आशांसाठी दाही दिशा…

आशांसाठी दाही दिशा…

कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये यावर्षी खास पाहुणा देश म्हणून रशियाला निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये रशियातील पुस्तकांचे दालन असून, त्यामध्ये विविध भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आलेली रशियन पुस्तके ठेवण्यात आली आहेत. रशियाचे उच्चायुक्त, राजदूत आणि समकालीन लेखकही उपस्थित आहेत. या प्रदर्शनामध्ये आन्द्रेई गेलासिमव या प्रसिद्ध रशियन लेखकाच्या पाच कथांचं अनघा भट यांनी अनुवाद केलेलं ‘तहान’ हे पुस्तक प्रकशित होत आहे.

‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार
मिथकीय हिंसेचे रचनाशास्त्र

रशिया म्हटल्यावर सहसा डोक्यात येतं ते सोव्हिएत संघ आणि अमेरिकेचं वर्षानुवर्षं चाललेलं शीतयुद्ध आणि अखेर सोव्हिएत संघाचं झालेलं विघटन. विसाव्या शतकातच्या अखेरीस घडलेल्या या घटनेने जगाचा भूगोलच नाही, तर भविष्यही बदललं. या उलाढालीचं अनेक अंगांनी केलेलं विश्लेषण अगदी सहज उपलब्ध आहे. पण सामान्य माणसांची त्यावेळची अवस्था काय होती? या अतर्क्य परिस्थितीत त्यांना कशाकशाला सामोरं जावं लागलं? तिथल्या थोरामोठ्यांनी, स्त्रीपुरुषांनी आजूबाजूला अचानक आणि झपाट्याने घडलेले एवढे मोठे बदल कसे स्वीकारले? त्यांचं जग भूगोलासोबत कसं बदललं? याबद्दल फारसं काही वाचनात-बघण्यात येत नाही. या अतिशय गुंतागुंतीच्या, असंख्य कंगोरे असलेल्या आणि तरीही आशावादी अशा त्यांच्या भावविश्वाचं दार ‘तहान’च्या निमिताने किलकिलं होतंय. आन्द्रेई गेलासिमव या प्रसिद्ध रशियन लेखकाच्या पाच कथांचं अनघा भट यांनी केलेलं हे भाषांतर.

या कथांमधल्या भावभावनांच्या कोलाहलाचं अतिशय समर्पक प्रतिबिंब म्हणजे पुस्तकाचं मुखपृष्ठ. तत्कालीन रशियातलं अंधारं, कोंदट, गडद वातावरण आणि भकास रिकामंपण या चित्रातून पुरेपूर पोचतं. ‘तहान’, हे शीर्षक अडखळत्या अक्षरात लिहून पुढे ओढलेला फराटा जणू दिशाहीन भविष्याचं प्रतिकच दाखवतो. तशीच पुस्तकाची प्रस्तावना. अनघा भट या प्रस्तावनेत या पाचही कथा समजून घेण्याची चौकट नेमकी आखून देतात. सोव्हिएत संघाचं विघटन, नंतरचं चेचेन युद्ध या पार्श्वभूमीवरच्या या कथांमधल्या पात्रांशी तोंडओळख करून देतानाच त्यांच्यात काय शोधायचं हेही वाचकाला सांगून जातात आणि तेही प्रत्येक कथेमधल्या धक्कातंत्राला अजिबात धक्का न लागू देता.

'तहान' आणि अनुवादक अनघा भट

पुस्तक प्रदर्शनामध्ये ‘तहान’ आणि अनुवादक अनघा भट

पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपल्या आणि तिथल्या समाजातला फरक. आपल्या समाजाचा पाया असलेली कुटुंबव्यवस्था, तिथे तुलनेने मोडकळीला आलेली आहे. तशात पुन्हा त्यावेळी देशात माजलेल्या अनागोंदीचा परिणाम म्हणून पारच ढेपाळलेली. त्यामुळे या पाचही कथांचे नायक कमीअधिक प्रमाणात ‘आईबापांनी टाकलेले’च आहेत. पुढे जाण्यासाठी ना दिशा, ना आशा, ना मार्ग, ना वाटाड्या अशा विचित्र कोंडीत सापडलेले, भांबावलेले, चाचपडणारे. हिंसा इतकी रोजची आहे त्यांच्यासाठी, की त्याबद्दल अगदी सहजपणे व्यक्त होतात. घरात खायला अन्न नसणं ते आपल्या प्रिय व्यक्तीचं मरून जाणं, इतका पट अतिशय बेफिकीरीने आपल्यासमोर मांडतात. त्यावेळी घडलेल्या गोष्टी, त्यांच्याशी निगडीत असलेल्या आठवणी, त्याचवेळी मनात आलेले स्पष्ट-अस्पष्ट विचार, भास हळूहळू वाचकासमोर उलगडत जातात. काळाच्या पडद्यावर सतत मागे-पुढे घेऊन जाताना त्यावेळच्या पार्श्वभूमीशी मात्र घट्ट जोडून ठेवतात. माणूस, माणुसकी, राजकारण, समाजातली उतरंड, युद्धं, हिंसेचं सामान्यीकरण अशा अनेकानेक गोष्टींवर पुन्हा पुन्हा आपल्याला निर्विकार प्रश्न विचारतात. तीस वर्षानंतरही.

‘कौटुंबिक प्रसंग’, या पहिल्या कथेचा नायक अलिक्सांदर. एका मुलीचा बाप. कथा सुरू होते ती त्याचे वडील वारल्याच्या बातमीने आणि अलिक्सांदरच्या असंख्य आठवणींचं गाठोडं उघडतं. लहानपणी आईबाबांसोबतच्या सुखद आठवणी, अचानक एक दिवस आई गायब झाल्यावर वडिलांना बसलेला मानसिक धक्का आणि त्यातून उभे राहिलेले थरकाप उडवणारे प्रसंग आणि त्यामुळे वडिलांची त्याच्या मनातली बदलत गेलेली प्रतिमा. या कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रेडिओवरच्या बातम्यांचा उल्लेख येतो. अगदी सहज वाटणारी, पण अतिशय विचारपूर्वक केलेली राजकीय-सामाजिक टिप्पणी आहे ही! सामान्य माणूस आणि राजधानीत बसलेले राज्यकर्ते यांच्यातला अंगावर येणारा विसंवाद.

कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये अनुवादक अनघा भट, लेखक आन्द्रेई गेलासिमव आणि लेखकाची पत्नी.

कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये अनुवादक अनघा भट, लेखक आन्द्रेई गेलासिमव आणि लेखकाची पत्नी.

‘कोवळे वय’, ही एका छोट्या मुलाच्या डायरीची गोष्ट. आईवडिलांची सततची भांडणं, आपला वर्गमित्र समलैंगिक असल्याची नुकतीच होऊ लागलेली जाणीव, शाळेचा आणि एकुणातच आजूबाजूच्या परिस्थितीचा आलेला पराकोटीचा वैताग आणि त्यामुळे साहजिकच चुकीच्या प्रवृत्तींकडे वळणारी पावलं यात अडकलेला आणि आपले सगळे विचार तुटक, असंबद्ध भाषेत डायरीत उतरवणारा निरागस मुलगा. आपल्या परीने परिस्थिती समजून घेण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो, चिडतो, ‘ऑटोमॅटिक रायफल’मध्ये सगळ्याची उत्तरं शोधू पाहतो आणि पुढे काहीच दिसत नसताना मदतीला येते ती शेजारी राहणारी पियानोच्या शिकवण्या घेणारी अक्त्याब्रिना मिखायलव्ना. तिने दिलेल्या ‘रोमन हॉलिडे’च्या कॅसेटमध्ये, ‘ऑड्री हेपबर्न’मध्ये, तिने गायलेल्या गाण्यांमध्ये हा मुलगा एक नवं, आशादायी जग शोधत राहतो. आणि एके दिवशी त्याचा हा शोध अचानकच थांबतो. संपून जातो.

‘परकी आजी’मधली आजी विघटनाच्या आधीच्या पिढीतली. तिचा नवरा, मुली आणि त्यांची कुटुंबं यांच्यातल्या ओढाताणीची ही कथा. यातली इवानन्वा पॅराजंपिंगची चँपियन, आता सोव्हिएतच्या हवाईदलासोबत काम करणाऱ्या ‘दोसाफ’ची सदस्य. सरकारी लाईन सांभाळणारी. नवरा अचानक गायब झालेला, मुलींची लग्नं झालेली. अचानक एक दिवस मुलगी आणि जावई एका अनोळखी लहान मुलीला घेऊन येतात. जावयाची पहिल्या बायकोपासूनची मुलगी. एका अर्थाने स्वतः अनाथच झालेली इवानन्वा या लहानग्या मुलीमध्ये गुंतत जाते, आपली सगळी सुखदुःखं तिला सांगू लागते. या मुलीच्या बापाचं, आपल्या जावयाचं तिच्याशी वाटेल तसं वागणं बघून इवानन्वा हतबुद्ध होते आणि आपल्या परीने यावर उपाय शोधून काढते. या मुलीच्या लाडक्या बाहुलीचं गोष्टीत सतत येणारं रूपक मोठं बोलकं आहे.

कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये बोलताना लेखक आन्द्रेई गेलासिमव .

कोलकाता पुस्तक प्रदर्शनामध्ये बोलताना लेखक आन्द्रेई गेलासिमव .

‘ज्हाना’ ही सोळा-सतरा वर्षांची अनाथ कुमारी माता. फसवली गेलेली, काम गमावलेली, आजूबाजूच्यांनी बोल लावलेली आणि अशा परिस्थितीतही खंबीरपणे उभी राहिलेली, शारीरिक आणि मानसिकदृष्या कमजोर असलेल्या आपल्या मुलाचा सांभाळ करणारी. उंचीवरून पडल्याने विकलांग झालेल्या शेजारच्या तोलिकबद्दल कमालीचा जिव्हाळा असलेली, त्याचा सांभाळ ही आपली जबाबदारी मानणारी. प्रसंगी ती नशिबाला दोष देते, दोन वर्षांचा होऊनही अजून चालू न शकणाऱ्या मुलाचा रागराग करते, यातून बाहेर पडून परदेशी जाण्याची स्वप्नंही क्वचित बघते. एके दिवशी अचानक अवतरलेल्या सिर्योज्हकाच्या – तिच्या मुलाच्या – बापाचं फसवं आमिष नाकारून शेवटी मात्र ती आपल्या विश्वाचा आनंदाने स्वीकार करते, तोलिकची जबाबदारी सांभाळत, सिर्योज्हकाने टाकलेली पहिलीवहिली पावलं बघत.

सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियाच्या जनतेने पचवलेला आणखी एक धक्का म्हणजे चेचेन युद्ध. ‘तहान’, या कथेचा नायक कन्स्तांतीन पंचविशीचा. वडील सोडून गेलेले, सावत्र वडील बापलेकाच्या नात्याशी काहीच संबंध नसलेले. अशात त्याला भेटतात त्याच्या इन्स्टिट्यूटचे प्राचार्य. त्याच्या हातातली कला ओळखून त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणारे, पण दारूच्या व्यसनापायी अपुरे पडणारे. शेवटी तेही दूर निघून जातात आणि कन्स्तांतीन सैन्यात दाखल होतो. चेचेन युद्धात लढताना त्यांच्या चिलखती रणगाड्यावर ग्रेनेड हल्ला होऊन त्याचा चेहरा विद्रूप होतो. नंतर तो घरं रंगवण्याचं काम करायला लागतो. अचानक एके दिवशी त्याचा सैन्यातला मित्र सिर्योगा गायब होतो आणि हे तीन मित्र त्याला शोधायला बाहेर पडतात. भकास आयुष्याला तात्पुरती का होईना, पण एक दिशा मिळते. या लांबलचक प्रवासात आपल्या वडिलांची दुसरी बायको, आपली सावत्र भावंडं त्याला भेटतात. त्यांच्यामध्ये तो स्वतःला शोधू पाहतो, जगाकडे पूर्ण नव्या दृष्टीने बघायला लागतो, मनातले विचार पुन्हा कागदावर रेखाटायला लागतो आणि शेवटी स्वतःचा ‘खरा चेहरा’ कागदावर चितारतो.

‘तहान’मधल्या बहुतेक प्रत्येक कथेचा शेवट वाचकांना अगदी अनपेक्षित धक्का देतो. या पाचही कथांचे नायक अत्यंत प्रतिकूल, भयंकर परिस्थितीत जगणारे, किंबहुना जगण्याचा प्रयत्न करणारे आहेत. कन्स्तांतीन म्हणतो त्याप्रमाणे, वाट बघण्याचं चित्र काढता येत नसल्याने फक्त ‘कशाचीतरी’ वाट बघणारे. आला दिवस निर्विकारपणे ढकलणारा अलिक्सांदर, आईवडिलांच्या घटस्फोटाचा असहाय्य साक्षीदार असलेला डायरी लिहिणारा चिमुरडा, जावयाच्या लेकीत स्वतःला पाहणारी इवानन्वा, प्रसंगी घरातल्या टेबलं-खुर्च्याही विकून पोट भरणारी ज्हाना आणि युद्धात जळालेला चेहरा दाखवून शेजारच्या मुलाला घाबरवून झोपवणारा कन्स्तांतीन. कुटुंबाचा, समाजाचा, व्यवस्थेचा, कुणाचाच आधार नसलेल्या दिशाहीन आयुष्यात चाचपडणारेच. देशात झालेल्या अतिप्रचंड उलथापालथींची ‘शिकार’ झालेल्या पिढीचे हे प्रतिनिधी. पण मग त्यांची दया येते का वाचताना? “आई गं, बिच्चारे..” असं होतं का? तर मुळीच नाही. कारण त्यांच्या कर्मकहाणीत ते स्वतःच कुठेही स्वतःला बिचारे, बापुडवाणे, रंजले-गांजले मानत नाहीत. वाचकांकडून दया, कणव असं काहीही त्यांना नकोय. ते फक्त सांगतायत की असं असं झालं, असे आम्ही जगलो, बास. भावनांचा पसारा न मांडता आपल्याशी ज्या थंडपणे हे नायक बोलतात, तेच प्रचंड अंगावर येतं.

पण इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यातली माणुसकी मात्र वेळोवेळी लख्ख दिसते. स्वतःच्या आयुष्यात सगळंच अस्थिर असतानाही आजूबाजूच्यांना अगदी सहज जवळ करण्याची, मदतीचा हात देण्याची यांची वृत्ती अंतर्मुख करणारी आहे. त्याचवेळी येतील त्या संकटांशी काहीशा गुर्मीने दोन हात करण्याची त्यांची उमेदही.

या कथा वाचकांपर्यंत पोचवण्यात अर्थातच महत्वाचा वाटा आहे भाषांतराचा. मूळ कथांचा धागा तुटू न देता आवश्यक तिथे तळटीपा देऊन केलेलं, हे भाषांतर अतिशय सहज आणि ओघवतं आहे. क्वचित कधीतरी संवादांमध्ये काहीसा तुटकपणा जाणवतो, काहीकडे एखादा शब्द खटकतो, पण एकूण कथांचं अंतरंग भाषांतरामधून पुरेपूर पोचतं. बरंचसं दुर्लक्षित असलेलं, हे जग अनघा भट यांच्या या भाषांतरामधून सुरेख उलगडतं.

या कथांमधली सगळी पात्रं जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एक आशा शोधतायत. नकारात्मकतेने भरलेल्या भोवतालात सकारात्मकतेचा एखादा किरण शोधतायत आणि एक अपवाद सोडता इतर चारही कथांच्या नायकांना तो मिळतोही. इतका क्षीण, की तो पटकन लक्षातही येत नाही. पण त्याचवेळी त्यांना मात्र तो दिसलेला असतो आणि त्या दुर्दम्य आशेवर या कथांमधली पात्रं शांतपणे पुढच्या वाटेवर चालू लागलेली असतात…

अनुवादक प्रा. डॉ. अनघा भट, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परकीय भाषा विभागात रशियन विभाग प्रमुख आहेत. त्यांनी अनेक रशियन पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: