स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण देणारी शोकांतिका

स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण देणारी शोकांतिका

परकीय सत्ताधीशांच्या अपरिमित क्रौर्याचे उदाहरण ठरलेले जालियानवाला बाग आज राष्ट्रीय स्मारक बनले आहे. जालियानवाला बाग आपल्या एका स्वातंत्र्याच्या लढाईची साक्ष आहेच, आता शंभर वर्षांनतर आपल्या अजूनही बाकी असलेल्या व्यापक स्वातंत्र्याची ते प्रेरणा बनले पाहिजे. जालियानवाला बाग हत्याकांड शताब्दी निमित्ताने विशेष लेख!

१०० वर्षांपूर्वी – मार्च १९१९मध्ये अमृतसर (पंजाब) मधून प्रकाशित होणाऱ्या ‘वक्त’ या दैनिकात एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. एकीकडे इंग्लंडचे पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या मंत्रिमंडळातील भारतमंत्री एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यु भारतमातेच्या हाती स्वातंत्र्याची सनद सुपूर्त करीत आहेत आणि दुसरीकडे न्यायमूर्ती सर सिडनी रौलट यांनी उघडलेल्या टोपलीतून बाहेर पडलेला भयंकर विषारी कोब्रा साप भारतमातेला दंश करीत आहे… ब्रिटिशांच्या दुटप्पी नीतीचे परखड आणि मार्मिक दर्शन करणारे हे व्यंगचित्र होते. अमृतसरच्या जालियानवाला बागेत १३ एप्रिल १९१९ रोजी ब्रिटिश सत्तेने घडवलेल्या निर्घृण हत्याकांडाला या दुटप्पी नीतीची पार्श्वभूमी होती.
१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. या महायुद्धात भारतीयांना इंग्रजांसाठी रक्त सांडावे लागले. युद्धासाठी पैसा आणि सैन्य दोन्हीची भारतीयांवर सक्ती केली गेली. भारतीयांना आशा होती, या युद्धानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेला इंग्रज राज्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. युद्धसमाप्तीनंतर भारतमंत्री मॉन्टेग्यु यांनी ब्रिटिश संसदेत केलेली घोषणा आणि पाठोपाठ केलेल्या भारत दौऱ्यामुळे या आशा पल्लवितही झाल्या होत्या. त्या वेळी भारतीयांची मागणी मर्यादित स्वातंत्र्याची – म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वतंत्र राष्ट्राची होती. जसे कॅनडा, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया हे ब्रिटिश साम्राज्यातील स्वतंत्र देश होते, तसाच दर्जा भारताला अपेक्षित होता. मॉन्टेग्यु यांनी भारताला राजकीय सुधारणांद्वारे टप्प्याटप्प्याने स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचे धोरण ब्रिटिश संसदेत जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच – मार्च १९१९मध्ये भारतातील ब्रिटिश सत्तेने देश विघातक कारवायांना लगाम घालण्याच्या नावाखाली भारतीयांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच करणारा काळा कायदा मंजूर केला. सर सिडनी रौलट यांच्या समितीने हा कायदा तयार केल्यामुळे त्याला रौलट कायदा असे म्हटले गेले. या कायद्यात निव्वळ संशयावरून कोणाही व्यक्तीला विना वॉरंट अटक, अनिश्चित काळापर्यंत विना चौकशी, विना अपील तुरुंगवास, मालमत्तेची जप्ती अशा जाचक तरतुदी करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ, इंग्रज सरकार भारतीयांच्या आशा आकांक्षांबाबत गंभीर नव्हते, संवेदनशील नव्हते. मॉन्टेग्यु सुधारणांद्वारे एका हाताने ते देत होते, तर दुसऱ्या हाताने रौलट कायद्याद्वारे काढून घेत होते. त्यामुळे भारतीय क्षितिजावर नुकत्याच उदयाला आलेल्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही मार्गाने देशव्यापी विरोध उभा राहिला. तो मोडून काढण्यासाठी, विशेषतः पंजाब प्रांतात उचलल्या गेलेल्या दमनकारी पावलांमुळे जालियानवाला बागेचा दुर्दैवी इतिहास घडला. या इतिहासाचे जनक होते, ब्रिगेडीअर जनरल रेगिनाल्ड डायर व पंजाबचा प्रशासक मायकेल ओ’ डवायर (O’Dwyer).
रौलट कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी ६ एप्रिल १९१९ रोजी देशव्यापी हरताळ जाहीर केला होता, त्याला अमृतसरमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या दिवशी अमृतसरमध्ये सर्व व्यवहार बंद राहिले, रस्ते ओस पडले, लोकांनी घरात राहून उपवास केला, प्रार्थना म्हटल्या. या प्रतिसादाने हबकलेल्या प्रशासनाने अमृतसरमध्ये हरताळाचे नेतृत्व करणारे डॉ.सैफुद्दीन किचलू, व डॉ. सत्यपाल यांना केलेली अटक व त्यांची धरमशाला इथे केलेली रवानगी, तसेच महात्मा गांधींना पंजाब सीमेवर झालेली अटक व त्यांची मुंबईला केलेली रवानगी, याचा जाब विचारायला गेलेल्या मोठ्या समुदायावर गोळीबार, त्यात गेलेले बळी, परिणामी अमृतसरमध्ये भडकलेला हिंसक दंगा, त्यात पाच युरोपीय नागरिकांचे गेलेले बळी, एका मिशनरी शिक्षिकेवर झालेला जीवघेणा हल्ला आदि घटनांच्या पार्श्वभूमीवर जालियानवाला बाग हत्याकांड घडले. ९ व १० एप्रिल या दोन दिवसांत निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती हाताळण्यासाठी ११ एप्रिल रोजी अमृतसर शहर लष्कराच्या हवाली करण्यात आले. १२ एप्रिलला ब्रिगेडीअर जनरल रेगिनाल्ड डायरने शहराचा ताबा घेतला. त्याने शहरात जमावबंदी लागू केली. रात्रीचा कर्फ्यू जारी केला. जमाव केल्यास जमावावर गोळीबार केला जाईल, अशी दवंडी दुपारपर्यंत पिटत त्याचा ताफा १३ एप्रिल रोजी अर्ध्या शहरातून फिरला होता. तरीही जालियानवाला बागेत अहिंसक सत्याग्रही निषेध सभेसाठी जमले होते. असे दुःसाहस करणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या इराद्याने डायरचा लष्करी ताफा जालियानवाला बागेत पोहोचला.
जालियानवाला बाग ही नावाप्रमाणे बाग नसून ६ ते ७ एकराचे ते एक पडीक मैदान होते. आसपासच्या घरांच्या भिंतींनी ते तीन बाजूंनी वेढले होते. एका बाजूला उंच तटबंदी होती. प्रवेशाचा मार्ग अरुंद होता. आत जाण्याचा व बाहेर पडण्याचा तो एकुलता मार्ग होता. मैदानात एक समाधी, विहीर व काही झाडे होती. अशा या मैदानात त्यावेळी सुमारे २५ हजार लोकांचा जमाव शांतपणे मैदानाच्या एका बाजूला उभ्या केलेल्या तात्पुरत्या मंचावरून बोलणाऱ्या वक्त्यांची भाषणे ऐकत होता. त्यात बैसाखी या सणाचा दिवस असल्याने आजूबाजूच्या गावांतून पवित्र सुवर्णमंदिरात दर्शनासाठी, तेथील पवित्र तळ्यात स्नानासाठी तसेच या निमित्ताने भरणाऱ्या बाजारात गुरांच्या खरेदी – विक्रीसाठी आलेले लोकही तिथे विश्रांती घेत होते. ब्रिगेडियर-जनरल डायर ५० जणांची फौज आणि दोन सशस्त्र लष्करी वाहने – ज्यात मशीनगन्स तैनात होत्या – घेऊन जालियानवाला बागेत आला, तेव्हा सूर्यास्ताला पांच मिनिटे कमी होती. प्रवेश मार्ग अरुंद असल्याने सशस्त्र वाहने आत शिरू शकली नाहीत. डायरने सैनिकांना मैदानाच्या डाव्या व उजव्या बाजूला एका रांगेत तैनात करून त्यांना रायफली सज्ज करण्याचा आदेश दिला. डायरने लोकांना कोणताही इशारा दिला नाही. सभा बेकायदा असल्याचे घोषित केले नाही. लोकांना शांतपणे निघून जाण्याची सूचना दिली नाही. त्याने सैनिकांना थेट गोळीबाराचा आदेश दिला आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडू लागल्या. मैदानात गोंधळ उडाला. हा हल्ला अनपेक्षित होता. जीवाच्या भीतीने लोक धावत सुटले. पण जाणार कोठे ? बाहेर पडण्यासाठी एकुलता एक अरुंद मार्ग होता आणि त्या बाजूनेच गोळ्यांचा भडीमार सुरु होता. परिणामी असंख्य लोक मृत्युमुखी पडले. कित्येकांनी मैदानातल्या खोल विहिरीत उड्या टाकल्या. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. (अधिकृत आकडेवारी ३७९ मृत व ११३७ जखमी अशी आहे.) या दुर्दैवी दिवशी निरपराध आणि निःशस्त्र जमावावर १६०० गोळ्यांची बरसात झाली. सतत दहा मिनिटे गोळीबार चालू होता. गोळ्यांचा साठा संपला तेव्हाच गोळीबार थांबला.
सत्ताधाऱ्यांच्या क्रौर्याने परिसीमा ओलांडली होती. त्याचे तीव्र पडसाद भारतात आणि इंग्लंडमध्येही उमटले. जे घडले ते भयानक होते. याचा निषेध म्हणून नोबेल पुरस्काराने सन्मानित कवी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्लंडच्या राजाने बहाल केलेला नाईटहूड किताब परत केला. महात्मा गांधींनी त्यांना बहाल करण्यात आलेले कैसर-ई-हिंद सुवर्णपदक परत केले. गांधींचे मित्र व चर्च ऑफ इंग्लंडचे धर्मोपदेशक सी.एफ.अँड्र्युज यांनी या घटनेला अमानुष म्हटले. इंग्लंडच्या संसदेत तत्कालीन युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी घणाघाती भाषण करून या घटनेचा तीव्र निषेध केला. जालियानवाला बाग कांड हा ब्रिटिश साम्राज्यावरचा कलंक असल्याची खंत अनेक उदारवादी ब्रिटिशानी व्यक्त केली. गांधीजी म्हणाले, ‘प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, अमृतसर घटनेने त्याला हादरा दिला.’
परकीय सत्ताधीशांच्या अपरिमित क्रौर्याचे उदाहरण ठरलेले जालियानवाला बाग आज राष्ट्रीय स्मारक बनले आहे. आता तिथे खरोखरच बाग आहे. या बागेत हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अखंड ज्योत तेवत आहे. त्या काळ्या दिवसाच्या खुणा अजूनही तिथे स्पष्ट आहेत. आज ही बाग एक स्मृती संग्रहालय बनली आहे. हजारो लोकांनी ती सतत वरदळलेली असते. भारताच्या विविध भागांतील पोशाखांनी सजलेली असते. भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांनी गजबजलेली असते. परिसरातल्या भिंतींवरील बुलेट मार्क्स आणि शेकडोंना समाधी देणाऱ्या विहिरीचा तळ पाहून अवाक होणारे डोळे बघायला मिळतात. असंख्य सेल्फीचा खेळ सातत्याने सुरु असतो. वातावरणातील सेलिब्रेशन काहीवेळा गोंधळून टाकणारे असते. हे स्वाभाविक आहे. शंभर वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत. तरीही जी स्वातंत्र्याची असीम इच्छा दडपून टाकण्यासाठी जालियानवाला बाग घडले, ती इच्छा खरेच पूर्ण झाली आहे का? स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकानंतरही आपला श्वास खरेच मुक्त आहे का? ज्या वेदनांच्या पायावर आपले स्वातंत्र्य उभे राहिले,  त्या वेदना खरेच संपल्या आहेत का? की वेदनांना बधिर करणारी सुगंधी भूल वातावरणात भरून आहे? आपल्या उत्थानाचे देखावे आपल्या समोर मांडून ठेवले आहेत? स्वातंत्र्याचे अर्थ अनेक आहेत. वेदनेतून मुक्तता, शोषणातून मुक्तता, वंचिततेतून मुक्तता, भेदभावातून मुक्तता, अज्ञानातून मुक्तता, गरिबीतून मुक्तता, अभावातून मुक्तता असे अनेक. प्रत्येकासाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा असू शकतो. प्रत्येकाला आपण स्वतंत्र आहोत याचा अनुभव घेता आला पाहिजे. पण या अनुभवापर्यंत पोहोचू न देण्याचीच धडपड भोवती सुरू असल्याचे दिसते. समता, बंधुता, मुक्तता, सुरक्षितता, सर्वसमावेशकता हा आपल्या स्वातंत्र्याचा व्यापक अनुभव असला पाहिजे, मात्र निव्वळ शब्दांच्या भोवऱ्यातच आपण गरगरत आहोत किंवा आपल्याला गरगरत ठेवले जात आहे.
जालियानवाला बाग आपल्या एका स्वातंत्र्याच्या लढाईची साक्ष आहेच, आता शंभर वर्षांनतर आपल्या अजूनही बाकी असलेल्या व्यापक स्वातंत्र्याची ते प्रेरणा बनले पाहिजे.

COMMENTS