सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांच्यावर ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच आज दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. रविकांत यांनी सांगितले.

८ मे २०२१ रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने आणि त्याचबरोबर निमोनिया झाल्याने त्यांना उपचारासाठी एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याना मधुमेह होता तसेच त्यांना ऑक्सीजनची लेवहाल खाली गेली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

पद्मभूषण सुंदरलाल यांचा जन्म जानेवारी १९२७ मध्ये टिहरी जिल्ह्यातील मरोडा गावात झाला होता. त्यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरी येथे वनाधिकारी होते. सुंदरलाल हे १३ वर्षांचे असतानाच ते  शहीद श्रीदेव सुमन यांच्या सहवासात आले आणि सामाजिक कार्यामध्ये आले.

त्यांनी पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी १९७३ साली चिपको आंदोलनाला सुरुवात केली होती. गडवाल हिमालयात वृक्षतोडीच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले होते. गौरा देवी आणि अन्य साथीदारांसह त्यांनी चिपको आंदोलन सुरु केले. २६ मार्च १९७४ साली चमोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिला झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या आणि झाडे तोडण्यासाठी आव्हान दिले, त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण जगभर गाजले.

हिमालय पर्वतराजीमध्ये पसरलेले जंगल व तेथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी टिहरी धरण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते. टिहरी धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जंगल येत असल्याने तेथील सर्व झाडे वाचवण्यासाठी झाडांना मिठी मारून राहावे व झाडांच्या कत्तलीला विरोध करावा अशी कल्पना त्यांनी मांडली आणि या ‘चिपको’ आंदोलनाला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पुढे या आंदोलनापासून प्रेरणा घेत उ. भारतातल्या अनेक राज्यांत अशी आंदोलने पसरली गेली. उत्तराखंडात हे आंदोलन पुढे कित्येक वर्षे सुरू होते. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अहिंसा तत्वावर उभे करण्यात आले होते व अखेरपर्यंत ते तसेच राहिले.

बहुगुणा यांचे स्वतःचे घर टिहरी धरणाच्या जलाशयात बुडाले पण या धरणाच्या विरोधात ते अखेरपर्यंत लढले. त्यांचे ८४ दिवसांचे उपोषण गाजले होते. जगभरातून या आंदोलनास पाठिंबा मिळाला होता. या आंदोलनादरम्यान त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला होता.

हिमालय पर्वतराजींमध्ये हॉटेल उद्योग व पर्यटन फोफावल्यास येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल असा ते अनेक वर्ष इशारे देत होते. आपल्या आंदोलनाला सर्वसामान्य जनतेमध्ये नेण्यासाठी त्यांनी अनेक पदयात्राही काढल्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे कट्टर विरोधी होते.

बहुगुणा यांच्या पर्यावरणवादी भूमिकेमुळे त्यांना देशविदेशातील अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

गांधीवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाने पर्यावरण आंदोलनाला वैचारीक अधिष्ठान दिले.

COMMENTS