सुल्ली डिल्स, बुली बाई अॅप प्रकरणः दोन आरोपींना जामीन

सुल्ली डिल्स, बुली बाई अॅप प्रकरणः दोन आरोपींना जामीन

नवी दिल्लीः मुस्लिम महिलांच्या छायाचित्रांमध्ये बदल करत त्यांची इंटरनेटवर बदनामी करणे वा त्यांचा लिलाव करण्याच्या प्रकरणातील सुल्ली डिल्स हे अॅप तयार

मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू
‘राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका’
गो-तस्करीच्या संशयावर मुस्लिम व्यक्तिची जमावाकडून हत्या

नवी दिल्लीः मुस्लिम महिलांच्या छायाचित्रांमध्ये बदल करत त्यांची इंटरनेटवर बदनामी करणे वा त्यांचा लिलाव करण्याच्या प्रकरणातील सुल्ली डिल्स हे अॅप तयार करणारा ओंकारेश्वर ठाकूर (२६) याला २८ मार्चला पतियाला हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीने पहिल्यांदा असा गुन्हा केला असून त्याला प्रदीर्घ काळ तुरुंगात ठेवणे त्याच्यासाठी नुकसानदायक असल्याचे कारण न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिले. आरोपी देश सोडून जाण्याची शक्यताही नसल्याने तो धोका नाही, त्यामुळे ५० हजार रु.च्या जातमुचलक्यावर जामीन देत असल्याचे न्या. पंकज कुमार यांनी सांगितले.

पण ठाकूर याच्यावर मुंबई पोलिसांकडून अन्य दोन प्रकरणात आरोपपत्र असल्याने त्याची सुटका लगेच झालेली नाही.

ओंकारेश्वर ठाकूरकडून इंदूर येथून ‘सुल्ली डील्स’अॅप मार्फत मुस्लिम महिलांची छायाचित्रे प्रसारित केली जात होती व त्यांचा लिलाव केला जात होता. या अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या मंजुरीशिवाय मोबाईल अॅप्लिकेशनवर लिलावासाठी ठेवण्यात आले होते.

आरोपी ओंकारेश्वर ठाकूर (२६ वर्षे) याने इंदूरमधील आयपीएस अकादमीमधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) केले आहे आणि तो न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी आहे.

बुली बाई अॅपच्या आरोपीलाही जामीन

गेल्या वर्षी सुल्ली डिल्स अॅप प्रकरणाबरोबर बुली बाई अॅपचे प्रकरण चर्चेत आले होते. या अॅपवरूनही मुस्लिम स्त्रियांना लक्ष्य केले जात होते. लक्ष्य केल्या गेलेल्या स्त्रियांमध्ये पत्रकार, कार्यकर्त्या तसेच विद्यार्थिनी होत्या. ‘सुल्ली डील्स’ अॅपप्रमाणे या अॅपमध्येही मुस्लिम स्त्रियांचा ‘लिलाव’ केला जात होता. यावर सोशल मीडिया अॅप्सवरून चोरलेल्या फोटोंद्वारे ‘लिलाव’ केला जात होता. हे अॅप तयार करणारा मुख्य सूत्रधार नीरज बिष्णोई यालाही पतियाला न्यायालयाने सोमवारी जामीन दिला आहे.

सुल्ली डिल्स व बुली बाई अॅप प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. मुंबई पोलिसांकडे या संदर्भात स्वतंत्र तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षी पोलिसांनी दोन २१ वर्षीय व एका १८ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले होते. ही १८ वर्षीय तरुणी या प्रकरणाची सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या अॅपद्वारे लक्ष्य करण्यात आलेल्या स्त्रियांमध्ये ‘द वायर’च्या पत्रकार इस्मत अरा यांचाही समावेश होता. त्यांनी दिल्ली पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. अरा यांनी केलेल्या तक्रारीमध्ये, भारतीय दंड संहितेच्या १५३ अ (दोन गटांमध्ये धर्माच्या आधारे शत्रुत्व निर्माण करणे), १५३ बी (राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारी कृत्ये), ३५४ ए (लैंगिक छळ), ५०६ (गुन्हेगारी दहशत निर्माण करणे) आणि ५०९ (स्त्रियांचा अवमान करणारे शब्द, आवाज किंवा हावभाव) यांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील काही तरतुदीही वापरण्याची मागणी अरा यांनी केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0