तालिबानने अफगाणिस्तानातील गझनीही बळकावले

तालिबानने अफगाणिस्तानातील गझनीही बळकावले

काबूल: अफगाणिस्तानातील महत्त्वाचे असे शहर गझनी तालिबानने बळकावल्याचे बीबीसीचे वृत्त आहे. गझनी बळकावल्यानंतर आजपर्यंत तालिबानने आठवडाभरात १० प्रादेशिक

अमेरिका भेटीतून इम्रानने बरंच कमावलं
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात १०० हून अधिक ठार?
बायडन यांच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान देशोधडीला

काबूल: अफगाणिस्तानातील महत्त्वाचे असे शहर गझनी तालिबानने बळकावल्याचे बीबीसीचे वृत्त आहे. गझनी बळकावल्यानंतर आजपर्यंत तालिबानने आठवडाभरात १० प्रादेशिक राजधान्या आपल्या ताब्यात घेतल्या असून येत्या दोन महिन्यात तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबूलही ताब्यात घेऊ शकते असे अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचे म्हणणे आहे.

तालिबानकडे देशातल्या एकूण ३४ प्रादेशिक राजधान्या ताब्यात आल्या आहेत.

दरम्यान गझनी बळकावल्यानंतर या शहराचे गव्हर्नर व त्यांचे उपप्रमुख या दोघांनी पलायन केले. त्या दोघांना अफगाण सैन्याने ताब्यात घेतले आहे.

गझनी हे काबूल-कंदाहार मार्गावरील सर्वात महत्त्वाचे शहर आहे. गझनीचा पाडाव झाल्याने तालिबानकडे काबूलला वेढा घालण्यासाठी आवश्यक ती सामग्री जमा करण्याची संधी मिळाली आहे. गझनी ताब्यात आल्याने तालिबानकडे अन्नसाठा व अन्य सामग्रीची कमतरता भासणार नाही.

गझनी शहराचा मोठा भाग ताब्यात घेतल्याचे गझनी प्रादेशिक परिषदेतील एका सदस्याने बीबीसीला सांगितले. पण पोलिसांचा तळ अफगाण सैन्याच्या ताब्यात असल्याचे समजते.

दरम्यान तालिबानने कंदाहार ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले असून कंदाहारच्या सीमेवर जोरदार चकमक सुरू आहे. तालिबानने कंदाहारमधील कारागृह ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे पण त्याला दुजोरा मिळालेला नाही.

तालिबानने हेलमंड प्रांताची राजधानी लष्कर गाह व तेथील पोलिस मुख्यालयही आपल्या ताब्यात घेतले आहे.

गेल्या महिन्याभरात या यादवीत अफगाणिस्तानात १ हजारहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर तालिबानने ताब्यात घेतलेल्या अनेक प्रांतातून भयभीत नागरिक काबूलच्या दिशेने वाटचाल करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंढे येत असल्याने काबूल शहराच्या बाहेर निर्वासित तळ उभे करण्यात आले आहे. या निर्वासितांना अन्न, औषधे यांचा तुटवडा भासत आहे.

अफगाणिस्तानातील यादवी लक्षात घेता जर्मनीने अफगाणिस्तानला देऊ केलेली ५० कोटी डॉलरची मदत थांबवू असा इशारा दिला आहे.

दरम्यान बुधवारी अफगाणिस्तान सरकारने आपले लष्करप्रमुख वाली मोहम्मद अहमदझाई यांना पदावरून दूर केले असून अध्यक्ष अशरफ गानी मझार-ए-शरीफ या शहरात गेले आहेत. तेथे ते सरकार समर्थनासाठी जनतेशी संवाद साधणार आहेत. मझार-ए-शरीफ हे उजबेकिस्तान व ताजिकीस्तानच्या सीमेलगत असून हे शहर तालिबानच्या ताब्यात गेल्यास संपूर्ण उत्तर अफगाणिस्तानावर तालिबानचे नियंत्रण येऊ शकते.

गेल्या ४ दिवसांत घडलेल्या घटना

तालिबानने समांगन या उत्तरेकडील प्रदेशाची राजधानी ऐबक काबीज केल्याचा दावा केला असून, तालिबानी बंडखोरांनी ताब्यात घेतलेली ही सहावी प्रादेशिक राजधानी आहे. ऐबकवर ताबा मिळवण्याचा दावा करणारे संदेश तालिबानच्या प्रवक्त्याने सोमवारी प्रसार माध्यमांना पाठवले.

समांगनच्या उपप्रादेशिक गव्हर्नरनेही एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना, तालिबानने ऐबक बळकावल्याच्या दाव्याला, दुजोरा दिला.

ऐबकमधील सर्व सरकारी व पोलिस यंत्रणा आपल्या ताब्यात आल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने ट्विटरमार्फत दिल्यानंतर थोड्याच वेळात, हा भाग तालिबानच्या ‘संपूर्ण नियंत्रणात’ गेल्याचे उपप्रादेशिक गव्हर्नरने सांगितले. सशस्त्र तालिबानींनी प्रादेशिक गव्हर्नरच्या कार्यालयाचे आवार, गुप्तचर संचालनालय, पोलिस मुख्यालये आणि अन्य सर्व सरकारी इमारतींवर नियंत्रण मिळवले आहे असा दावा तालिबानने केला आहे.

ऐबक ही गेल्या चार दिवसांच्या काळात तालिबानींच्या हातात पडलेली, उत्तरेकडील पाचवी प्रादेशिक राजधानी, तर एकंदर अफगाणिस्तानमधील सहावी राजधानी आहे.

यापूर्वीच तणावाखाली असलेल्या अफगाण संरक्षण दलांवरील ताण समांगन हातातून गेल्यामुळे आणखी वाढणार आहे. कारण, कमांडो आणि अतिरिक्त दले, राजधान्या गमावलेल्या अन्य पाच प्रदेशांमध्ये, पाठवण्यात आली आहेत. कुंडुझ, ताखर, जोव्झजान, सर-ए-पोल, निम्रुझ या पाच प्रदेशांच्या राजधान्या तालिबानींनी यापूर्वीच बळकावल्या आहेत. याशिवाय हेरत, कंदाहार आणि हेलमांड प्रदेशांमध्येही सुरक्षा दले पाठवण्यात आली आहेत.

आता तालिबानी बंडखोर मझार-इ-शरीफच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे तालिबानने सोमवारी जाहीर केले. मझार-इ-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे.

रविवारची संपूर्ण रात्र आणि सोमवारच्या दिवसभरात बल्ख, बदकशान आणि पंजशिर भागांतून बातम्या येत होत्या. या भागांच्या (डिस्ट्रिक्ट्स) राजधान्या ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे.

जोव्झजान, कुंडुझ आणि सर-ए-पोल या भागांत पूर्वीपासून तालिबानींचा जोर होता. मात्र, समांगन हा प्रांत तुलनेने सुरक्षित समजला जात होता. या भागात तालिबानींचे अस्तित्व नाममात्र होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत या भागांत तालिबानींचा जोर सातत्याने वाढत आहे.

सरकारी सैन्यदलांनी कुडुंझमध्ये तालिबानींना हुसकावून लावण्याचे काम सुरू केले असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांनी रविवारी केला. मात्र, तालिबानी सोमवारचा संपूर्ण दिवसभर विमातळाच्या नजीक जाण्याच्या प्रयत्नात होते, असे स्थानिक रहिवाशांनी ‘अल जझिरा’ला सांगितले. प्रत्यक्ष घटनास्थळावरील स्रोतांच्या सांगण्यानुसार, तालिबानी सशस्त्र बंडखोर विमानतळापासून ३ किलोमीटर अंतरावर पोहोचले होते आणि शहरात सातत्याने चकमकी सुरू होत्या.

काबूलहून कुंडुझला जाणारा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून तालिबानींच्यात ताब्यात असल्यामुळे, त्यांनी विमानतळही ताब्यात घेतला तर त्याचे परिणाम भीषण होतील ही भीती नागरिकांच्या मनात आहे. यामुळे नागरिकांचे निर्वासन करण्याची शक्यताच संपून जाईल ही चिंता त्यांना वाटत आहे.

रविवारी दुपारी तालिबानने शहरातील मुख्य चौकात आपला पांढरा ध्वज फडकावला. तेव्हापासून अनेक जखमी नागरिकांवर उपचार केल्याची माहिती कुुंडुझमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, कंदाहार, हेरत आणि लष्कर गाह या शहरांतील नागरिकांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या राजधान्यांच्या जवळ सातत्याने चकमकी सुरू आहेत. या राजधान्या ताब्यात घेण्यासाठी तालिबान गेल्या महिनाभरापासून प्रयत्नशील आहे.

हेलमंड प्रदेशाची राजधानी लष्करगाहपासून जवळ असलेल्या एका शाळेच्या व रुग्णालयाच्या इमारतीची, अमेरिका व अफगाणिस्तान सरकारने चालवलेल्या हवाई हल्ल्यांत, पडझड झाल्याच्या बातम्या आहेत. मात्र, त्यांना अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकलेला नाही. हवाई हल्ले झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. मात्र, हे हल्ले तालिबानी ठाण्यांना लक्ष्य करून झाले व यात ५४ बंडखोर ठार, तर २३ जखमी झाले असा सरकारचा दावा आहे. यात रुग्णालय किंवा शाळेच्या इमारतीचे नुकसान झाल्याचा उल्लेख नाही.

अफगाणिस्तानातील अधिकारी दीर्घकाळापासून अतिरिक्त मदतीची मागणी करत आहेत. परदेशांतून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून किंवा स्वत:चे हवाईदल विकसित करून हे साध्य करण्याची मागणी ते करत आहेत. मात्र, अशा हल्ल्यांमध्ये नागरिकांचाच मृत्यू झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0