणून साजरा केला जातो. या मधील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकला भेट द्या. (http://diversityindia.org/bbm/)

NatureNotes

सोहिनी वंजारी, या गेली १५ वर्षे फुलपाखरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी ‘बटरफ्लाय जेनेटिक्स’ या विषयात केम्ब्रिज विद्यापीठातून एम.फील. केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0