द्रविडी सत्तायम….!

द्रविडी सत्तायम….!

तामिळनाडूची विधानसभा निवडणूक यावेळी अण्णा द्रमुक व द्रमुक या पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये लढली जाणार नाही. यात तिसरा पक्ष भाजपही आपली देशव्यापी ताकद घेऊन उतरला आहे.

महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन
कर्नाटकातील आक्रमक हिंदुत्ववादात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही!
कलम ३७० चे मिथक आणि राजकारण!

राष्ट्रीय राजकारणाच्या अवकाशात तमिळनाडू हे बहुदा एकमेव राज्य असेल जिथे दोन पक्षातच सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असते आणि आलटून पालटून हे दोन्ही पक्ष राज्य करतात. एआयडीएमके (अण्णा द्रमुक) आणि द्रमुक या दोन शक्तिशाली प्रादेशिक पक्षातच सत्तेचा हा लोण्याचा गोळा खाल्ला जात असला तरी यावेळची निवडणूक मात्र या दोन मांजरांच्या सत्तारुपी लोण्याचा भांडणात तिसराच कोणी तरी तो हडप करेल, अशी पुसटशी शंका निर्माण झाली आहे. हा तिसरा पक्ष म्हणजे अर्थातच ‘के टू के’ अशी टॅग लाईन (काश्मीर ते कन्याकुमारी ) असलेला भारतीय जनता पक्ष.

या राज्यातील निवडणुकीचा १९७७ पासून आढावा घेतला तर हे स्पष्ट होते की डीएमकेने अनेकदा एकूण मतांपैकी ३५ टक्के मते कायम राखून पाच वेळा सत्ता हस्तगत केली आहे. १९९६ पर्यंत एआयडीएमकेने ३० टक्क्यांनी अधिक मते कधीही मिळविली नव्हती. यापूर्वीच्या सर्व  निवडणूका या एम. करुणानिधी आणि जे. जयललिता या दोन नेत्यांत लढल्या गेल्या. त्यातील करुणानिधी हे डीएमकेचे तर जयललिता या एआयडीएमकेच्या शक्तीशाली नेत्या. आता मात्र हे दोन्ही नेते हयात नसताना निवडणूक होत आहे. काँग्रेस अथवा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे येथील अस्तित्व हे संपूर्ण सजलेल्या थाळीतील लोणचे असल्यासारखेच राहिले आहे. यावेळी मात्र भाजपची ताकद काही प्रमाणात वाढली असल्याचे दिसत असले तरी जोडतोडच्या समीकरणात ते कितपत यशस्वी होतात यावर त्यांची वाटचाल ठरेल.

सध्या एआयडीएमकेबरोबर भाजप सत्तेत लहान भावाच्या भूमिकेत असला तरी आम्हीच मोठा भाऊ अशी वलग्ना स्थानिक नेत्यांकडून वारंवार होत आहे. सुपरस्टार रजनीकांत याला राजकारणात उतरवून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून एआयडीएमकेच्या उमेदवारांची शिकार करण्याच्या भाजपच्या मनसूब्यावर रजनीनेच पाणी फिरवले. त्यामुळे भाजपला येथे ‘बिहार पॅटर्न’ राबविता आला नाही.

यावेळी एआयडीएमके सत्तेत असून ई. के. पलानीस्वामी हे मुख्यमंत्रीपदी आहेत. जयललिता यांच्या नंतर एआयडीएमकेमध्ये पक्ष कोणाच्या ताब्यात यावरून मोठे राजकारण रंगले. जयललिता यांच्या विश्वासू सहकारी के. शशिकला यांना अवैध संपत्ती कारणावरून जेलवारी करावी लागली. चार वर्षांनी त्या तुरूंगातून बाहेर आल्या आणि एआयडीएमकेच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे विराट स्वागत केले. त्यामुळे एआयडीएमके मध्येच पक्षाची सूत्रे आता इ. पलानिस्वामी आणि शशिकला यांच्या पैकी कोण खेचणार यावर पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा भावी चेहरा ठरणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री पलानिस्वामी हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील. एकेकाळी शशिकला यांच्या समर्थक म्हणून पलानिस्वामी यांची ओळख होती पण नंतर पक्ष कोणाच्या ताब्यात राहणार यावरून त्यांच्यात वितुष्ट आले.

तमिळनाडूमध्ये शशिकला या चिन्नम्मा म्हणजे मावशी म्हणून ओळखल्या जातात. तुरूंगातून मुक्त होऊन बाहेर येताच रस्तोरस्ती शशिकला यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. एक भला मोठा हार घालण्यासाठी चक्क एक क्रेन मागवावी लागली. चाहत्यांचा हा उत्साह पाहून मग शशिकला यांनीही राज्याचे नेतृत्व आपण करणार याची ग्वाही दिली. जयललिता यांनी पुढील १०० वर्षे अण्णा द्रमुक पक्षाची वाटचाल चालली पाहिजे असे सांगितले होते. त्यांची ही इच्छा मी पूर्ण करणार असे शशिकला यांचे म्हणणे आहे.

करुणानिधी यांच्यानंतर द्रमुकचे नेतृत्व एम. के. स्टॅलिन यांच्याकडे आहे. गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकबाबत लोकांच्या मनात असलेली नकारात्मक भावनेचा फायदा द्रमुक उठविण्याचा प्रयत्न करेल. स्टॅलिन हे गेली ३० हून अधिक वर्षे राजकारणात आहेत. चेन्नईचे महापौर ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. राजकारण आणि समाजकारण याची नस माहीत असलेला नेता म्हणून ते ओळखले जातात. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकने २३४ पैकी १३६ तर द्रमुकने ८९ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ ८ जागा मिळाल्या होत्या.

राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे कोंगु भागात आणि काही मध्य तमिळनाडूमध्ये द्रमुकला जास्त जनाधार नाही. या सर्व भागातून अण्णा द्रमुक ४० ते ४३ जागा नेहमी हस्तगत करतात. शहरी आणि निमशहरी भागातही अण्णा द्रमुकचे प्राबल्य आहे. द्रमुक हा राज्याच्या पूर्व तसेच काही ग्रामीण पट्ट्यात मूळ धरून आहे. तिथे द्रमुक किती जागा घेतो त्यावर संख्याबळ ठरेल. विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या समोर पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना १२ हजार कोटी रु.ची कर्जमाफी केली आहे. तसेच अनेक सवलतीच्या घोषणांचा धडाका लावला आहे. पलानिस्वामी हे १९८० पासून राजकारणात आहेत. १९८७ मध्ये  एम. जी. रामचंद्रन यांचे निधन झाल्यावर पक्षात जी फूट पडली होती त्यावेळी त्यांनी जयललिता यांना पाठिंबा दिला. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी शशिकला यांचा विश्वास संपादन करून मुख्यमंत्रीपद मिळवले. आज स्थिती अशी आहे की शशिकला आणि त्यांच्यातून विस्तवही जात नाही.

या सर्व घडामोडीमध्ये अभिनेता कमल हसन यांनी तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तविली आहे. मक्कल निधी मयम या आपल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्यांनी हे संकेत दिले. रजनीकांत आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

द्रविडी सत्तायनाच्या या सापशिडीमध्ये कोण शिडी चढून सत्ता हस्तगत करतो हे लवकरच समजेल.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: