राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू

राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्

एनएसडीपुढे उभा ‘भूमिके’चा प्रश्न
तळकोकणातले दशावतारी
देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहीलः अजित पवार

मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी केली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या हीरक महोत्सवी व देशाच्या अमृत महोत्सवी तसेच स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढविण्यात येत आहे. त्यामुळे राज्याबाहेरील व देशाबाहेरील मराठी रंगकर्मींना या स्पर्धेचा लाभ घेता येईल यामुळे मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होईल,असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

देशमुख म्हणाले, की दरवर्षी या स्पर्धांमधून जवळजवळ एक हजार संघ सहभागी होतात. या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास २० हजार कलाकार २० लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मी, संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरून, कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी हौशी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, दिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असेही अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0