स्वामी अग्निवेश यांनी साधू संन्याशाच्या पारंपरिक कल्पनेला पूर्णपणे छेद दिला आणि एक योद्धा संन्यासी म्हणून स्वतःला उभे केले. संन्यासत्वाचे व्रत घेऊन समाजापासून स्वतःला अलिप्त करून न घेता ते समाजाच्या मधोमध उभे राहिले.
प्राध्यापकी, वकिली, संन्यास धर्म, राजकारण, सामाजिक चळवळ अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे स्वामी अग्निवेश यांचे व्यक्तित्व होते. समाजव्यवहाराच्या विविध क्षेत्रात असे व्यक्तिमत्व घडणे हे तसे दुर्मिळच. आजच्या कमालीच्या अस्थिर परिस्थितीत त्यांच्या निधनाने निर्माण होणारी पोकळी परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढवते.
भगवी वस्त्रे धारण करणार्या व्यक्तीस पाहून अशा व्यक्ती म्हणजे परमात्मा, मोक्ष, योग प्राणायम आणि भारतीय परंपरेविषयी आग्रही किंवा दुराग्रही असणारे वाटतात. पण स्वामी अग्निवेश यांनी साधू संन्याशाच्या पारंपरिक कल्पनेला पूर्णपणे छेद दिला आणि एक योद्धा संन्यासी म्हणून स्वतःला उभे केले. संन्यासत्वाचे व्रत घेऊन समाजापासून स्वतःला अलिप्त करून न घेता ते समाजाच्या मधोमध उभे राहिले. त्यांच्या दृष्टीने अध्यात्माचे समाजासाठी जोपर्यत उपयोजन होत नाही तोपर्यत ते अध्यात्म हे ढोंग असते. त्यातून ढोंगीपणा, अहंकार आणि कुंठित विचारसरणीला तयार होते.
याच भूमिकेतून त्यांनी आर्य समाज स्वीकारला आणि सर्व प्रथम जे प्रश्न हाती घेतले ते बालमजुरी आणि वेठबिगारी. हरियाणा परिसरात या कार्यांचा आरंभ करून आपल्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. ते ही कायद्याचा आधार घेऊनच. पुढे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणारे सव्यसाची मुखर्जी यांच्या कार्यालयातील वकिलीचा अनुभव पाठीशी होताच. हा लढा केवळ औपचारिकपणे न लढत त्यांनी धाडसी पद्धतीने लढवला. आपल्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन ते वीटभट्टी आणि दगडी खाणींवर धाडी टाकत आणि बाल मजूर व वेठबिगारांची सुटका करत. त्यांच्या या कार्यामुळे राजकीय नेत्यांशी संबंध असलेल्या खाण मालकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्यांचे प्रयत्नही केले होते.
पण याने विचलित न होता वेठबिगार वर्गासाठी त्यांनी वस्त्यांमध्ये जाऊन प्रबोधनातून त्यांना त्यांच्या हक्कांची शिकवण दिली. यातील कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील काही जण गेल्या आठवड्यात स्वामीजींच्या अंत्यसंस्कारात कृतज्ञतेने सामील झाल्याचे पाहावयास मिळाले.
सामाजिक कार्य करत असताना राजकीय शक्तीची जोड मिळाल्यास ते अधिक परिणामकारक होईल या विचाराने त्यांनी ‘आर्यसभा’ हा पक्ष स्थापन केला. सत्तरच्या दशकातील काळ हा तरुण रक्ताला राजकीय संघर्षाकडे आकर्षित करणारा होता. आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना १४ महिन्याचा तुरुंगवासही झाला होता.
नंतर सर्व पक्षांप्रमाणे स्वामीजींनीही आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला आणि हरियाणात ते शिक्षण मंत्री झाले. पण राजकारणातील साठमारीने निराश होऊन समाज कार्यातच राहण्याचे त्यांनी ठरवले. ८०च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने बालमजुरी आणि वेठबिगारीविषयी जे आदेश आणि नियमावली काढली त्यात अग्निवेश यांच्या प्रचाराचा आणि त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांच्या महत्वाचा वाटा होता. दरम्यान त्यांचे भारतभ्रमण, सामाजिक आंदोलने आणि सार्वजनिक सभा हा नित्याचा भाग बनत गेला. महाराष्ट्रात काही भागात ते सातत्याने भेट देत. विशेषतः मराठवाड्यात लातूर, औरंगाबाद, नांदेड आणि येडशी येथे त्यांचे अनेक अनुयायी आणि चाहता वर्ग आहे. याचे कारण म्हणजे मराठवाड्याने आर्य समाजाच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध दिलेला लढा आणि आर्य समाजाचा या भागातील प्रचार व स्वामीजींची तेलगू मातीशी असलेली नाळ हे सुद्धा कारण होते.
स्वामीजींची सामाजिक विषयावरील भाषणेही विविध विषयांचा आवाका स्पष्ट करणारी होती. भांडवलशाही शोषण, अन्याय, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि हुंडाबळी यावर ते आपल्या ओघवत्या भाषेत प्रहार करत. ऐकणाऱ्याच्या मनात स्फुलिंग निर्माण नाही झाले तरच नवल.
अग्निवेश मेरा नाम है I
आग लगiना मेरा काम है II
असं स्वतःविषयी बोलणारा संन्यासी विरळच. त्यांच्या भाषणांमुळे आणि कार्यामुळे ते नक्षलवादी विचारवंतांनाही आपले वाटू लागले. असे काही विचारवंत आणि कार्यकर्ते त्यांचं संपर्कात आले पण नक्षलवाद्यांच्या हिंसेचे त्यांनी कधीही समर्थन केले नाही. लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यावर त्याचा ठाम विश्वास होता. बस्तर जिल्ह्यात ‘सलवा जुडूम’ या नक्षलवादी विरोधी संघटनेने त्यांच्यावर हल्ला केला होता तो याच गैरसमजातून.
नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या ८ पोलिसांची सुटका करण्यासाठी युपीए सरकारने स्वामीजींनाच मध्यस्थ म्हणून पाठवले होते. त्यानंतर छत्तीसगढ आणि तेलंगणा येथील नक्षलवादी नेत्यांना वाटाघाटीसाठी तयार करावे असा प्रस्ताव युपीए सरकारने मांडला. स्वामीजी नक्षलवादी नेत्यांना हिंसात्मक मार्ग सोडून वाटाघाटी करण्यासाठी तयार करण्याचे आवाहन करतंच होते. पण या गोष्टीचा आधार घेऊन सरकारने आझाद आणि इतर नक्षलवादी नेत्यांची धरपकड करून तेलंगणाच्या जंगलात त्यांचे एन्काऊंटर केले. तेव्हा स्वामीजींना सरकारचा हा डाव लक्षात आला. नक्षलवाद्यांना हिंसा सोडण्याचे आवाहन करत असताना त्यांच्यावर हिंसा होत आहे आणि प्रश्न अजून बिकट होणार हे त्यांनी हेरले. एकदा अनौपचारिक गप्पा मारत असताना याविषयी मी अजून जरा खोलवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
स्वामीजींनी सांगितले की, या घटनेनंतर ते गृहमंत्री पी. चिदंमबरम यांना भेटावयास गेले आणि आझाद यांच्यासोबत झालेल्या घटनेविषयी त्यांनी विचारले. माझा प्रश्न ऐकून चिदंबरम यांनी नजर न मिळवता ‘याविषयी मला कल्पना नव्हती’ असे सांगितले. एवढ्या मोठ्या घटनेची देशाच्या गृहमंत्र्याला कल्पना नसावी यावर स्वामीजींचा विश्वास बसणे शक्य नव्हते. अशातच एका नक्षलवाद्याने स्वामीजींना उद्देशून एक पत्र दिल्लीच्या एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवले. स्वामीजींविषयी या पत्रात आदर प्रकट करत त्यांना पत्रामध्ये एक सल्ला दिला गेला की, त्यांनी सरकारच्या नादी लागू नये. सरकार स्वामीजींचा आधार घेऊन आमची फसवणूक करत असल्याचा एकूण भावार्थ या पात्रात होता. जाता जाता या नक्षलवाद्याने स्वामीजींची भेट कधी झाली होती हे सुद्धा नमूद केले. आंध्रप्रदेश मधील राजमुंद्री येथे एका सभेला संबोधन केल्यानंतर त्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था त्यानेच पाहिली होती अशी आठवण पत्रात नमूद केली होती. पण इतकी जुनी घटना आणि चेहरा स्वामीजींना नेमका आठवला नाही.
संघर्ष आणि आंदोलन हाच पिंड असलेल्या अग्निवेश यांनी राजकारणातही तोच पवित्रा घेतला. वळणावळणाचे असलेले राजकारण साहजिकच त्याच्या संन्यस्त वृत्तीला मानणारे नव्हतेच. जनता पक्षाच्या प्रयोगानंतर जेव्हा पक्षाची वाताहत सुरू झाली तेव्हा पक्षाचे अध्यक्षपद निवडण्याची वेळ आली. चरणसिंगनंतर पक्षात दबदबा असणारी व्यक्ती म्हणजे चंद्रशेखर होते. त्याच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक न घेताच चंद्रशेखर यांना पक्षाध्यक्ष बनवले. या निर्णयाला स्वामीजींनी विरोध केला व लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडण्याची मागणी केली. तेव्हा चंद्रशेखर यांच्या कार्यकर्त्यांनी अग्निवेश यांच्या जंतरमंतर येथील कार्यालयात घुसून सर्व पेपर आणि वस्तू बाहेर फेकून दिल्या. अशा घटना त्यांच्याबाबतीत बर्याच वेळा घडल्या. या घटनेनंतर Illustrated Weekly या साप्ताहिकात संपादक प्रीतीश नंदी यांनी ‘Angry Ascetic’ (संतप्त संन्यासी) अशा मथळ्याची कव्हर स्टोरी केली होती.
स्वामी अग्निवेश यांच्या सामाजिक कार्याची दाखल या देशात विशेष घेतली गेली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही संघटनांनी ती नक्की घेतली होती. त्यांची संयुक्त राष्ट्राच्या ‘Antislavery Committee वर तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तसेच प्रति नोबेल समजला जाणारा स्वीडनच्या Right Livelihood Award हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाच्या साठीनंतर नंतर स्वामीजींनी धार्मिक सलोख्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रयत्न केले. पण त्यांच्या भांडवलशाहीविरोधी आणि प्रस्थापितविरोधी भूमिकेमुळे ते भांडवलशहांना आणि राजकीय पक्षांना अडचणीचेच वाटले. याचा प्रत्यय २०१४ साली कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला तेव्हा दिसून आला. कारण सत्यार्थी हे अग्निवेश यांच्या मुशीत तयार झालेले आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते होते. कालांतराने बालमजुरी प्रश्नांवर त्यांनी वेगळी चूल मांडली. स्वामीजींचे कार्य हे याबाबतीत अधिक मूलभूत होते याची नोबेलसाठी दाखल घेतली नाही याचे त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटणे साहजिक होते.
अर्थात फकिरी वृत्तीने राहणाऱ्या स्वामीजींना पुरस्कारादी गोष्टींचे सोयरसुतकही नव्हते. आपल्या एकला चलो रे भूमिकेवर ते ठाम होते. अवहेलना, शाब्दिक आणि शारीरिक हल्ले याची त्यांना सवय झालीच होती. यासाठी त्यांचे काही दुराग्रह सुद्धा कारणीभूत ठरले. राजकारणाविषयी धरसोड भूमिका, अमरनाथविषयी अनावश्यक भाष्य, नशाबंदी आणि मांसाहार याविषयी अतिआग्रही भूमिका आणि हिंदू धर्मातील काही श्रद्धांविषयी टाळता येण्यासारखे काही मुद्दे यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यास ते कारणीभूत ठरले.
अशा मुद्द्यांवर त्यांनी अनावश्यक ऊर्जाही खर्च केली. कधी जनता पार्टी तर कधी जनता दल, राजद आणि काँग्रेस या पक्षांची जवळीक साधली. या पक्षांनीही त्यांना फायद्यासाठी जवळ केले पण एकंदरीत राजकारणातील त्यांचे समीकरण जमलेच नाही. युपीए सरकारने राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार केल्याची चर्चा होती. भाजपच्या हिंदुत्वाला काँग्रेसचे भगवे उत्तर अशी भूमिका त्यामागे असावी. पण आघाडीतील डाव्यांना भगवा रंग मान्य नसल्याने चर्चेच्या प्रथम फेरीतच त्यांचे नाव बाद झाले. भाजपआदी उजव्या पक्षांना तर त्यांची अलर्जीच होती. भगव्या वस्त्रातील हा संन्यासी धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलतो, व्यासपीठावर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना घेऊन सभा संबोधित करतो, असा स्वामी उजव्यांच्या पचनी पडणे शक्य नव्हते. मोदी सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला स्वामीजींनी कडाडून विरोध केला होता. त्यांच्या गुलबर्गा, भोपाळ येथील सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
त्यांची ही आंदोलनकर्त्यांची भूमिका बऱ्याच वेळा अप्रिय करणारी ठरली. अण्णा हजारेंच्या जनआंदोलनात त्यांच्याविषयी बरेच गैरसमज पसरवले गेले. युपीए सरकारचा हस्तक म्हणून आंदोलन मोडण्यामागे ते आहेत असा गैरसमज अण्णा समर्थकांनी पसरवला. याविषयीच्या चर्चेत स्वामीजींनी काही खुलासा केला. खरे तर युवकांचा आंदोलनात इतका मोठा सहभाग ही गोष्ट स्वामीजींना आकर्षित करणारी होती. शिवाय अण्णांविषयी आदर ही सुद्धा बाब होतीच. पण अण्णांचे उपोषण हे अनावश्यकरित्या लांबवण्यात येत होते आणि त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. त्याच्या भोवती जे कोंडाळे निर्माण झाले होते ते कुठल्याही चर्चेला नकारच देत होते. कदाचित अण्णांना शहीद करून अराजक माजवण्याचा डाव केजरीवाल-बेदी कंपनीचा असल्याचा संशय स्वामीजींना आला. या कोंडाळ्यात अण्णा कैद झाल्यासारखे वाटले. त्यांनी अण्णांची भेट घेणेही दुरापास्त करून ठेवले होते. ही बाब स्वामीजी त्यांच्या कार्यालयाबाहेर फोनवर कदाचित कपिल सिब्बल यांना सांगत असावेत. याच वेळी कुणीतरी त्याच्यावर स्टिंग ऑपरेशन केले आणि बोलता बोलता ‘ये पागल हाथी की तरह हो गये है’ या त्यांनी केलेल्या वाक्याचा अण्णांशी संबंध जोडण्यात आला. पण स्वामीजींचा रोख अण्णांभोवतीच्या मंडळींकडे होता. खरे तर या आंदोलनाला एक विधायक दिशा मिळावी हे भूमिका स्वामीजींची होती.
अशीच एक दुसरी घटना म्हणजे त्यांचा ‘बिग बॉस या रिऍलिटी शो मधील सहभाग. आपले विचार आजच्या तरुण पिढी पुढे मांडले जावेत त्यासाठी या शोकडे त्यांनी एक व्यासपीठ म्हणून पहिले. पण प्रायोगिकतेचे मुळातच वावडे असलेल्या समाजाने या गोष्टींची थट्टा केली.
आज त्यांच्या निधनानंतर जगातील अनेक वर्तमानपत्रात लेख लिहिले जात आहेत. पण भारतीय माध्यमांनी त्यांची विशेष दाखल घेतलेली दिसत नाही. शोषणमुक्त आणि समतामूलक समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या व्यक्तीवर धर्मद्रोहाचे आरोप करण्यात आले. त्यातूनच दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर झारखंड येथे एका जमावाने सभास्थानाकडे जात असताना हल्ला केला. त्यांना जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ८० वर्षाच्या वृद्धावर असा हल्ला करण्याची कुठली संस्कृती शिकवण देते? विचार मान्य नसतील तर प्रतिविचाराने उत्तर का देता येत नाही? हल्ल्यानंतर स्वामीजींचा लिव्हर प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्याच कारणामुळे त्यांचा मृत्यूही झाला.
समाजाला अडचणीच्या वाटणाऱ्या व्यक्तीच समाजाला दिशा दाखवणाऱ्या असतात. पण आत्ममग्नात अडकलेल्या समाजाला हे सांगणार कोण?
विद्याभूषण आर्य, हे मिडिया व कम्युनिकेशन क्षेत्रातील प्राध्यापक असून, ते स्वामी अग्निवेश यांच्या निकट होते.
COMMENTS