नताशा, देवांगना, आसिफ अखेर तुरुंगाबाहेर

नताशा, देवांगना, आसिफ अखेर तुरुंगाबाहेर

नवी दिल्लीः सीएए आंदोलन व दिल्ली दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेले तीन विद्यार्थी नताशा नरवाल, देवांगना कलिता व आसिफ इक्बाल यां

देवांगना, नताशा, आसिफला जामीन
‘संपूर्ण देशावर परिणाम होईल’
देवांगना कलिताचा जामीन फेटाळला

नवी दिल्लीः सीएए आंदोलन व दिल्ली दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेले तीन विद्यार्थी नताशा नरवाल, देवांगना कलिता व आसिफ इक्बाल यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली पोलिसांना कडकडडूमा न्यायालयाने दिल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी हे तिघे विद्यार्थी तुरुंगाबाहेर आले. या विद्यार्थांचे स्वागत करण्यासाठी जेएनयू व अन्य विद्यापीठातील अनेक विद्यार्थी तिहार कारागृहाबाहेर जमले होते.

देवांगनाने तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांना सांगितले की, सरकार हताश झाले असून आमच्यासारख्या महिलांना यांचे भय वाटत नाही. आम्ही वाचलो कारण आम्हाला आमचे मित्र, हितचिंतकांचा पाठिंबा मिळाला. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

नताशा नरवालने, आम्ही जे काही केले तो दहशतवाद नसून ते महिलांच्या नेतृत्वाखाली झालेले एक लोकशाही आंदोलन होते. आम्हाला तुरुंगाचे भय दाखवले पण आम्ही घाबरलो नाही. आमचा हा संघर्ष या पुढे कायमच राहील. या संघर्षांत दिल्ली उच्च न्यायालयाने आमची बाजू समजून घेतली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.

गेल्या मंगळवारी सीएए कायद्याविरोधात आंदोलनात या तिघांचे निदर्शने करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करत व सत्तेला विरोध करणे म्हणजे दहशतवादाला उत्तेजन देणे नाही, असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने तिघांचा जामीन मंजूर केला होता. पण पोलिसांनी या तिघांचे पत्ते व जामीनदारांविषयीची काही माहिती अपूर्ण असल्याचे कारण दाखवत त्यांची सुटका केली नव्हती. या काळात दिल्ली पोलिसांनी या तिघांच्या जामीनाला हरकत घेणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडून २१ जूनपर्यंत तारीख मागितली होती, या तारखेपर्यंत या तिघांच्या कागदपत्रांची सत्यता तपासली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे होते.

दिल्ली पोलिस आपली सुटका करत नसल्याची याचिका या तिघांनी स्थानिक न्यायालयात दाखल केली होती. दिल्ली पोलिस वेळकाढूपणा करत असून आमच्याविषयीच्या माहितीची सत्यता २४ तासात दिल्ली पोलिस का करू शकत नाहीत, असा सवाल या तक्रारीत करण्यात आला होता.

त्यावर गुरुवारी कडकडडूमा न्यायालयाने या तिघांच्या जामीनाला विलंब असल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. दिल्ली पोलिसांनी या तिघांच्या पत्त्यांची पुष्टी होत नसल्याने सुटकेस वेळ लागत असल्याचे न्यायालयास सांगितले. पण न्यायालयाच्या फटकार्यानंतर गुरुवारी संध्याकाळी या तिघांना जामीनावर मुक्त करण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

गेल्या वर्षी २२ व २३ फेब्रुवारी रोजी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएएविरोधात निदर्शने झाली होती व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे ५०० आंदोलक उपस्थित होते. यातील बहुतांश आंदोलक महिला होत्या. त्यात देवांगना व नताशा उपस्थित होत्या.

जाफराबाद येथील या आंदोलनावरूनच भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले होते. जाफराबादमध्ये ठिय्या मारून बसलेले सीएएविरोधक तीन दिवसात येथून हटले नाही तर आम्ही या आंदोलकांकडे पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता आणि त्याच्या दुसर्या दिवशी ईशान्य दिल्लीत दंगल पेटली होती, ज्यात ५२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता व शेकडो लोक जखमी झाले होते.

त्यानंतर मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी देवांगना कलिता (३०) व नताशा नरवाल (३२) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आयपीसी कलम ३५३ लावले होते. या कलमात सरकारी कामात व्यत्यय आणणे व या कर्मचार्यांवर बळाचा प्रयोग करणे अशा तरतूदी होत्या.

नताशा नरवाल व देवांगना कलिता या जेएनयूच्या विद्यार्थीनी असून नताशा सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजमध्ये पीएचडी स्नातक असून देवांगना सेंटर फॉप वुमेन स्टडिजच्या एम.फील स्नातक आहेत. आसिफ हा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.

नताशा व देवांगना या दोघी ‘पिंजरा तोड’ या सामाजिक चळवळीच्या संस्थापक सदस्य असून  त्यांनी २०१५मध्ये ही महिला संघटना स्थापन केली होती. जेएनयूमध्ये वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांवर सतत लावली जाणारी बंधने, स्त्री-पुरुष असा भेदभाव ठेवणारे कायदे-नियम व कर्फ्यू टाइमच्याविरोधात या संघटनेने आंदोलने केलेली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0