१८८२ मध्ये करून ठेवलेली “स्त्रीपुरुषतुलना” – आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन!

१८८२ मध्ये करून ठेवलेली “स्त्रीपुरुषतुलना” – आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन!

“स्त्रिया जर नसत्या तर झाडाचीं पानें चावीत रानोरान भटकत फिरला असता मग असें रोज पंचामृत पुढें आलें असतेंच. याकरितां प्रथम तुम्ही तुमची मनें गच्च विवेकाचे खांबास बांधून भीष्माचार्याचे व्रत घ्या. तुम्ही आपले मदोन्मत्त कामगज कर्दळी वनांत सोडून पायाखालीं तुडवू नका. तुम्ही सदाचरणाने प्रथम वागा.”

भारतातील पक्षीनिरीक्षण चळवळीतील पक्षीमैत्रिणी
‘फॅमिली केअरटेकर’, पण…
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र
पानांमधून पुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारप्रवृत्त करणारे सदर

पानांमधून
पुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारप्रवृत्त करणारे सदर

“ज्या परमेश्वरानें ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेंच स्त्री-पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदी स्पष्ट करून दाखवावें” अशी प्रस्तावना करून ताराबाई शिंदे यांनी “स्त्रीपुरुष तुलना” हा निबंध लिहिला. पुणे येथे “श्री शिवाजी” छापखान्याने तो छापला होता. स्त्रिया कपटी असतात, मूर्ख असतात, अनर्थाला कारण असतात, बाहेरख्याली असतात इ. इ. – स्त्रियांवर सतत होणारे असले आरोप ऐकून ताराबाईंना राहवले नाही. त्या आरोपांचे खंडन करणारा हा निबंध त्यांनी १८८२ मध्ये लिहिला. आजही स्त्रियांना अशीच अतार्किक आणि पूर्वग्रहदूषित दूषणे दिली जातात ह्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ताराबाईंची मांडणी ही किती लखलखीत होती याचा प्रत्यय खालील उतारे वाचून होईल.

उच्चवर्णीय पुरुषसत्ताक पद्धतीवर त्यांनी ओढलेले आसूड हे भारतीय स्त्रीवादाचे पहिले प्रतीक मानले जाते. “स्त्रीपुरुष तुलना” ह्या निबंधात त्या म्हणतात,

“या स्त्री जातीत सावित्री तरी आपले पतीचा प्राण परत आणण्याकरितां यमदरबारांत जाऊन आली. पण पुरुषांमध्ये कोणी तरी आपले बायकोचे प्राणाकरितां यमराजाचे दरबारांत तर नाहींच पण उगींच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे काय? तर जसें एकदां सौभाग्य गेलें म्हणजे स्त्रियांनी आपलीं तोंडे अगदीं एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळीं करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडींत राहावें, त्याप्रमाणें तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपलें तोंड काळें करून दाढ्या मिश्या भादरून येऊन जन्मपर्यंत कोठेंही अरण्यवासांत कां राहूं नये बरे? एक बायको मेली कीं तिचे दहावें दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी. असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवानें दाखला दिला आहे तो दाखवा बरें, जशी स्त्री तसेच पुरुष. तुमच्यामध्यें मोठे अलौकिक गुण कोणते? तुम्हीच कोण असे शूर म्हणून देवांनी तुम्हाला इतकी मोकळीक दिली?

अरे, तुम्ही देव ना? तुमचेजवळ मुक्तद्वार, पक्षपात नाहींना, मग हें काय रे! पक्षपाताचा बाप झाला ना हा! अरे पुरुषांला तशीच स्त्रियांना तूंच निर्माण केलेंस ना! तर त्यांना सुख व यांना दुःख अशी निवडानिवड का रे केलीस? बाबा तू तर करून चुकलास. पण त्यांना सोसणें भाग झालें रे झालें. स्त्रियांना पुष्कळ तऱ्हेचे दोष दिलेले वाचण्यांत व रोजच्या वहिवाटींत ऐकू येतात. पण जे दोष स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत अजिबात नाहींत काय? जशा बायका लबाडी करितात तसें पुरुष करीत नाहींत काय?

दुसरें स्त्रिया अनेक संशयाचा परिभ्रम भोवरा हें खरें! तरी त्यांच्या मनातला संशय फक्त त्यांच्या संबंधापुरतांच असतो. पण तुमच्या मनांतलें संशयाचें चक्र जर पाहू गेले तर त्यावर नजरसुद्धां ठरणार नाहीं. तुमचीं मनें नाना प्रकारचीं, देशी व परदेशी मानसिक व व्यावहारिक दगाबाजीनें अगदी संभ्रमित असतात. आज अमक्या सावकारास अशी थाप देऊन या रीतीनें त्याचेजवळून एक हजाराचा तोडा उपटावा, आज साहेबाला असे सांगून त्या अमुक खटल्याचा निकाल अमूकतर्फे करावा, तो खोटा दस्तऐवज आज नोंदवून आणावयाचाच, आज ती फलाण्याची मोठी नखरेबाज – मोठी नाकाने कांदे सोलती, तिला कसें तरी एकदा गाठावयाचेच. तेव्हा अशा प्रकारचे संशय स्त्रियांचे मनांत कधींच येणार नाहींत. तरी यां जगातील सर्व स्त्रिया प्रखर सूर्याच्या तेजाप्रमाणे सतेज, अंतर्बाह्य गंगाजलाप्रमाणे निर्मल आहेत असें मुळींच नाहीं.

तिसरें स्त्रिया उद्धततेचें केवळ गृहच. यांत आपली जाति काय कमी आहे. वजन करू गेलें असतां शंभर दीडशें तोळे पारडें खालींच जाईल.

चौथें स्त्रिया अविचार कर्माचें नगरच. तर स्त्रियांचेच हातून अविचार घडतात? आणि तुम्ही पाजी, बेईमान, भरंवसा देऊन केसांनी गळा कापणारे जे तुम्ही त्या तुमच्या हातून कधींच अविचार होत नाहीं? तुम्ही अगदी विचारमंदिरे. अहारे शाबास! अरे, तुम्ही महापढिक शहाणें व विचारी असून तुमचे हातून न भूतो न भविष्यत, असे अविचार घडून व रोज घडत असतांही तुम्ही मोठे विचारी म्हणवितां याला काय म्हणावे?

स्त्रिया केवळ गोठणांतील म्हशींप्रमाणे मूर्ख. त्यांना ना लिहिणें ना वाचणे म्हणून का ईश्वरानें त्यांना काहीच बुद्धी दिली नसेल काय? तरी त्या अविचारी असूनही तुमच्यापेक्षा बऱ्या. तुम्ही शहाणें आहांत खरे. पण इकडे कारागृहात जाऊन पहावें तों पाय ठेवण्यास देखील जागा मिळत नाहीं. इतकी तिथें आपल्या देशबांधवांची दाटी असते. तेथे काय सर्व शहाणें!

सहावें, शतश: कपटानीं व्यापलेले कोण बरें. अरे, कपटांत तर पहिला नंबर तुमचा. तुमचे कपट किती वर्णावें, पावलोपावली प्रत्यय येतो. अहा रे काय काय सोंगे घेऊन अंगावर पिवळे काळे पट्टे ओढून पटाईत वाघ बनता रे! अरे, गोसावी, फकीर, हरदास, ब्रह्मचारी, साधू, दुधहारी, गिरिपुरी, भारती, नानक, कानफाटे,जोगी, जटाधारी, नंगे, बनून सर्वत्याग करून रानोरान अंगास भस्म फासून व डोकीस जटा वाढवून हे सर्वजग कपाटानेच भोंदीत फिरतांना? हं. जशा मिशा श्रीभागीरथीला आर्पण करिता तसें दुर्गुणांचे पोतें भागीरथीत टाकून परतता का ? छे, मग तर अंगी ज्यास्ती आभिमान व पापवासना येते. वरून तर काय मोठे साधू बनता; पण अंतर्यामी जी कपटाची मशाल जळते ती कोठें भागीरथीचें पाण्यानें विझते कां?

अरे, देव देखील स्त्रियांचे मुळावर, मग तुम्ही असल्याचे काय नवल? कृष्णानी अर्जुनाकडून महंतांचे वेषाने सुभद्रेचें हरण करविलें तेव्हा यादवांची मुलें “गोसाव्यांनी आत्याबाई नेली” असें म्हणूं लागलीं. पण आत्याबाईने गोसावी नेला असें तुम्ही कोठे ऐकलेत का?

सातवें, दुर्गुणांचें उत्पत्तिस्थान; तर दुर्गुणांची उत्पत्ती आधीं आपलेपासूनच झाली. प्रथम स्वधर्म सोडून मन मानेल तसें वर्तन करणें, दारू पिऊन रस्त्यांत लोळणें, पो-यांचे तमाशे पहात फिरणें , जुवा खेळणे, गांजा वगैरे ओढणें, रांडा ठेवणें, इत्यादि वाईट व घाणेरडी आचरणें तुम्ही करू लागला. आता रांडा कोण? यांची काहीं सृष्टीविरहित उत्पत्ती झाली का? का ह्या कोणी दुसऱ्या देवानें केल्या? रांडा या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात”.

तुम्ही शास्त्रांचे बळानें उद्या मारता. पण शास्त्रांत जो घोटाळा आहे तो आता सांप्रत नाहीं. पूर्वीं एक राजा मेला, आणि त्याच्या पोटीं पुत्रसंतान नसलें तर त्याच्या राणीनें जो मनास आवडेल त्या ऋषीपासून वंशवृद्धी करावी. मग राणीसाहेबांनी त्याला दहा मुलें होईतो ठेऊन घेतलें म्हणून काय झाले? मग यांत काय झालें? हें नाहीं का परद्वार? हा व्यभिचार नव्हे का? हें सशास्त्र झालें का? असें करण्यापेक्षां दुसरें लग्न करण्याची जर चाल चालूं ठेविली असती तर त्या राज्याला दुप्पट बळकटी येऊन आज लक्षावधी लहान लहान मंडलिक राज्यें, जहागिरी, इ – नामें, देशमुख्या वैगेरे बुडून आपला देश भिकारी झाला नसता.

आतां तुम्ही म्हणाल कीं स्त्रियांच्या पायी मोठमोठे अनर्थ नाहीं का झाले? हो झाले, व नित्य होतात. नाहीं कोण म्हणते? पण त्यांत त्यांनी काय केलें. अरे, तुम्ही रोज जहागिरी, वाटण, देशमुखी, यःकश्चित पाटीलकीकरितां देखील एकमेकांचे प्राण घेता. विष घालीता, हेंही स्त्रियांचे पायींच होतें का? हे अनर्थ नाहीत. एखादा खटला सरकारांत चालत असला म्हणजे लक्षावधी रुपये खर्चिता, तीन टीकल्याचा शिपाई त्याच्या देखील पाया पडता, मग हें कोणाकरतां. तुम्ही आपल्या टेकीकरितां मरता का पातकाकरितां मरता?

हे असे अनर्थ दुसरे कशाकरितां न होऊन फक्त स्त्रियाच जर याला कारणभूत असत्या तर मग त्या खरोखर दोषी ठरत्या. स्त्रियांचे पायीं जीव तर काय पण हा सारा जन्म अर्पण करणें हा तुमचा देहधर्मच आहे. अरे, देवासारख्यानी स्त्रियांची खुशामत केली; तेथें तुम्ही कोण कोण्या झाडाचा पाला? सर्वात वर्चस्व स्त्रीचेच. कारण सगळें तिचे स्वाधीन, तिचें करिता सारे वैभव. अरे, स्त्रिया जर नसत्या तर झाडाचीं पानें चावीत रानोरान भटकत फिरला असता मग असें रोज पंचामृत पुढें आलें असतेंच. याकरितां प्रथम तुम्ही तुमची मनें गच्च विवेकाचे खांबास बांधून भीष्माचार्याचे व्रत घ्या. तुम्ही आपले मदोन्मत्त कामगज कर्दळी वनांत सोडून पायाखालीं तुडवू नका. तुम्ही सदाचरणाने प्रथम वागा.”

(नोंद – ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या मराठी भाषेमध्ये काहीही बदल केलेले नाहीत)

पुस्तकाचे नाव : स्त्रीपुरुषतुलना (यथामूल संशोधित आवृत्ती)

लेखिका : ताराबाई शिंदे ; संपादक: विलास खोले

प्रतिमा प्रकाशन; किंमत : रुपये २००/-

संकलन : मृदगंधा दीक्षित

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: